मिरज संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या मुंबई इलाख्यातील दक्षिण महाराष्ट्रातील एक संस्थान. थोरल्या माधवराव पेशव्यांनी १७६२ मध्ये गोविंदराव पटवर्धनांना मिरजेचा किल्ला आणि आजूबाजूचा बराच प्रदेश जहागीर म्हणून दिला. परशुरामभाऊ पटवर्धनांच्या मृत्यूनंतर कुटुंबात अंतःकलह माजून गंगाधरराव पटवर्धन वेगळे झाले आणि पटवर्धनास, जहागिरीच्या १८०८ मध्ये झालेल्या वाटण्यांत मिरज सांगलीपासून अलग होऊन गंगाधररावांकडे आले. १८२० मध्ये इंग्रजांच्या संमतीने मिरजेच्या चार वाटण्या झाल्या. त्यांपैकी औरस पुत्र नाही म्हणून १८४२–४५ मध्ये दोन वाटे खालसा झाले. उरलेल्या दोन वाट्यात थोरल्या पातीकडे ८३९ चौ. किमी. चा प्रदेश आला. त्यात मिरज-लक्ष्मेश्वर धरून ५ शहरे आणि धारवाड-सोलापूर-सातारा जिल्ह्यांतून विखुरलेली ५९ खेडी होती. थोरल्या पातीची राजधानी मिरज ठरविण्यात आली. तिचे उत्पन्न पाच लाख रुपये, खंडणी सु. १२,५५८ रु. व लोकसंख्या सु. एक लाख होती (१९४१). थोरल्या पातीची संगीताच्या वाद्यांसाठी प्रसिद्धी होती. धाकट्या पातीत ५०७ चौ. किमी. चा प्रदेश असून त्यात तीन शहरे व ३१ खेडी होती ती बंकापूर (धारवाड जिल्हा), पंढरपूर (सोलापूर जिल्हा), तासगाव (सातारा जिल्हा) या तालुक्यांना लागून असून चार इनाम गावे पुणे जिल्ह्यातही होती. धाकट्या पातीची राजधानी बुधगाव असून उत्पन्न सु. तीन लाख रुपये, खंडणी सु. ६,४१३ रु. व लोकसंख्या सु. अर्धा लाख होती. दोन्ही पात्यांचे संस्थानिक पहिल्या दर्जाचे सरदार असून त्यांना दत्तकाचे तसेच न्यायदानाचे पूर्ण अधिकार होते. आंदोलनामुळे १९३८ मध्ये दोन्ही पात्यांत मर्यादित जबाबदारीची राज्यपद्धती अस्तित्वात आली. दोन्ही पात्या १९४८ मध्ये मुंबई राज्यात विलीन झाल्या.

कुलकर्णी, ना. ह.