कोल्हापूर संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील दक्षिण महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध संस्थान. पूर्व व दक्षिण सीमेवर बेळगाव जिल्हा(कर्नाटक राज्य) आणि गोवा प्रदेश, नैर्ऋत्य व पश्चिम दिशांस गोवा व रत्नागिरी जिल्हा, उत्तर व पूर्व बाजूंस सांगली जिल्हा, अशा तऱ्हेने वेढलेला महाराष्ट्रातील जिल्हा हेच पूर्वीचे साधारणत: कोल्हापूर संस्थान होते. विस्तार सु. ८,२८८ चौ.किमी. लोकसंख्या सु. १३ लाख (१९४१) आणि सामीलनाम्याच्या वेळी उत्पन्न अंदाजे दीड कोटी रु. होते. हे संस्थान १९४९ मध्ये विलीन होऊन त्या वेळच्या मुंबई राज्यात समाविष्ट करण्यात आले.

कोल्हापूरचा इतिहास फार प्राचीन आहे. महाराष्ट्रातील इतर काही ठिकाणांप्रमाणे या प्रदेशातही प्राचीन काळी हीनयान बौद्धांचे प्राबल्य होते. त्या काळी परदेशांशी, मुख्यत्वे रोमन साम्राज्यांशी, व्यापार चालू होता. सातवाहन, चालुक्य, राष्ट्रकूट, शिलाहार आणि यादव यांची सत्ता चौदाव्या शतकापर्यंत ह्या प्रदेशावर राहिली. त्यांपैकी राष्ट्रकूट घराण्यातील अमोघवर्षाने लोकोपद्रवाच्या शांतीसाठी आपले एक बोट तोडून कोल्हापूरच्या महालक्ष्मीस वाहिल्यामुळे त्याची ख्याती झाली. शिलाहार घराण्यातील दहा पुरुषांनी सु. २५० वर्षे (९७५–१२२५) सह्याद्रीच्या पूर्वेस, पण लगतच्या बेळगावपासून साताऱ्‍यापर्यंतच्या प्रदेशावर राज्य केले  त्यांचे या प्रदेशात अनेक सांस्कृतिक अवशेष (उदा., ताम्रशिलाशासने, मंदिरे, वीरगळ, मूर्ती इ.) अद्यापि आढळतात. दुसऱ्या  राजेंद्र चोलाने (१०५२–१०६४) चालुक्यांचा पराभव कोल्लपूर (कोल्लपुरम?) येथे केला. ते ठिकाण कोल्हापूर हेच असावे. कोल्ह्याचा या नावाशी संबंध नाही. बहमनी आणि आदिलशाही सुलतानांचा अंमल येथे सु. अडीचशे-तीनशे वर्षे टिकला. खलफ हसन बसरी, महंमूद गावान इत्यादींनी पन्हाळा, खेळणा आदी गड सर केले होते. छत्रपतींनीही पन्हाळ्यावर आपले भगवे निशाण चढविले. छत्रपती राजाराम जिंजीस गेल्यावर रामचंद्रपंत अमात्य आणि छ. राजारामाच्या मृत्यूनंतर त्यांची पत्नी ⇨ ताराबाई  यांच्या वास्तव्यामुळे कोल्हापूर, पन्हाळा आणि विशाळगड या प्रदेशास अधिक महत्त्व आले.

