थ्यूसिडिडीझ : (सु.४७१ ?–३९९ इ. स. पू.). प्राचीन ग्रीसमधील एक प्रसिद्ध इतिहासकार व शास्त्रशुद्ध इतिहासलेखनपद्धतीचा जनक. त्याच्या जन्ममृत्युच्या काळाविषयी निश्चित माहिती उपलब्ध नाही. तथापि आधुनिक इतिहासकार त्याचा जन्म इ. स. पू. ४६० ते ४५० च्या दरम्यान मानतात. त्याचा अथेन्स येथे सधन घराण्यात जन्म झाला. त्याचे वडील ओलोरस ह्यांच्या मालकीच्या सोन्याच्या खाणी थ्रेस येथे होत्या व त्याची आई हेजिसिपाइल ही मूळची थ्रेसची. त्यामुळे थ्रेस–अथेनियन गुणावगुणांचा वारसा त्याला लाभला. त्याच्या बालपणाविषयी आणि शिक्षणासंबंधी फारशी माहिती उपलब्ध नाही तथापि त्याने अथेन्समध्ये उपलब्ध असणारे सर्व शिक्षण घेतले होते. तो अँटिफोनच्या हाताखाली वक्तृत्वकला व ॲनॅक्सॅगोरसच्या हाताखाली तत्त्वज्ञान शिकला. इ. स. पू. ४३०–२७ मध्ये आलेल्या प्लेगच्या साथीतून सुदैवाने तो बचावला. अथेन्सविरुद्ध स्पार्टा यांतील पेलोपनीशियन युद्धात (इ. स. पू. ४३१–०४) तो एक सेनानी होता. त्याने तत्कालीन दैनंदिन घटनांची नोंद ठेवली व पुढे त्यांवरून द हिस्टरी ऑफ द पेलोपनीशियन वॉर  हा आठ खंडात्मक पुस्तकात विभागलेला ग्रंथ लिहिला. अर्थात ह्या ग्रंथासाठी जी सामग्री त्यास हवी होती, ती त्याने हद्दपारीच्या सु. वीस वर्षांच्या काळात अविश्रांत परिश्रम व प्रवास करून गोळा केली. तत्पूर्वी थ्रेसवरील आरमारी स्वारीसाठी निवडलेल्या दोन सेनापतींपैकी तो एक होता. त्याच्याकडे अँफिपलिसला शत्रूच्या वेढ्यातून मुक्त करण्याचे काम दिले होते. त्यात तो अयशस्वी झाला. तेव्हा अथेनियनांनी त्यास हद्दपार केले. पुढे क्लीऑनच्या मदतीने त्याचा अज्ञातवास समाप्त झाला व इ. स. पू. ४०४ च्या सुमारास तो अथेन्समध्ये परत आला आणि त्याने उपर्युक्त इतिहासलेखनास प्रारंभ केला. इ. स. पू. ३९९ च्या सुमारास त्याचा खून झाला असावा. त्यामुळे त्याने आरंभलेले इतिहासलेखनाचे कार्यही अपूर्ण राहिले.

आपल्या पुस्तकाच्या सुरुवातीस त्याने म्हटले आहे की, ‘थ्यूसिडिडीझ, एक अथेनियन, पेलोपनीशियन व अथेनियन ह्यांमध्ये जे युद्ध झाले, त्याच्या सुरुवातीपासूनचा इतिहास लिहीत आहे, कारण हे आतापर्यंत घडलेल्या सर्व युद्धांत एक महत्त्वाचे युद्ध आहे’.

थोडक्यात, हीरॉडोटस जिथे थांबला, त्या इराणी युद्धापासूनच्या पुढील इतिहासलेखनास थ्यूसिडिडीझने सुरुवात केली. हीरॉडोटस त्याच्यापूर्वी पन्नास वर्षे आधी होऊन गेला व तो सुशिक्षित वाचकांच्या करमणुकीसाठी इतिहासलेखन करीत असे. उलट, थ्यूसिडिडीझचा दृष्टिकोन विशाल आहे. त्याने जमविलेली माहिती भावी इतिहासकारांच्या उपयोगासाठी संकलित करून ठेवली. हीरॉडोटसची स्वैर व असंबद्ध शैली त्याच्या विवेचनात आढळत नाही. त्याची शैली सखोल, समतोल पण थोडी क्लिष्ट होती. वस्तुनिष्ठतेला अधिक चिकटून राहण्याची त्याची निःपक्षपाती प्रवृत्ती उल्लेखनीय आहे. इतिहासमीमांसेत अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कार्यकारणभावाच्या तत्त्वाचे भान त्याच्या लेखनात सतत प्रत्ययास येते. त्याने सांगितलेल्या घटना एकतर प्रत्यक्ष अनुभविलेल्या आहेत किंवा प्रत्यक्ष अनुभवलेल्यांकडून ऐकलेल्या आहेत. तथापि त्याचा इतिहास म्हणजे केवळ लष्करी इतिहासच होय. त्यात कोठेही सामाजिक–सांस्कृतिक अंगांचा विचार आढळत नाही कारण त्याचा वर्ण्यविषय पूर्णतया युद्ध आणि त्यात सहभागी झालेल्या व्यक्ती एवढा मर्यादित आहे. असे असले, तरीही थ्यूसिडिडीझ हा खऱ्या अर्थाने इतिहासकार आहे कारण त्याला इतिहासामागील तत्त्वज्ञानाची जाणीव असलेली दिसते. म्हणूनच त्यास इतिहासलेखनपद्धतीचा जनक म्हटले जाते. त्याच्या ग्रंथांचे इंग्रजी भाषांतर टॉमस हॉब्ज याने प्रथम केले असून पुढे डेव्हिड ग्रीनने ते १९५९ साली संपादित केले.

संदर्भ : 1. Godolphin, F. R. B. Ed. The Greek Historians, Vol.I, New York, 1942.

           2. Westlake, H. D. Individuals in Thucydides, London, 1968.

           3. Woodhead, A. G. Thucydides on the Nature of Power, Cambridge (Mass.), 1970.

 

देशपांडे, सु. र.