गंग घराणे : भारतातील कर्नाटक व ओरिसा राज्यांत चौथ्या शतकापासून ते पंधराव्या शतकांपर्यंत गंग घराण्याचे प्राबल्य होते, तथापि आठव्या शतकापासून पुढे ओरिसामध्ये त्याचा जोर अधिक वाढला आणि गंग घराणे प्रबल झाले. त्याच्या पूर्व व पश्चिम शाखांमध्ये काही नाते होते किंवा पूर्वीची शाखा ही पश्चिमेच्या शाखेतूनच उद्‌भवली, ह्याविषयी फारसी विश्वसनीय माहिती ज्ञात नाही, परंतु गंग घराण्याच्या दोन शाखा होत्या. पश्चिम शाखा पूर्वीच्या दक्षिण म्हैसूर प्रदेशावर राज्य करीत होत्या. तिच्या अंमलाखालील प्रदेशाला गंगवाडी म्हणत. तिची राजधानी प्रथम कोलार आणि नंतर तैलकाड ही होती. पूर्वशाखांच्या 

भक्तिलीन स्त्रीमूर्ती, श्रवणबेळगोळ

नंतरच्या लेखात म्हटले आहे, की कोलाहल नामक राजानेगंगवाडी प्रदेशात कोलाहलपुर स्थापून तेथे आपली राजधानीकेली. नंतर काही काळाने कामार्णवाने आपल्या चुलत्याला गादी देऊनआपल्या भावांसहदेश जिंकण्याकरिता प्रयाण केले आणि कलिंग दे शात महें द्र पर्वताजवळ येऊन तेथील राजाला पदच्युतकरून तो आपल्या चार भावांसहराज्य करूलागला.नंतरच्या या आख्यायिकेतचकि ती तथ्य आहे, हे सांगता येत नाही. तथापिआरंभीपांच गंग राज्ये असून नंतर त्यांचे एकीकरण झाले, असे काही कोरीव लेखांत म्हटले आहे. पूर्व शाखेची राजधानी कलिंगनगर (सध्याचे मुखलिंगम्) येथे होती.

पश्चिम शाखा : या शाखेचा मूळपुरूष कोंगुणिवर्मा हा चौथ्या शतकाच्या उत्तरार्धात होऊन गेला. याची राजधानी कोलार येथे होती. पुढे त्याचा वंशज आय्यवर्मा (सु. ४५o–६o) याने ती तैलकाड येथे नेली. यालाच नंतरच्या लेखांत हरिवर्मा म्हटले आहे.

गंगराजे हे आरंभी पल्लवांचे मांडलिक होते, पण पुढे दुर्विनीत (सु. ५४0–६00) याने पुन्नाड (दक्षिण कर्नाटक) आणि कोंगुदेश जिंकून त्यांचे जूं झुगारून दिले. त्यानंतरचा राजा श्रीपुरूष याने पांड्यांशी सख्य करून पल्लवांशी युद्ध केले. त्याचे राज्य राष्ट्रकूट, पल्लव आणि पांड्य यांच्या राज्यांमध्ये असल्याने त्याला मोठ्या सावधगिरीने वागावे लागे. त्याने कोंगुणिराजाधिराज परमेश्वर अशी पदवी धारण करून बंगलोरजवळ मान्यपूर (मण्णे) येथे आपली राजधानी नेली.

त्याचा पुत्र श्रीपुरूष (७२५–८0) याला राष्ट्रकूटांशी झगडावे लागले. राष्ट्रकूट नृपती ध्रुव आणि तिसरा गोविंद यांनी त्याला दोनदा बंदीत टाकून आपल्या राजकुमारांना राज्यशासक नेमले होते. पण गोविंदाचा पुत्र पहिला अमोघवर्ष याच्या कारकीर्दीत पुन्हा गंगानी आपले वर्चस्व स्थापले. तिसऱ्या कृष्णाने आपला मेहुणा बूतुग याला गंगवाडीचा अधिपती केले. त्याचे वंशज पुढे काही पिढ्या तैलकाड येथे राज्य करीत होते. त्यांपैकी राजमल्लाचा प्रधान चामुंडराय याने ९८३ मध्ये श्रवणबेळगोळ येथे गोमटेश्वराचा मव्य पुतळा उभारला.

