प्यूनिक युद्धे : प्राचीन काळी रोम व कार्थेज यांमध्ये इ. स. पू. २६४—१४६ दरम्यान झालेली तीन युद्धे. या युद्धांना कार्थेजिनियन युद्धे असे दुसरे नाव आहे. कार्थेज शहर फिनिशियन (लॅटिनप्यूनिकस) लोकांनी बसविले होते. त्यावरून या युद्धांस प्यूनिक युद्धे हे नाव मिळाले. पहिले प्यूनिक युद्ध इ. स. पू. २६४—२४१ दुसरे इ. स. पू. २१८—२०१ व तिसरे इ. स. पू. १४९—१४६ दरम्यान झाले.

आफ्रिकेच्या उत्तर किनाऱ्यावरील ट्यूनिसच्या आखातातील कार्थेज ह्या सुरक्षित बंदरातून भूमध्य समुद्राच्या परिसरातील स्पेनपासून ग्रीसपर्यंतच्या देशांशी कार्थेजचा मोठा व्यापार चाले. कार्थेजच्या सैन्यात युद्धनौका असून त्यांचे आरमार सुसज्‍ज होते. सागरी स्वामित्वाच्या बळावर कार्थेज वैभवाच्या शिखराकर गेले होते. तथापि कार्थेजिनियन लोक वृत्तीने व्यापारी असल्यामुळे त्यांचे शासन व्यापारी वर्गाकडे होते व त्यांचे सैन्यही भाडोत्री होते. रोम हे लोकसत्ताक राज्य असून त्याची भूसेना सुसज्‍ज होती पण त्याच्याजवळ आरमार मुळीच नव्हते.

पहिले युद्ध : सिसिलीतील मेसीना आणि सिरॅक्यूझ नगरराज्यांच्या तंट्यातून प्रथम पहिले प्यूनिक युद्ध उद्‌भवले. मेसीनाच्या लोकांनी रोम व कार्थेज दोघांनाही मदतीस बोलाविले. इटलीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मोक्याच्या सिसिली बेटावर ताबा असणे रोमच्या फायद्याचे होते. साहजिकच रोमचे सैन्य मेसीनाच्या मदतीस गेले पणत्या अगोदरच कार्थेजचे सैन्य मेसीनाला पोहोचून तंट्यात तडजोडही निघाली होती. तरीही रोमनांनी या संधीचा फायदा घेऊन कार्थेजच्या सैन्याला हुसकावून लावले आणि संपूर्ण सिसिलीवर ताबा मिळविला. कार्थेजच्या आरमाराशी मुकाबला देण्यासाठी रोमने आरमारही उभारले होते. या आरमाराने मीलात्सॉची लढाई जिंकून आफ्रिका खंडात रोमन सैन्य उतरविले. परंतु कार्थेजिनियन सेनापती हॅमिलकार बार्कने रोमन सैन्यास सतावून सोडले इतकेच नव्हे, तर रोमन आरमाराचा पराभव करून त्याने आरमारप्रमुख मार्कस अटिलिअस रेग्यूलसलाही कैद केले. या संकटांनी न डगमगता रोमनांनी नवे आरमार उभारले व इगेडियन बेटांजवळ कार्थेजच्या आरमाराचा धुव्वा उडविला. तेव्हा कार्थेजच्या याचनेनुसार त्याच्या ताब्यातील सिसिलीचा प्रदेश व भारी युद्धदंड घेऊन रोमने उभयतांतील तहास मान्यता दिली.

पहिल्या युद्धानंतर तहाच्या अटींकडे दुर्लक्ष करून रोमनांनी प्रथम सार्डिनिया व कॉर्सिका बेटे काबीज केली. या युद्धामुळे कार्थेजची अपरिमित हानी झाली होती. त्यांचे भूमध्यसमुद्रातील आरमारी वर्चस्व कमी झाले आणि त्यांच्या विभागलेल्या साम्राज्यावर रोमचे सातत्याने हल्ले होऊ लागले. तेव्हा हॅमिलकार बार्कने स्पेनमध्ये कार्थेजचे बस्तान बसवून रोमला शह देण्याचा प्रयत्न चालविला. हॅमिलकारचा मुलगा हॅनिबल याने रोमनानुकूल सागून्टोवर हल्ला करताच रोमने युद्ध पुकारले व दुसऱ्या प्यूनिक युद्धास सुरुवात झाली.