शिवछत्रपतींचा धाकटा मुलगा छत्रपती राजाराम यांच्यानंतर ताराबाईचा पुत्र (वेडा?) शिवाजी (ज.१६९६) बालराजा म्हणून सिंहासनावर बसला. तेव्हापासून कोल्हापूरची निराळी गादी चालू झाली, असे म्हणावयास हरकत नाही. परंतु राजसबाईचे कारस्थान यशस्वी होऊन ताराबाईस सपुत्र कारावास व पुढे निर्वासन पतकरावे लागले (१७१४). तेव्हापासून राजसबाईचा मुलगा संभाजी याची कारकीर्द (१७१४–६०) सुरू झाली. सातारकर शाहूशी करवीरकर संभाजी प्रथम भांडतच होता. पण १७३१ मधील वारणेच्या तहानंतर हे भांडण प्राय: संपले. सात लग्ने करूनही संभाजीला औरस संतती लाभली नाही. म्हणून खानवलकरांकडील एका मुलास त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या एका राणीच्या मांडीवर दत्तक दिले. तो दुसरा शिवाजी सु. ५१ वर्षे छत्रपती राहिला (१७६२–१८१३).

दुसऱ्या शिवाजीच्या कारकीर्दीत यशवंतराव शिंदे (मृ. १७८२) आणि रत्नाकरपंत राजाज्ञा-दिवाण यांनी राज्यकारभार केला. त्यांनी पेशव्यांशी लढायाही केल्या पट्टणकुडीच्या लढाईत तर परशुरामभाऊ पटवर्धनाचा त्यांनी क्रूरपणे शेवट केला.

शिवाजीच्या पश्चात संभाजी (१८१३–२१) व शहाजी (१८२१–३८) अशा दोन भावांच्या कारकीर्दी झाल्या. राहत्या राजवाड्यात संभाजीचा मोहित्यांनी खून केला. मराठ्यांच्या इतिहासात एका पेशव्याचा खून झाला होता, आता ही राजहत्या घडली.

एवढ्या काळात इंग्रजांशी कोल्हापूरचे तीन तह झाले. (१८१२, १८२७ आणि १८२९). त्यांना मुलूख तोडून देऊन व सर्वाधिकार इंग्रजांना बहाल करून त्यांच्या तंत्राने चालण्याचे कबूल केल्यामुळे कोल्हापूरचे राज्य पुढे टिकले.

शहाजीनंतर त्याचा पुत्र तिसरा शिवाजी याने १८३८ ते १८६६ पर्यंत राज्य केले. याच्या कारकीर्दीत १८४४ व १८५७ या वर्षी कोल्हापूरात बंडे झाली. पैकी दुसऱ्याचा भारतातील साधारण उठावाशी संबंध असणे शक्य आहे. औरस पुत्र नसल्याने पाटणकरांकडील मुलगा दत्तक घेतला. तोच राजाराम होय. हा मोठा देखणा, शहाणा आणि त्या काळातील नवलाई म्हणजे हा इंग्रजी बोलणारा होता. राजाराम महाराजांची यूरोप-यात्रा फार गाजली. त्यांचे कौतुकही पुष्कळ झाले. परत येताना फ्लॉरेन्स (इटली) या शहरात ते मरण पावले (१८७०). त्यांची छत्री तेथे आहे.

राजाराम महाराजांसही पुत्र नव्हता, म्हणून सावर्डेकर घराण्यातला मुलगा दत्तक घेण्यात आला. तो चौथा शिवाजी छत्रपती (१८७१–८३). याचा अहमदनगरच्या किल्ल्यात कारावासातील निर्घृण छळामुळे अत्यंत दुःखद अंत झाला. नंतर कागलकर घाटगे घराण्यातला दत्तक मुलगा गादीवर आला. त्यांचे नाव ⇨ शाहू महाराज (१८८४–१९२२). यांच्या कारकीर्दीत कोल्हापूरचे महत्त्व वाढले. राज्याची प्रगती झपाट्याने झाली. ब्रिटिशांची मर्जी छत्रपतींवर अधिक बसली. त्यांची कारकीर्द तीन तपांहून थोडी अधिक काळ झाली. त्यांच्या चाहत्यांनी त्यांना ‘राजर्षि’ ही पदवी दिली. त्यांचे पुत्र राजाराम महाराज अठरा वर्षे छत्रपती होते (१९२२–४०).

