दुर्गादास राठोड : (१३ ऑगस्ट १६२८?–२२ नोव्हेंबर १७१८). औरंगजेबकालीन एक स्वामिनिष्ठ व स्वदेशाभिमानी राजपूत. जोधपूरच्या जसवंतसिंग राठोडचा मंत्री अजकर्ण याचा मुलगा. वडिलांप्रमाणे त्याने जसवंतसिंगाची प्रामाणिकपणे नोकरी केली. जसवंतसिंगाच्या मृत्यूनंतर (१६७८) जन्मलेला त्याचा मुलगा अजितसिंग याला गादी मिळू नये व जोधपूरचे राज्य खालसा करावे, म्हणून औरंगजेबाने नाना तऱ्हेची कुटिल कारस्थाने रचली परंतु दुर्गादासाने मोठ्या चातुर्याने व धैर्यान अजितसिंगाला औरंगजेबाच्या तावडीतून वाचविले व वाढविले. १६८१ मध्ये राजपूतांच्या सहकार्याने औरंगजेबाचा मुलगा अकबर याने बापाविरुद्ध बंड केले, तेव्हा मोगलांच्या पाठलागातून अकबराला वाचविण्यासाठी दुर्गादास त्याला दक्षिणेत संभाजीच्या आश्रयास घेऊन गेला. १६८७ साली अकबर इराणला गेल्यानंतर त्याच्या दोन मुलांना घेऊन दुर्गादास जोधपूरला गेला. त्याने व अजितसिंग यांनी गेलेला मुलूख परत मिळविण्यासाठी मोगलांविरुद्ध लढा सुरू केला. अकबराची मुले ताब्यात मिळविण्यासाठी मोगलांनी १६९४ साली दुर्गादासाशी तह केला. अजितसिंगाला औरंगजेबाने क्षमा करून त्याला जालोर, सांचोर, सिवाना हे परगणे आणि दुर्गादासाला ३,००० ची मनसबदारी दिल्यानंतरच १६९८ मध्ये दुर्गादासाने मुले स्वाधीन केली. १७०२ मध्ये दुर्गादासाने अजितसिंगाच्या सहकार्याने मोगलांविरुद्ध पुन्हा बंड केले पण ते यशस्वी होऊ शकले नाही. १७०४ मध्ये औरंगजेबाने दुर्गादासाला क्षमा करून त्याला गुजरातमध्ये त्याचे पूर्वीचे पद दिले. १७०९ साली दुर्गादासाने अजितसिंगाला जिद्दीने जोधपूरची गादी मिळवून दिली पण पुढे अजितसिंग दुर्गादासाचे उपकार विसरला आणि त्याने त्यास आपल्या राज्यातून हाकलून दिले. अजितसिंगासाठी इतकी वर्षे झटून शेवटच्या काळात त्याला उदयपूरच्या महाराण्याकडे नोकरी करावी लागली. त्याचे चारित्र्य शुद्ध व कर्तृत्व मोठे होते.

खोडवे, अच्युत