फ्रेंच राज्यक्रांति  :  इ . स . १७८९  मध्ये फ्रान्स मध्ये झालेली ही राज्यक्रांती म्हणजे अठरा व्या शतकातील जगाच्या इतिहासातील सर्वात महत्त्वा ची घटना होय .  या क्रांतीमुळे निर्माण झालेल्या विचारप्रवाहांचा युरोपीय देशांवर निरनिराळ्या प्रमाणात प्रभाव पडून युरापची सरंजामशाही समाजरचना पूर्ण नष्ट झाली आणि भांडवलशाही समाजरचना औद्योगिक क्रांतीच्या पायावर उभारली जाऊ लागली  म्हणून आधु निक यूरोपची उभारणी फ्रेंच राज्यक्रांतीपासून झाली असे मानतात .  त्याचप्रमाणे क्रांती ही संकल्पना इतिहास व राज्यशास्त्र यांत प्रथम अस्तित्वात आली ,  ती फ्रेंच राज्यक्रांतीनंतर व राज्यक्रांतीमुळेच!  १७८९  पासून नेपोलियन बोनापार्ट  ( पहिला )  याच्या उदयापर्यंतचा काळ  (१७९९ )  हा सामान्यतः फ्रेंच राज्यक्रांतीचा काळ समजण्यात येतो  पण हा काळ  १७९२  पर्यंतच धरण्यात यावा व तदनंतरचा हिंसात्मक कृतींनी भरलेला अराजकाचा आणि दहशतीचा काळ हा क्रांतीपासून वेगळा समजला जावा ,  असे काही इतिहासकारांचे मत आहे .

  

 ही  राज्यक्रांती यूरोपच्या इतिहासातील किंबहु ना मानवी इतिहासातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी घटना मानली जाते .  राजकीय सांस्कृतिक आणि वैचारीक क्षेत्रात ⇨  चौदाव्या लूई पासून  ( कार . १६४३  –  १७१५ )  फ्रान्सला यू रोपमध्ये अनन्यसाधारण स्थान प्राप्त झाले होते  म्हणून फ्रेंच राज्यक्रांतीमुळे सर्व यू रोप प्रभावित झाला ,  यात नवल नाही .  फ्रान्समधील बूँर्बा घराण्याच्या अनियंत्रित सत्तेला क्रांतीमुळे पायबंद घातला गेला .  तेथे चालत आलेली परंपरागत सरदारवर्ग व धर्मगुरू यांची मिरा स दारी क्रांतीने संपुष्टात आणली. शहरातील नवीन उदयास येणारा जो उत्पादकवर्ग त्याच्यावरील करांचा बोजा नाहीसा झाल्याने त्याला धंद्यात व राजकारणात पुढे येण्यास वाव मिळाला . जमीन कसणारा शेतकरी क्रांति काळातील कायद्यांमुळे आपल्या शेतीचा मालक बनला .  या क्रांतीमुळे फ्रान्समध्ये लिखित संविधानाची प्रथा सुरू झाली .  धार्मिक पुरोहितशाहीविरुद्ध बुद्धिवादाची प्रतिष्ठापना क्रांति काळात झाल्यामुळे राजकारणावरील चर्चची पकड कायमची ढिली झाली .

  

  कारण मीमांसा  :  या क्रांतीची कारणे सांगताना वैचारीक प्रबोधनापासून मिळालेली प्रेरणा व मार्क्सप्रणित वर्गविग्रहात्मक स्पष्टीकरण या गोष्टीं वर भर दिला जात असे  पण आज हे दोन्ही दृष्टिको ण मर्यादित प्रमाणातच मान्य झाले आहेत .  क्रांति पर्व सुरू झाल्यानंतर क्रांति कारकांनी त्या विचारांचा आपल्या प्रश्नांची मांडणी करताना उपयोग करून घेतला होता ,  एवढीच साक्ष इतिहास देतो .  त्याहून जास्त श्रेय प्रबोधन आणि विवेकवाद यांना देता येत नाही .  मार्क्सचा वर्गविग्रहवादही फ्रेंच राज्यक्रांतीचे समाधानकारक स्पष्टीकरण देऊ शकत नाही .  ऑस्ट्रियन वारसा युद्ध  (१७४० – ४८ )  व यूरोपातील सप्तवार्षिक युद्ध  (१७५६ –  ६३ )  यासारख्या  युद्धां मुळे सरकारी तिजोरीवर पडलेला विलक्षण ताण व त्यामुळे कोलमडण्याच्या अवस्थेत भडकलेली आर्थिक विपन्नावस्था ,  गंभीर स्वरूपाचा राजकीय पेच प्रसंग आणि सामान्य माणसां वर ओढवलेली उपासमारीची आपत्ती ,  यांचाही क्रांतीच्या कारणामध्ये अंतर्भाव करावा लागतो .   

  

 क्रांतीला पोषक असे वातावरण निर्माण झाले ,  त्यामध्ये श्र मजीवी शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती हा प्रमुख घटक होता .  शासन व्यवस्थेवरील सरदार वर्गाचे वर्चस्व कमी झाले होते  परंतु आर्थिक व सामाजिक संबंधांत ते टिकून होते .  बहुसंख्य शेतकरी वस्तुतः आपल्या जमिनीचे मालक झाले होते  तरीपण परंपरागत सरदार वर्गास अनेक प्रकारचा करभार त्यां स विनाकारण द्यावा लागे .  माल विकावयास नेताना रस्ताकर ,  नदी ओलांडतांना पूलकर ,  पिकांचा ठराविक हिस्सा व अंडी इ .  सरदारवर्गास हक्काने मिळत .  आठवड्यातील तीन दिवस सरदारवर्गाच्या शेतावर राबावे लागे अथवा त्याऐवजी पैसे द्यावे लागत .  त्याचप्रमाणे तथाकथित संरक्षणासाठी वार्षिक कर सरदारवर्गास द्यावा लागे .  शिवाय शेतकऱ्यास उत्पन्नाचा बारावा किंवा पंधरावा हिस्सा दशांशकर म्हणून द्यावा लागे .  

  

 वरील करांपेक्षा जाचक म्हणजे सरकारकडे भरावे लागणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर होत .  यांमध्ये जमीनसारा ,  डोईकर ,  प्राप्तीकर ,  मिठावरील कर इ .  मोडत यां व्यतिरिक्त शेतकऱ्यास रस्त्याच्या कामासाठी वर्षांतून कित्येक आठवडे वेठबिगार करावी लागे .  वरील सर्व करां पोटी जमीन कसणाऱ्यास उत्पन्नाचा अर्धा भाग तरी पदरात पडत होता की नाही ,  याची शंकाच आहे .   

  

 शहरात नव्याने निर्माण होणाऱ्या कामगारवर्गांची स्थितीही शेतकऱ्यांप्रमाणेच हलाखीची होती .  कमी मजूरी ,  वाढत्या किंमती ,  अनिश्चित बाजारभाव ,  बेकारी ,  उपासमार व रोगराई  त्यां च्या नशिबी कायमची होती . समाजामध्ये एका टोकास दुर्दैवी श्रमजीवी वर्ग होता  तर दुसऱ्या टोकास चैनीत व विलासात मश्गूल झालेला सरदार – पुरोहितांचा वर्ग होता .  ⇨ आर्मा झां  रीशल्य  (१५८५ – १६४२ )  व चौदावा लूई यांच्या धोरणामुळे सरदारवर्गास शासनव्यवस्थेमध्ये काहीच स्थान राहिले नव्हते .  त्यांच्यातले मातबर लोक व्हर्सायला टोलेजंग वाडे बांधून राजाचे अनुकरण करीत आणि चैनीचे आयुष्य घालवीत असत .  यामुळे शेतकरीवर्गापासून ते संपूर्णतः दुरावले होते .

