धर्मसुधारणा आंदोलन : (रेफॉर्मेशन). धर्मसुधारणा आंदोलन ह्या नावाने यूरोपमध्ये सोळाव्या शतकात सुरू झालेल्या धार्मिक चळवळीचा निर्देश होतो. मार्टिन ल्यूथरने १५१७ मध्ये आपले प्रसिद्ध पंच्याण्णव सिद्धांत (थेसिस) जाहीर केले. तेव्हापासून धर्मसुधारणेच्या चळवळीला प्रारंभ झाला व एक आंदोलन ह्या स्वरूपात ती एका शतकाहून अधिक काळ टिकली. ह्या दीर्घ अवधीत पश्चिम यूरोपमधील सर्व देशांतून ही चळवळ कमी अधिक उग्र स्वरूपात पसरली व यूरोपचे धार्मिक, वैचारिक आणि राजकीय जीवन तिने ढवळून काढले. ह्या आंदोलनाने यूरोपचा कायापालट झाला. यूरोपची राजकीय घडण तर बदललीच पण व्यक्तिस्वातंत्र्याचे मूल्य प्रथमतः धार्मिक जीवनात व नंतर हळूहळू जीवनाच्या सर्वच अंगांत दृढमूल झाले. व्यक्तीच्या स्वातंत्र्यावर आणि कर्तव्यनिष्ठेवर आधारलेल्या नवीन आर्थिक प्रेरणा उदयाला आल्या. व्यक्तिस्वातंत्र्य, समता आणि ऐहिक जीवनाची स्वायत्तता ही आधुनिक मूल्ये यूरोपीय संस्कृतीत रुजली आणि त्यांना अनुसरून पुढील काही शतकांत राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जीवनाची क्रांतिकारक पुनर्रचना करण्याच्या प्रक्रियेला जोमाने सुरुवात झाली. आधुनिक संस्कृतीच्या उभारणीत धर्मसुधारणेचा वाटा मोठा आहे.

पार्श्वभूमी : मध्ययुगापर्यंत रोमन कॅथलिक चर्च यूरोपमध्ये दृढपणे संघटित झाले होते. माणसांचा तारणकर्ता येशू ख्रिस्त ह्याने हे चर्च स्थापन केले आहे आणि माणसांच्या तारणासाठी आवश्यक असलेला ईश्वराचा अनुग्रह चर्चच्या द्वाराच माणसाला प्राप्त होऊ शकतो, असा चर्चचा दावा होता. शिवाय माणसाचे तारण होण्यात त्याचे सर्वश्रेष्ठ श्रेय असल्यामुळे माणसाचे केवळ ऐहिक हित साधणाऱ्या राज्यसंस्थेपेक्षा चर्च श्रेष्ठ आहे, असाही चर्चचा दावा होता. चर्चच्या हातात धार्मिक सत्ता एकवटलेली असल्यामुळे सर्वसाधारण मानवी प्रवृत्तीला अनुसरून सत्तेबरोबर जे दुर्गुण येतात, त्यांनी चर्चचा व्यवहार भ्रष्ट झाला होता. चर्चने अमाप संपत्ती गोळा केली होती. उदा., स्वीडनमध्ये दोनतृतीयांश जमीन, तर इंग्लंडमध्ये दोनपंचमांश जमीन चर्चच्या मालकीची होती. चर्चचे वरिष्ठ धर्मगुरू ख्यालीखुशालीचे आणि रंगेल जीवन जगत. गावोगावचे अनेक धर्मगुरू अतिशय अज्ञानी आणि लोभी असत. धर्मगुरूंना सक्तीने ब्रम्हचर्य पाळावे लागत असे आणि ह्यातून लैंगिक भ्रष्टाचार फार मोठ्या प्रमाणावर बोकाळला होता. चर्चने भिक्षूंच्या अनेक संघांना मान्यता दिली होती. सुरुवातीला वैराग्यशील, उत्कट धार्मिक प्रवृत्तीच्या व्यक्ती भिक्षू होत. दारिद्र्यात राहून व कडक धार्मिक शिस्तीचे पालन करून ते अनेक मार्गांनी जनसेवा करीत. पण पुढे हे मठ संपन्न बनले आणि भिक्षूंची, विशेषतः मठाधिपतींची राहणी विलासी व भ्रष्ट बनली. अनेक पोप स्वतः इतके अनीतिमान होते की, त्यांच्या अपकृत्यांचा निर्देश करणेही सभ्य माणसाला अशक्य होईल. शिवाय राज्यकर्त्यांच्या नीतिमत्तेचे व धार्मिक श्रद्धेचे आपण राखणदार आहोत, असा पोपचा दावा असल्यामुळे पोप राजकीय उलाढालींत सतत भाग घेत असे. ह्याचा परिणाम असा झाला की, इतर राज्यकर्त्यांमधील एक, हे स्थान पोपला प्राप्त झाले आणि ईश्वराचा पृथ्वीवरील आध्यात्मिक प्रतिनिधी म्हणून त्याच्याविषयी जी पूज्य भावना वाटावयास हवी होती, ती क्षीण झाली.

मध्ययुगाच्या अखेरीस चर्चमध्ये मूलगामी आणि व्यापक सुधारणा होणे आवश्यक आहे, ही गोष्ट सर्वांना पटली होती. चर्चच्या सिद्धांतांना आणि व्यवहारपद्धतीला विरोध करणारे अनेक पाखंडी पंथ उदयाला आले आणि त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी चर्चने त्यांचा निर्घृण छळही केला. कॅथरी, ॲल्बिजेन्सीझ, विक्लिफ यांनी इंग्लंडमध्ये स्थापन केलेला ‘लोलार्ड’ हा पंथ, जॉन हसने बोहीमियात स्थापन केलेला ‘हसाइट’ हे पंथ भिन्न ठिकाणी उदयाला आलेल्या पाखंडी चळवळीत प्रमुख होते. उलट बाजूने चर्चमधील काही नेत्यांनीच चर्चची अंतर्गत सुधारणा करण्याचे मधूनमधून केलेले प्रयत्न साधारणपणे निष्फळ ठरले. चर्चच्या प्रमुख धर्मगुरूंच्या मिळून बनलेल्या जनरल कौन्सिलने १४१४ आणि १४३१ मध्ये पोपच्या अनियंत्रित व लोभी कारभाराला आळा घालण्याचे प्रयत्न केले परंतु ते फार यशस्वी ठरले नाहीत. पण अनेक देशांत, विशेषतः स्पेनमध्ये, राज्यसत्तेने सात्त्विक व धार्मिक वृत्तीच्या धर्मगुरूंच्या साहाय्याने चर्चच्या कारभारातील विशिष्ट दोष दूर करून काही सुधारणा घडवून आणण्याचा केलेला उपक्रम बऱ्याच प्रमाणात फलदायी ठरला.

चर्चच्या एकछत्री वर्चस्वाला विरोध करणाऱ्या शक्ती मध्ययुगाच्या अखेरीस उदयाला येत होत्या. तेराव्या शतकाच्या सुमारास इंग्लंड, फ्रान्स, स्पेन इ. राष्ट्रे संघटित झाली होती. त्यांचे राजे आपापल्या विशिष्ट राष्ट्राच्या हिताला प्राधान्य देत, सार्वभौमत्वाचा दावा करीत आणि चर्चला त्यांच्याशी जुळवून घ्यावे लागे. पंधराव्या शतकापर्यंत प्रबोधनकालाने नवी विद्या मोकळी केली होती, छापखान्यामुळे विद्येचा प्रसार होण्यास मदत झाली होती आणि ग्रीक तत्त्वज्ञानाला आधारभूत असलेले स्वतंत्र आणि चिकित्सक विचारांचे मूल्य लोकांच्या परिचयाचे होऊ लागले होते. लोकांच्या विचारांवरील चर्चा सर्वकष काबू ढिला होऊ लागला होता. धर्माविषयी अधिक मोकळ्या, अधिक चिकित्सक पद्धतीने विचार करणाऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून ⇨ डेसिडीअरिअस इरॅस्मस  (१४६६—१५३६) याच्याकडे पाहता येईल. पण इरॅस्मस वृत्तीने सौम्य होता. ह्या अधिक मोकळ्या वातावरणात अनाचार असह्य होऊन जर एखादी चर्चमधील प्रखर धार्मिक श्रद्धेची व्यक्ती चर्चविरुद्ध, चर्चच्या मूलभूत सिद्धांतांविरुद्ध बंड पुकारून नेटाने उभी राहिली असती, तर अनेक परस्परविरोधी हितसंबंध असलेल्या राज्यकर्त्यांमधील स्पर्धेचा आधार घेऊन आपल्या बंडाचा प्रसार करणे तिला अगदी शक्य झाले असते आणि अशा रीतीने प्रारंभ झालेल्या धार्मिक परिवर्तनाचा शेवट कुठे होईल हे सांगणे कठीण झाले असते. मार्टिन ल्यूथरच्या रूपाने अशी व्यक्ती उभी राहीली.