गंगांची पांड्यांच्या बाजूने पल्लवांशी आणि राष्ट्रकूटांचे साहाव्यक म्हणून चोलांशी वरचेवर युद्ध होत. शेवटी १००४ मध्ये चोलांनी तैलकाड काबीज करून गंगांना आपले स्वामित्व कबूल करावयास लावले, नंतर लवकरच गंग नामशेष झाले.

पूर्व शाखा: पाचव्या शतकाच्या अखेरीस वाकाटक नृपती हरिषेण याच्या स्वाऱ्यांमुळे कलिंग प्रदेशात जी अस्थिर परिस्थिती उत्पन्न झाली, तीत पूर्व शाखेच्या गंगांचा उदय झाला. त्यांनी आपल्या राज्य-स्थापनेचा द्योतक असा गांगेय (किंवा गंग) संवत् चैत्र शुल्क प्रतिपदा शक संवत् ४२o (१४ मार्च ४९८) या दिवशी स्थापला. हा गंग संवत् कलिंग देशात निदान ५२६ वर्षे प्रचलित होता. पुढे त्याची जागा शक संवताने घेतली.

या वंशाचा पहिला ज्ञात राजा पहिला इंद्रवर्मा. याचा गंग संवत् ३९ चा लेख सापडला आहे. तोच कदाचित या घराण्याचा मूळ पुरूष असावा. यानंतरच्या अनेक राजांचे अकराव्या शतकाच्या आरंभापर्यंतचे ताम्रपत्र सापडले आहेत. हे राजे महेंद्र पर्वतावरील गोकर्णेश्वराचे उपासक होते. त्यांची राजधानी कलिंगनगर (मुखलिंगम्) येथे होती. ते त्रिकलिंगाधिपती अशी पदवी धारण करीत पण तिचा नक्की अर्थ विवादास्पद आहे. यांचे राज्य सामान्यत: गंजाम आणि विशाखापटनम् जिल्ह्यांना व्यापून असे. आरंभीच्या काही लेखांत हे आपणास तुंबुरू गंधर्वाचे वंशज म्हणवीत पण पुढे त्यांनी आपला वंश ययातीचा पुत्र तुर्वसु याच्यापासून उत्पन्न झाला, अर्थात आपण सोमवंशी आहो, असे मानण्यास सुरूवात केली.

गंगांचा मधला काही इतिहास संशयित आहे. शक संवत् ९६o (१0३८) मध्ये अभिषिक्त झालेल्या पाचव्या वज्रहस्ताच्या वंशजांस उत्तरकालीन गंग म्हणतात. त्यामध्ये अनंतवर्मा-चोडगंग हा महाप्रतापी राजा होऊन गेला. हा १o७८ मध्ये गादीवर आला. याने कुलोत्तुंग चोल, दक्षिण कोसलचे कलचुरी, ओरिसाचे सोमवंशी आणि बंगालचे पाल यांच्याशी युद्धे करून त्यांपैकी बहुतेकांवर विजय मिळविले आणि आपले राज्य गंगेपासून गोदावरीपर्यंत विस्तृत केले. त्याने पुरी येथे जगन्नाथाचे सुप्रसिद्ध देवालय बांधले.

याच्या वंशजांकडून लवकरच सेन राजांनी नैर्ऋत्येचा बंगालचा भाग जिंकून घेऊन तेथे आपले राज्य स्थापले पण लक्ष्मणसेनाच्या काळी मुहम्मद बखत्यारने स्वारी करून बंगाल जिंकला व तो १२००च्या सुमारास ओरिसाच्या सीमेपर्यंत येऊन पोहोचला. तिसरा राजराज आणि तिसरा अनंगभीम (१२१६–३५) यांनीही मुसलमानांचा पराभव करून आपले स्वातंत्र्य टिकविले. यानंतरही पहिला नरसिंह व दुसरा नरसिंह यांनीही मुसलमानी आक्रमणाला पायबंद घातला. पहिल्या नरसिंहाने (१२३८–६४) समुद्रकाठी ⇨कोनारक येथे भव्य सूर्यमंदिर बांधले. भारतातील अत्यंत आश्चर्यजनक अशा प्राचीन स्थापत्यकृतींत त्याची गणना होते.

