देवास संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील मध्य प्रदेश राज्यातील एक मराठी संस्थान. संस्थानच्या थोरली आणि धाकटी पाती अशा दोन स्वतंत्र शाखा होत्या. मात्र दोन्ही शाखांची राजधानी देवासच होती. दोन्ही शाखा ग्वाल्हेर, इंदूर, जावरा, नरसिंहगड संस्थानांच्या प्रदेशांनी सीमांकित झाल्या होत्या. संस्थानचे एकूण क्षेत्रफळ २,२९३ चौ. किमी. होते व लोकसंख्या १,५४,४७७ (१९४१) होती.

पहिला बाजीराव पेशवा याने तुकोजीराव व जिवाजीराव पवार या दोन बंधूंना आपल्याबरोबर मध्य हिंदुस्थानात स्वारीवर नेले (१७२८). त्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्याने देवास, अलोट, गडगुचा, रिंग्नोद, बागौद, सारंगपूर वगैरे परगणे त्यांना इनाम दिले शिवाय माळव्यातील इतरही काही प्रदेश व हक्क बहाल केले. यातूनच या संस्थानचा उगम झाला. संस्थानिकांची मूळ शाखा धारच्या पवारांचीच होती.

थोरली पाती : याचे संस्थापक पहिले तुकोजीराव होत. त्यांनी अनेक लढायांत पराक्रम केला. त्यांच्या मृत्यूनंतर (१७५३) त्यांचा पुतण्या कृष्णाजी हा दत्तक मुलगा म्हणून गादीवर आला. कृष्णाजीरावाने राघोबादादाविरुद्ध बारभाईंस मदत केली तो महादजी शिंद्यांचा उजवा हात समजला जाई. पानिपतच्या १७६१ च्या युद्धात तो मराठ्यांबरोबर होता. त्याच्या मृत्यूनंतर १७८९ मध्ये त्याचा दत्तक मुलगा दुसरा तुकोजी गादीवर आला. या पुढील काळात पेंढारी, होळकर व शिंदे यांचा संस्थानला फार उपद्रव झाला. त्यामुळे संस्थानचे नुकसान झाले. १८१८ साली संस्थान इंग्रजांचे मांडलिक बनले आणि २८,५०० रु. खंडणी ठरली. संस्थानने १८३८ मध्ये सारंगपूरातील बंडाळी मोडून काढली.मूळ संस्थानने गधागड प्रकरणी इंग्रजास सहाय्य केल्यावर १८४१ मध्ये संस्थानच्या वाटण्या होऊन थोरल्या पातीत १,१६० चौ. किमी.चा प्रदेश व देवास, अलोट, सारंगपूर, राघोगढ व बागौद हे परगणे आणि धाकट्या पातीत १,०८५ चौ.किमी. प्रदेश व देवास, बागौद, बडगुचा, रिंग्नोद, सारंगपूर व अकबारपूर हे परगणे समाविष्ट करण्यात आले. यामुळे देवास, बागौद, सारंगपूर या परगण्यांची विभागणी झाली. १८६० मध्ये थोरल्या पातीच्या गादीवर दुसरा कृष्णराव आला. त्याच्या कारकीर्दीत संस्थानला कर्ज झाले म्हणून राज्यकारभारासाठी अधीक्षकाची नियुक्ती करण्यात आली. एकोणिसाव्या शतकात दिनकराव राजवाडे, विष्णू केशव कुंटे वगैरे दिवाणांनी प्रशासनव्यवस्था उत्तम ठेवली आणि अनेक सुधारणा केल्या. त्यानंतर १८९९ मध्ये तिसरे तुकोजीराव गादीवर आले. हे धार्मिक वृत्तीचे होते. त्यांनी वेदोक्त पद्धतीने मौजीबंधन केले. ते मराठा व धनगर यांच्या शिक्षणात विशेष रस घेत. त्यांनी १९३३ मध्ये संन्यास घेऊन पाँडिचेरीस वास्तव्य केले. विक्रमसिंह या त्यांच्या मुलाची कोल्हापूरच्या छत्रपतींच्या गादीवर दत्तक पुत्र म्हणून निवड झाली (१९४७). त्यामुळे त्यानंतर तुकोजीरावांचे नातू कृष्णराव हे १९४७ मध्ये गादीवर आले. विलिनीकरणाच्या वेळी कृष्णराव हे संस्थानिक होते. संस्थानला १५ तोफांच्या सलामीचा मान व दत्तकाची सनद होती. संस्थानची लोकसंख्या व उत्पन्न अनुक्रमे ८७,४७९ (१९४१) आणि १५ लाख रु. होते.

धाकटी पाती : जिवाजीरावाने हे संस्थान स्थापन केले असले, तरी मूळ संस्थानच्या वाटण्या १८४१ मध्ये झाल्या. जिवाजीराव १७८५ मध्ये मरण पावला. १८९२ मध्ये मल्हारराव पवार या संस्थानच्या गादीवर आले. विलिनीकरणाच्या वेळेचे विद्यमान संस्थानिक यशवंतरराव १९४३ मध्ये गादीवर आले. या संस्थानिकांनाही नंतर ‘महाराज’ ही उपाधी मिळाली. या शाखेला १५ तोफांच्या सलामीचा मान व दत्तकाची सनद होती. संस्थानची लोकसंख्या व उत्पन्न अनुक्रमे ६६,९९८ (१९४१) व २० लाख रु. होते.

शिक्षण, आरोग्य व जकातव्यवस्था सोडली, तर दोन्ही पात्यांचा कारभार स्वतंत्र होता. दोन्ही पात्यांत १९२२ पासून जबाबदार राज्यपद्धती अंमलात आली. विसाव्या शतकात दोन्ही पात्यांत स्थानिक स्वराज्य, शिक्षण, वीजपुरवठा, पाणीपुरवठा, बँका, वनसंरक्षण, वृत्तपत्रे, हरिजनांचा उद्धार, औद्योगिकीकरण, छापखाने वगैरे बाबतींत अनेक सुधारणा झाल्या. १९४८ मध्ये ही दोन्ही संस्थाने त्यावेळच्या मध्य भारत संघात विलीन झाली आणि पुढे १ नोव्हेंबर १९५६ रोजी मध्य प्रदेश राज्यात समाविष्ट करण्यात आली.

कुलकर्णी, ना. ह.