ड्रायफस प्रकरण : आल्फ्रेड ड्रायफस ह्या फ्रेंच लष्करातील अधिकारी व्यक्तीवर लादलेल्या आरोपातून उद्‌भवलेले एक प्रकरण. फ्रान्समध्ये ज्यूविरोधी वातावरण तापले असताना तसेच रोमन कॅथलिक चर्च व राज्यसंस्था यांमध्ये भांडण चालू असताना उद्‌भवलेल्या या प्रकरणामुळे तिसऱ्या प्रजासत्ताकास धक्का बसला. जर्मनीला लष्करी गुपिते कळविल्याच्या आरोपावरून लष्करातील एक ज्यू अधिकारी कॅप्टन आल्फ्रेड ड्रायफस (१८५९–१९३५) यास सप्टेंबर १८९४ मध्ये लष्करी न्यायालयाने जन्मठेपीची शिक्षा दिली व डेव्हिल्स बेटावर हद्दपारीत धाडले. पुढे काही दिवसांतच फ्रान्समध्ये असे वातावरण निर्माण झाले, की ड्रायफस निष्पाप आहे. त्यातच १८९७ मध्ये गुप्तहेर खात्याचा प्रमुख कर्नल झॉर्झ पीकार याने खरा गुन्हेगार ड्रायफस नसून एस्टेराझी हा आहे, असे मत मांडले. पीकारने स्वार्थाचा विचार न करता हे सत्य उजेडात आणले. एमिल झोला प्रभृती व न्यायप्रेमी लोक तसेच प्रजासत्ताकाच्या पुरस्कर्त्यांनी व समाजवाद्यांनी ड्रायफसला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी केली. लष्करी श्रेष्ठींनी इभ्रतीसाठी ड्रायफसची फेर चौकशी करण्यास नकार दिला. मे. आंरीने ड्रायफसविरुद्ध आणखी खोटे कागद तयार केले व पीकारवरही काही आरोप लादले. एवढेच नव्हे, तर पीकारने पुन्हा यात भाग घेऊ नये, म्हणून त्याची बदली ट्यूनिशियात केली. तेव्हा ड्रायफसच्या मॅथ्यू या भावाने हे प्रकरण धसास लावण्याकरिता लोकमत बदलण्यास सुरुवात केली. या वेळी एस्टेराझीचे नाव या प्रकरणाशी संबद्ध झाले होते आणि त्याला यातून बाजूला काढणे कठीण झाले. या प्रकरणामुळे सारा देश दुभंगला. प्रजासत्ताकविरुद्ध राजेशाहीचे पुरस्कर्ते, कॅथलिक पंथीय, आंत्यंतिक राष्ट्रवादी व ज्यूविरोधी लोक यांची एक फळी तयार झाली व प्रजासत्ताकाचे अस्तित्वच धोक्यात आले. मे. यूबेअर आंरी यांनी ड्रायफसविरुद्ध बनावट कागद केल्याचे उघडकीस आले, तेव्हा अपराधाची कबुली देऊन आत्महत्या केली (१८९९). एस्टेराझी फ्रान्समधून पळाला. सर्वश्रेष्ठ न्यायालयाच्या आदेशावरून लष्करी न्यायालयाने ड्रायफसची पुन्हा चौकशी करून त्यास दोषी ठरविले पण अध्यक्षांमार्फत माफीची शिफारस केली. पुढे सर्वश्रेष्ठ न्यायालयाने ड्रायफस निर्दोषी आहे, असा स्पष्ट निर्णय देऊन (१९०६) त्यास त्याच्या पूर्वीच्या हुद्यावर स्थानापन्न केले. ड्रायफसवाद्यांचा विजय हा तिसऱ्या प्रजासत्ताकाचाच विजय म्हणावा लागेल.

संदर्भ : 1. Chapman, Guy, The Dreyfus Case, London, 1955.

           2. Johnson, Douglas, France and the Dreyfus Affair, New York, 1966.

 

पोतनीस, चं. रा.