दुसरे युद्ध : यावेळी रोमने सुरुवातीस हॅनिबलने शरणागती पतकरावी असे सुचविले परंतु त्याचे चढाईचे धोरण कार्थेजिनियनांत इतके लोकप्रिय झाले होते, की त्यांच्या परिषदेने हॅनिबलला सर्वाधिकार दिले आणि युद्ध जाहीर केले. हे युद्ध अठरा वर्षे चालले. पिरेनीज पर्वत, ऱ्होन नदी व आल्प्स पर्वत यांसारख्या नैसर्गिक अडचर्णीवर मात करून हॅनिबलने इटलीवर स्वारी केली व प्रचंड रोमन सेनेला सतत मागे रेटीत नेले. रोमन सेनापती मॅक्सिमस फेबिअस व थोरला सिपिओ ॲफ्रिकेनस यांचे व हॅनिबलचे डावपेच, उभय सैन्यातील असंख्य झटापटी इत्यादींमुळे विश्वेतिहासातील एक महान संग्राम म्हणून या युद्धाचा सैनिकीतज्ञ उल्लेख करतात. रोमची आर्थिक सुबत्ता व क्षमता, मध्य इटलीतील डोंगराळ मुलखामुळे आपल्या घोडदळाच्या हालचालींना होणारे अडथळे, रसद मिळविण्यातील असंख्य अडचणी आणि स्वदेशातून अपेक्षेप्रमाणे न मिळणारी मदत यांसारख्या अनंत अडचणींना तोंड देऊनही हॅनिबल कित्येक वर्षे इटलीत ठाण मांडून राहिला. खुद्द कार्थेजवरच स्वारी केली, तर हॅनिबलला इटलीतून माघार घ्यावी लागेल म्हणून शेवटी रोमन सेनापती थोरला सिपिओ ॲफ्रिकेनस याने तो विचार अंमलात आणला. अपेक्षेप्रमाणे कार्थेजच्या शासकांनी हॅनिबलला स्वदेशी बोलाविले. तेथे झामाच्या संग्रामात थोरला सिपिओ ॲफ्रिकेनसने हॅनिबलचा पराभव केला. तेव्हा स्पेनमधील आपला मुलूख व सर्व आरमार यांवरील ताबा सोडून कार्थेजला तह करावा लगला.

तिसरे युद्ध : यानंतर कार्थेजच्या राजकीय सत्तेला उतरती कळा लागली. तथापि कार्थेजने अनेक संकटांतून आपले व्यापारी वर्चस्व पुन्हा प्रस्थापित केले. त्यामुळे साहजिकच रोमला त्याचा हेवा वाटू लागला. तेव्हा मार्कस पॉरशिअस केटोसारख्या रोमन मुत्सद्यांनी रोमच्या सुरक्षिततेसाठी कार्थेज नष्ट केलेच पाहिजे, असा प्रसार व प्रचार सतत चालू ठेवला. सुरुवातीस रोमला यश येईना. शेवटी काहीतरी निमित्त काढून रोमन सेनेटने धाकटा सिपिओ ॲफ्रिकेनस याला सर्वाधिकार देऊन कार्थेजवर पाठविले. त्याने कार्थेजला वेढा घातला व शहराची रसद तोडली. उपासमारीने कार्थेजमधील लोकांचे फार हाल झाले, तरी युद्ध चालूच राहिले. शेवटी रोमन सैन्याने तटावर हल्ला करून कार्थेजमध्ये प्रवेश केला. शहराच्या रस्त्यारस्त्यावर व घरोघरी चकमकी होऊन सु. सात लाख नागरिकांची कत्तल झाली आणि रोमनांनी कार्थेज जाळून उद्ध्वस्त केले. यामुळे भूमध्यसमुद्रावर पूर्णतः रोमचे वर्चस्व प्रस्थापित झाले.

संदर्भ : 1. Cook, S. A. &amp Others, The Cambridge Ancient History, Vols. VII &amp VIII, Cambridge, 1954.

2. Dorey, T. A. Dudley, D. R. Rome Against Carthage, New York, 1972.

ओक, द. ह.