धर्मसुधारणेचे मूलभूत सिद्धांत : ⇨ मार्टिन ल्यूथर (१४८३—१५४६) आणि ⇨ जॉन कॅल्व्हिन (१५०९—६४) ह्या अध्वर्यूंनी मांडलेले धर्मसुधारणेचे मूलभूत सिद्धांत असे मांडता येतील : पहिला सिद्धांत असा की, व्यक्ती आणि ईश्वर यांच्यात साक्षात नाते असते असे नाते जुळवून आणण्यासाठी चर्च, त्याचे अधिकृत धर्मगुरू किंवा धार्मिक परंपरा यांच्या मध्यस्थीची आवश्यकता नसते. धर्माच्या किंवा अध्यात्माच्या क्षेत्रात सत्य काय आहे, ह्याचा निर्णय व्यक्तीला स्वतंत्रपणे करता येतो व करावा लागतो. हा निर्णय अर्थात व्यक्तीला पवित्र ग्रंथाच्या—बायबलच्या—आधारे करावा लागतो कारण माणसाच्या तारणासाठी आवश्यक असलेले सबंध सत्य पवित्र ग्रंथात प्रकट करण्यात आले आहे, पण माणसाला बु्द्धीच्या साहाय्याने ह्या सत्याचा योग्य अर्थ लावता येतो. परंपरेत ह्या सत्याचा जो अर्थ लावण्यात आला आहे, तोच प्रमाण म्हणून स्वीकारला पाहिजे किंवा चर्च हाच बायबलचा अर्थ लावण्याच्या बाबतीत एकमेव अधिकृत भाष्यकार आहे, असे मानणे म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या आध्यात्मिक जबाबदारीपासून पळून जाणे होय. धर्मसुधारकांतील कित्येक पंथानी, उदा., इंग्लंडमधील प्यूरिटन पंथाने, बायबलच्या आध्यात्मिक व नैतिक प्रामाण्याचा अतिरेकी अर्थ लावला, हे येथे नमूद केले पाहिजे. दुसरा सिद्धांत ‘श्रद्धामूलक समर्थन’ ह्या नावाने प्रसिध्द आहे. माणसाची नैसर्गिक प्रकृती मूलतः पापमय आहे आणि म्हणून माणसाच्या नैसर्गिक, पापमय जीवनाला मृत्यूनंतर अनंत नरकवास हीच योग्य शिक्षा ठरते पण ख्रिस्ताने, ईश्वरपुत्राने, माणसाच्या वतीने यातनामय मरणाचे प्रायश्चित्त घेऊन माणसाची आदिम पापापासून मुक्ती केली. हा सिद्धांत सर्व ख्रिस्ती पंथांना पायाभूत आहे. आता माणसाची स्वाभाविक प्रकृती पापी असल्यामुळे आपल्या स्वाभाविक प्रेरणेने तो जे काही करेल, ते पापमयच असणार. तेंव्हा माणूस स्वतःच्या बळावर पापापासून मुक्त होऊ शकणार नाही. ख्रिस्ताद्वारा लाभणाऱ्या ईश्वराच्या प्रसादाच्या आधारेच तो शुद्ध किंवा पुण्य कृत्ये, सत्कृत्ये करू शकेल, पापापासून मुक्त होऊ शकेल. आता चर्चची भूमिका अशी होती की, पापाची कबुली दिल्याने आणि पश्चातापाने पापक्षालन होते. माणसाची प्रकृती पापमय असते खरी पण ईश्वराचा प्रसाद प्रत्येकाच्या वाट्याला काही प्रमाणात आलेलाच असतो. ह्याचा आधार घेऊन व्यक्तीने जर सत्कृत्ये केली, तर त्याला आणखी ईश्वरी प्रसाद लाभतो आणि त्याच्या बळावर अधिक चांगली कृत्ये करून तो पुण्य संपादन करू शकतो. कधीकधी, सर्व पापांचे क्षालन होऊन तारला जाण्यासाठी, स्वर्गप्राप्ती होण्यासाठी जेवढे पुण्य आवश्यक असेल, त्यापेक्षाही अधिक पुण्य तो संपादन करतो. विशेषतः संतांच्या गाठी असे अतिरिक्त पुण्य साठलेले असते ह्या साठलेल्या पुण्याच्या कोषावर पोपचा अधिकार असतो आणि कुणाही व्यक्तीच्या एखाद्या पापाचे क्षालन करण्यासाठी पोप ह्या कोषातील आवश्यक तेवढे पुण्य त्या व्यक्तीकडे संक्रांत करू शकतो. व्यक्तीकडे असे पुण्य संक्रांत करण्याला अनुज्ञा (इंडलजन्स) म्हणण्यात येत असे आणि ह्या अनुज्ञेप्रीत्यर्थ ती व्यक्ती चर्चला काही देणगी देत असे. चर्चला मिळालेल्या अशा देणग्यांतून भव्य प्रार्थनामंदिरे, रुग्णालये, पूल इ. बांधण्यात येत असत आणि धर्मयुद्धांचा खर्चही त्यांच्यातून भागविण्यात येत असे. अनुज्ञेच्या कल्पनेचे मूळ जर्मन कायद्यात होते. ह्या कायद्याप्रमाणे व्यक्तीने केलेल्या अपराधाबद्दल तिला जी शिक्षा होई, ती योग्य त्या रकमेचा दंड भरून माफ करून घेण्याची तिला सवलत असे. सुरुवातीला चर्च अपराध्यांना ज्या शिक्षा करीत असे, त्यांच्यापुरताच दंड घेऊन अनुज्ञा देण्यात येत असे. पण नंतरनंतर ईश्वर पर्गेटरीत (मृत्यूनंतर पूर्णपणे पापक्षालन होऊन स्वर्गात प्रवेश मिळेपर्यंतच्या अवधीत पापांचे परिमार्जन करण्यासाठी ईश्वराने दिलेल्या शिक्षा भोगण्याकरिता आत्म्यांची जेथे वसती असते, ती जागा) ज्या शिक्षा देतो, त्यांच्यासाठीही अनुज्ञेची सोय करण्यात आली. पापाची कबुली देऊन पश्चात्तप्त मनाने पापक्षालनासाठी धर्मगुरू जे कारायला सांगेल, ते करून पापापासून मुक्त होणे, हा एक ख्रिस्ती धर्मसंस्कार आहे [→ पापनिवेदन]. अनुज्ञेच्या प्रथेमुळे हा संस्कार बाजूला सारला गेला.


पाप आणि पापाचे परिमार्जन यांच्याकडे पाहण्याचा हा सारा दृष्टीकोनच ल्यूथरला पूर्णपणे अमान्य होता. आपण पापी व पापमय आहोत याची अतिशय तीव्र भयभीत करून सोडणारी, अंतःकरणाला व्यापणारी जाणीव हा ल्युथरचा स्थायीभाव होता. व्यक्तीला तिने केलेल्या कृत्यांना अनुसरून न्याय देणारा ख्रिस्त, ही त्याच्या दृष्टीने अतिशय भीषण अशी मूर्ती होती. आपण कितीही सत्कृत्ये केली, यमनियमांनी अंतःकरणाची शुद्धी करण्याचा प्रयत्न केला, तरी ईश्वरी न्यायाच्या भव्य मानदंडाने मापता, आपण अपराधीच ठरू आणि निरंतरच्या नरकवासावाचून आपल्यापुढे दुसरा पर्याय नाही, ह्या खात्रीने ल्यूथर विलक्षण संत्रस्त असे. ह्या भयाकुल मनःस्थितीत त्याला एकाएकी ईश्वराच्या प्रेमाचा, त्याच्या करुणेचा साक्षात्कार झाला. आपण आपल्या सत्कृत्यांमुळे, आपल्या गुणवत्तेमुळे तारले जात नाही, आपल्या अंगी काहीच गुणवत्ता नसते, पण ईश्वराच्या प्रेमामुळे, करुणेमुळे आपण तारले जातो. ईश्वराच्या प्रेमाचा श्रद्धापूर्वक स्वीकार करण्यानेच आपण तारले जातो. ल्यूथरचा हा सिद्धांत श्रद्धामूलक समर्थन म्हणून प्रसिद्ध आहे.

माणसाने केलेल्या सत्कृत्यांचे पारितोषिक म्हणून आपण तारले जात नाही, तर ईश्वरी प्रसादामुळे ख्रिस्तावर माणसाची श्रद्धा जडते, तिच्यामुळे तो तारला जातो. ह्या श्रद्धेमुळे माणसाच्या अंतरंगाचे आमूलाग्र परिवर्तन होते, ते शुद्ध होते तो स्वाभाविकपणे सत्कृत्ये करतो. पण माणसाने केलेली सत्कृत्ये, ही तो तारला गेला आहे ह्याची खूण असते, त्यांचे कारण नसते. आता ईश्वरी अनुग्रहाचा प्रसाद कोणाला लाभतो? सर्वच पापमय असल्यामुळे कुणालाच तारले जाण्याचा अधिकार नसतो पण ईश्वर आपल्या अपार करुणेमुळे कित्येकांची स्वेच्छया आपल्या अनुग्रहासाठी निवड करतो व त्यांची ईश्वराच्या ठिकाणी श्रद्धा जडते आणि तेच तारले जातात. ह्या निवडलेल्या व्यक्ती कोण हे कसे ओळखायचे? हे ओळखण्याचे काही साधन किंवा बाह्य खूण नाही. न निवडली गेलेली व्यक्ती बाह्यतः सत्कृत्ये करील पण तिच्या अंतर्यामी श्रद्धा असणार नाही व ती तारली जाणार नाही. आपल्याला निवडण्यात आले आहे की नाही,  ह्या अनिश्चिततेमुळे ल्यूथरच्या अंगाचा अधून-मधून थरकाप उडत असे, धर्मसुधारणेचा दुसरा प्रमुख नेता जॉन कॅल्व्हिन ह्याची ह्या बाबतीतील भूमिका अधिक सौम्य होती.

