डेलियन संघ : इराणविरुद्ध लढण्यासाठी अथेन्सच्या नेतृत्वाखाली इ. स. पू. ४७८–४७७ मध्ये संघटित झालेला एक संघ. त्याचे प्रमुख स्थान डिलॉस येथे होते. हा संघ मुख्यत्वे आयोनियन समुद्राच्या परिसरातील नगरराज्यांचा होता. सुरुवातीस त्यात सु. १३० सभासद होते ते इ. स. पू. ४५० च्या सुमारास जवळजवळ २०० झाले. संघकार्यार्थ सर्व नगरराज्यांनी पैसा, जहाजे वगैरे देऊन ही जबाबदारी प्रत्येकाच्या कुवतीनुसार उचलली. प्रथम सभासदांत संघभाव व सहकार्य होते व इराणच्या प्रतिकारार्थ सैन्य, आरमार व पैसा उत्साहाने पुरविण्यात आला. परिणामतः इराणचे साम्राज्यविस्ताराने स्वप्न भंग पावले व पहिल्या झर्क्‌सीझच्या निधनानंतर ग्रीसवरील आक्रमणाचे संकट टळले. याच सुमारास नॅकसॉसने संघाबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संघाच्या कार्यकारी मंडळास बाजूस सारून अथेन्सने स्वतःकडे नेतृत्व घेतले. एवढेच नव्हे, तर अथेन्स संघाचा पैसा वापरू लागले. त्याने नॅकसॉसचा बेत हाणून पाडला. या प्रसंगापासून डेलियन संघ म्हणजे अथेन्सची साम्राज्यशाही असेच समीकरण झाले. नॅकसॉसप्रमाणे थेसॉस आदी नगरराज्यांनीही संघातून बाहेर पडण्याचे असफल प्रयत्न केले. त्या सर्वांकडून बळजबरीने मोठमोठ्या रकमांची मागणी अथेन्सने केली. या फुटीर प्रवृत्तीमुळे अथेन्सच्या पुढाऱ्यांनी संघाचा खजिना अक्रॉपलिसला (अथेन्स) हलविला. मात्र फुटीर वृत्तीला आळा घालण्यात अथेन्सला फारसे यश आले नाही.  हळूहळू अनेक सभासद संघाबाहेर पडले व पेलोपनीशियन युद्धाच्या वेळी संघ संपुष्टात आला (इ. स. पू. ४०४). 

पुढे इ. स. पू. ३७८ मध्ये अथेन्स-स्पार्टा संघर्षाच्या वेळी डेलियन संघाचे पुनरुज्जीवन करण्यात आले. परंतु मॅसिडॉनच्या दुसऱ्या फिलिपने केरनीयाच्या लढाईत अथेन्सचा पराभव केला व डेलियन संघ कायमचा संपुष्टात आला (इ. स. पू. ३३८).

ओक, द. ह.