इंदूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य प्रदेशातील एक मोठे संस्थान. क्षेत्रफळ २४,६०५ चौ. किमी. चतुःसीमा उत्तरेस ग्वाल्हेर, पूर्वेस देवास व भोपाळ, दक्षिणेस पूर्वीचा मुंबई इलाखा, पश्चिमेस बडवानी व धार.

या संस्थानाचा संस्थापक ⇨ मल्हारराव होळकर (१६९४–१७६६). तो धनगर जातीचा होता. आपल्या मामाच्या मदतीने त्याने पेशव्यांच्या सैन्यात प्रवेश केला. त्याने पेशव्यांकडून मनसब, माळव्याची जहागीर व नर्मदेच्या उत्तरेकडील मराठ्यांच्या हालचालींचे सेनापतिपद हे अधिकार क्रमाक्रमाने मिळविले. त्याच्या हयातीतच त्याचा मुलगा खंडेराव हा मरण पावल्याने खंडेरावाचा मुलगा मालेराव यास पुढे गादीवर बसविण्यात आले. तथापि मालेरावाच्या अकाली निधनामुळे खंडेरावाची पत्‍नी अहिल्याबाई हिने १७५४ ते १७९५ पर्यंत इंदूर संस्थानची जबाबदारी सांभाळली. धार्मिकता, औदार्य, देवालयांचे जीर्णोद्धार, न्याय व राज्यकारभाराची उत्तम व्यवस्था इ. कार्यांबद्दल ती प्रसिद्ध आहे. इंदूर शहराची भरभराट अहिल्याबाईनेच केली. तिच्यानंतर मल्हाररावाचा पाल्य तुकोजीराव गादीवर आला. तुकोजीरावाच्या मृत्यूनंतर त्याच्या काशीराव व मल्हारराव या दोन मुलांपैकी मल्हाररावास पेशव्यांनी होळकरशाहीची वस्त्रे दिली. मल्हारराव युद्धात मारला गेला त्यास मुद्दाम मारण्यात आले असे तत्कालीन कागदपत्रांवरून वाटते. तुकोजीचा अनौरस पुत्र विठोजीने पंढरपुरला लुटमार केली, या सबबीखाली पेशव्यांनी त्याला हत्तीच्या पायाखाली दिले.

तुकोजीचा दुसरा अनौरस पुत्र यशवंतराव होय. त्याने काशीरावाला दूर करून आपला पुतण्या खंडेराव याच्या नावाने कारभार सुरू केला. दक्षिणेत येऊन यशवंतरावाने शिंदे व पेशवे यांच्या मुलखात लूटमार व जाळपोळ केली. इंग्रजांविरुद्ध पुकारलेल्या युद्धात त्याने रणजितसिंग, भरतपूरचा राजा, शिंदे, भोसले इत्यादींची मदत मिळविण्यासाठी खटपट केली. इतरांकडून फारशी मदत न मिळताही त्याने इंग्रजांना मोठ्या हिमतीने तोंड दिले. तथापि नाईलाजाने १८०५ साली कर्नल लेकशी त्याला तह करावा लागला. दारूचे व्यसन व वारंवार येणारे वेडाचे झटके, यांमुळे भानपुरा येथे तो मरण पावला (१८११). मराठेशाहीच्या स्वातंत्र्यासाठी झुंजणारा, स्वार्थत्यागी, मुत्सद्दी व लष्करी संघटक म्हणून तो प्रसिद्ध आहे. त्याची पत्‍नी तुळसाबाई हिचा शिरच्छेद त्याच्याच सैन्याने केला (१८१७). १८१७ च्या इंग्रज-मराठे युद्धात होळकरांचा मेहिदपूर येथे पराभव होऊन, मंदसोरच्या तहान्वये होळकर ब्रिटिशांचे मांडलिक बनले.

तुळसाबाईने दत्तक घेतलेला मल्हारराव १८३३ साली मरण पावला. त्यानंतर सत्तेवर आलेले हरिराव व खंडेराव कर्तृत्ववान नव्हते. १८४३ मध्ये ब्रिटिशांनी भाऊ होळकराच्या मुलास दुसरा तुकोजी म्हणून गादीवर बसविले. त्यानंतर शिवाजीराव (१८८६) व तिसरे तुकोजीराव (१९०३) गादीवर आले. १९२७ साली तुकोजीरावाच्या निवृत्तीनंतर त्याचा पुत्र यशवंतराव गादींवर आला. त्याच्या कारकीर्दीतच २० एप्रिल १९४८ ला हे संस्थान मध्य भारत संघात विलीन झाले.

शिक्षण, व्यापार व कापड उत्पादन या क्षेत्रांत या संस्थानाने बरीच प्रगती केली आहे.

पहा : होळकर घराणे.

कुलकर्णी, अ. रा.