ख्रिस्ती संस्कारांची—सॅक्रॅमेंटची—कल्पना ईश्वरी अनुग्रहाच्या कल्पनेशी निगडीत आहे. संस्कार म्हणजे ज्याच्या माध्यमातून ईश्वरी अनुग्रह व्यक्तीच्या आत्म्यात प्रवेश करतो, असा विधी. रोमन कॅथलिक चर्च असे सात विधी पवित्र संस्कार म्हणून स्वीकारीत असे. चर्चची भूमिका अशी की, हे विधी यथासांग केले असता, त्यांच्या द्वारा ईश्वरी प्रसाद व्यक्तीच्या आत्म्यात आपोआप प्रवेश करतो आणि व्यक्ती पावन बनते. जर व्यक्तीने स्वतः होऊन ह्या प्रवेशात अडथळा निर्माण केला, तरच तो घडून येत नाही. ईश्वरी प्रसादाचे आणि चित्तशुद्धीचे हे स्पष्टीकरण यांत्रिक, धार्मिक जादूटोण्याच्या स्वरूपाचे म्हणून धर्मसुधारकांनी त्याज्य मानले. चित्तशुद्धी, ईश्वरी प्रसाद लाभल्याची अवस्था, ही ख्रिस्तावरील आंतरिक श्रद्धेच्या स्वरूपात असते विधीसारख्या बाह्य मार्गाद्वारा ती आपोआप घडून येऊ शकत नाही. तेव्हा धर्मसुधारक संस्कारांचा वेगळा अर्थ लावतात. पापी माणसाची योग्यता नसतानाही ख्रिस्त आपल्या अपार करुणेतून त्याचे तारण करण्याचे त्याला जे वचन देतो, त्याच्यावर जो अनुग्रह करतो, त्या ह्या ईश्वरी, आध्यात्मिक कृत्याचे दृश्य प्रतीक म्हणजे संस्कार. संस्कार म्हणजे धर्मगुरूने माणसांसाठी केलेला विधी, एक आध्यात्मिक कृत्य नव्हे तर संस्कार म्हणजे ईश्वराच्या कृत्याची दृश्य खूण. माणसाला तारण्याचे ईश्वराने दिलेले वचन हे सर्वांसाठी म्हणून त्याने केलेले एक कृत्य आहे. उलट, संस्कारांत ज्या ज्या व्यक्तीवर ते करण्यात येतात, त्या त्या विशिष्ट व्यक्तीसाठी हे ईश्वरी कृत्य त्याच्या दृश्य प्रतीकाद्वारा मूर्त होते.

रोमन कॅथलिक चर्चने बाप्तिस्मा, दृढीकरण, विवाह, प्रायश्चित, नियुक्ती (ऑर्डिनेशन), अंत्य अभ्यंजन (एक्स्ट्रीम अंक्शन) व प्रभुभोजन असे सात संस्कार मान्य केले होते. यांपैकी प्रभुभोजन हा दैनंदिन विधी किंवा संस्कार आहे. ख्रिस्ताने आपल्या शिष्यांसोबत जे शेवटेचे भोजन घेतले होते, त्याच्या स्मरणार्थ हा विधी होतो. रोमन कॅथलिक चर्चच्या मते ह्या विधीचे स्वरूप दुहेरी आहे : एकतर, हा एक यज्ञ आहे ख्रिस्ताने मानवांना पावन करण्यासाठी केलेल्या आत्मयज्ञाचे, उपासकांना पावन करण्यासाठी  दर दिवशी होणारे आवर्तन आहे शिवाय ख्रिस्ताचे शरीर व रक्त यांचे सेवन केल्याने ईश्वराचा अनुग्रह उपासकांच्या आत्म्यात प्रवेश करतो व म्हणून हा विधी एक संस्कार आहे. धर्मसुधारकांनी ह्या सात संस्कारांच्या ऐवजी दोनच संस्कार स्वीकारले. पहिला, बाप्तिस्मा. ह्या संस्काराने मानवी बालकाचा ईश्वराच्या अनुग्रहाने तारलेल्या परिवारात वेशअनुप्र होतो. दुसरा, प्रभुभोजनाचा संस्कार. हा संस्कार म्हणजे एक यज्ञ आहे, ख्रिस्त मानवी धर्मगुरूच्या द्वारा आपला आत्मयज्ञ लोकांच्या तारणासाठी परत परत घडवून आणतो, ही कल्पना धर्मसुधारक अमान्य करतात. त्यांच्या मते ख्रिस्ताचे  इतिहासात घडलेले यातनामय मरण हा एकमेव, अंतिम व माणसांना तारण्यासाठी पूर्णपणे पर्याप्त असा आत्मयज्ञ होता. त्याची पुनरावृत्ती व्हायचे कारण नाही. प्रभुभोजन हा केवळ संस्कार आहे. ख्रिस्ताने अपार करुणेने माणसाचे जे तारण केले, त्याची ती खूण आहे. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचे सेवन केल्याने उपासकाला ख्रिस्ताच्या अनुग्रहाने आपले तारण झाले आहे, ह्याची साक्ष पटते आणि त्याची श्रद्धा दृढ होते.

ख्रिस्ताने आपल्या शिष्याबरोबर घेतलेल्या शेवटच्या भोजनाच्या वेळी एक भाकर घेतली, थोडे मद्य घेतले, त्यांना धन्यवाद दिले, म्हणजे ईश्वराच्या कृपेची ती फळे आहेत असे मानून ती लाभल्याबद्दल धन्यता व्यक्त केली आणि नंतर भाकरीला उद्देशून ‘हे माझे शरीर आहे’ आणि मद्याला उद्देशून ‘हे माझे रक्त आहे’, असे म्हणून ती आपल्या शिष्यांना वाटली आणि ‘याचे सेवन करा’ असा आदेश त्यांना दिला. ह्या कथेमध्ये ह्या संस्कारांचे मूळ आहे. आता भाकरीला उद्देशून ख्रिस्ताने ‘हे माझे शरीर आहे’ हे जे शब्द उच्चारले त्यांचा अर्थ कसा लावायचा, ह्याविषयी ल्यूथर, कॅल्व्हिन, त्स्व्हिंग्ली (झ्विंग्ली) इ. धर्मसुधारकांत मतभेद आहेत. पण ख्रिस्ताने माणसांना त्यांचे तारण करीन असे दिलेले वचन संस्कारांत सहभागी होणाऱ्या व्यक्तीसाठी पक्के करणे आणि तिची श्रद्धा दृढ करणे, हे संस्कारांचे प्रयोजन आहे, ह्याविषयी त्यांच्यात एकमत आहे. विशेषतः ‘मास’ मध्ये दीक्षित धर्मगुरू, जिवंत आणि मृत व्यक्तींचे पापक्षालन करण्यासाठी यज्ञ करतो, ख्रिस्ताच्या आत्मयज्ञाचे आवर्तन घडवून आणतो, ह्या कल्पनेचा सर्वांनी तीव्र निषेध केला आहे.


ह्यामधून एक महत्त्वाचे तत्त्व स्पष्ट होते. दीक्षित धर्मगुरूंना आणि अशा धर्मगुरूंची परंपरा म्हणजे जे चर्च त्याला, धार्मिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात ख्रिस्तापासून लाभलेले काही विशेष अधिकार आहेत हा चर्चचा दावा अमान्य करण्याचा अर्थ असा होतो, की आध्यात्मिक क्षेत्रात सर्व ख्रिस्ती समान आहेत. ह्यातून ख्रिस्ती व्यक्तींचा एक परिवार आहे, ही कल्पना दृढ होते. बायबलमध्ये ग्रंथित झालेला संदेश ह्या परिवारापुढे सतत मांडला जावा ख्रिस्ती जनांची श्रद्धा, ह्या श्रद्धेला अनुसरून नीतीने जगण्याचा, मोहाचे दमन करण्याचा त्यांचा निर्धार दृढ व्हावा, म्हणून काही ज्येष्ठ व्यक्तींची नियुक्ती करणे आवश्यक आहे. ह्या अर्थाने काही व्यक्ती धर्मगुरू—बिशप, पॅस्टर, प्रेसबिटर—राहतील पण मूलतः सर्व श्रद्धावान ख्रिस्ती व्यक्तींचा आध्यात्मिक अधिकार सारखाच असतो. धर्मसुधारणेच्या आंदोलनाने धार्मिक क्षेत्रात स्वयंनिर्णय व व्यक्तीस्वातंत्र्य या तत्त्वांचा जसा पुरस्कार केला, तसाच समतेच्या तत्त्वाचाही पुरस्कार केला आणि हळूहळू ही तत्त्वे धार्मिक जीवनापुरती मर्यादित न राहता राजकीय व आर्थिक क्षेत्रांतही प्रभावी ठरली.

जर्मनीतील धर्मसुधारणा : माइनत्सचा आर्चबिशप अनुज्ञा विकत असल्याचे आढळून आल्यावर मार्टिन ल्यूथरने १५१७ च्या ऑल सेंट्स डे ह्या दिवशी अनुज्ञांविरुद्ध आपले पंच्याण्णव सिद्धांत प्रसिद्ध केले. ह्या दिवसापासून धर्मसुधारणेच्या आंदोलनाला स्पष्टपणे सुरुवात झाली असे म्हणता येईल. ल्यूथरचे हे सिद्धांत पाखंडी आहेत, असे पोप दहावा लिओ ह्याने जाहीर केले. तेव्हा धार्मिक क्षेत्रात सत्य काय आहे आणि पाखंडी मत कोणते, ह्याचा निर्णय द्यायचा पोपला किंवा चर्चला विशेष आधार असतो, हे तत्त्वच ल्यूथरने नाकारून प्रतिहल्ला चढविला. इरॅस्मसला ल्यूथरची भाषा निष्कारण आक्रमक आहे, असे जरी वाटत होते तरी त्याचे महत्त्वाचे सर्व मुद्दे त्याला मान्य होते आणि जेव्हा ल्यूथरवर पाखंडीपणाचा आरोप करण्यात आला, तेव्हा इरॅस्मसने तिसरा फ्रिड्रिख ह्या राजाला—ह्याच्या राज्यात व्हिटेनबर्ग ह्या शहरात ल्यूथर राहत होता—आपल्या प्रजाजनांना न्यायाने वागविण्यात येत आहे की नाही हे पाहणे, एक ख्रिस्ती राजा म्हणून पाहणे, हे तुझे कर्तव्य आहे असा निरोप पाठविला.