 फ्रान्सची राज्यव्यवस्था पूर्णपणे अनियंत्रित पद्धतीची होती .  राजा मनास येईल ते कायदे करी व विरोधकां स पकडून बेमु दत तुरुं गात डांबून ठेवी .  स्टेट्स जनरलचे  ( संसदेचे )  अधिवेशन  १६१४  पासून बोलावलेच गेले नव्हते . न्यायपद्धतीत कमालीचा अनागोंदी पणा होता .  कायद्यामध्ये एकवाक्यता ,  एकसूत्रीपणा व समता यांचा पूर्णतः अभाव होता .

  

 अन्याय ,  दारिद्र्य व विषमता ही फक्त फ्रान्सपुरती मर्यादित होती  असे नव्हते  तर यूरोपमधील इतर देशांमध्ये ह्या सर्व गोष्टी होत्या  किंबहुना पोलं ड व जर्मनीमधील प्रशिया ,  बव्हेरिया ,  सॅक्स नी ,  होल्डनबर्ग ,  ब्रंझविक इ .  काही राज्यां मध्ये त्या जास्तच प्रमाणात होत्या  परंतु या परिस्थितीवर मात करून आपण आपले भविष्य उज्वल करू अशी श्रद्धा फ्रेंचां मध्ये जेवढ्या प्रमाणात होती , तेवढी ती अन्यत्र कोठेही नव्हती .  ही श्रद्धा वैचारिक क्रांतीच्या पोटी निर्माण झाली होती व ती  दृ ढमूल होण्याचे कारण म्हणजे इंग्लं डमधील वैभवशाली राज्यक्रांतीची  (१६८८ – ८९ )  स्फूर्ती व अमेरिकेचा स्वातंत्र्य लढा  (१७७५ – ८३ ).  या लढ्यात फ्रेंच सैन्याने सक्रिय भाग घेतला होता .  नवविचारांचे आंदोलन फ्रान्सप्रमाणे इंग्लड ,  जर्मनी व अमेरिका यांतही झाले होते  परंतु फ्रान्समधील विचारवंत जास्त प्रभावी ठरून जनमानसावर त्यांचा परिणाम झालेला दिसतो .  नवविचारांचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांमध्ये देशासंबंधी विचार केला नसून देशनिरपेक्ष मानवसमाजाच्या कल्याणाचा विचार केलेला आढळतो .  सामाजिक राजकीय व धार्मिक संस्थांचे मूल्यमापन मावनतावादाच्या दृष्टि कोनातून केले गेले .  सामाजिक अर्थव्यवस्थेवर व विशेषतः तत्कालीन धर्मसंस्थांवर या विचारवंतांनी कडाडून हल्ला केला होता .  ⇨ दनी दीद्रो  (१७१३ – ८४ ), ⇨ चार्ल्स माँतेस्क्यू  (१६८९ – १७५५ ), ⇨ फ्रान्स्वा व्हॉल्ते अर  (१६९४ – १७७८ ), ⇨ झां झाक रूसो (१७१२ – १७७८ ) इत्यादींचे या संबंधीचे कार्य उल्लेखनीय आहे .

  


  या  नवविचारांचे   स्वागत मुख्यतः फ्रान्समधील मध्यमवर्गाने –  व्यापारी ,  बँकांचे संचालक ,  दुकानदार ,  धंदेवाले लोक ,  वकील ,  डॉक्टर ,  अध्यापक यांनी केले .  सरदार व पुरोहित यांचे वर्चस्व आणि विशेष हक्क किवा अधिकार नष्ट करणे ,  राज्यकारभार सुधारणे ,  वर्गनिरपेक्षपणे सर्वास राजकीय ,  आर्थिक व धार्मिक स्वातंत्र्य उपलब्ध करून देणे  या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या .  जनता सार्वभौम आहे ,  या रूसोच्या तत्त्वाने ते भारले गेले होते  पण वरील गोष्टी साध्य करण्यासाठी फ्रेंच राज्यपद्धतीत सनदशीर मार्ग दिसत नसल्यामुळे क्रांतीच्या अपरिहार्यतेची जाणीव त्यांस होऊ लागली होती .

  

  अशा वेळी  सोळा वा लूई  ( कार . १७७४ – ८९ )  गादीवर आला .  या पापभीरू व सत्प्रवृत्त राजाच्या ठायी राज्यकर्त्यास आवश्यक असणारा कणखरपणा ,  कर्तृत्व व बुद्धिमत्ता नव्हती .  सर्व सत्ता त्याची पत्नी राणी ⇨ मारी आंत्वानेत  (१७५५ – ९३ )  हिच्या हातात होती .  राज्यकारभारावर तिचा प्रभाव जास्त होता .  राजा लोकांचे भले करू इच्छित होता  परंतु शासन व राजकारण यांत त्याला विशेष आस्था नव्हती .  आन रोबेअर झाक त्यूर्गो  ( कार . १७७४ – ७६ )  ह्या अर्थशास्त्रज्ञास लूईने अर्थमंत्री नेमून आर्थिक घडी बसविण्याचा प्रयत्न केला  पण वेठबिगार बंद करणे ,  वरिष्ठ वर्गावर कर लादणे वगैरे सुधारणांचे त्याचे धोरण जाहीर होताच ,  राणी व सरदार यांनी लूईवर दडपण आणून त्यूर्गोची हकालपट्टी करविली  (१७७६ ).  नंतरचा अर्थमंत्री झाक नेकेर  ( कार . १७७६ – ८१ )  याने करवसूलपद्धती राबविली आणि सरकारी हिशेब तपासण्यास सुरुवात केली व राज्याच्या एकूण खर्चावर विशेषतः राणीच्या उधळपट्टीवर नियंत्रण घातले .  फ्रान्सचा आर्थिक गाडा नेकेर वळणावर आणू शकला असता  पण त्यावेळी फ्रान्सने अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धात भाग घेतल्याने ताण आणखी वाढला .  शेवटी राणीच्या दडपणामुळे नेकेरचीही हकालपट्टी झाली  (१७८१ ).

  

  नेकेरनंतर शार्ल कालोन  ( कार . १७८१ – ८७ )  व त्यानंतर लोमेनी द ब्रीएन  ( कार . १७८७ – ८८ )  हे अर्थमंत्री झाले  पण शासनाची आर्थिक स्थिती खालावत जाऊन शेवटी कर्ज मिळणेही कठीण झाले .  तेव्हा नाईलाजाने राजाने संसदेचे अधिवेशन मे  १७८९  मध्ये बोलाविले .  राज्यकारभारात बदल घडवून आणावयाच्या उत्साहात वर्गवार निवडणुका झाल्या . मध्यमवर्गीय व शेतकामगार यांचा मिळून जो तिसरा वर्ग बनला होता ,  त्याच्या प्रतिनिधींनी नेहमीच्या प्रथेप्र माणे गाऱ्हाणी सादर केली .  त्यांचा रोख राज्यकारभारात सुधारणा करणे व समाजातील विषमता नष्ट करणे ,  यांवर होता  परंतु या गाऱ्हाणी पत्रकात राजाविरुद्ध शब्दसुद्धा काढला नव्हता किंवा क्रांतीची कल्पानाही सुचविली नव्हती ,  ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे .

