पुलकेशी, दुसरा : (सु.६१०/११–६४२).बादामीच्या चालुक्य घराण्यातील एक पराक्रमी आणि कलाभिज्ञ राजा. आपला पिता पहिला कीर्तिवर्मा याच्या मृत्युसमयी हा अल्पवयी असल्याने त्याचा चुलता मंगलेश हा राज्य करू लागला. पुढे पुलकेशी वयात आल्यावर त्यास राज्य न देता आपल्या मागून आपला मुलगा गादीवर यावा, अशी खटपट मंगलेशने सुरू केली. तेव्हा पुलकेशीला त्याच्याशी लढावे लागले. त्यात मंगलेश मारला जाऊन पुलकेशी गादीवर आला.

या राज्यक्रांतीच्या वेळी उत्तरेकडून आप्पायिक आणि गोविंद या राजांनी त्याच्या प्रदेशावर आक्रमण करून भीमेपर्यंत चाल केली, तेव्हा पुलकेशीने गोविंदास वश करून घेऊन आप्पायिकाचा पराभव केला. नंतर त्याने दक्षिणेतील कदंब, गंग व आलुप उत्तर कोकणातील मौर्य गुजरात व महाराष्ट्र येथील कलचुरी यांचा पराभव करून नर्मदा नदीपर्यंत आपली सत्ता वाढविली व तो तीन महाराष्ट्रांचा राजा झाला. उत्तर भारताचा सम्राट हर्षवर्धन याच्याशी त्याचे नर्मदातीरी घनघोर युद्ध झाले. त्यात हर्षाचे गजदल कामास येऊन त्याचा पराभव झाला. हे युद्ध ६३० च्या सुमारास झाले असावे. नंतर पुलकेशीने कोसल (छत्तीसगढ), कलिंग, आंध्र इ. प्रदेश जिंकून, चोल, चेर आणि पांड्य राजांशी सख्य करून कांची येथील पल्लवांच्या प्रदेशावर आक्रमण केले. पुढे दिग्विजय संपवून तो बादामीस परत आला. नंतरच्या तीन युद्धांत पल्लवांनी त्याचा पराभव केला. ६४२ मध्ये पल्लवांशी झालेल्या युद्धांत तो बादामीजवळ मारला गेला. विजापूर जिल्ह्यातील ऐहोळे येथील जैन देवालयातील ६३४–३५ च्या शिलालेखात रविकीर्तिकवीने पुलकेशीच्या दिग्विजयाचे सुंदर वर्णन केले आहे.

पुलकेशीचे साम्राज्य उत्तरेस नर्मदेपासून दक्षिणेस कावेरीपर्यंत आणि पश्चिम ते पूर्व समुद्रापर्यंत पसरले होते. यांतील काही प्रदेशांवर उदा., गुजरात, उत्तर कोकण, आंध्र यांवर त्याने आपले पुत्र व नातलग यांना नेमले होते. त्याची दुसरी राजधानी महाराष्ट्रात नासिक येथे असावी. चिनी यात्रेकरू ह्यूएनत्संग याने त्याला महाराष्ट्राचा राजा म्हटले आहे. तो त्याच्या दरबारी ६४१–४२ मध्ये आला असावा. त्याने तत्‌कालीन महाराष्ट्र देशाचे व तेथील लोकांचे वर्णन आपल्या प्रवासवृत्तात केले आहे.

पुलकेशीचा विद्वानांस व कलाकारांस उदार आश्रय होता. त्याने इराणचा राजा खुसरौ पर्वीझ याच्या दरबारी ६२५–२६ मध्ये आपला वकील पाठवला होता, असे मुसलमानी इतिहासकार तबरी याने म्हटले आहे पण ते कालदृष्ट्या सुसंगत वाटत नाही.

पहा : चालुक्य घराणे.

संदर्भ : Yazdani, Gulam, Ed. Early History of the Deccan, Parts I-VI, London,1960.

देशपांडे, सु. र.