चौदाव्या शतकात गंगांच्या राज्यावर मुसलमानांच्या वरचेवर खाऱ्या होत होत्या पण त्यांना यशस्वी रीतीने तोंड देऊन हे गंग राजे त्या परतवीत. त्यांना विजयानगरच्या हल्ल्यांनाही प्रतिकार करावा लागे. चौथ्या नरसिंहाच्या (१३७८–१४१४) कारकीर्दीत तर दक्षिण भारतआणि माळवा येथील मुसलमान अधिपतीं नी त्याच्यावर स्वारी केलीपण तीही त्याने परतविली. त्याच्या निधनानंतर त्याचा प्रधान कपिलेंद्र याने १४३४ मध्ये गादी बळकावली आणि अशा रीतीने जवळजवळहजार वर्षे राज्य करणाऱ्या गंग घराण्याचाअस्त झाला.

इतर प्रदेशात मुसलमानांच्या आक्रमणामुळे हिंदू राज्ये कोलमडून पडली पण गंग राजांनी दोन शतकांहून अधिक काळ त्यांचा यशस्वी प्रतिकार केला, हे त्यांस नि:संशय भूषणावह आहे.


साहित्य, कला इत्यादी: गंगांच्या कारकीर्दीत विद्या, वाङ्मय व कला यांस उत्तेजन आणि उदार आश्रय मिळाला. पश्चिम गंगाच्या दरबारी संस्कृतव कन्नड कवींना आश्रय होता. दुर्विनीत राजानेभारवीच्या किरातार्जनीयवर (सर्व १५) स्वत: टीका लिहिली होती. त्याने व्याकरणावर शब्दावतार हा ग्रंथलिहिला होता आणि प्राकृत बृहत्कथेचे संस्कृतमध्ये भाषांतर केले होते, ते सध्या उपलब्ध नाही. साहित्यदर्पणकर्ता विश्वनाथ आणि त्यांचेपूर्वज यांना पूर्व गंग राजांचा उदार आश्रय होता.

भैरवमूर्ती, सूर्यमंदिर, कोनारक.

गंगराजे हे वास्तुकला व मूर्तिकला ह्यांचेही भोक्ते होते. त्या काळी त्यांनीउत्तुंगदेवालयेबांधली. गंगांचा कल जरी मुख्यत: हिंदू धर्माकडे होता, तरी जैन इ. धर्मांबाबत त्यांचे धोरण सहिष्णू होते. त्यामुळे हिंदू धर्माबरोबरच इतर धर्मीयांच्या कलेचा विकास त्या काळात झालेला आढळतो. गंगाचे राज्य प्रथम पूर्वीच्या म्हैसूर राज्यातील कावेरी नदीच्या काठी होते व पुढे त्यांची एक शाखा ओरिसा राज्यात प्राचीन काळी ख्यातनाम पावलेल्या ⇨लिंगदेशात वृद्धिंगत पावली. साहजिकच त्यांच्या कलेचे नमुने कर्नाटक राज्यात, तसेच ओरिसामध्ये दृष्टोत्पत्तीस येतात. प्रथम राष्ट्रकूट, पल्लवव चालुक्य ह्यांचागंगांवर फार मोठा प्रभाव होता,किंबहुना त्यांचे राजकीय स्थान मांडलिक राजांचेच होते. त्यामुळे त्यांच्या कलेत पल्लव-चालुक्य-राष्ट्रकूटांचा प्रभाव दृग्गोचर होतो. गंगांचे पहिले शिल्पकाम नीतिमार्गह्या प्रतिमांचित्रात दिससे. यात गंगराजा राजमल्लआणि त्याचा वारस गंगराजपुत्र ह्यांचे भावस्पर्शीचित्रण केलेले असून आसन्नमरण राजमल्ल शरपंजरी  पडला आहे व त्याच्या शेजारी राजपुत्र उभा आहे, असे दाखविले आहे. पश्चिम गंगांची मूर्तिकलेची भव्यता श्रवणबेळगोळ येथील ⇨गोमटेश्वराच्या भव्य पुतळ्यात प्रतीत होते. हा पुतळा ९८३ मध्ये तयार केलेला असून त्याच्या बांधणीत चामुंडराय ह्या मुख्यमंत्रि-सेनापतीचे साहाय्य झाले असावे. हा पुतळा म्हणजे गंग मूर्तिकलेचा उत्कृष्ट अविष्कारच म्हणावा लागेल.