  

   यानंतर संसदेच्या मतदानपद्धतीबद्दल वाद उपस्थित झाला .  पुरोहित व सरदार यांचे म्हणणे पडले की ,  परंपरागत पद्धतीप्रमाणे पुरोहित ,  सरदार व सामान्य किंवा तिसरा गट  ( थर्ड इस्टेट )  या तिन्ही वर्गानी अलग अलग बैठका भरवू न मतदान करावे .  असे केल्याने पुरोहित व सरदार या दोन वर्गांची मते एका बाजूस व तिसऱ्या गटाचे मत विरुद्ध बाजूस अशी स्थिती होऊन तिसरा वर्ग बहुसंख्य असताही त्याचे मत संसदेमध्ये कधीच प्रभावी ठरू शकणार नाही व त्यास हव्या असणाऱ्या सुधारणा कधीच अंमलात येऊ शकणार नाहीत  हे लक्षात घेऊन तिसऱ्या गटाने अशी मागणी केली ,  की सर्व वर्गाची एकत्र सभा बोलवावी व मतदान दरडोई एक मत या पद्धतीने घ्यावे .  या प्रश्नावर राजा निश्चित धोरण लवकर ठरवत नाही ,  हे पाहून  १७  जून  १७८९  रोजी तिसऱ्या वर्गाने आपली सभा ही राष्ट्रीय सभा असल्याची घोषणा केली .  पुरोहित व सरदार यांस सभेत सामील होण्यासाठी आवाहन केले .  शाही बैठकीच्या तयारीचे निमित्त करून राजाने तिसऱ्या गटाच्या सभागृहस्थाना स कुलूप लावून तेथे लष्कर आणून ठेवले .  हे पाहून ⇨ ऑनॉरे गाब्रीएल मीराबो  (१७४९ – ९१ )  व आबे स्येयअस यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्या वर्गाचे प्रतिनिधी शेजारच्या टेनिस क्रीडांगणावर गेले व त्यांनी शपथ घेतली ,  की ‘ जनतेचे सार्वभौमत्व प्रस्थापित करणारे संविधान तयार केल्याखेरीज आम्ही राष्ट्रीय सभेचे  ( संसदेचे )  प्रतिनि धी एकमेकांपासून दूर हो णार नाही ’.  २० जून  १७८९  चा हा शपथविधी म्हणजे फ्रेंच राज्यक्रांतीची नांदी होती ,  असे म्हणण्यास हरकत नाही .

 संसदेची एकत्र बैठक घेण्यास राजाने अखेर संमती दिली  परंतु त्याचबरोबर सैन्याची जमवाजमव करून दडपशाहीची तयारी ठेवली .  याचा परिणाम असा झाला की ,  पॅरिसची जनता संसदेच्या मदतीस आली व त्यांनी जुलूमशाहीचे प्रतीक असलेला ⇨ बॅस्तील चा तुरुं ग फोडला  (१ ४ जुलै  १७८९ ).  अशा प्रकारे क्रांतिकारकांनी विजयाची पहिली पताका फडकाविली .  क्रांतिकाळात राजेशाहीला विरोध करणाऱ्या क्रांतिकारकांनी लाल टोपी ही स्वातंत्र्याचे प्रतीक म्हणून सर्रास वापरली .  तसेच फ्रान्सच्या राष्ट्रध्वजातील लाल ,  पांढरा आणि निळा असा तिरंगी राष्ट्रध्वज या क्रांतिकाळातच बोधचिन्ह म्हणून १७  जुलै  १७८९  रोजी वापरण्यात आला .

  

  हिंसक चळवळीचे पर्व  : जनतेच्या उठावापुढे लूईने तात्पुरती मान तुकविली  पण उठाव दडपून टाकण्यासाठी सैनिक बोलाविले .  हे समजताच पॅरिसच्या जनतेने परत उठाव केला व व्हर्सायच्या राजवाड्यावर  ५  ऑक्टोबर  १७८९ रोजी स्त्रियांचा मूक मोर्चा नेला .  ⇨ मा र्की द लाफायेत  (१७५७ – १८३४ )  यांच्या प्रसंगावधानामुळे राजकुटुंब त्या दिवसाच्या हत्याकांडा मधू न बचावले  पण लूई ला व्हर्साय सोडून पॅरिसला यावे लागले .  पॅरिसच्या तूलरीझ राजवाड्यात तो  १०  ऑगस्टपर्यंत ओलीस असल्यासारखा राहिला .  मूक मोर्च्याच्या बातम्या देशभर प्रसृत झाल्या आणि सगळीकडे शासनयंत्रणेविरुद्ध बंडाचे वातावरण फैलावले .  ग्रामीण विभागात ठिकठिकाणी शेतकऱ्यांनी सरदारांच्या वाड्यांवर हल्ले करून त्यांची हक्कपत्रे जाळून टाकली आणि धार्मिक मठांचा विद्ध्वंस केला .  लूईचा पळून जाण्याचा प्रयत्न फसल्यानंतर राजाविरुद्ध वातावरण चांगलेच संतप्त झाले .  राजसत्ता नष्ट करून प्रजासत्ताक स्थापन करावे ,  अशी भाषा लोक बोलू लागले .

  

  क्रांतिकाळातील राज्यघटना व सत्तांतरे  : १६  व्या लूईने नाइलाजास्तव बोलाविलेल्या संसदेने राष्ट्रीय सभा हे नामाभिधान घेतले .  ही सभा म्हणजे फ्रान्सचे एकगृही विधिमंडळ होते .  मंत्रिमंडळाची निवड राजा स्वतः करी व त्या चा संसदेशी काही संबंध नसे .  राजाच्या तांत्रिक संमतीशिवाय कोणताही प्र स्ताव कायदा म्हणून अंमलात येऊ शकत नव्हता .  परंतु मूलतः कमकुवत मनोवृत्ती चा लूई कठीण परिस्थितीत सापडल्यामुळे संसदेचे प्राबल्य वाढले होते . बॅस्तीलच्या पाडावातून पॅरिसच्या कम्यूनचे  ( स्थानिक स्वराज्यसंस्थेचे )  महत्त्व वाढत जाऊन संसदेवर कम्यू न दबाव आणीत असे .  साहजिकच पॅरिस कम्यून मध्ये प्रभावी असलेला गट व व्यक्ती यांचा फ्रान्सच्या राजकारणावर हळूहळू प्रभाव पडू लागल्याचे दिसून येते .

  

 राष्ट्रीय संसदेने  १७८९  ते  १७९१  या काळात संविधान तयार केले  महत्त्वाचे कायदे संमत करून त्यांनी मानवी हक्कांची घोषणाही केली .  या घोषणेत स्वातंत्र्य ,  समता ,  आणि जनतेचे सार्वभौमत्व  उद्‌ घो षित करण्यात आले . क्रांतीनंतरच्या काळात यूरोपीय क्रांति कारकांना ह्या घोषणेपासून स्फूर्ती मिळत गेली .  नेपोलियनच्या सर्व सैन्यापेक्षा  ही घोषणा जास्त प्रभावी होती ,  असे लॉर्ड जॉन ॲक्टन  (१८३४ – १९०२ )  याने म्हटले आहे . ४  ऑगस्ट १७८४ रोजी संसदेत एका सरदाराने त्यावेळी अस्तित्वात असलेल्या सरदारांचे सर्व खास अधिकार रद्द करण्यात यावे त ,  असा प्रस्ताव मांडला .  पाठोपाठ पुरोहितवर्गाच्या प्रतिनिधींनी स्वतः स व चर्च्ला असलेले खास अधिकार रद्द व्हावेत ,  अशीही मागणी केली होती .  दोन्ही वर्गाचे तत्सम प्रस्ताव सभेपुढे आणण्याची जणू अहमहमिकाच चालली होती .  एका बैठकीत राष्ट्रीय संसदेने संविधान समितीच्या भूमिकेवरून माँतेस्क्यू आणि रूसो यांच्या तत्वांवर आधारलेले संविधान तयार केले .