ह्या धर्मकारणात राजकारण गुंतले होते. अनेक जर्मनांना पवित्र रोमन साम्राज्याला जर्मन राष्ट्राचे सार्वभौम राज्य हे स्वरूप द्यायचे होते. हे साधायचे तर पोपबरोबर युद्ध करणे आवश्यक होते. धर्माच्या प्रचारासाठी युद्ध करणे ल्यूथरला अमान्य होते. तरीही ल्यूथरने पोपवर वैचारीक हल्ला केला, म्हणून राष्ट्रवादी जर्मनांचा त्याला पाठिंबा मिळाला. शिवाय राजकीय कारणांसाठी पोप तिसऱ्या फ्रिड्रिखला दुखवायला तयार नव्हता. ह्यामुळे ल्यूथर पाखंडी आहे असे पोपने जाहीर केले असले, तरी त्याच्यावर तत्काळ काही कारवाई करण्यात आली नाही. त्याचे सिद्धांत प्रसिद्ध झाल्यावर जवळजवळ तीन वर्षानंतर जून १५२० मध्ये पोपने ल्यूथरला शरण येण्याचा आदेश दिला.

मध्यंतरीच्या काळात ल्यूथरने जर्मन राष्ट्राच्या ख्रिस्ती उमरावांना उद्देशून एक संदेश प्रसिद्ध केला. त्यात त्याने जर्मन राजांना आणि सम्राटाला चर्चचे बाह्यांग, म्हणजे चर्चचा व्यवहार सुधारण्याचे आवाहन केले. सर्व श्रद्धावान ख्रिस्तीजनांचा धर्माच्या बाबतीत सारखाच अधिकार असतो, सर्व सारखेच ‘धर्मगुरू’ असतात आणि म्हणून ख्रिस्ती राज्यकर्त्यांना चर्चच्या बाह्य व्यवहारात सुधारणा करण्याचा अधिकार आहे, ह्या तत्त्वावर हे आवाहन आधारले होते.

सम्राट पाचवा चार्ल्स ह्याला पवित्र रोमन सम्राट म्हणून ऑक्टोबर १५२० मध्ये अभिषेक झाल्यावर आपली पहिली राज्यसभा (डाएट) त्याने वर्म्झ येथे भरविली. ह्या सभेपुढे आपले म्हणणे मांडण्यासाठी ल्यूथरला सुरक्षेची हमी देऊन बोलाविण्यात आले. चर्चच्या अधिकृत परिषदेने (जनरल कौन्सिल) धार्मिक सिद्धांतांविषयी दिलेले निर्णय प्रमादरहित असतात, हे तत्त्व ल्यूथर मान्य करतो की नाही, हा ह्या वादातील प्रमुख मुद्दा होता. ल्यूथरने हे तत्त्व आपल्याला अमान्य आहे असे सांगितले व पूर्वी प्रसिध्द केलेले, चर्चला पाखंडी वाटणारे सिद्धांत मागे घ्यायला, ‘माझ्या जर्मन राष्ट्राशी माझे जे कर्तव्य आहे ते पाहता’ नकार दिला. पाचव्या चार्ल्सने चर्चच्या अधिकाराचे रक्षण करण्याकरिता आपले सर्वस्व आपण पणाला लावू असे जाहीर केले. आता जर्मनीत धार्मिक यादवी होणे अटळ ठरले.

ल्यूथरला देण्यात आलेली सुरक्षेची हमी एकवीस दिवसांत संपत होती. तो वर्म्झहून परतला पण वाटेत व्हार्टबुर्क राजाच्या अनुमतीने त्याला पळवून नेऊन व्हार्टबुर्कच्या किल्यात त्याच्या सुरक्षिततेसाठी ठेवण्यात आले. चार्ल्सने ल्यूथर पाखंडी आहे, असे जाहीर केले पण ल्यूथरच्या ग्रंथांचा व मतांचा जर्मनीत जोमाने प्रसार होत होता व त्याला वाढता पाठिंबा मिळत होता. जर्मनीतील बहुतेक मोठ्या शहरांनी ल्यूथरच्या मतांचा स्वीकार केला होता आणि विटनबर्गच्या विद्यापीठातही त्याला वाढत्या संख्येने अनुयायी मिळत होते. दहाव्या लिओनंतर पोपच्या पदावर आलेल्या सहावा एड्रिअन आणि सातवा क्लेमेंट यांनी आपल्या प्रतिनिधींमार्फत ल्यूथरविरुद्ध कठोर कारवाई करावी, असे डाएटला आवाहन केले. पण डायएटच्या काही सभासदांनी आपली चर्चविरुद्ध असलेल्या १०० गाऱ्हाण्यांची एक यादी पोपच्या प्रतिनिधीला सादर केली. श्पायरच्या डाएटने जर्मनीसाठी धर्मगुरूंची एक परिषद संघटित करण्याच्या योजनेला सुरूवात केली (१५२४). हे जर्मनीचे वेगळे राष्ट्रीय चर्च झाले असते.

धर्मसुधारणेच्या आंदोलनातील एक महत्त्वाची घटना म्हणजे जर्मनीतील शेतकऱ्यांचे युद्ध. आर्थिक पिळवणुकीने आणि सामाजिक विषमतेने गांजलेल्या जर्मन शेतकऱ्यांनी जून १५२४ मध्ये एक उठाव केला आणि हे बंड जर्मनीत सर्वत्र पसरले. अनेक शहरे तसेच राजे बंडवाल्यांना शरण येऊन त्यांच्यात सामिल झाले पण अखेर कार्यक्षम नेतृत्वाच्या आणि शिस्तीच्या अभावी बंडाचा पाडाव झाला. महत्त्वाची गोष्ट अशी की, बंडवाल्यांनी आपल्या उठावासाठी ल्यूथरच्या धार्मिक सिद्धांतांचा आधार घेतला होता. ल्यूथरच्या मतात अभिप्रेत असलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे ऐहिक क्षेत्रातही क्रांतिकारक ठरणार होती, ह्याची ही खूण होती. सुरुवातीला ल्यूथरची बंडवाल्यांना सहानुभूती होती पण नंतर त्यांनी केलेल्या अतिरेकांमुळे धार्मिक परिवर्तनाच्या कार्यात अडथळे निर्माण होतात, असे आढळल्याने बंडाचा अतिशय कठोर भाषेत निषेध केला.

जर्मनीतील धार्मिक तेढीने १५२५ च्या सुमारास उग्र स्वरूप धारण केले होते. जुलै १५२५ मध्ये धर्मसुधारणा आंदोलन, रक्तपाताने का होईना, संपुष्टात आणण्यासाठी कॅथलिक पंथावर निष्ठा असलेल्या राजांचा एक संघ स्थापन करण्याचा प्रयत्न होत होता. ऑक्टोबर १५२५ मध्ये आंदोलनाचे संरक्षण करण्यासाठी त्याला अनुकूल असलेल्या राजांचा गट बनविण्याच्या प्रयत्नांना सुरुवात झाली. श्पायरच्या डाएटने (जून १५२६) वर्म्झच्या डाएटने मंजूर केलेल्या जाहिरनाम्याला कार्यवाहीत उतरविण्याचे नाकारून, प्रत्येक राजाने धार्मिक बाबतीत ईश्वराला व सम्राटाला आपण जबाबदार आहोत, हे स्मरण ठेऊन स्वतःला योग्य वाटेल तसे वर्तन केले पाहिजे, असे घोषित केले. ह्यामुळे धर्मसुधारणावादी लोकांना व राजांना काही उसंत मिळाली पण १५२९ मध्ये डाएटने चार्ल्सच्या प्रेरणेवरून ही धर्मसहिष्णुतेला मान्यता देणारी घोषणा मागे घेतली. तेथे उपस्थित असलेल्या सहा राजांनी आणि चौदा शहरांच्या प्रतिनिधींनी ह्या बहुमताने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध निषेध नोंदविला. ह्यावरून त्यांच्या पक्षाचे ‘निषेधक’ (प्रॉटेस्टंट) हे नाव पडले आणि ह्याच नावाने हा पक्ष यापुढे ओळखण्यात येऊ लागला.


ह्यानंतर ह्या दोन पक्षांमध्ये समझोता घडून यावा, यासाठी अनेक प्रयत्न झाले. ह्याबरोबरच आपापला पक्ष संघटित करण्याचा प्रयत्नही दोन्ही बाजूंनी होत होता. १५३१ पर्यंत आठ राजे आणि अकरा शहरे ह्यांनी प्रॉटेस्टंट पंथाच्या संरक्षणासाठी श्मालकाल्डन संघ प्रस्थापित केला होता. चार्ल्सने १५३८ मध्ये ह्याच्या विरोधी संघ स्थापन केला. पण दरम्यान दोन्ही पक्षांना जवळ आणण्याचे प्रयत्नही होत होते. १५४४ मध्ये ‘न्युरेंबर्गची शांतता’ पाच वर्षांसाठी जाहीर करण्यात आली पण प्रॉटेस्टंट पंथाचा काही वेळा हिंसक मार्गांचा अवलंब करूनही प्रसार होत राहिला. सम्राटाने युद्ध पुकारले आणि १५४७ मध्ये म्युलबेर्क येथे प्रॉटेस्टंटचा पराभव झाला. पण आतापर्यंत प्रॉटेस्टंट पंथ खूपच स्थिर आणि दृढ झाला होता. १५५५ मध्ये जर्मन राजांच्या नाऊम्बुर्क येथे भरलेल्या सभेने प्रत्येक राजाला कॅथलिक किंवा प्रॉटेस्टंट पंथ स्वीकारण्याचा अधिकार आहे आणि राजा ज्या पंथाचा असेल, तो पंथ प्रजेने स्वीकारला पाहिजे किंवा देश सोडून गेले पाहिजे, हे तत्त्व घोषित केले. ह्याचा अर्थ असा, की प्रॉटेस्टंट पंथ यापुढे पाखंडी राहिला नाही. एक अधिकृत धर्मपंथ हे स्थान त्याला मिळाले.