पूर्व गंगानी ओरिसामध्ये असंख्य मंदिरे बांधली. बहुतेक मंदिरे मुखलिंगम्‌च्या आसपास बांधण्यात आलेली आहेत. ह्यांतील अवशिष्ट मंदिरांमध्ये कलादृष्ट्या लिंगराज, परशुरामेश्वर, मुक्तेश्वर, राजाराणी, केदारेश्वर, ब्रह्येश्वर, सिद्धेश्वर (भुवनेश्वर) सूर्यमंदिर (कोनारक) जगन्नाथ मंदिर (पुरी) दुर्गा मंदिर (जाजपूर) वगैरे काही मंदिरे ख्यातनाम आहेत. यांतील काही मंदिरे पडली आहेत किंवा उद्‌ध्वस्त झालेली आहेत. मंदिरांच्या बांधणीतील शिखर, अंतरालय, सभामंडप, देऊळ व जगमोहन वैशिष्ट्यपूर्ण असून शिखराची रचना नागर पद्धतीची, बुंदेलखंडातील खजुराहो येथील मंदिरांसारखी उत्तुंग केलेली दिसते. त्यात टप्प्याटप्प्यांनी बांधकाम केलेले असून शिखर वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि ते पुढे निमुळते होत गेले आहे. मंदिराचे विधान चतुरस्त्र, पंचरथ, वृत्तसंस्थान किंवा नवरथ प्रकारचे आहे.

सर्व मंदिरांमधील परशुरामेश्वराचे मंदिर जुने (आठव-नववे शतक) आहे. त्यात देऊळ आहे, परंतु जगमोहनाची बांधणी आढळत नाही. त्यावरील चित्रशिल्पपट्ट्या व इतर आकृत्या अप्रतिम आहेत. एका चित्रशिल्पचौकटीत संगीतप्रेमी लोकांच्या प्रतिमा दर्शविलेल्या असून त्यांचे प्रमाणबद्ध शरीर, आविर्भाव (मुद्रा) व एकूण आकृत्यांची गुंफण ह्यांमुळे गुप्तकलेचे स्मरण होते. गुप्तकला ह्या सुमारास काही अंशी अवशिष्ट होती असे वाटते. मुक्तेश्वर मंदिर लघुचित्रणकलेचे संग्रहालय आहे. येथील प्रत्येक आकृती नमुनाकृती म्हणावी लागेल. येथील गवाक्षांवर माकडांची नीतिकथा चितारलेली आहे. एके ठिकाणी द्वाराच्या पाठीमागे उभी राहून आतुर झालेली वासकसज्जिका प्रियकराची वाट पाहत आहे, असे द्दश्य दाखविले आहे. त्याच वेळी वेळ घालविण्यासाठी ती गृहशुकाशी गप्पा मारीत आहे. ह्याशिवाय भिन्न आविर्भावांतील नागिणी-गंध, माल्य, धूप, शंखतीर्थ, मुकुट इ. अर्पण करीत असल्याचे दिसते. येथील सुरसुंदरी म्हणजे तर दगडांत साकार झालेले मूर्तिकारांचे स्वप्नच होय. ह्या मंदिराचे छोटे गर्भागार, त्याभोवतीची उत्थित शिल्पे असून त्यांतील वरूण, अग्नी, यम, निर्ऋत्ती आणि इतर दिक्पाल व सुरसुंदरी यांच्या प्रतिमा अप्रतिम आहेत. ह्याशिवाय मयूरांच्या नृत्यास झांजांच्या मधुर ध्वनीने प्रोत्साहन व प्रतिसाद देणारी अप्सरा कालिदासाच्या मेघदूतातील वर्णनाची आठवण करून देते, तर आपल्या पदांवरील मंजिरा उचलणारी अप्सरा मृच्छकटिक नाटकातील वसंतसेनेचे स्मरण करून देते.