  


   या  संविधानानुसार राजाची सत्ता मर्यादित करण्यात आली .  मंत्रिमंडळ निवडण्याचा अधिकार राजास देण्यात आला पण हे मंत्री विधिमंडळा चे सभासद असता कामा नये व त्यांनी विधिमंडळाच्या बैठकीस केव्हाही हजर राहता कामा नये ,  असा दंडक घालण्यात आला .  राजाला खर्चासाठी ठराविक रक्कम मंजूर करण्यात आली .  त्याचे परमाधिकार मर्यादित करण्यात आले .  विधिमंडळ हे एकगृही ठेवण्यात येऊन त्याची मु दत दोन वर्षाची ठरविण्यात आली  पण मतदानाचा अधिकार विशिष्ट रकमेपेक्षा जास्त कर भरणाऱ्यास देण्यात आला .  सर्व न्यायाधीश लोकनियुक्त राखून ज्यूरींची पद्धत सुरू केली गेली .  विभागीय शासनाची पुनर्घटना करण्यात आली .  चर्चची संपत्ती सरकारजमा केली गेली .  या संपत्तीच्या आधारावर कागदी चलन सुरू करण्यात आले  पण पुढे ते प्रमाणबाहेर गेल्यामुळे प्रत्यक्षात त्याची किंमत कमी होऊ लागली आणि आर्थिक व्यवहारात गोधळ माजला .  लोकांनी पुरोहितांची निवड करावयाची व त्यास वेतन पोपकडून न मिळता ते शासना क डून मिळवावयाचे ,  हा महत्त्वाचा बदल करण्यात आला .  पोपने या बदलाचा निषेध केल्यामुळे प्रत्युत्तरादाखल राष्ट्रीय विधिमंडळाने पुरोहितांस या कायद्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घ्यावयास भाग पाडले .  या क्रांतिकार क बदलांचा परिणाम असा झाला ,  की धर्मनिष्ठ लोक क्रांतीविरुद्ध बिथरले .  ज्याने आतापर्यंत क्रांतीला प्रतिकूल असे काही केले नव्हते ,  तो धार्मिक प्रवृत्तीचा लूई आता क्रांतीचा कट्टर द्वेष्टा बनला .

 १९७१  च्या संविधानाप्रमाणे निवडणुका होऊन नवीन विधिमंडळाची पहिली बैठक  १  ऑक्टोबर  १७१९  रोजी भरली .  संविधानाप्रमाणे पूर्वीच्या विधिमंडळातील कोणाही सभासदास या निवडणुकीसाठी उभे राहता येत नसल्यामुळे नवीन विधिमंडळात अनुभवी नेते राहिले नाहीत .  म्हणून फ्रान्सच्या राजकारणाचे नेतृत्व विधिमंडळाच्या हाती न राहता ते त्या बाहेर राहिले .  विधिमंडळातील रा ज कीय पक्षांतील जॅकबिन्झ पक्षांतर्गत फॉयां हा उजवा गट बाहेर पडला  (१७९१ ).  हे संविधान राबविताना राजसत्ता दृढमूल करून ती अधिक प्रभावी बनवावयाची ,  असा त्या पक्षाचा दृष्टिकोन होता .  त्यांना संविधानात्मक राजेशाही हे तत्त्व मान्य होते .  डाव्यांपैकी जिराँदिस्त पक्ष हा मध्यम वर्गीयांच्या हितास जपणारा असून ग्रामीण विभागात त्यांचा प्रभाव होता .  प्येअर व्हेर्न्यो ,  माक्सिम्यॅ इस्नार , झाक ब्रिसो ,  द ला प्लातेअर रोलाँ इ .  त्यांचे नेते होते .  जॅकबिन्झ पक्ष हा डाव्यांमधील जहाल असून विशेषतः पॅरिसच्या जनतेचा या पक्षास पाठिंबा होता .  रोब्झपीअर ,  झा पॉल मारा आणि कॉर्देल्ये क्लबचा संस्थापक झॉर्झ झाक दांताँ हे जॅकबिन्झ पक्षातील काही प्रमुख नेते होते .

  

 नवीन संविधानाप्रमाणे लूईने पहिले मंत्रिमंडळ फॉयां या फुटीर पक्षाचे बनविले .  देशत्याग केलेल्या उमरावांविरुद्ध व धार्मिक पुर्नघटनेशी एकनिष्ठ नसणाऱ्या पुरोहितांविरुद्ध विधि मंडळाने केलेल्या कायद्या ला राजाने संमती न दिल्यामुळे लोकमताचे वादळ उठले .  तेव्हा फॉयां पक्षाच्या मंत्रिमंडळास काढून राजाने जिराँदिस्त पक्षाचे मंत्रिमंडळ नेमले .  या सुमारास फ्रान्सचे परराष्ट्रीय धोरण अत्यंत नाजूक स्वरूपाचे होते .  रोब्झपीअर प्रभृती जॅकबिन्झांस यु द्ध नको होते  कारण त्यामधून लष्करी हुकूमशाही निर्माण होईल अशी त्यांना भीती वाटत होती  मात्र जिराँदिस्त युद्धास अनुकूल होते .  शेवटी  २०  एप्रिल  १७९२  रोजी फ्रान्सने ऑस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग घराण्याविरुद्ध युद्ध पुकारले .  प्रशिया लकरच ऑस्ट्रियास मिळाला .  फ्रेंच सेनेच्या पीछेहाटीच्या वार्ता ऐकून जनता प्रक्षुब्ध झाली .  ऑस्ट्रियाने युद्ध पुढे चालविण्याची तयारी केली .  राजा व त्याचे सल्लागार शत्रू स सामी ल आहेत ,  असा पॅरिसच्या कम्यूनला दाट संशय होता .  पळपुट्या लोकांनी ड्यूक ऑफ ब्रंझविककडून एक जाही रनामा काढला , ‘ की जर राजा लूई व त्याचे कुटुं ब यांच्या केसाला धक्का लागला  तर पॅरिस जाळून उद्ध्वस्त करू आणि संसदेच्या सर्व सभासदांना फाशी देऊ ’!  या घोषणेमुळे  (३  ऑगस्ट  १७९२ )  लोकक्षोभात भर पडली .  शेवटी त्याचा स्फोट होऊन राजास पदच्युत करण्यात आले  (१०  ऑगस्ट  १७९२ ).

