ऑक्‍लंड, लॉर्ड जॉर्ज ईडन: (२५ ऑगस्ट १७८४–१ जानेवारी १८४९). ब्रिटिश अंमलाखलील हिंदुस्थानचा १८३५ ते १८४२ या काळातील गव्हर्नर जनरल. ऑक्‍लंडने १८१४ मध्ये बॅरन झाल्यावर हाऊस ऑफ लॉर्ड्समध्ये प्रवेश केला. तो १८३० पासून १८३४ पर्यंत बोर्ड ऑफ ट्रेडचा अध्यक्ष होता. त्याची हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल म्हणून १८३५ मध्ये नेमणूक झाली.

हिंदुस्थानात १८३७३८ मध्ये मोठा दुष्काळ पडला होता. यावेळी ऑक्‍लंडने दुष्काळनिवारणार्थ एक सरकारी चौकशी समिती नेमली. त्याचप्रमाणे स्वत:च्या खाजगी मिळकतीतून त्याने दुष्काळपीडितांना मदत दिली. याच सुमारास अफगाणिस्तानचा अमीर दोस्त मुहम्मद याने इराण व रशिया यांच्या अफगाणिस्तानमधील हालचालींना प्रतिबंध करण्यासाठी व रणजितसिंगाने घेतलेला पेशावर प्रांत परत मिळविण्यासाठी ऑक्‍लंडच्या मैत्रीची याचना केली. पूर्वीपासून शिखांशी असलेली मैत्री टिकविण्याच्या दृष्टीने ऑक्‍लंडने दोस्त मुहम्मदाला सहकार्य करण्यास नकार दिला. म्हणून इंग्रजांवर दडपण आणण्यासाठी दोस्त मुहम्मदाने इराण व रशिया यांच्याशी तहाची औपचारिक बोलणी सुरू केली. या घडामोडीच्या संदर्भात इंग्‍लंडहून आदेश येताच ऑक्‍लंडने दुसऱ्याच्या राज्यात हस्तक्षेप न करण्याचे आपले मूळचे धोरण बदलले. त्याने रणजितसिंगाच्या मदतीने पूर्वी पदच्युत केलेला अफगाणिस्तानचा अमीर शाह शुजा याला काबूलच्या गादीवर बसविण्याचे ठरविले. त्याप्रमाणे ऑक्‍लंडने शाह शुजा व रणजितसिंग यांच्याबरोबर जून १८३८ मध्ये तह केला व मार्च १८३९ मध्ये शाह शुजाला गादीवर बसविण्यासाठी अफगाणिस्तानात सैन्य पाठविले. ह्या पहिल्या इंग्रजअफगाण युद्धाच्या सुरुवातीस इंग्रजांना जय मिळाला व त्याबद्दल ऑक्‍लंडला ‘अर्ल ऑफ ऑक्‍लंड’ ही पदवीही मिळाली,परंतु पुढे या युद्धात इंग्रजांची पीछेहाटच झाली.

इंग्रजअफगाण युद्ध चालू असताना ऑक्‍लंडने सिंधच्या अमीराशी झालेला पूर्वीचा तह मोडून त्याच्यावर नवीन अटी लादल्या. त्याच्याकडून तीन लाख रुपयांची मागणी केली. त्याचप्रमाणे त्याने अयोध्येच्या गादीवर येणाऱ्या नव्या नबाबाशी तह करून त्याच्यावरही अटी लादल्या. परंतु हा तह ईस्ट इंडिया कंपनीच्या डायरेक्टरांना मान्य नव्हता. अफगाण युद्धामुळे ऑक्‍लंडला संस्थानिकांकडे लक्ष देण्यास वेळ झाला नाही, तरी त्याने मद्रासमधील कर्नूलचे संस्थान खालसा केले. १८३९ मध्ये त्याने सातारच्या प्रतापसिंह राजाला इंग्रजांविरुद्ध कारस्थाने केल्याच्या निमित्ताने पदच्युत करून त्याच्या भावाला गादीवर बसविले. ऑक्‍लंडने यात्रेकरूंवरील कर बंद करून धार्मिक बाबतीत लोकांना स्वातंत्र्य दिले. शेतीविषयक सुधारण केल्या. व्यापार व उद्योगधंदे ह्या खात्यांचा विस्तार केला. भारतीय शिक्षणसंस्थांमध्ये सुधारणा केली. मुंबई व मद्रास येथे वैद्यकीय महाविद्यालये काढली. १८४२ मध्ये ऑक्‍लंड इंग्‍लंडला परत गेला. पुढे ब्रिटिश नौअधिकारणाचा पहिला लॉर्ड म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली होती (१८४६).

देवधर, ना.