स्वित्झर्लंडमधील धर्मसुधारणा : हुल्ड्राइख त्स्व्हिंग्ली (१४८४—१५३१) हा धर्मगुरू स्वित्झर्लंडमधील धर्मसुधारणा आंदोलनाचा नेता होता. स्वित्झर्लंड १४९९ मध्येच पवित्र रोमन साम्राज्यातून बाहेर पडले होते. त्स्व्हिंग्ली झुरिक येथे धर्मगुरू होता आणि त्याची विद्वत्ता, खोल व उत्कट श्रद्धा ह्यांचा प्रभाव तेथील लोकशाहीवादी जनतेवर पडला आणि त्याला प्रेषिताचे स्थान प्राप्त झाले. १५२३ मध्ये झुरिकच्या शासकांनी कॅथलिक पंथीय आणि नवीन विचारांचे पुरस्कर्ते यांच्यात सार्वजनिक वाद घडवून आणला आणि नवविचारांच्या पुरस्कर्त्यांतर्फे निकाल दिला. ह्यानंतर झुरिक शहरात त्स्व्हिंग्लीच्या मतांना अनुसरून उपासनापद्धतीत झपाट्याने सुधारणा घडवून आणण्यात आली. झुरिकहून हे धार्मिक आंदोलन स्वित्झर्लंडच्या इतर भागांतही पसरू लागले. पण स्वित्झर्लंडमधील अधिक डोंगराळ आणि दुर्गम प्रदेशात कॅथलिक पंथ चिवटपणे मूळ धरून होता आणि १५२४ मध्ये त्यांनी पाखंड विरोधी संघ स्थापन केला. उलट त्स्व्हिंग्लीने १५२७ ते १५३० ह्या कालावधीत प्रॉटेस्टंट शहरांचा संघ स्थापन करण्यात यश मिळविले आणि त्याला उत्तर म्हणून पाच कॅथलिक विभागांनी (कँटन) ‘ख्रिस्ती संघ’ स्थापन केला. कापल येथे १५३१ मध्ये झालेल्या ह्या दोन पक्षांतील लढाईत त्स्व्हिंग्ली मारला गेला. त्यानंतर झालेल्या तहाने प्रत्येक विभागाला धार्मिक स्वातंत्र्य दिले आणि धार्मिक अल्पसंख्यांकांच्या संरक्षणाचीही सोय केली.

कॅल्व्हिन पंथ : प्रॉटेस्टंट पंथांमधील एक अतिशय प्रभावशाली पंथ म्हणजे जॉन कॅल्व्हिन ह्याने स्थापन केलेला कॅल्व्हिन पंथ. कॅल्व्हिन हा फ्रेंच होता पण प्रॉटेस्टंट पंथाचा स्वीकार केल्यामुळे त्याला फ्रान्स सोडून परागंदा व्हावे लागले. वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्याने इन्स्टिट्युट्‌स ऑफ द क्रिश्चन रिलिजन (१९३६) हा आपला ग्रंथ प्रसिद्ध केला. त्याच्या सुधारून वाढविलेल्या अनेक आवृत्या निघाल्या.  प्रॉटेस्टंट ईश्वरविद्या आणि धर्मविद्या ह्यांवरील हा एक आधारभूत व प्रमाण ग्रंथ मानण्यात येतो. श्रद्धामूलक समर्थन व धार्मिक बाबतीत केवळ बायबल प्रमाण मानले पाहिजे हे ल्यूथरचे सिद्धांत अर्थात कॅल्व्हिन स्वीकारतो. प्रभुभोजनाच्या बाबतीत ल्यूथरचे मत व स्विस मत यांतून त्याने मध्यम मार्ग काढला आहे. ख्रिस्ताचे शरीर जरी सर्वत्र उपस्थित नसले, तरी त्याचे चैतन्य सर्वत्र असते आणि प्रभुभोजनाद्वारा पुनरुत्थित ख्रिस्त आणि उपासक ह्यांच्यामध्ये खराखुरा संबंध जुळून येतो, असे त्याने प्रतिपादन केले. कलांच्या बाबतीतही त्याची भूमिका मध्यममार्गी होती. सामूहिक भक्तिगीते गायला त्याने परवानगी दिली आणि जरी ख्रिस्ती संतांच्या मूर्ती किंवा क्रुसावरील ख्रिस्ताची मूर्तीही त्याने निषिद्ध मानली, तरी निव्वळ क्रूस उभारायला त्याची अनुज्ञा होती. एकंदरीत पाहता धार्मिक व्यवहारात कलांना स्थान देण्याच्या तो विरोधी होता. त्याच्या कलांचे योग्य स्थान ऐहिक व्यवहारात होते.

ईश्वराने आपल्या प्रसादासाठी निवडलेल्या व्यक्ती कोण हे कसे ओळखायचे, हा श्रद्धामूलक समर्थनाचा सिद्धांत स्वीकारणाऱ्यांपुढील जीवघेणा प्रश्न होता. ल्यूथरच्या मते कोण निवडण्यात आले आहेत, ह्याचे ज्ञान होणे अशक्य होते. कॅल्व्हिनच्या मते हे ओळखण्याच्या बराचशा प्रमाणात निश्चित अशा खुणा आहेत. ह्या खुणा म्हणजे ख्रिस्ती श्रद्धेचा अंगीकार केलेला असणे, अतिशय शिस्तबद्ध व संयत अशा ख्रिस्ती जीवनमार्गाला अनुसरून जगणे आणि ख्रिस्ती संस्कारांची ओढ असणे. ह्या निकषांचे समाधान केलेल्या व्यक्तीला आपण निवडलेल्यांपैकी एक आहोत, अशी खात्री बाळगायला हरकत नव्हती. ईश्वराच्या महिम्यासाठी व पृथ्वीवर पवित्र जनगण (होली कॉमनवेल्थ) निर्माण करण्यासाठी जगणे ही निवडलेल्यांची साधना होती. आपण निवडलेले आहोत, ह्या आत्मविश्वासाने ह्या कठीण कठोर आत्मदमनावर आधारलेल्या जीवनमार्गाने जगण्यासाठी आवश्यक त्या मानसिक शक्ती मोकळ्या झाल्या. हे सुधारलेले चर्च म्हणजे ईश्वराचे राज्य, असे कॅल्व्हिनचे एक वचन आहे. ईश्वराच्या सेवेचे आंतरिक आवाहन ज्यांना होते. त्यांनी धर्मगुरू बनले पाहिजे किंवा भिक्षूचे जीवन अंगीकारले पाहिजे, अशी मध्ययुगीन कल्पना होती पण ल्यूथरच्या किंवा कॅल्व्हिनच्या मते ईश्वराच्या राज्याची सेवा एखादा विशिष्ट पेशी किंवा व्यवसाय पतकरूनच करता येते असे नाही कोणत्याही व्यवसायाद्वारा करता येते. आपल्याला लाभलेले स्थान, आपल्या वाट्याला आलेला व्यवसाय आपण पतकारला पाहिजे, त्याच्यात आनंद मानला पाहिजे हे तर खरेच पण आपल्या कृत्यांनी, आपल्या कष्टांनी आपण जे घडवितो, निर्माण करतो, ते ख्रिस्ती समाजाच्या धारणेला पोषक ठरते, ईश्वरी राज्याची विधायक सेवा आपल्या हातून घडू शकते, हे आपण ओळखले पाहिजे.

ख्रिस्ती समाजाचा आपला काल्पनिक आदर्श प्रत्यक्षात उतरविण्याची  संधी कॅल्व्हिनला मिळाली. जिनीव्हा शहर १५३६ पासून स्वतंत्र झाले होते. ह्यापूर्वी काही काळ प्रॉटेस्टंट स्विस (राज्यसंघ) कॉन्फेडरेशन स्थापन झाले होते पण जिनीव्हा त्यात सामील झाले नाही. जिनीव्हा स्वतंत्र झाल्यावर बर्न शहरातून खूप उपदेशक तेथे येऊन त्यांनी प्रॉटेस्टंट मताचा जोराने प्रसार केला. कॅथलिक व प्रॉटेस्टंट यांच्यामधील धार्मिक कलहामुळे शहरात यादवी युद्ध होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली. ह्या अवधीत कॅल्व्हिनचा योगायोगाने जिनीव्हा शहरात मुक्काम होता. शहरातील प्रॉटेस्टंट पंथाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपविण्यात आले. कॅल्व्हिनचा सत्तेवर जम बसायला काही वर्षे जावी लागली पण आयुष्याच्या अखेरच्या वीस वर्षांत जिनीव्हा शहराच्या जीवनाचे कॅल्व्हिनने यशस्वीपणे नियंत्रण केले.