  

 यानंतर जिराँदिस्त या नेमस्त राजकीय पक्षाच्या मंत्रिमंडळाची सत्ता नाममात्र राहिली व खरी सत्ता पॅरिसच्या कम्यूनकडे आली .  कम्यूनमध्ये क्रांतिकारकांचा जॅकबिन्झ पक्ष हा प्रमुख असून ⇨ मॉक्सीमील्यँ  रोब्झपीअ र  (१७५८ – ९४ )  हा त्यांचा नेता होता .  शत्रू राज्यांच्या चढाईस पायबंद बसत नाही ,  हे पाहून परराज्यांस सामील असणाऱ्या घरातल्या शत्रूस दहशत बसविण्याचे धोरण जॅकबिन्झ पुढाऱ्यांनी  २  सप्टेंबर  १७९२  रोजी सुरू केले .  तात्पुरत्या उभारलेल्या चौकशी मंडळापुढे झटपट चौकशी आटोपून लूईचे पक्षपाती व जॅकबिन्झ विरोधक यांचा शेकडोंच्या संख्येने वध करण्यात आला .  या सप्टेंबर कत्तलीनंतर व्हाल्मी येथे क्रांतिकारकांच्या सेनेस विजय मिळताच ,  जॅकबिन्झ पक्षास अधिक हुरूप येऊन आपले कार्य त्यांनी अधिकच क्रुरतेने चालू ठेवले .  या वधसत्रात  १९  जानेवारी  १७९३  रोजी लूईचाही बळी पडला .  विधिमंडळाने नवीन संविधान समिती निवडण्याचा निर्णय घेतला आणि जिराँदिस्त पक्षाचे मंत्रिमंडळ नेमून कारभार सुरू केला .  याला आल्बेअर मात्येसारखे फ्रेंच इतिहासकार  ‘ फ्रान्सची दुसरी क्रांती ’  असे संबोधितात  पण खरी सत्ता विधिमंडळाच्या वा मंत्रिमंडळाच्या हाती न राहता ती बहुसंख्य बूर्झ्वा असलेल् या जॅकबिन्झ पक्षाच्या  ( जॅकबिन्झ क्लब्ज )  प्रभावाखाली विशेषतः पॅरिस कम्यूनच्या हाती गेली होती .  प्रजासत्ताक हे साध्य आणि अत्याचार हे साधन या दोन तत्वांवर त्यांची भिस्त होती .  सप्टेंबर कत्तल चालू असताना संसदेची निवडणूक होऊन पहिली सभा भरली .  ही सभा जॅकबिन्झ आणि जिराँदिस्त यांमधील राजकीय स्पर्धेचा आखाडा बनली .  इकडे व्हाल्मी व झमाप येथे फ्रान्सला मिळालेले यश क्षणिक ठरून फ्रेंचांना ऑस्ट्रिया  –  प्रशियाच्या फळीपुढे माघार घ्यावी लागली  (२०  सप्टेंबर  १७९२ ).  त्यात पुन्हा ला व्हान्दे विभागामध्ये संसदेविरुद्ध बंड सुरू झाले .  दोन्ही शत्रूंस परिणामकारक री त्या तोंड देण्यासाठी संसदेने क्रांतिकारक चौकशीमंडळ स्थापन केले  पण अखेर रोब्झपीअरवर सर्व आरोप लादण्यात आले आणि त्याला पकडण्यात येऊन फाशी दिले  (२८  जुलै  १७९४ ).

  

   रोब्झपीअरच्या पाडावानंतर दहशतीच्या वातावरणाचा जोर ओसरला .  पॅरिस कम्यूनच्या बेतालपणास लगाम घालण्यात येऊन संसदेचे वर्चस्व पुन्हा प्रस्थापित झाले .  प्राव्हेन्सच्या कौंटच्या वतीने राजसत्तावादी डोके वर काढू लागल्याचे दिसताच संसदेने एक नवीन संविधान अमलात आणण्याचे ठरविले  पण नव्या द्विगृही मंत्रिमंडळाचे दोन तृतीयांश सभासद हे राष्ट्रीय सभागृहामधील सभासदांपैकी असले पाहिजेत ,  या तरतुदीस राजसत्तावाद्यां बरोबर जॅकबिन्झ व जिराँदिस्तांचाही विरोध होता . ५  ऑक्टोबर  १७९५  ( क्रांतिकारकांचा व्हान्देम्येअर महिना )  रोजी संसदेविरुद्ध उठाव झाला  पण पॉल फ्रान्स्वा बारास व नेपोलियन बोनापार्ट यांनी तो दडपून टाकला .  अखेर  २६ ऑक्टोबर  १७९५  रोजी संसदेचे विसर्जन झाले .

 संसदेने लष्करी मजबूतीखेरीज इतरही क्षेत्रांत अविस्मरणीय असे कार्य केले .  फ्रान्स हे एक अविभाज्य असे राष्ट्र आहे ,  ही शिकवण लोकांस देऊन तिने प्रांतीय अभिमानाऐवजी राष्ट्रभिमान जागृत केला  कायद्याच्या संहतीकरणास हात घातला  सर्व देशभर वजनमाप कां करी ता मेट्रिक पद्धत सुरू केली  फ्रेंच भाषेच्या माध्यमातून एकाच प्रकारचे ,  धर्माशी संलग्न नसलेले ,  सक्तीचे व मोफत शिक्षण देशभर सुरू करण्याचा प्रयत्न केला आणि लूव्हरच्या म्युझियमसारख्या सांस्कृतिक व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाच्या संस्थांचा पाया घातला .

  

 संसदेने नेमलेल्या अकरा लोकांच्या मंडळाने बनविलेल्या संविधानात द्विगृही मंडळ स्थापण्यात आले .  त्यातील ज्येष्ठ गृह  ( सिनेट )  हे वयाने  ४०  वर्षांपेक्षा जास्त असलेल्या विवाहि त वा विधुर अशा  २५०  प्रतिनिधींचे असून कनिष्ठ गृह  ( पाचशेचे गृह )  हे  ३०  वर्षांवरील प्रतिनिधींचे बनविले होते .  झां लांबेअर ताल्यँ या मुत्सद्याने या संविधानात एक कलम घालून विधिमंडळाच्या दोन्ही गृहांचे प्रत्येकी निम्मे सभासद दरवर्षी निवृत्त व्हावेत ,  ही सुधारणा अंतर्भूत केली .  प्रस्ताव मांडण्याचा अधिकार कनिष्ठ गृहास होता  परंतु ज्येष्ठ गृहाच्या सं मतीखेरीज कोणताही कायदा अंमलात येऊ शकत नसे .  सरकारी कर देण्याइतकी मिळकतीची लायकी असलेल्यानाच मतदानाचा हक्क होता .  यामुळे खासगी मिळकतीला मान्यता मिळाली .  संचालक मंडळ  ( डिरेक्टरी )  हे विधिमंडळाने निवडलेल्या  ४०  वर्षांवरील पाच सदस्यांचे बनविले होते .  दरवर्षी त्यातील एक सदस्य  ( ज्याच्या नावाची चिठ्ठी निघेल तो )  निवृत्त व्हावा अशी तरतूद केली होती .  खजिना मंत्रिमंडळाच्या हाती न देता तो विधिमंडळाने नियुक्त केलेल्या स्वतंत्र आयुक्ताकडे असावा .  दोन्ही गृहांनी संमत केलेला कायदा नामंजूर करण्याचा अधिकार कोणासच ठेवला नाही .  विधिमंडळाला मंत्रिमंडळाला दूर करता येऊ नये व मंत्रिमंडळाला विधिमंडळ बरखास्त करता येऊ नये ,  असे दुहेरी नियंत्रण तयार केले होते .

