बाप्पा रावळ : (इ.स. आठवे शतक). राजपुतान्यातील गुहिलोत घराण्यातील मेवाडचा (मेदपात) एक प्रसिद्ध राजा. परंपरेप्रमाणे गुहिलोत घराण्याचा हा मूळ पुरुष असावा असे मानले जाते तथापि याबाबत इतिहासकारांत मतैक्य नाही. अनंतपूर येथील कोरीव लेखात (इ.स.९७७) गुहिलोत घराण्यातील वीस पिढयांचा उल्लेख आहे. त्यांत बाप्पा रावळ असा निर्देश नाही पण उनाव व एकलिंग लेखांत उल्लेख मिळतो. बाप्पाविषयी विश्वसनीय अशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध नाही पण त्याचा पराक्रम आणि रोमांचकारी जीवन यांबद्दल अनेक दंतकथा राजस्थानात प्रचलित आहेत. बाप्पा हा चितोडच्या मोरी राजाचा मांडलिक होता. नागदा किंवा नागहद या उदेपूरजवळच्या गावी तो राज्य करीत होता. तो मोठा शिवभक्त असून हरितऋषींची त्याने सेवा-चाकरी केली. त्यांच्या आशीर्वादाने त्यास पुढे चितोड येथील राज्य मिळाले, असा वृत्तांत सुरुवातीच्या काही लेखांमधून आढळतो तर नंतरच्या लेखांत त्याने चितोड हरितऋषींच्या कृपेने मोरीच्या मानसिंह (मौर्य) राजाकडून जिंकून घेतले आणि रावळ ही उपाधी धारण केली, असा मजकूर आहे. त्याच्या कारकीर्दीविषयी गौर शंकर ओझा, कर्नल जेम्स टॉड इ. इतिहासकार भिन्न मते व्यक्त करतात पण आठव्या शतकात तो मेवाडच्या गादीवर होता (इ.स.७३॰-६३), याबाबत मतैक्य आहे. गुहिलोत घराण्यातील काळभोज किंवा त्याचा मुलगा खुम्माण म्हणजेच बाप्पा रावळ, असेही मानले जाते. बाप्पाने भिल्ल वगैरे जमातींना एकत्र आणून मोठे सैन्य उभे केले आणि इ.स. ७२५ – ३८दरम्यान महंमद बिन कासिमच्या आधिखात्याखाली अरबांन राजस्थानावर जी आक्रमणे केली, ती यशस्वीरीत्या परतविली. इ.स. ७६३ मध्ये मुलाकडे राजसत्ता देऊन उर्वरित आयुष्य संन्यस्त वृत्तीने काढले.

पहा : गुहिलोत घराणे.

देशपांड, सु. र.