काशी संस्थान : प्राचीन संस्कृत व बौद्ध वाङ्मयात उल्लेखिलेले काशीचे स्वतंत्र राज्य. इ.स.पू.सु. सहाव्या शतकात कोसल राज्यात समाविष्ट झाले. आधुनिक काशी संस्थानाचा उगम १७३८ च्या सुमारास गंगापूरचा जमीनदार मनसाराम यांने अयोध्येचा सुभेदार सादतखानाकडून मिळविलेल्या बनारस–जौनपुर–चरणादीच्या जमीनदारीत झाला. त्याचा मुलगा राजा बलवंतसिंग याने किल्ले बांधले, राज्यविस्तार करून संस्थान नावारूपाला आणले, राजधानी गंगापूरहून काशीजवळील १६ किमी.वरील रामनगरला आणली (१७५०). अयोध्येच्या राजकारणावर त्याचा प्रभाव असे. त्याच्या मृत्यूनंतर (१७७०) त्याचा अनौरस मुलगा चेतसिंग याला राजा म्हणून मान्यता मिळाली. पुढे चेतसिंगचे ईस्ट इंडिया कंपनीशी संबंध बिघडले. १७८१ मध्ये त्याच्याकडून पैसे उकळण्यासाठी वॉरन हेस्टिंग्ज बनारसला आला. चेतसिंगला कैद झाली, पण तो निसटला. बलवंतसिंगचा नातू महीपनारायणसिंगला गादीवर बसविण्यात आले. सत्तासूत्रे मात्र इंग्रजांच्या हाती होती. रेसिडेंट डंकनने उत्तम शासन करून महसूल वाढवला. राजांकडे फक्त गंगापूर तहसील (बनारस जिल्हा), भादोही व चावीया (मिर्झापूर जिल्हा) हा २,५३१ चौ.किमी. चा, २० लाख उत्पन्नाचा पूर्वार्जित प्रदेश व उत्तर प्रदेशातील काही जमीनदाऱ्या राहिल्या. काशीचे नामधारी राजे इंग्रजांशी एकनिष्ठ असत. १९११ मध्ये काशीला संस्थान म्हणून मान्यता मिळाली, ऑक्टोबर १९४९ मध्ये ते उत्तर प्रदेश राज्यात विलीन झाले. काशीचे विद्यमान राजे विभूतिनारायणसिंग यांनी काशीराज ट्रस्ट नावाचा एक मोठा निधी स्थापन करून त्याकरवी मुख्यतः पुराणांच्या संशोधित आवृत्त्या प्रकाशित करण्याचे एक मोठे सांस्कृतिक कार्य चालविले आहे.

पहा : वाराणसी.

कुलकर्णी, ना.ह.