कॅल्व्हिनच्या शासनपध्दतीप्रमाणेच चर्च, राज्यसंस्था आणि समाज एकच होते त्यांच्यात अभिन्नता होती. नागरी अधिकारी आणि चर्चचे अधिकारी हे दोघेही सारखेच ईश्वराचे सेवक होते त्यांची कार्य काय ती वेगळी होती. चर्चचे अधिकृत सिद्धांत आणि चर्चने नेमून दिलेली जीवनपद्धती अमान्य करणाऱ्यांना समाजातून बहिष्कृत करण्याचा चर्चला अधिकार होता आणि बहिष्कृत करण्यात आलेल्या व्यक्तीवरील बहिष्कार जर सहा महिन्यांत मागे घेण्यात आला नाही, तर तिला शहराबाहेर हाकलून देण्यात येत असे.


मार्क्सवादी दृष्टीकोनाप्रमाणे व्यक्तीच्या निर्णयाला सार्वभौम महत्त्व देणारा व्यक्तिवादी प्रॉटेस्टंट पंथ म्हणजे भांडवलशाही उत्पादनपद्धतीचे वैचारिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात पडलेले प्रतिबिंब होय. उलट, माक्स वेबर ह्या समाजशास्त्रज्ञाने प्रॉटेस्टंट नैतिक शिकवणीमुळे भांडवलशाही अर्थरचनेला प्रोत्साहन मिळाले, ह्या मताचा पुरस्कार केला आहे. ह्या मताप्रमाणे पाहता प्रॉटेस्टंट नैतिक शिकवणीचा भांडवलशाहीच्या विकासावर दुहेरी परिणाम झाला. एकतर, ख्रिस्ती समाजात व्याजखोरीवर परंपरेने जी बंदी चालत आली होती, ती प्रॉटेस्टंटांनी उठविली आणि म्हणून नफ्यासाठी भांडवलाची गुंतवणूक करणे शक्य झाले. पण याहीपेक्षा आपापल्या व्यवसायात सर्व शक्ती पणाला लावून निष्ठेने यश संपादन करण्यात ईश्वराची सेवा आहे, ह्या सिद्धांतामुळेच आर्थिक क्षेत्रात उत्पादन भरभराटीला आले. पण त्याचबरोबर वासनांचे दमन करून वैराग्याने जगणे, हा ख्रिस्ती जीवनपद्धतीचा भाग असल्यामुळे ही प्रंचड प्रमाणावर निर्माण झालेली संपत्ती सुखोपभोगांत खर्च झाली नाही ती भांडवल म्हणून परत उत्पादनात गुंतविण्यात आली. ह्यामुळे भांडवलाचा मोठ्या प्रमाणावर संचय झाला आणि भांडवलशाही उत्पादनपद्धतीत वेगाने वाढ झाली. भांडवलशाही उत्पादनव्यवस्थेचा विकास प्रामुख्याने यूरोपच्या उत्तरेच्या भागातील देशांत झाला आणि प्रॉटेस्टंट मताचा प्रसारही प्रामुख्याने ह्याच देशांत झाला, ही गोष्ट खरी आहे पण विशिष्ट देशांत व विशिष्ट काळात भांडवलशाही उत्पादनव्यवस्था का उदयाला आली आणि अन्यत्र ती का आली नाही, ह्याची कारणे गुंतागुंतीची आहेत. भांडवलशाही उत्पादनपद्धती आणि प्रॉटेस्टंट नैतिक शिकवण यांच्यात सरळ कार्यकारणभाव प्रस्थापित करता येणार नाही. तथापि प्रॉटेस्टंट नीतीमुळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत, विशेषतः आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात नवीन चैतन्य आणि गतिशीलता उफाळून आली यात शंका नाही.

फ्रान्समधील धर्मसुधारणा : फ्रान्समधील परिस्थिती काहीशी जर्मनीसारखीच होती. म्हणजे केंद्रीय राजसत्ता, फ्रान्सच्या राजाची सत्ता बरीचशी दुबळी होती आणि प्रांतांना, विशेषतः दक्षिणेकडील प्रांतांना बऱ्याच प्रमाणात स्वायत्तता होती. शिवाय काही फ्रेंच उमराव घराणी मातबर होती आणि राजाला आपल्या काबूत घेण्यासाठी किंवा त्याच्या सत्तेला शह देण्यासाठी त्यांची सतत कारस्थाने चालू असत. फ्रान्सच्या दक्षिणेकडील प्रांतांत प्रॉटेस्टंट पंथाचा प्रथम उदय झाला. उमराव घराण्यांना काबूत आणणे आणि देशभर राजाची एकछत्री सत्ता प्रस्थापित करणे, हे  ह्या कालखंडात फ्रान्सच्या गादीवर एकामागून एक आलेल्या राजाचे प्रमुख राजकीय उद्दिष्ट होते. परस्परांशी झगडणाऱ्या धार्मिक पंथांचा उदय आणि त्यांचे नेतृत्व करणाऱ्या उमरावांची परस्परांविरुद्ध आणि राजसत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी चाललेली कारस्थाने, यांमुळे हे उद्दिष्ट साधण्यात मोठ्याच अडचणी निर्माण होत होत्या. ह्यामुळे ह्या कालखंडात फ्रान्सच्या जीवनात राजकीय हितसंबंध आणि धार्मिक निष्ठा यांचे धागे एकमेकांत गुंतून गेले होते.

ल्यूथरची शिकवण जेव्हा फ्रान्समध्ये शिरकाव करून हळूहळू पसरू लागली, तेव्हा ह्या पाखंडी मताचा बंदोबस्त करणे फ्रान्सच्या त्या वेळच्या राजाला, पहिल्या फ्रान्सिसला भाग होते. पण हे मत जोमाने दडपून टाकणेही त्याला कठीण होते. कारण ल्यूथरचे अनुयायी असलेल्या जर्मन राजांशी सख्य करण्याची आवश्यकता त्याला मधून मधून भासत असे. पोपशी सख्य करणे अधिक हिताचे ठरेल की ल्यूथर पंथीयांशी सख्य करणे अधिक हिताचे ठरेल, यावर पाखंडाचा बंदोबस्त करण्याचे त्याचे अंतर्गत धोरण अवलंबून असे. शिवाय चर्चची अंतर्गत सुधारणा करायला जर्मनीपेक्षा फ्रान्समध्ये अधिक अनुकूल भूमी होती. मानवातवादी कॅथलिक सुधारकांनी ह्या दृष्टीने प्रयत्न केले होते आणि अधिक कडव्या, अंधश्रद्ध कॅथलिक धर्मगुरूंच्या रोषापासून ह्या सुधारकांना वाचविण्यात फ्रान्सिस आणि त्याची बहीण मार्गारेट ह्यांनी पुढाकार घेतला होता. ह्यामुळे सुरुवातीला फ्रान्समध्ये प्रॉटेस्टंट पंथीयांविरुद्ध, ह्यांना फ्रान्समध्ये ह्यूजनॉट म्हणत, ऊग्र स्वरूपाची दडपशाही नव्हती पण १५३४ मध्ये पॅरिसमध्ये मासविरुद्ध जहाल टीका करणारी भित्तिपत्रके लावण्यात आली आणि ह्यूजनॉटांना दडपून टाकण्याच्या कारवाईने ऊग्र रूप धारण केले. फारेल, लफेअव्हर, कॅल्व्हिन इ. ह्यूजनॉटांचे पुढारी देश सोडून गेले. १५५९ मध्ये जेव्हा फ्रान्स व स्पेन यांच्यात शांतता प्रस्थापित झाली, तेव्हा ही दडपशाही अधिकच कठोर झाली. मातबर उमराव घराण्यातील गीझ हे घराणे कडवे कॅथलिक पंथी होते आणि स्पेनचे साहाय्य घेऊनही ह्यूजनॉटांचा बंदोबस्त करावा असे त्याचे धोरण होते. ॲड्‌मिरल कॉलिन्यी घराणे निष्ठावान ह्यूजनॉट पंथीय होते आणि इंग्लंड किंवा जर्मनीचे साहाय्य घेऊनही आपल्या पंथाचे संरक्षण करण्याची त्याची तयारी होती. दुसऱ्या फ्रान्सिसच्या कारकिर्दीत गीझ घराण्याचा वरचष्मा होता. तेव्हा समोर दिसत असलेल्या निष्ठुर दडपशाहीपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ह्यूजनॉटांनी कट रचला. हा आंब्वाझ कट म्हणून प्रसिद्ध आहे. गीझ पक्षाच्या पुढाऱ्यांचा वध करणे आणि राजसत्ता व्हाल्वाच्या घराण्यापासून बुर्‌बाँ घराण्याकडे संक्रांत करणे, ही ह्या कटाची उद्दिष्टे होती.

