तालिकोटची लढाई : दक्षिण भारतात २३ जानेवारी १५६५ रोजी सामान्यतः तालिकोट वा राक्षस–तागडी येथे झालेली ऐतिहासिक महत्त्वाची निर्णायक लढाई. विजयानगराच्या रामराजाचा मुसलमानी राज्यात होणारा वाढता हस्तक्षेप थांबविण्याकरिता, त्याचप्रमाणे वर्धिष्णू होणाऱ्या हिंदू सत्तेस पायबंद घालण्याकरिता आदिलशाह, निजामशाह, कुत्बशाह व बरिदशाह यांनी युती करून त्याच्यावर स्वारी केली. या युतीत अकबरही सामील झाल्याची दंतकथात्मक माहिती प्रा. एच्. के. शेरवानी यांनी नंदियाळ कैफियतच्या आधारे दिली आहे. रामराज्याच्या मराठी कन्नड बखरीनेही त्यास पुष्टी मिळते परंतु या माहितीची साधने अगदी उत्तरकालीन असल्यामुळे विश्वसनीय असण्याची शक्यता कमी. रामराजाचा भोंगळपणा व शत्रूच्या सामर्थ्यास कमी लेखण्याची प्रवृत्ती यांमुळे तीत त्याचा पराभव होऊन तो मारला गेला व विजयानगरचे हिंदू साम्राज्य पुढील शंभर वर्षांत प्रायः लय पावले.

खोडवे, अच्युत