  


  

 संचालक मंडळाची कारकीर्द  (३  नोव्हेंबर  १७९५  ते  ९  नोव्हेंबर  १७९९ )  फार टिकली नाही .  ते लाचखाऊ व निरु पयोगी ठरले बॅबफच्या नेतृत्वाखाली कामगार वर्गाने समता प्रस्थापनेसाठी बंड केले  पण ते फसले व बॅबफला फाशी देण्यात आले  (१७९७ ).  फ्रान्समध्ये अराजक बोकाळले होते .  सतत दहा वर्षे  (१७८९  –  ९९ )  जे संविधानाचे प्रयोग झाले ,  त्यास लोक कंटाळले होते .  प्रतिनिधींच्या स्वार्थी वर्तनाचा व सत्तास्पर्धेचा त्यास उबग आला होता . अशा वेळी बिघडलेली राजकीय घडी नीट बसावी ,  म्हणून खंबीर नेतृत्वाची लोकांना अंतयामी गरज वाटत होती .  त्या वेळी ⇨ पहिला नेपोलियन  (१७६९ – १८२१ )  ईजिप्तच्या मोहिमेवरून परतला .  फ्रान्समध्ये अत्यंत उत्साहाने त्याचे स्वागत झाले .  परिस्थितीचा अंदाज घेऊन नेपोलियनने आपली योजना आखली .  ज्येष्ठ गृह व कनिष्ठ गृह यांची खास बैठक पॅरिसपासून दूर सेंट क्लाउद येथे भरविण्यात आली .  दोन्ही सभागृहां त नेपोलियनने भाषणे केली  पण त्यांचा फारसा उपयोग झाला नाही  तथापि त्या गृहाचा अध्यक्ष व नेपोलियनचा भाऊ ल्यूसँ याने सैन्यास आ त बोलावून विरोधी प्रतिनिधीस पिटाळून लावले .  राहिलेल्या प्रतिनिधींनी सांगितल्याप्रमाणे संचालक मंडळ रद्द होऊन नेपोलियन ,  आबे स्येयअस व रॉजर द्यूको या तिघांचे प्रशासक मंडळ अस्तित्वात आले .  यात प्रमुख कॉन्सल नेपोलियन होता .  याशिवाय चार मंडळांची नेमणूक करण्यात आली .  पण ती सर्व सत्ताविहीन होती .  पुढेपुढे प्रिफेक्ट आणि सब्‌प्रिफेक्ट यांच्या नेमणुका आपल्या हाती ठेवून नेपोलियनने स्थानिक स्वराज्यसंस्थांवर आपली पकड पक्की केली .  देशातील खरी सत्ता पहिला कॉन्सल म्हणून नेपोलियनच्या हाती केंद्रीत झाली .

  

  क्रांतिकालीन परराष्ट्रीय संबंध व संघर्ष  :  फ्रेंच राज्यक्रांतीच्या इतिहासामध्ये परदेशाशी झालेल्या युद्धांस फार महत्त्व  आहे .  क्रांतीला वेळोवेळी जे वळण मिळाले ,  त्यातील एक महत्वाची घटना म्हणजे ही युद्धे होत . १७९२  मध्ये अशा प्रकारच्या युद्धांस सुरुवात होऊन  १८१५  पर्यंत ही युद्धे चालू राहिली .  यूरोपातील जु नी सामाजिक व राजकीय व्यवस्था व नवी क्रांतिकारक तत्त्वे यांतील हा झगडा होता .

  

 सोळाव्या लूईचा पॅरिसमधून पळून जाण्याचा प्रयत्न फसल्यावर त्याच्या सल्लागारांनी ,  विशेषतः मारी आंत्वानेत राणीने ऑस्ट्रिया – प्रशियास फ्रान्सवर आक्रमणे करण्याची चिथावणी दिली .  ऑस्ट्रियाचे प्रशियाशी मुळीच सख्य नव्हते .  खुद्द ऑस्ट्रियात बंडाळीचे वातावरण असल्यामुळे फ्रान्सच्या भानगडीत पडण्यास ऑस्ट्रिया उत्सु क नव्हता .  शिवाय ऑस्ट्रिया ,  प्रशिया व रशिया या तिघांमध्ये पोलंडच्या प्रश्नावरून वितुष्ट निर्माण झाले होते  परंतु ऑस्ट्रियाचा सम्राट फ्रान्सच्या राणीचा भाऊ असल्यामुळे तिला मदत व्हावी ,  या उद्देशाने फ्रेंच क्रांति कारकांस धाक दाखविण्यासाठी त्याने प्रशियाशी संगनमत करण्याचा प्रयत्न केला .  ऑगस्ट  १७९१  मध्ये पिलनिट्स येथील बैठकीत त्याने यूरोपातील सत्तांचे सहकार्य लाभल्यास फ्रेंच राजघराण्याची नष्ट झालेली प्रतिष्ठा त्यास परत मिळवून देण्याची घोषणा केली .  ही घोषणा म्हणजे के वळ  दमदाटी होती  परंतु ही गोष्ट क्रांति कारकांच्या नेत्यास उमगली नाही .  त्यांनी लूईला ऑस्ट्रियाच्या सम्राटाविरुद्ध युद्ध पुकारण्यास भाग पाडले . २०  एप्रिल  १७९२  मध्ये फ्रेंच परराष्ट्र मंत्री शार्ल द्यूमू ऱ्ये यास आशा वाटत होती ,  की ऑस्ट्रियाविरुद्ध इंग्लंड – रशिया आपणास मदत करतील  पण तसे न घडता प्रशिया ऑस्ट्रियास मिळाला व युद्धास तोंड फुटले .

 ऑस्ट्रियाच्या ताब्यातील नेदर्लंड्सवर हल्ला करण्यास निघालेल्या क्रांतीकारकांच्या सेनेला बेशिस्तीमुळे माघार घ्यावी लागली  (१७९२ ).  या पराभवाचा परिणाम असा झाला की ,  राजाच्या दगलबाजीचा संशय येऊन पॅरिसमध्ये प्रक्षुब्ध जमावाने राजा – राणींची अत्यंत मानहानी केली .  याला प्रत्युत्तर म्हणून प्रशियाचा सेनापती ब्रंझविकचा ड्यूक याने पॅरिसची राखरांगोळी करण्याची धमकी दिली  पण धमकी ची प्रतिक्रिया भयंकर होऊन लूईला पदच्यु त करण्यात आले व सप्टेंबर  १७९२  च्या कत्तलीची सुरुवात झाली .  दोस्तांच्या सैन्याने व्हर्डन घेतल्यामुळे पॅरिसला धोका निर्माण झाला  पण फ्रान्सच्या सुदैवाने व्हाल्मी येथे त्यांना विजय मिळून  २०  सप्टेंबर  १७९२  मध्ये पॅरिसवरील अरिष्ट टळले .  व्हाल्मीनंतर क्रांति कारकां स अनेक विजय मिळाले .  झमापच्या विजयामुळे बेल्जियम सर्वस्वी त्यांच्या ताब्यात आला .  क्रांति कारकांनी  २१  जानेवारी  १७९३  रोजी लूईचा शिरच्छेद केल्यामुळे फ्रान्सला इंग्लंड ,  हॉलंड व स्पेन यांचे शत्रुत्व प तक रावे लागले .  नेर्व्हिनदन येथे फ्रान्सचा पराभव होऊन द्यूमूऱ्ये ऑस्ट्रियास मिळाला .  पराभवामुळे चिडून जाऊन जॅकबिन्झच्या ताब्यात असलेल्या पॅरिसच्या कम्यूनविरुद्ध बंडे   होऊन बंडखोरांनी तूलाँ बंदर इंग्रजांना खुले केले  पण झा फ्रान्स्वा द्यूगॉमीअर व नेपोलियन बोनापार्ट यांनी त्यांना हाकलले  ( डिसेंबर  १७९३ ).

