प्लिनी, धाकटा : (इ.स. ६१ – सु. ११३). रोमन लेखक व प्रशासक. पूर्ण नाव गेयस प्लिनिअस सिसिलिअस सिकंदस. थोरल्या प्लिनीचा पुतण्या व दत्तक पुत्र. जन्म सधन घराण्यात कॉमूम (कॉमो) येथे उत्तर इटलीत झाला. लहानपणीच आई-वडील गेल्यामुळे तो पोरका झाला. थोरल्या प्लिनीने त्याचे शिक्षण केले व वयाच्या अठराव्या वर्षी तो वकिली करू लागला. वकिलीत त्यास पैसा व नावलौकिक लवकरच प्राप्त झाला. त्यामुळे रोमन सम्राटाने त्याची विविध पदांवर नियुक्ती केली. अखेरीस तो काही वर्षे कॉन्सल, नंतर सिनेटर व पुढे आशिया मायनरमध्ये बिथिनीआ व पॉन्टस या ठिकाणी राज्यपाल होता (इ.स. ११०).

प्लिनीने आपल्या चुलत्याप्रमाणे स्वतंत्रपणे असे लेखन केले नाही तथापि त्याची अनेक पत्रे दहा खंडांत प्रसिद्ध झाली. यांतील १ ते ९ खंड त्याच्या हयातीत प्रसिद्ध झाले (इ. स. ९७-११०) व दहावा खंड त्याच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झाला. पहिल्या नऊ खंडांत त्याची खासगी पत्रे असून, दहाव्या खंडात त्याचा मार्क्स ट्रेजन सम्राटाशी झालेला पत्रव्यवहार आहे. त्याचा विषय मुख्यतः प्रांतिक प्रशासन आणि त्यातील इतर व्यवहार हाच आहे. १ ते ९ खंडांतील पत्रांतून तत्कालीन सामाजिक व राजकीय जीवनावर प्रकाश पडतो. रोमच्या ऐतिहासिक घडामोडी व तत्कालीन व्यक्ती यांचेही त्यांतून दर्शन होते. ही पत्रे तत्कालीन रोमन साम्राज्यातील राजकारण, तत्त्वज्ञान, कायदा, साहित्य इ. विविध विषयांसंबंधी तपशीलवार माहिती देतात. शिवाय त्यांतून थोरल्या प्लिनीविषयी महत्त्वाची माहिती मिळते. त्याची शैली विषयानुरूप कधी काव्यात्म, कधी वक्तृत्वपूर्ण, तर कधी सलगीच्या संभाषणासारखी आहे.

धाकटा प्लिनी हा तत्कालीन प्रशासकाचा एक आदर्श नमुना ठरतो. त्याच्या पत्रांतून उत्कृष्ट प्रशासकाला आवश्यक असणारा मुत्सद्दीपणा, उदारपणा, संयम, कार्यक्षमता, तत्त्वनिष्ठा इ. गुणांचा प्रत्यय येतो.

संदर्भ : 1. Pliny, the Younger Trans. Radice, Betty, Letters and Panegyricus, 2 Vols., Cambridge, Mass., 1969.

2. Sherwin-White, A. N. Ed. The Letters of Pliny, New York, 1966.

देशपांडे, सु. र.