झ्वँव्हील, झां सीर द : (? सु. १२२४-२५—२४ डिसेंबर १३१७). फ्रेंच इतिवृत्तकार व लेखक. शँपेन प्रांतातील व्हासी येथे जन्म. झ्वँव्हीलने १२४१ मध्ये प्रथम नवव्या लूईची सोम्यूर येथे भेट घेतली आणि त्याच्याबरोबरच त्याने धर्मयुद्धाचा क्रॉस धारण केला. १२४८ च्या सातव्या धर्मयुद्धात झ्वँव्हील लूईबरोबर ईजिप्त, पॅलेस्टाइन या भागांत गेला आणि प्रत्यक्ष युद्धात सहभागी झाला परंतु लुईचा पराभव होऊन त्यांना सैन्यासहित अटक करण्यात आली. पुढे पैसे देऊन लूईने दोघांची मुक्तता करून घेतली. १२५४ मध्ये फ्रान्सला परत येईपर्यंत त्याची व लूईची घनिष्ठ मैत्री जमली. सिरियात तुरुंगात असताना झ्वँव्हीलने क्रेडोवरील आपली टीका पूर्ण केली (१२५१). या टीकेत त्याचे बायबलसंबंधीचे सखोल ज्ञान आणि चिकित्सक दृष्टी दिसते. या स्वारीनंतर लूईने त्यास शँपेन प्रांताचा सुभेदार नेमले. तो हळूहळू दरबारी कामकाजात तरबेज झाला. लूईने त्यास पुढील धर्मयुद्धाकरिता पुन्हा बोलविले. तेव्हा त्याने ‘मी येथील लोकांची व्यवस्था पाहतो’, या सबबीवर नकार दिला. लूईचा ट्यूनिस येथे १२७९ मध्ये पूर्ण पराभव झाला आणि त्यात तो मरण पावला. झ्वँव्हीलने उर्वरित आयुष्य आपल्या सुभ्याची प्रशासनव्यवस्था व लेखन यांत व्यतीत केले. दहाव्या लूईची आई व शँपेन आणि नाव्हारा प्रांताची राणी झान् हिने नवव्या लूईच्या आठवणी लिहिण्यासाठी त्यास विनंती केली, पण तिच्या मृत्यूपूर्वी (१३०५) त्यास त्या पूर्ण करता आल्या नाहीत. पुढे १३०९ मध्ये त्याने दहाव्या लूईस त्या अपर्ण केल्या. या आठवणी हिस्टरी ऑफ द सेंट लूई (१३०९) किंवा द लाइफ ऑफ सेंट लूई  या नावाने प्रसिद्ध आहेत. या ग्रंथाचे स्वरूप पूर्णतः खासगी असून त्यात औपचारिक इतिहासलेखनाऐवजी लूईचे खासगी जीवन, दंतकथा, चालीरीती, सातवे धर्मयुद्ध व तत्कालीन सरंजामशाही पद्धती इत्यादींचे सहजसुंदर वर्णन आढळते. झ्वँव्हीलची शैली साधी व संवेदनशील असून तो प्रामाणिकपणे आपले दोष सांगतो तसेच निर्भीडपणे राजाच्या चुका मांडतो. धर्मयुद्धांवरील ग्रंथांत त्याचा हा इतिहास माहितीपूर्ण व निःपक्षपाती समजला जातो. त्याच्या या ग्रंथाचे जोन एव्हान्झने केलेले इंग्रजी भाषांतर प्रमाणभूत मानतात (१९३८).

देशपांडे, सु. र.