  

    जॅकबिन्झ नेतृत्वाखालील जनसंरक्षण समितीने ,  विशेषतः दांताँने प्रयत्नांची शर्थ करून घरच्या शत्रूप्रमाणे परकीय शत्रू सही जेरीस आणले .  ⇨ झॉर्झ झाक दांताँ  (१७५९ – १७९४ )  याला सेनापती ला झा र कार्नोची साथ चांगली मिळाली .  माघार घेणाऱ्या सेनाप्रमुखांना फासावर लटकविण्याची धमकी जनसंरक्षण समितीने दिली होती .  या उलट फ्रान्सच्या शत्रूं मध्ये पोलंडच्या प्रश्नाबाबतचा बेबनाव वाढला होता .  त्यामुळे फ्रेंचांस पाठोपाठ विजय मिळून १७९५  च्या जानेवारीत हॉलंड फ्रान्सच्या संपूर्णपणे ताब्यात आला .

  

    संचालक मंडळाची स्थापना झाल्यावर फ्रान्सची लष्करी परिस्थिती काहीशी सुधारली .  परागंदा झालेल्या फ्रेंच सरदारांची सेना कीब्राँ बेमध्ये उतरविण्याचे इंग्लंडचे प्रयत्न फसले .  पोलंडच्या विभागणीमध्ये असंतुष्ट राहिलेल्या प्रशियाने फ्रान्सची बाझेलचा तह केला  (१७९५ ). त्यामुळे जुलैमध्ये स्पेनही ऑस्ट्रिया – इंग्लंड – प्रशिया या दोस्तांच्या फळीतून बाहेर पडला .  ऑस्ट्रिया व इंग्लंड हेच फ्रान्सविरुद्धच्या फळीमध्ये टिकून राहिले .

  

    ऑस्ट्रियावरील हल्ल्यासाठी झां व्हिक्तॉर मॉरो आणि झां बातीस्त झूरदां यांनी व्हिएन्नाच्या रोखाने जावयाचे व नेपोलियनने ऑस्ट्रिया अंकित इटली काबीज करावयाचा ,  अशी दुहेरी योजना संचालक मंडळाने आखली .  इटलीच्या मोहिमेत नेपोलियनचे मुख्य धो रण सार्डिनिया व ऑस्ट्रिया यांचा पराभव करणे हे होते .  त्यांना केरास्कॉ तह करण्यास भाग पाडले  (२८  एप्रिल  १७९६ ).  ऑस्ट्रियाच्या सैन्याचा लोदी येथे  १०  मे  १७९६  रोजी त्याने पराभव केला  नंतर त्यांचा लष्करी दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा असा मँट्युआचा किल्ला त्याने जिंकून घेतला  (१३  जुलै  १७९६ ).  फ्रेंच सैन्य दोन्ही आघाड्यांवर पुढे सरकत आहे ,  असे पाहून ऑस्ट्रियाने काम्पॉफार्मिदॉ येथे शस्त्रसंधी केला  (१७  ऑक्टोबर  १७९७ ).  यामुळे बेल्जियम ,  आयोनियन बेटे व ऱ्हाईनच्या डाव्या तीरावरील विस्तीर्ण प्रदेश फ्रान्सला मिळाले .  फ्रान्सच्या अधिपत्याखाली उत्तर इटलीमध्ये सिसॅल्‌ पाइन प्रजासत्ताक स्थापन झाले  (१७९७ ) परंतु त्याच्या मोबदल्यात नेपोलियनने व्हेनिसच्या प्रजासत्ताकाचे उदक ऑस्ट्रियाच्या हातावर सोडले .  पोप पायसलाही आपल्या प्रदेशाचा काही भाग व बरेच द्रव्य नेपोलियनला देणे भाग पडले .  नेपोलियनने मौल्यवान वस्तू व काही जगप्रसिद्ध चित्रे इटलीमधून फ्रान्समध्ये लूटून आणली .

  


   इंग्लंडला नमविण्यासाठी नेपोलियनने तुर्कस्तानच्या वर्चस्वाखालील ईजिप्त हा देश फ्रान्सच्या ताब्यात आणण्याचे ठरवले .  ईजिप्तच्या मोहिमेवर  (१९  मे  १७९८ ) जाताना त्याने तेथील संस्कृतीबद्दल कुतूहल असलेले अनेक विद्वान आपल्याबरोबर नेले होते .  वाटेत माल्टा त्याने जिंकून घेतले  (१७९८ ).  नंतर कैरोजवळ ईजिप्तच्या मामलूकांचा पराभव केला  परंतु ब्रिटिश ॲडमिरल ⇨ होरेशो नेल्सन  (१७५८ –  १८०५ )  याने ना ई लच्या लढाईत फ्रेंचांच्या आरमाराचा दारु ण पराभव केल्यामुळे  (१  ऑगस्ट  १७९८ )  नेपोलियन ईजिप्तमध्ये अडकून पडला . तुर्की सुलतानाचा संभाव्य हल्ला होण्यापूर्वीच तो पुढे सिरियामध्ये सरकला व तेथे काही लढाया जिंकून ईजिप्तमध्ये परतला .  यूरोपमध्ये फ्रान्सविरुद्ध एक फळी तयार होत आहे , हे कळल्यामुळे तो ईजिप्तमधून निवडक सहकाऱ्यांसह फ्रान्सला आला .  मागे राहिलेल्या फ्रेंच फौजेस शरणागती वाचून गत्यंतर उरले नाही .

  

    नेपोलियनच्या गैरहजेरीत युरोपातील देशांनी  फ्रान्सविरुद्ध फळी उभारण्याचे कारण म्हणजे क्रांतीच्या ज्वाला इतरत्र पसरण्याची त्यांना वाटणारी भीती .  हॉलंड ,  पीडमाँट ,  स्वित्झर्लंड ,  नेपल्स इ .  ठिकाणी जी प्रजासत्ताक राज्ये निर्माण झाली ,  ती फ्रान्सच्या प्रेरणेने झाली होती व सर्वस्वी फ्रान्सच्या अधी न होती .  या घटनेची प्रतिक्रिया म्हणजे रशिया ,  इंग्लंड व ऑस्ट्रिया यांची फ्रान्सविरुद्ध एकजूट निर्माण झाली .  प्रथमतः या फळीकडून फ्रान्सला पराभव प तक रावा लागला  परंतु फ्रेंचांचे सक्तीचे लष्करीकरण व दोस्त राष्ट्रां तील अंतर्गत मतभेद आणि द्वेष यांचा परिणाम होऊन या पराभवामधून फ्रान्स उसळी मारून दुप्पट जोराने वर आला .  ह्या सुमारास नेपोलियनने फ्रान्समधील संचालक मंडळाची सत्ता झुगारून देऊन नवे संविधान अंमलात आणले व स्वतः पहिला कॉन्सल बनला .