ह्या स्वरूपाचे कटकारस्थानांचे आणि बंडखोरीचे प्रयत्न अशा परिस्थितीत स्वाभाविक होते, पण त्यांच्यामुळे प्रॉटेस्टंट पंथीयांपुढे एक नैतिक समस्या उभी राहिली. सत्य धर्माच्या प्रसारासाठी तलवार हाती घेणे ल्यूथरला नापसंत होते. राज्याचे कायदे पाळणे हे नागरिकाचे कर्तव्य असते, असे त्याचे ठाम मत होते आणि राज्यकर्त्यांविरुद्ध बळाचा वापर करून बंड करणे त्याला अमान्य होते. पण जेव्हा ल्यूथरवादी जर्मन राजांनी सम्राटाविरुद्ध संघ स्थापन केला आणि प्रॉटेस्टंट पंथीयांचे संरक्षण शस्त्राचा वापर करून करण्याचे ठरविले, तेव्हा एक नवीन सिद्धांत पुढे आला. तो असा की, जर्मन राजे सम्राटाची निवड करीत असल्यामुळे तेही कनिष्ठ राज्यकर्ते होते आणि त्यांनी निवडलेला वरिष्ठ राज्यकर्ता, म्हणजे सम्राट, जर सत्य धर्माविरुद्ध आचरण करू लागला, तर बळाचा वापर करूनही त्याला विरोध करण्याचा कनिष्ठ राज्यकर्त्यांना अधिकार असतो. तेव्हा कनिष्ठ दंडाधिकाऱ्यांना वरिष्ठ दंडाधिकाऱ्यास विरोध करण्याचा अधिकार असतो, हा सिद्धांत मान्य झाला. पण आंब्वाझच्या कटाचे नेतृत्व कुणाही दंडाधिकाऱ्याकडे नव्हते आणि म्हणून कॅल्व्हिनला तो पसंत नव्हता. हा कट फसला. दुसऱ्या फ्रान्सिसच्या मृत्यूनंतर अल्पवयीन नववा चार्ल्स गादीवर आला. त्याची आई मेदिसिसची कात्रिन (कॅथरिन) हिने फ्रान्समध्ये धार्मिक शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. १५६२ मध्ये तिने घोषणा करून ह्यूजनॉटांना काही सीमित प्रदेशात काही बंधने घालून धार्मिक स्वातंत्र्य दिले. पण एव्हाना धार्मिक असहिष्णुता पराकोटीला पोहचली होती. फ्रांस्वाझ, ड्यूक द गीझ ह्याने व्हासी येथे मुक्रर केलेल्या सीमेबाहेर एकत्र प्रार्थना करीत असलेल्या ह्यूजनॉट लोकांची कत्तल केली. ह्यानंतर फ्रान्समध्ये अंतर्गत धार्मिक युद्धे सुरू झाली. ह्यूजनॉट पंथाचे नेतृत्व पहिला लुई प्रिन्स द काँदे ह्याच्याकडे होते. हा राजघराण्याशी रक्ताच्या नात्याने संबंधित असल्यामुळे ‘राज्यकर्ता’ होता आणि म्हणून ह्या युद्धाला कॅल्व्हिनची संमती मिळाली. हा अशांततेचा कालखंड दहा वर्ष टिकला. काँदे आणि फ्रांस्वाझ, ड्यूक द गीझ हे विरुद्ध पक्षांचे नेते मारले गेले. कात्रिनने ह्यूजनॉट पक्षाचा प्रमुख नाव्हाराचा हेन्री (हा बुर्‌बाँ घराण्यातील होता) आणि आपली कॅथलिक पंथी मुलगी मार्गारेट ह्यांचा विवाह जमवून परत एकदा धार्मिक सख्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. ह्या लग्नासाठी सर्व पक्षांचे नेते पॅरिसला आले असताना फ्रांस्वाझचा मुलगा ड्यूक द गीझ ह्याने कॉलिन्यीचा वध करण्याचा प्रयत्न केला कारण आपल्या पित्याला ठार मारण्यात कॉलिन्यीचा हात होता, अशी त्याची समजूत होती. ह्यानंतर बदला घेतला जाईल, ह्या भीतीने ड्यूक द गीझने सेंट बार्थोलोम्यूच्या दिवशी ह्यूजनॉट पक्षाच्या पॅरिसमध्ये जमलेल्या सर्व पुढाऱ्यांच्या कत्तली घडवून आणली. फ्रान्समधील इतर प्रदेशांतही ह्यूजनॉट पंथातील पुढाऱ्यांच्या कत्तली झाल्या. ही अतिशय भीषण घटना होती. कात्रिन आणि चार्ल्स ह्यांनी घाबरून जाऊन ह्या कृत्याला संमती दिली होती.


चार्ल्सनंतर त्याचा भाऊ तिसरा हेन्‍री गादीवर आला (१५७४). सेंट बार्थोलोम्यूच्या कत्तलीमुळे लोकांत इतकी घृणा पसरली होती की, ह्यूजनॉट पंथाचा प्रमुख असलेल्या नाव्हाराच्या हेन्‍रीचे साहाय्य घेऊनच त्याला कारभार सांभाळावा लागला. ह्यामुळे चिडून जाऊन एका कडव्या कॅथलिक पंथीयाने राजाचा वध केला. ह्यानंतर नाव्हाराचा हेन्‍री, चौथा हेन्‍री म्हणून गादीवर आला. पण पॅरिसची जनता प्रामुख्याने कॅथलिक होती. हेन्‍रीने कॅथलिक पंथाचा स्वीकार केल्यानंतरच त्याला पॅरिसचा कबजा मिळून फ्रान्सवर राज्य करता आले. हेन्‍रीने अनेकदा आलटूनपालटून प्रॉटेस्टंट आणि कॅथलिक पंथ स्वीकारले होते. धार्मिक बाबतीत तो सहिष्णू होता. १५९८ मध्ये नॅन्ट्स येथे घोषणा करून त्याने ह्यूजनॉट पंथीयांना काही बंधने घालून धार्मिक स्वातंत्र्य दिले. ह्या घोषणेप्रमाणे त्यांना काही सीमित प्रदेशांत उपासनास्वातंत्र्य मिळाले आणि सार्वजनिक जीवनात पूर्ण सहभाग घेता येऊ लागला.

इंग्लंड आणि स्कॉटलंड यांतील धर्मसुधारणा : इंग्लंडमधील धर्मसुधारणेच्या मागची प्रेरणा बरीचशी राजकीय स्वरूपाची होती तथापि जुन्या लोलार्ड पंथाच्या शिकवणीचे अवशेष, यूरोपमधील ल्यूथरचे आंदोलन आणि विशेषतः इरॅस्मसचा ख्रिस्ती मानवतावाद यांचाही प्रभाव ह्या घटनांवर पडला. इंग्लंडचा त्या वेळचा राजा आठवा हेन्‍री ह्याने ॲरागॉनची कॅथरिन हिच्याशी लग्न झाले होते. कॅथरिनला अनेक अपत्ये झाली, पण त्या सर्व मुली होत्या. हेन्‍रीला गादीला वारस म्हणून मुलगा पाहिजे होता. दुसऱ्या स्त्रीशी विवाह करायचा, तर हेन्‍रीच्या कॅथरिनशी झालेल्या विवाहाचा विच्छेद करणे आवश्यक होते. हा विवाह अवैध म्हणून रद्द ठरविता येणे शक्य होते कारण कॅथरिन अगोदर हेन्‍रीचा थोरला भाऊ आर्थर ह्याची पत्नी होती आणि कायद्याप्रमाणे कुणालाही विधवा भावजयीशी लग्न करता येत नव्हते. विवाह रद्द करणे पोपच्या अधिकारात होते पण कॅथरिन ही स्पेनचा सम्राट पाचवा चार्ल्स ह्याची आत्या असल्यामुळे, चार्ल्सचा हा विवाह रद्द करण्याला तीव्र विरोध होता आणि पोप चार्ल्सच्या ताब्यात होता. उलटपक्षी हेन्‍रीला नाराज करणेही पोपला सोयीचे नव्हते. तो निर्णय देण्यात चालढकल करू लागला. अखेरीस हेन्‍रीने पोपचा अधिकार झुगारून दिला आणि १५३४ मध्ये इंग्लंडच्या राष्ट्रीय चर्चची —अँग्लिकन चर्चची—स्थापना केली. इंग्लंडचा राजा या नात्याने तो स्वतः अँग्लिकन चर्चचा प्रमुख बनला आणि कँटरबरीच्या आर्चबिशपची त्याने चर्चचा धार्मिक प्रमुख म्हणून स्थापना केली. टॉमस क्रॅनमर, त्यावेळचा कँटरबरीचा आर्चबिशप, ह्याने हेन्‍रीचे ॲन बुलीनशी लग्न लावून दिले.

अँग्लिकन चर्चची स्थापना जरी राजकीय कारणांसाठी झाली, तरी त्याची रचना करताना धार्मिक स्वरूपाच्या—धार्मिक सिद्धांत, विधी, संस्कार ह्यांविषयीच्या—सुधारणा करता आल्या. ख्रिस्ती भिक्षूंचे मठ नष्ट करण्यात आले. प्रत्येक गावातल्या चर्चमधून इंग्रजी भाषेतील बायबल वापरण्यात येऊ लागले आणि धर्मगुरूंना लग्न करण्याची परवानगी देण्यात आली. आठव्या हेन्‍रीनंतर सहावा एडवर्ड गादीवर आला आणि टॉमस क्रॅनमरच्या नेतृत्वाखाली अँग्लिकन चर्चने अधिक प्रॉटेस्टंट वळण घेतले. एडवर्डमागून हेन्‍रीची मुलगी मेरी गादीवर आली. मेरीचा स्पेनच्या दुसऱ्या फिलिपशी विवाह झाला. तिने कॅथलिक पंथात प्रवेश केला. अँग्लिकन चर्चच्या प्रमुख धर्मगुरूंना वधस्तंभांवर जाळण्यात आले. ह्यात टॉमस क्रॅनमरही होता. मेरीनंतर तिची बहिण एलिझाबेथ इंग्लंडची राणी झाली (१५५८). तिने सौम्य वळणाच्या प्रॉटेस्टंट पंथाला पाठिंबा दिला आणि समावेशक राष्ट्रीय चर्चच्या संकल्पनेचा पुरस्कार केला. म्हणजे ख्रिस्ती धर्मसिद्धांतांचे वेगवेगळे अर्थ लावणारे लोक एकाच चर्चमध्ये नांदू शकतात, ही कल्पना उचलून धरली. एलिझाबेथच्या कारकीर्दीतही कित्येक कॅथलिक पंथीयांचा वध करण्यात आला. पण त्याची कारणे राजकीय होती, धार्मिक नव्हती.

