गोखले, बापू : (? १७७७–१९ फेब्रुवारी १८१८). मराठी राज्याचा हा शेवटचा सेनापती. पूर्ण नाव नरहर गणेश गोखले. याचे मूळ गाव कोकणातील तळेखाजण. नंतर तो पिरंदवणे ता. विजयदुर्ग येथे राहत होता. त्याचे चुलते धोंडोपंत गोखले नाना फडणीसांकडे लष्करात नोकरीस होते. त्यांनी स्वतंत्र पथक उभे करून अनेक स्वाऱ्यांत भाग घेतला. दक्षिणेत धोंड्या वाघाने फार वाघाने फार उच्छेद मांडला. तेव्हा गोखले आणि पटवर्धन यांनी धोंड्या वाघावर स्वारी केली. कित्तूर व हल्ल्याळ यांच्या दरम्यान वाघाने धोंडोपंत गोखले व त्यांचा पुतण्या महादेव यास मारले. बापू हाही या स्वारीत हजर होता. तो कसाबसा वाचला. धोंडोपंतांच्या मृत्यूनंतर त्यांची सरदारकी यास मिळाली. शेवटी त्याने इंग्रजांच्या मदतीने वाघास मारले. पटवर्धनांचा पाडाव करण्यात त्याने दुसरा बाजीराव पेशवे याची बाजू घेतली. त्याचप्रमाणे प्रतिनिधी आणि ताई तेलीण ह्यांचा पाडाव बापूने केला. चतुरसिंगाने पेशव्यांविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो बापूने हाणून पाडला. रास्ते, पटवर्धन, पानसे या सरदारांविषयी बाजीरावाच्या मनात अढी होती. त्याने १८१२ मध्ये बापूस सरंजाम देऊन सेनापतिपद दिले. त्याचप्रमाणे खर्चासाठी प्रतिनिधींचा जप्त केलेला मुलूख दिला.

बाजीराव आणि एल्‌फिन्स्टन यांच्यात वितुष्ट आले, तेव्हा फक्त बापूनेच इंग्रजांशी युद्ध करावे, असा बाजीरावाने सल्ला दिला. इंग्रजांविरुद्ध झालेल्या खडकीच्या लढाईत (५ नोव्हेंबर १८१७) बापूचा घोडा ठार झाला, तेव्हा तो पायउतारा होऊन लढला. त्याचप्रमाणे येरवड्याच्या व गणेशखिंडीच्या लढाईत तो निकराने लढला. परंतु बाजीराव पळून गेल्यामुळे त्यास पराजय पतकरावा लागला. बाजीराव पर्वतीवरून पुरंदराकडे पळाला, तेव्हा त्याचा पाठलाग इंग्रजी फौजा करू लागल्या. बापू गोखले पाठीमागे राहिला आणि त्याने इंग्रजांना हैराण केले. पुढे घोड नदीहून इंग्रजी फौज पुण्यास येताना बाजीरावाची आणि तिची गाठ पडली. त्यावेळी बापूने इंग्रजांचा पराभव केला. पुढे १९ फेब्रुवारी १८१८ रोजी बाजीरावाचा मुक्काम अष्टीवर असताना इंग्रज पाठलाग करीत आले. एकट्या बापूने इंग्रजांवर चाल करून मोठा पराक्रम केला पण याच लढाईत तो धारातीर्थी पडला. 

बापूस दोन बायका होत्या. त्यांपैकी हयात यमुनाबाई बापूच्या मृत्यूनंतर साताऱ्यास जाऊन राहिली. तिला संतती नव्हती. पहिलीस दोन पुत्र होते. त्यांपैकी एक लहानपणीच वारला व दुसरा गोपाळ अष्टीच्या लढाईत मारला गेला. बापूने थोड्या अवधीत अनेक पराक्रम केले. त्यामुळे त्याचे नाव एक शूर सेनापती म्हणून इतिहासात प्रसिद्ध आहे. 

कुलकर्णी, गो. त्र्यं.