लिंगराज आणि सूर्यमंदिर ही भव्य मंदिरे असून त्यांतील लिंगराज येथील एकसंध दगडातील गणेश, पार्वती, कार्तिकेय ह्यांच्या मूर्ती, तसेच नृत्यांगना व इतर मिथुन शिल्पेही शिल्पकलेतील विविधता आणि वैभव दर्शवितात. कोनारकचे सूर्यमंदिर तर वास्तुकलेचा अप्रतिम नमुना असून त्याच्या बांधणीत दाक्षिणात्य चोलांच्या वास्तुकलेतील द्वारसुरम् व चिदंबरम् येथील रथ-ज्ञापक (कल्पना) आत्मसात केलेले असून त्यात अश्व आणि चक्र ह्या कल्पनांची भर घातलेली आहे. ह्यातील रथ व चक्र ह्यांची प्रमाणबद्धता आणि त्यांवरील विविध प्रतिमांचे उत्थित शिल्पांत केलेले खोदकाम मनोवेधक आहे. मंदिराचा सर्व भागच शिल्पांकित केलेला दिसतो आणि त्यात विषयाची भिन्नता व रचनेचे वैविध्य दृष्टोत्पत्तीस येते. सबंध मंदिराची बांधणी वालुकाश्यमाने केलेली असून त्यात क्लचित मृदू अश्य व हिरव्या रंगाचा अश्मही आढळतो. हवामानामुळे मंदिरावरील अनेक शिल्पकृती खराब झाल्या आहेत तथापि कामशिल्पाकृतींसाठी हे मंदिर जगप्रसिद्ध आहे. शिवाय येथील चित्र-शिल्पपट्ट्यांतून नरसिंहाच्या (मंदिर निर्माता) जीवनातील विविध प्रसंग खोदलेले आहेत. कोनारक म्हणजे तत्कालीन संस्कृतीचे प्रतीकच म्हणावे लागेल. जाजपूर येथील दुर्गामंदिरातही ओरिसामधील कलेचे काही नमुने आढळतात. येथील मातृकामूर्ती लक्षवेधक आहेत. याशिवाय खिचिंग वस्तुसंग्रहालयात गंगकलेचे असंख्य नमुने आढळतात. त्यांतील नृत्तगणपती, मातृ-अपत्य वगैरे काही शिल्पे ख्यातनाम आहेत.

गंग राजांच्या कारकीर्दीत ओरिसामध्ये वास्तुशैलीचे विकसित स्वरूप आढळते. त्यात गंग राजांनीआपल्या आणखी काही कल्पना घालून सुधारणा केली. रध-चक्र वअश्वही त्याचीच उदाहरणे होत.

पहा: ओरिसा. 

संदर्भ:  1. Goswami, A. Ed. Orissan Sculpture and Architecture, Calcutta, 1956.

     2. Majumdar, R. C. Ed. The Age of Imperial Kanaui, Bombay, 1964.

     3. Majumdar, R. C. Ed. The Classical Age, Bombay, 1970.            

     4. Majumdar, R. C. Ed. The Struggle for Empire, Bombay, 1957.

मिराशी, वा. वि. देशपांडे, सु. र.