राजाराम महाराज निपुत्रिक वारल्यावर (२६ नोव्हेंबर १९४०) चावरेकर घराण्यातील दत्तक घेतलेला सहा आठवड्यांचा बालछत्रपती अल्पायू ठरला. (मृ. २९ सप्टेंबर १९४६). तेव्हा देवासचे (थोरली पाती) महाराज विक्रमसिंह पवार हे कोल्हापूरचे दत्तक छत्रपती म्हणून निवडले गेले (२१ मार्च १९४७). इतर संस्थाने भराभर सामीलनामा पतकरीत असता, कोल्हापूरबाबत सरकारी धोरण आस्ते कदम होते. कारण रीजन्सी कौन्सिलने प्रजामंडळाला ५१ सभासदांचे कायदेमंडळ दिले होते. मंत्रिमंडळाचा हक्कही दिला होताच. तेव्हा गादीचा वारसा निश्चित झाल्याखेरीज कोल्हापूरसारखे छत्रपतींचे राज्य सामील करून घेणे इष्ट नव्हते. शेवटी १ फेब्रुवारी १९४९ रोजी सामीलनाम्यावर सह्या झाल्या. दहा लाखांची तैनात ठरली. मुंबई राज्यातर्फे बा.गं. खेर यांनी कोल्हापूरचा कारभार आपल्या हाती घेतला. तेव्हापासून कोल्हापूर हा महाराष्ट्रात एक जिल्हा झाला.

सातारकर छत्रपतींनी पेशव्यांची प्रतिष्ठा राखली आणि पुढे सर्वस्वी पेशव्यांच्या वर्चस्वाखाली ते राहिले तसे कोल्हापूरचे नव्हते. तत्कालीन सर्व सत्ताधाऱ्यांवर संधी मिळताच आक्रमण करणे किंवा गप्प बसणे किंवा आतबट्ट्याचा तह करणे, हेच कोल्हापूरचे सदैव धोरण असे. कोल्हापूरच्या गादीवर दत्तकांचा आणि बालराजांचा भरणा जास्‍त होता. त्यामुळे दिवाणांचे धोरण प्रभावी ठरे. शिवाय हैदर – टिपू अशांकडे कल. त्यामुळे कोल्हापूरचा पेशव्यांना काही वेळा विरोध झाला. ब्रिटिश अंमलात बहुतेक छत्रपती विशेष राजनिष्ठ ठरले. राष्ट्रीय कार्यकर्त्यांना त्यांनी मदत केली नाही. केसरीचे संपादक, प्रा. विजापूरकर, प्रा. वामन मल्हार जोशी, पंडित सातवळेकर, स.खं. आळतेकर इत्यादिकांवर कोल्हापूर संस्थानने खटले भरले. कित्येकांना कारावास भोगावा लागला, तर काहींना संस्थान सोडावे लागले. ब्रिटिशांकरवी त्यांचा छळ झाला. करवीरकरांचे संरक्षण त्यांना मिळाले नाही. ब्राह्मणेतर चळवळीने कोल्हापूर दरबारच्या आश्रयामुळे बाळसे धरले. क्षात्रजगद्‍गुरूंची स्थापना ही तर फार मोठी नवी व्यवस्था कोल्हापूर राज्याने केली. वेदोक्त प्रकरणातून दोहोंनाही बळ चढले.

कोल्हापूरला रेसिडेंट राहू लागला, तेव्हा दक्षिण महाराष्ट्रातील इतर चार सलामी संस्थाने, अकरा बिगर-सलामी संस्थाने, संस्थानातील सर्व जहागिऱ्या यांचा कारभार याच रेसिडेंटमार्फत चालत असे.

संदर्भ : 1. Menon, V.P. The story of the Integration of the Indian States, New Delhi 1956.

             २.गर्गे, स.मा. करवीर रिसायत, पुणे, १९६८. 

            ३. भिडे,ग.रं. देशपांडे, पु.ल. संपा. कोल्हापूर दर्शन, पुणे, १९७१.

टिकेकर, श्री. रा.