जॉन नॉक्स (१५०५—७२) हा स्कॉटलंडमधील धर्मसुधारणेचा अध्वर्यू म्हणून प्रसिद्ध आहे. १५६० मध्ये स्कॉटलंडच्या प्रेसबिटरियन चर्चची स्थापना झाली असे म्हणता येईल पण त्यापूर्वी बरीच वर्षे स्कॉटलंडच्या दक्षिण भागात अनेक उपदेशकांनी, कॅल्व्हिनच्या पंथाचा सर्वसामान्य लोकांत प्रसार केला होता. १५६० मध्ये प्रसबिटरियन पद्धतीने चर्च संघटित करण्यात आले. स्कॉटलंडची राणी मेरी हिची कॅथलिक पंथावर निष्ठा होती पण तिच्या अनेक दुष्कृत्यांमुळे तिला स्कॉटलंड सोडून देऊन इंग्लंडमध्ये आश्रय घ्यावा लागला आणि प्रेसबिटरियन पंथ स्कॉटलंडमध्ये स्थिर झाला.

भिन्न पंथीयांमधील तेढ १५६० च्या सुमाराला विकोपाला गेली असे म्हणता येईल. रोममध्ये पोप तिसरा पॉल ह्याने चर्चमध्ये अंतर्गत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला. पण त्याबरोबरच १५४२ मध्ये रोमन इन्क्विझिशनची स्थापना केली. इन्क्विझिशन म्हणजे धर्माने ख्रिस्ती असलेल्या पण ख्रिस्ती सिद्धांतांपासून भ्रष्ट झाल्याचा आरोप असलेल्या व्यक्तीवर खटले चालविण्यासाठी चर्चने नेमलेले न्यायमंडळ. १५४५ मध्ये ट्रेंट येथे परिषद भरविण्यात आली आणि त्याने कॅथलिक धर्म सिद्धांतांची नेमकेपणे परत मांडणी केली. प्रॉटेस्टंटांनी स्वीकारलेला श्रद्धामूलक समर्थनाचा सिद्धांत, प्रभुभोजनाचा त्यांनी लावलेला अर्थ आणि धर्मगुरूंना विवाह करण्याची त्यांनी दिलेली अनुज्ञा ह्या गोष्टींचा पाखंडी म्हणून परिषदने धिक्कार केला. कॅथलिक चर्चमधील धर्मसिद्धांतांच्या बाबतीतील सर्व मतभेद ह्या कालखंडात निष्ठुरपणे दडपण्यात आले. पोप चौथा पॉल आणि पोप पाचवा पायस ह्यांच्या आमदानीत, अनेक उदारमतवादी कॅथलिक धर्मगुरूंना तुरूंगवास भोगावा लागला आणि काहींना जिवंत जाळण्यातही आले.यूरोपच्या इतर प्रदेशात झालेल्या घडामोडी ह्याच स्वरूपाच्या आहेत. म्हणजे तेथेही धर्मकारण आणि राजकारण एकामेकांत गुंतलेली आहेत. उदा., हॉलंडमध्ये  प्रॉटेस्टंट मताच्या प्रसाराला पंधराव्या शतकापासूनच अनुकूल क्षेत्र निर्माण होत होते. बायबलचे डच आणि फ्लेमिश भाषांत भाषांतर झाले होते आणि छापखाने निर्माण झालेले असल्यामुळे बायबलचा आणि ल्यूथरच्या लिखाणांचा मोठ्या प्रमाणावर प्रसार झाला होता. व्यापाराने समृद्ध झालेल्या शहरांतून प्रॉटेस्टंट पंथ अधिक दृढ होत होता. ह्याला आळा घालण्यासाठी स्पेनच्या पाचव्या चार्ल्सने इन्क्विझिशनची स्थापना केली (१५२२). इन्क्विझिशनने कडक आणि निर्घृण उपाय योजूनही प्रॉटेस्टंट पंथाचा होणारा प्रसार थांबला नाही. १५६६ मध्ये काही उमराव आणि प्रमुख नागरिक एकत्र आले आणि इन्क्विझिशनचा प्रतिकार करण्यासाठी त्यांनी एक संघ स्थापन केला. तेव्हा दुसऱ्या फिलिपने इन्क्विझिशन मागे घेण्याचे वचन दिले पण आता प्रॉटेस्टंटांची वृत्ती आक्रमक बनली होती. तेव्हा पाखंडी मत धारण करणे, हा राजद्रोहाचा राजकीय गुन्हा आहे असे जाहीर करण्यात आले आणि प्रॉटेस्टंट पंथीयांची ससेहोलपट करण्यात येऊ लागली (१५६७). यानंतर ह्या धार्मिक कलहाचे रूपांतर सरळ राजकीय यादवीत झाले आणि कालांतराने स्पेनच्या आधिपत्यापासून हॉलंड स्वतंत्र झाला.

डेन्मार्क आणि स्वीडन या देशांत झालेली धर्मक्रांती तुलनेने रक्तशून्य म्हणावी लागेल. डेन्मार्कमध्ये ल्यूथरच्या मतांचा प्रसार होत होता. शिवाय दुसरा फ्रीड्रिख आणि तिसरा क्रिश्चन हे राजेच राजकीय आणि धार्मिक कारणांसाठी प्रॉटेस्टंट पंथाला अनुकूल होते. ह्यामुळे डेन्मार्क मध्ये प्रॉटेस्टंट पंथाची अधिकृत स्थापना रक्तपात न होता झाली. उलट नॉर्वे आणि आइसलँड ह्या डेन्मार्कच्या अंकित राज्यांत ही धर्मसुधारणा अनुत्साही जनतेवर लादण्यात आली. स्वीडनमध्येही राजा आणि प्रजा प्रॉटेस्टंट पंथाला अनुकूल होते व लोकांनीच पुढाकार घेऊन देशातील कॅथलिक चर्च विसर्जीत केले आणि ल्यूथरच्या पंथाची अधिकृतपणे स्थापना केली.

इटली, स्पेन आणि पोर्तुगाल या देशांत प्रॉटेस्टंट पंथीयांना राज्यकर्त्यांचा पाठिंबा मिळाला नाही. उलट इन्क्विझिशनने केवळ प्रॉटेस्टंट मताकडे कल असलेल्यानाच नव्हे तर, चर्चमध्ये सुधारणा घडवून आणाव्या असे मत प्रदर्शित करणाऱ्या विद्वान धर्मगुरूंचाही छळ करून प्रॉटेस्टंट मताच्या प्रसाराला वावच मिळू दिला नाही. जे काही थोडे लोक प्रॉटेस्टंट पंथाकडे झुकलेले होते, त्यांना देशत्याग करून परागंदा व्हावे लागले.

धर्मसुधारणेचा परिणाम : धर्मसुधारणा आंदोलनाचे एकंदर फलित काय? एकतर, व्यक्तीला बायबलचा अर्थ लावायचे स्वातंत्र्य आहे, हा सिद्धांत प्रॉटेस्टंट पंथीय देशांत प्रस्थापित झाला आणि मर्यादित स्वरूपात मान्य झालेल्या ह्या व्यक्तिस्वातंत्र्याच्या हक्काचा विकास हळूहळू होऊन जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्यक्तिस्वांतंत्र्याचे मूल्य प्रस्थापित झाले. चर्चचे एकछत्री आध्यात्मिक साम्राज्य फुटून अनेक भिन्न धर्मपंथ स्थापन झाल्यामुळे, ऐहिक जीवनाची स्वायतत्ता हळूहळू मान्य करावी लागली. चर्चच्या सिद्धांतांप्रमाणे  किंवा कॅल्व्हिनच्या ख्रिस्ती परिवाराच्या संकल्पनेप्रमाणे मानवी जीवन एकसंध असते आणि त्याच्यात ऐहिक क्षेत्र आणि आध्यात्मिक क्षेत्र अशी दोन स्वतंत्र क्षेत्रे एकमेकांपासून अलग करता येत नाहीत. पण एकदा धार्मिक बाबतीत व्यक्तिस्वातंत्र्यांचे तत्त्व मान्य केले आणि अनेक धर्मपंथांना एकाच राज्यात वसणे व्यावहारिक दृष्ट्या अटळ झाले, की ह्याचे दुहेरी परिणाम घडतात. एकतर, धार्मिक बाबतीत हस्तक्षेप करण्याच्या राज्यसंस्थेच्या अधिकाराला मर्यादा घालणे सर्वांच्याच हिताचे ठरते. तसेच ऐहिक व्यवहाराचे नियमन विशिष्ट धार्मिक सिद्धांतांवर न आधारता स्वायत्तपणे करावे, ह्या गोष्टीला सर्व धर्मपंथ अनुकूल होतात. व्यक्तिस्वातंत्र्य आणि ऐहिक स्वायत्तत्ता ह्या धर्मसुधारणा आंदोलनाकडून मानवी संस्कृतीला लाभलेल्या सर्वांत महत्त्वाच्या देणग्या होत.

पहा : धर्म (धर्म व समाजसुधारणा) प्रबोधनकाल.

संदर्भ :1. Bainton, R. H. Reformation of the Sixteenth Century, London, 1952.

           2. Chadwick, Owen, The Reformation, Middlesex, 1964.

          3. Dutant, Will, The Reformation, New York, 1957.

          4. Elton, G. R. Reformation Europe, 1517—1599, London, 1964.

          5. Grimm, H. J. The Reformation Era 1500—1950, Chicago, 1954.

रेगे, मे. पुं.