हिक्सॉस : पॅलेस्टाइन व त्याच्या परिसरातील एक पशुपालक सेमेटिक वंशाची रानटी जमात. या प्रदेशात त्यांचा इ. स. पू. सतराव्या शतकात वावर होता. काही इतिहासकार त्यांचा धनगर राजे असा उल्लेख करतात, तर ईजिप्तमधील भाषेत हिक्सॉस म्हणजे परकीय जमातनायक वा म्होरक्या होय. इ. स. पू. १७८० च्या सुमारात सिरिया व पॅलेस्टाइन-मधून त्यांनी ईजिप्तवर स्वारी केली. त्या वेळी ईजिप्तमध्ये द्वितीय मध्यकाळातील चौदा ते सतरा राजवंशातील राजांचा अंमल होता.हिक्सॉस लोकांनी हळूहळू ईजिप्तच्या फेअरोंना जिंकून तिथे आपलाअंमल बसविला. तो इ. स. पू. १५५० पर्यंत होता व पुढे सतराव्या घराण्याच्या फेअरोंनी त्यांचे उच्चाटन केले व एकतंत्री राज्य स्थापनकेले. हिक्सॉसांनी घोडा, घोड्यांचा रथ, नवीन शस्त्रास्त्रे, विशेषतः ब्राँझची हत्यारे व आयुधे आणि तटबंदीचे वास्तुशास्त्र यांची माहिती ईजिप्शियनांना करून दिली. 

 

ईजिप्शियन इतिवृत्तलेखकांनी त्यांचा रानटी टोळ्या असा उल्लेख केला असला, तरी त्यांनी ईजिप्तमधील देवदेवता, धार्मिक स्थळे यांना हात लावला नाही. तसेच तेथील कला, साहित्य यांचे प्रवाह पूर्ववत चालूराहिले. घोडे, घोड्यांची गाडी व ब्राँझचा वापर या हिक्सॉसांनी ईजिप्तमध्ये आणलेल्या गोष्टी आत्मसात करून पुढे ईजिप्त संस्कृती अधिक प्रभाव-शाली झाली. त्यामुळे पुढे ईजिप्तला मोठे साम्राज्य स्थापणे शक्य झाले. 

 

हिक्सॉससंबंधीच्या मॅनेथोनच्या उपलब्ध तुटक टिपणावरून जोसेफसने दिलेला वृत्तान्त विश्वसनीय नाही तथापि हॅटशेपसूटच्या कोरीव लेखातीलउल्लेखावरून ईजिप्तमधील राजकीय अंदाधुंदीतून ईजिप्तमध्ये पूर्ववत राजेशाही प्रस्थापित झाली असे दिसते. 

 

पहा : ईजिप्त संस्कृति. 

सोसे, आतिश सुरेश