एलेनबरो, लॉर्ड एडवर्ड : (८ सप्‍टेंबर १७९०­­­—२२ डिसेंबर १८७१). ब्रिटिशांकित हिंदुस्थानचा १८४२ ते १८४४ या काळातील गव्हर्नर जनरल. याचे वडील इंग्‍लंडमध्ये मुख्य न्यायाधीश होते. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर एलेनबरो सेंट मायकेल परगण्यातर्फे हाउस ऑफ कॉमन्सचा सभासद झाला. वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने हाउस ऑफ लॉर्ड्‍‍‍समध्ये प्रवेश केला. १८२८ मध्ये त्याला ‘लॉर्ड प्रिव्ही सील’ व पुढे बोर्ड ऑफ कंट्रोलच्या अध्यक्षत्त्वाचा मान मिळाला. १८४२ मध्ये त्याची ऑकलंडच्या जागी हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल म्हणून नेमणूक झाली.

आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या उद्देशाने आलेल्या एलेनबरोची कारकीर्द युद्ध करण्यातच गेली. अफगाण युद्धाचा लॉर्ड ऑकलंडने खेळखंडोबा केला होता. अफगाणिस्तानात इंग्रज पराभूत होत आहेत, हे लक्षात येताच एलेनबरोने आपल्या सेनापतींना गझनी व काबूल या वाटेने परत फिरण्यास सांगितले. इंग्रजांनी गझनीची तटबंदी धुळीस मिळविली, काबूलचा बाजार उधळून टाकला. आनंदाच्या भरात एलेनबरोने मुहम्मद गझनीने नेलेले सोमनाथचे चंदनी दरवाजे आग्रा येथे आणण्यास सांगितले मात्र आता ही केवळ दंतकथा ठरली आहे.

सिंधच्या बाबतीत मिंटो, बेंटिंग, ऑकलंड यांचे अपुरे काम एलेनबरोने पुरे केले. एलेनबरोने सिंधमध्ये असलेला इंग्रज रेसिडेंट उट्रम यास अमीरा बरोबर तैनाती फौजेचा तह करण्याची सूचना दिली. सिंधमध्ये नेपिअरला पाठवून त्याने सिंध ताब्यात घेतला. शीख व ग्वाल्हेरचे शिंदे यांच्या फौजेचे एकीकरण टाळण्यासाठी व ग्वाल्हेरच्या वाढत्या फौजेला आळा घालण्यासाठी त्याने ग्वाल्हेरमधील लष्करी सत्ता मोडण्याचे प्रयत्‍न सुरू केले. जनकोजी शिंदे मरण पावल्यावर त्याची दुसरी बायको ताराबाई हिने १८४३ मध्ये दत्तक घेतला. यामुळे निर्माण झालेल्या अव्यवस्थेचा फायदा घेऊन एलेनबरोने ग्वाल्हेरवर सैन्य रवाना केले. नंतर दि. १३ जानेवारी १८४४ रोजी झालेल्या तहानुसार अल्पवयी राजाचा कारभार पहाण्यासाठी ‘कौंसिल ऑफ रीजन्सी’ नेमण्यात आले.

गुलामगिरी नष्ट करण्यासाठी एलेनबरोने कायदा केला. बंगालमधील पोलिसदलात त्याने सुधारणा केल्या. १८४४ मध्ये एलेनबरोला परत बोलाविण्यात आले. १८५२ मध्ये हाउस ऑफ कॉमन्सच्या सिलेक्ट कमिटीपुढे एलेनबरोने हिंदुस्थानच्या कारभाराविषयी अनेक योजना सुचविल्या. त्या पुढे १८५८ च्या कायद्याने अंमलात आल्या. एलेनबरो उत्कृष्ट वक्ता होता. तो सनदी नोकरांवर टीका करीत असे.

देवधर, य. ना.