डफ ग्रँट : (८ जुलै १७८९–२३ सप्टेंबर १८५८). मराठ्यांच्या इतिहासावर लिहिणारा सुप्रसिद्ध इतिहासकार. पूर्ण नाव कॅप्टन जेम्स कनिंगहॅम ग्रँट डफ. ग्रँट या नावाने तो अधिक परिचित आहे. त्याचा जन्म बॅम्फ (स्कॉटलंड) येथे झाला. अबर्डीन येथील मार्शल महाविद्यालयात त्याने प्रवेश घेतला पण शिक्षण अपुरे टाकून तो वयाच्या सोळाव्या वर्षी ईस्ट इंडिया कंपनीत, मुंबईच्या लष्करात नोकरीला आला. १८०६ साली बॉम्बे नेटिव्ह इनफंट्री अथवा बॉम्बे ग्रेनेडिअर्समध्ये त्याला अधिकाराची जागा मिळाली. एल्फिन्स्टनने त्यास मुद्दाम पुण्यास बोलावून घेतले. १८१७च्या खडकी येथील मराठ्यांबरोबरच्या युद्धात त्याने प्रसंगावधान दाखवून शौर्य दाखविले. या सुमारास त्याचा एल्फिन्स्टनशी चांगला परिचय झाला आणि त्यास कॅप्टन हा किताब मिळाला. १८१८ मध्ये त्याची एल्फिन्स्टनने साताऱ्यास पोलिटिकल एजंट म्हणून नियुक्ती केली. तो साताऱ्यास १८१८ ते १८२२ अशी चार वर्षे राहिला आणि साताऱ्याची राजकीय व्यवस्था लावून प्रतापसिंहास सुशिक्षित केले. १८२३ च्या जानेवारीत तो मायदेशी रजा घेऊन गेला, तो पुन्हा हिंदुस्तानात परत आला नाही. १८२५ मध्ये त्याने कंपनीच्या नोकरीचा राजीनामा दिला. तत्पूर्वी त्याची आई वारली. १८२५ मध्ये जेन कॅथरिन या तरुणीशी त्याने विवाह केला. तिची काही संपत्ती त्यास मिळाली. म्हणून उर्वरित आयुष्य त्याने आपली संपत्ती व शेती यांची देखभाल करण्यात घालविण्याचे ठरविले.एल्फिन्स्टनच्या आज्ञेप्रमाणे त्याने ऐतिहासिक कागदपत्रांचा शोध घेऊन १९ जुलै १८१९ रोजी मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचे कार्य अंगीकारले. थोड्याच अवधीत एल्फिन्स्टनच्या अनुमतीने त्याने लेखनकार्यास आरंभ केला. सातारचे महाराज तसेच अनेक संबंधित सरदार, सरदेशमुख, देशपांडे आणि आदिलशाही, निजामशाही येथील तवारिखा व मराठी बखरी तसेच पत्रे जमवून माहिती गोळा केली. यामध्ये त्यास बाळाजीपंत नातू यांचे फार साहाय्य झाले. हा सर्व इतिहास त्याने एल्फिन्स्टन, ब्रिग्झ, व्हॅन्स केनेडी, विल्यम अर्स्किन, बाळाजीपंत नातू यांना दाखविला व मसुदा तयार केला (१८२२). जॉन मरे पब्लिशर्स लि. कंपनीने या पुस्तकाचे ‘मोगल सत्तेचा ऱ्हास आणि ब्रिटीश सत्तेचा उदय’ असे नामकरण केल्यास छापू म्हणून कळविले. तेव्हा मला मराठ्यांचाच इतिहास केवळ सांगावयाचा आहे, असे बाणेदार उत्तर देऊन त्याने स्वखर्चाने लाँगमन्स लि. कंपनीकडून १८२६ मध्ये हिस्टरी ऑफ द मराठाज  हा ग्रंथ छापून प्रसिद्ध केला. या व्यवहारात त्यास २,००० पौंड खर्च आला. त्यांपैकी ३०० पौंड कसेबसे वसूल झाले. १९२१ पर्यंत या ग्रंथाच्या सहा आवृत्या निघाल्या. १८२९ मध्ये कॅ. डेव्हिड केपेन व बाबा साने यांनी या ग्रंथाचे मराठ्यांची बखर  या शीर्षकाने मराठीत भाषांतर केले. त्याच्याही सहा आवृत्या निघाल्या. त्याच्या ग्रंथावर प्रथम कुठेच समीक्षण आले नाही व टीकाही झाली नाही. मात्र नंतरच्या मराठी इतिहासकारांनी त्याच्या हिस्टरी ऑफ द मराठाज  या ग्रंथावर सडेतोड टीका केली. तथापि मराठ्यांचा सुसंगत इतिहास लिहिण्याचा त्याचा प्रयत्न सर्वांनी मान्य केला.

एडन येथे स्थायिक झाल्यावरही त्याचा प्रतापसिंह व एल्फिन्स्टन यांच्याशी प्रदीर्घ काळ पत्रव्यवहार चालू होता. सातारच्या राजाची पदच्युती आणि राज्य खालसा (१८४८) या संबंधीची ब्रिटिश नीती त्याला आवडली नाही. त्यास दोन मुलगे आणि एक मुलगी होती. त्याचा एक मुलगा माउंट स्ट्यूअर्ट एल्फिन्स्टन ग्रँट डफ हा पुढे मद्रासचा गव्हर्नर झाला. तो एडन येथे मरण पावला.

संदर्भ : Sen, S. P. Ed. Historians and Historiography in Modern India, Calcutta, 1973.

कुलकर्णी, अ. रा.