जंजिरा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मुंबई इलाख्यापैकी महाराष्ट्रातील एक संस्थान. काठेवाडातील जाफराबादही यात अंतर्भूत होते. दोन्ही मिळून क्षेत्रफळ ९३३ चौ. किमी. लोकसंख्या सु.१ लाख (१९४१). जझीरा (बेट) या अरबी शब्दावरून जंजिरा नाव पडले. मराठी कागदपत्रांत क्वचित हबसाण असाही याचा उल्लेख येतो. पूर्वेस कुलाबा जिल्ह्यातील रोहा-माणगाव तालुके, दक्षिणेस बाणकोटची खाडी, पश्चिमेस अरबी समुद्र, उत्तरेस कुलाबा जिल्ह्यातील रोह्याची खाडी या संस्थानच्या सीमा होत. राजपुरीच्या खाडीने संस्थानचे दोन स्वाभाविक भाग पडले होते. पूर्वी येथे कोळ्यांचे राज्य होते. पंधराव्या शतकाच्या अखेरीस अहमदनगरच्या निजामशाहीतील हबशांनी (सिद्यांनी) कपटाने बेटावर कबजा मिळविला. येथील अभेद्य किल्ला जिंकण्याचे शिवाजी महाराजांचे प्रयत्न सफल झाले नाहीत. आदिलशाहीकडून शिवाजी महाराजांविरुद्ध संरक्षण मिळत नाही, असे पाहून हबशांनी १६७० मध्ये मोगलांची मांडलिकी पत्करली व पुढे ते मोगल नौदलाचे प्रमुख समजले जाऊ लागले. त्यांनी हाजच्या यात्रेकरूंना संरक्षण द्यावे व त्याच्या बदल्यात त्यांना सुरतच्या महसुलातील काही अंश मोगलांनी द्यावा, असे ठरले होते. १६८२ मध्ये संभाजी आणि १७३३ मध्ये आंग्रेपेशवे यांचे हल्ले जंजिऱ्याच्या सिद्दीने परतवले खरे तथापि दुसऱ्या वेळी त्याला रायगडपर्यंतचा आणि मावळातील सर्व प्रदेश सोडावा लागला. १७३६ मध्ये चिमाजी आप्पाने सिद्दीसात ह्या हबशी प्रमुखास लढाईत ठार केल्यानंतर ते मराठ्यांना वचकून वागू लागले. मोगल सत्तेच्या अपकर्षकाळी गुजरातच्या सुलतानाने वसविलेल्या काठेवाडातील जाफराबादचा ठाणेदार व कोळी चाचेगिरी करू लागले होते. ते १७६२ मध्ये जंजिऱ्याच्या वर्चस्वाखाली आले.

सुरतेच्या सिद्दी हिलालने १७३१ मध्ये त्यांची जहाजे धरून दंड मागितला, तो देता येईना म्हणून ठाणेदाराने १०४ चौ. किमी.चा हा प्रदेश सिद्दीलाच विकला. तेव्हा सिद्दी हिलाल आपल्या जंजिऱ्याच्या भाऊबंदांचा नोकर म्हणून कारभार पाहू लागला. अठराव्या शतकाच्या शेवटच्या पंचविशीत नाना फडणीसाने जंजिऱ्याच्या गादीसाठी चाललेल्या अंतःकलहाचा फायदा घेऊन गादीचा एक हक्कदार बालूमिया याला सुरतेजवळची सचिनची जहागीर देवविली आणि पेशव्यांची अधिसत्ता स्थापण्याचा प्रयत्न केला. १८३४ मध्ये संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक झाले. त्यांनी तेथील फक्त टांकसाळ बंद केली. संस्थानाला खंडणी नव्हती आणि संपूर्ण अंतर्गत स्वायत्तता होती. संस्थानी कारभारातील बजबजपुरीमुळे १८६८ मध्ये इंग्रज पोलिटिकल एजंट नेमला गेला आणि पोलीस व न्याय ही खाती त्यांच्याकडे सोपविली. श्रीवर्धन, मुरूड व म्हसाळे हे तीन महाल संस्थानात होते. मूळचे आफ्रिकेतून आलेले येथील नबाब मुसलमान बनले. संस्थानात बहुसंख्य हिंदू व सिद्दी थोडे असूनही त्यांना जहागिरी होत्या. २३ खेडी जहागिरीत दिलेली होती. शेतीखेरीज मच्छीमारी हा मुख्य धंदा होता. राजपुरीच्या खाडीत पूर्वी मोतीही सापडत. जहाजावर खलाशी बनणे हा उपजीविकेचा आणखी एक मार्ग असे. या संस्थानात बेने-इझ्राएल जमातीचे मराठी भाषिक असणे, हे संस्थानचे आणखी एक वैशिष्ट्य होय. १८७४ पासून मुंबई–दासगाव बोटी जंजिरा–श्रीवर्धनला थांबू लागल्या. जाफराबाद हेही चांगले बंदर होते. १८८० मध्ये डाकघर आले. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात आणि विसाव्या शतकात शिक्षण, नगरपालिका, आरोग्य, वनसंरक्षण अशा अनेक सुधारणा झाल्या. संस्थानचे उत्पन्न सु. १० लाख रुपयांपर्यंत होते. स्वातंत्र्योत्तर काळात संस्थान मुंबई प्रांताच्या कुलाबा जिल्ह्यात समाविष्ट झाले. 

कुलकर्णी, ना. ह.