  क्रांतीचे परिणाम व महत्व : स्वातंत्र्य, समता व विश्‍वबंधुत्व ही तत्वत्रयी वरील क्रांतीकारक सुधारणांची प्रेरणा होती. त्यांच्या जोडीला क्रांतीने जनतेच्या सार्वभौमत्वाची घोषणा केली होती. ही तत्वत्रयी क्रांतीच्या काळात सार्वजनिक इमारतींवर झळकत असे. नेपोलियनने हुकूमशाही प्रस्थापित केल्यावरही ती शब्दावली न पुसता तशीच ठेवण्यात आली. स्वातंत्र्यामध्ये भाषण, लेखन, प्रकाशन तसेच धार्मिक आणि खाजगी मालमत्तेचे स्वातंत्र्य ह्या गोष्टी अभिप्रेत होत्या. समतेमध्ये सरदारवर्गाची व तिच्यामधील खास अधिकारांची समाप्ती, सर्व नागरिकांस वर्गनिरपेक्ष समान संधी व कायद्याच्या बाबतीत समानता या गोष्टी अंतर्भूत होत्या. विश्‍वबंधुत्व म्हणजे जगामध्ये स्वातंत्र्य व समता यांवर विश्‍वास असणारे व ती तत्त्वे अंमलात आणण्यासाठी झगडणारे सर्व लोक, मग ते कोणत्याही देशांतील असोत ते एकमेकांचे बंधू आहेत. स्वातंत्र्य, समता व विश्‍वबंधुत्व आणि जनतेचे सार्वभौमत्व या कल्पनांचा प्रसार सशस्त्र क्रांतीपूर्वी वैचारीक क्रांती करणाऱ्‍या फ्रेंच तत्ववेत्त्यांनी आपल्या लेखनाद्वारे केला होता. क्रांतीने या कल्पना साकार करण्याचा रांगडा धसमुसळेपणाचा रांगडा प्रयत्न केला. क्रांतीला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाले, ते युरोपीय जनतेमुळे नव्हे तर फ्रेंच सैन्यामुळे! फ्रान्सबाहेर क्रांती मानली न जाता लादली गेली होती. तत्त्वापेक्षा परिस्थितीच्या गरजेचा प्रभाव त्यांच्या कृतीवर जास्त पडला होता. सामाजिक समतेवर अशा प्रकारच्या लोकशाहीची व सामाजिक न्यायाची कल्पना यूरोपीय विचारांमध्ये कायमची दृढमूल झाली. पुढील इतिहासावरून ही कल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचे प्रयत्न युरोपात व अन्यत्र झालेले दिसून येतात आणि आधुनिक युगातही ते पुढे चालू आहेत. तसेच या काळात गरजेच्या पोटी किंमतीवर नियंत्रण आणणे, खासगी मालमत्ता ताब्यात घेणे, यांसारख्या ज्या काही गोष्टी क्रांतिकालीन शासनांना कराव्या लागल्या त्यांमधून काही विचारवंतांना समष्टिवादाची प्रेरणा मिळाली.

  

 क्रांतीकारकांचे बंधुत्व व आंतरराष्ट्रीय एकात्मता जगाच्या निदर्शनास आणण्यासाठी फ्रेंच नेता लाफायेत याने बॅस्तिलच्या किल्ल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यास देण्यासाठी इंग्लिश क्रांतीकारक टॉमस पेन याच्या हवाली केल्या. टॉमस पेन व जेरेमी बेंथॅम यांस फ्रान्सने नागरिकत्वाचे हक्क दिले. क्रांतीची तत्वे व वरील घटना यांचा विचार करता फ्रेंच राज्यक्रांतीची बैठक आंतरराष्ट्रीय स्वरूपाची होती, हे लक्षात येते. दुसरा महत्वाचा परिणाम म्हणजे फ्रान्समध्ये व फ्रेंचांच्या ताब्यातील इतर देशांत राष्ट्रीयत्वाती भावना निर्माण झाली राष्ट्रवादास प्रोत्साहन मिळाले आणि विसाव्या शतकातील राजकीय जागृतीवरही तिचा परिणाम झाला. क्रांतीकारक फौजांनी परक्या राजघराण्यास हाकलून लावले खरे पण क्रांतीचा प्रसार करण्यास निघालेल्या फ्रेंच फौजांमध्ये उत्तरोत्तर स्वार्थी व आक्रमक स्वरूपाचा राष्ट्रवाद संचारला व त्याची प्रतिक्रिया म्हणून विरोधक देशातील लोकांमध्ये स्वत्वाची म्हणजेच राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण झाली. विशेषतः पुढे नेपोलियनच्या काळात ही भावना प्रखर झालेली आढळते. फ्रेंच राष्ट्राच्या यशासाठी व नेपोलियनच्या इभ्रतीसाठी आपणास करभार सहन करावा लागावा, हे स्पेन, हॉलंड, ऑस्ट्रिया यांसारख्या देशांतील लोकांस मानहानीचे वाटू लागले. अन्यायाच्या व अपमानाच्या जाणिवेतून राष्ट्रीय भावनेने उसळी घेतली. शासन स्थापणे हे नवे ध्येय निर्माण झाले. युरोपातील जुनी सामाजिक व राजकीय धडी विसकटल्यामुळे एकोणिसाव्या शतकाच्या मध्यास इटली व जर्मनी यांची एकीकरणाची चळवळ सुरू होण्यास क्रांतीने गती मिळाली. अशा प्रकारे अभावितपणे फ्रेंच राज्यक्रांतीमुळे यूरोपातील राष्ट्रवादास स्फूर्ती मिळाली व एकोणिसाव्या शतकात या राष्ट्रवादी चळवळी फोफावल्या.

  

 फ्रेंच क्रांतीचे मूल्यमापन आधूनिक विचारवंत अनेक प्रकारे करतात परंतु क्रांतीच्या उद्दिष्टांपेक्षा तिची परंपरा व्यापक आहे. तीमध्ये क्रांतिकारी प्रक्रियेची अधिमान्यता, क्रांतीच्या मार्गाने मोठे उद्देश गाठण्याची शक्यता, क्रांतिगर्भ प्रचार आणि कृती ही अधिमान्य राजकीय साधने व आशय आहेत. क्रांतीने राजकीय कृतीचा धडा युरोपीय जनतेला दिला. या सामूहिक अनुभवातून क्रांतीची संकल्पना व सिद्धांत निघाले. विद्यमान परिस्थिती बदलून जीवन अधिक प्रगतीशील करण्यासाठी झगडणारा मानव, हा इतिहासामध्ये स्फूर्तिस्थाने शोधण्याचा सतत प्रयत्न करीत असतो. त्यास निष्ठेच्या, त्यागाच्या व हौतात्म्याच्या उदाहरणांनी खच्चून भरलेली फ्रेंच राज्यक्रांती निःसंशय स्फूर्तिदायक ठरेल.

पहा : क्रांती -२ नेपोलियन, पहिला फ्रान्स मानवी हक्क.

  

संदर्भ : 1. Cobban, Alfred, France Since the Revolution and Other Aspects of Modern History, London, 1976.

          2. Durant, Will, Rousseall and Revolution, New York, 1967.

          3. Gurr. T. R. Why Men Rebel, Princeton, 1971.

          4. Kafker, F. A. Laux, J. M. Ed. The French Revolution, New York, 1976.

          5. Kennedy, M. L. The Jacobin Club of Marseilles, Ithaca (N.Y.), 1973.

          6. Markham, F. M. H. Napoleon and the Awakening of Europe, New York, 1975.

          7. Mathiez, Albert, La Revolution Francaise, Vols. 3, Paris, 1962.

          8. O’Brien, C. C. Ed. Edmund Burke : Reflections on the Revolution in France, London, 1976.

          9. केळकर, न, चिं, फ्रेंच राज्यक्रांति, पुणे, १९३८.                                        

 पोतणीस, चं. रा.