अमेरिकेचे यादवी युद्ध : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील दक्षिणेकडील घटक राज्ये व उत्तरेकडील घटक राज्ये यांच्यातील परस्परविरोधी हितसंबंधांतून उद्‌भवलेले १८६१–६५च्या दरम्यानचे यादवी युद्ध. ‘यादवी युद्ध’ हे नाव अन्वर्थक न वाटून काही इतिहासकारांनी याला ‘दक्षिणेचे स्वातंत्र्ययुद्ध’, ‘विभक्तीकरणाचे युद्ध’, ‘बंडखोरांचे युद्ध’ इ. निरनिराळी नावे सुचविली आहेत.

या युद्धाचा कारणाबद्दल इतिहासज्ञांत मतभेद आहेत. मात्र गुलामांच्या श्रमावर आधारलेली दक्षिणेकडील ग्रामीण जीवनपद्धती व गुलामगिरीला विरोध करणारी उत्तरेकडील नागरी व औद्योगिक जीवनपद्धती यांमधील संघर्ष हाच ह्या लढ्याच्या मुळाशी होता हे सर्वमान्य आहे.

अमेरिकेच्या स्वातंत्र्यसंग्रामात भाग घेणाऱ्‍या संयुक्त संस्थानांतील तेरा राज्यांपैकी व्हर्जिनिया, साउथ कॅरोलायना व जॉर्जिया ही राज्ये दक्षिणी गटात होती. त्यांत गुलामगिरी प्रचलित व मान्य होती. त्यांत नंतर फ्लॉरिडा, ॲलाबॅमा, मिसिसिपी व लुइझिॲना या राज्यांची भर पडली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीस गुलामगिरीला प्रतिबंध केला. तेव्हापासून गुलामगिरीचा पुरस्कार करणारी दक्षिणी राज्ये व विरोध  करणारी उत्तरेकडील राज्ये यांच्यातील तेढ वाढली. नवी राज्ये संघात घेताना या दोन गटांत नेहमी खटके होत व दर वेळी काहीतरी जुजबी तडजोड काढून संघर्ष टाळण्यात येई. १८२० मध्ये मिसूरी राज्य संघात सामील करण्यात आले. तेव्हा एकूण बावीस घटक राज्यांपैकी अकरांमध्ये गुलामगिरी अवैध ठरविण्यात आली.गुलामी-विरोधी राज्यांची संख्या वाढू लागल्यामुळे दक्षिणी राज्यांना ‘आपल्याला न्याय्य वाटणारी जीवनपद्धती सोडण्याचा प्रसंग येईल, अशी भीती प्रकर्षाने वाटू लागली. या भीतीतून संघराज्याच्या अधिकारक्षेत्रासंबंधीचा वाद विशेष वाढला व आपले कृतिस्वातंत्र्य टिकवावयाचे, तर संघराज्याचे अधिकार मर्यादित असले पाहिजेत, या तत्त्वाचा दक्षिणी राज्ये हिरिरीने पुरस्कार करू लागली.डेमॉक्रॅटिक व रिपब्‍लिकन ह्या प्रमुख राजकीय पक्षांचे राजकारणही तेव्हा ग्रामीण कृषिसंस्कृती विरुद्ध नागरी औद्योगिक संस्कृती, केंद्र सत्तेचे आकुंचन विरुद्ध तिचा विस्तार, दास्यप्रथापालन विरुद्ध दास्यविमोचन आदी तत्त्वांवरच आधारलेले होते. स्थूलमानाने डेमॉक्रॅटिक पक्ष दास्यप्रथेचा व रिपब्‍लिकन पक्ष दास्यविमोचनाचा समर्थक होता.

आपल्या आर्थिक उत्कर्षाला पोषक असणारी दास्यप्रथा टिकविण्यासाठी संघराज्यातून विभक्त होण्याची विचारसरणी १८४० पासून प्रगल्भ होऊ लागली. रिपब्‍लिकन पक्षाचा उमेदवार  ⇨ अब्राहम लिंकन  ह्याची अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष म्हणून १८६० मध्ये निवड झाली. तेव्हा प्रबल केंद्रसत्तावादी व दास्यविमोचनाचे समर्थक यांना आनंद झाला तर ‘आता संघातून बाहेर पडण्याशिवाय गत्यंतर नाही’, असे अनेक दाक्षिणात्यांना वाटू लागले. साउथ कॅरोलायना राज्याने अमेरिकेच्या संघराज्यातून विभक्त होण्याचा निर्णय डिसेंबर १८६० मध्ये घेतला. मार्च १८६१ मध्ये लिंकनने अधिकारसूत्रे धारण केली, तेव्हा अशा राज्यांची संख्या सात झाली होती.त्यांनी दक्षिणेकडील राज्यांचा ‘कॉन्‌फेडरेटेड स्टेट्स ऑफ अमेरिका’ असा संघ स्थापून डेव्हिस जेफरसन व अलेक्झांडर स्टीव्हेंझ यांची अनुक्रमे अध्यक्ष व उपाध्यक्ष म्हणून नेमणूक केली आणि नव्या सार्वभौम संघाचे उद‌्घाटन केले.

गुलामगिरी प्रचलित असलेल्या राज्यांत हस्तक्षेप करण्याची लिंकन याची इच्छा नव्हती तथापि कोणत्याही घटक राज्याला कायदेशीरपणे संघातून बाहेर पडता येणार नाही, असे त्याचे ठाम मत होते. म्हणून फुटीर राज्यांविरुद्ध शस्त्र उपसणे त्याला प्राप्त झाले. युद्ध टाळण्याचे त्याने आटोकाट प्रयत्‍न केले, मानहानी सोसून दक्षिणी संघाच्या प्रक्षोभक हालचालींकडे दुर्लक्ष केले.शेवटी दक्षिणी संघाने फोर्ट सम्टरवर १२ एप्रिल १८६१ रोजी हल्ला चढविल्याने प्रत्यक्ष युद्धाला सुरुवात झाली आणि दक्षिणी सैन्याच्या शेवटच्या टोळीने शरणागती पतकरल्याने २६ मे १८६५ रोजी ते विधिवत संपले. अमेरिकेच्या इतिहासातील अनेक रोमहर्षक प्रसंग या युद्धकळात घडले. सु. पंचवीस महत्त्वाच्या लढाया या युद्धात झाल्या. त्यांत दक्षिणी संघाचा सरसेनापती रॉबर्ट ली, उत्तरेचा सेनाप्रमुख युलिसीझ ग्रँट व जनरल शर्मन हे सेनानी विशेष चमकले. विरोधकांचा केवळ लष्करी पराभव करण्याचे उद्दिष्ट न ठेवता, दक्षिणी राज्यांनी संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करण्याचे तंत्र या युद्धात प्रथमच वापरले. रेल्वे, तारायंत्रे, छायाचित्रकला यांबरोबरच विविध नवी शस्त्रास्त्रे व पोलादी जहाजे यांचा या युद्धात प्रथमच सर्रास वापर झाला.त्यामुळे अमेरिकेतील यादवी युद्धाने आधुनिक युद्धतंत्राचा श्रीगणेशा केला, असे मानले जाते.

उभय पक्षांकडील सु. दहा लक्ष शिपाई व नागरिक या युद्धात मारले गेले किंवा जखमी झाले. युद्ध चालविण्याचा प्रत्यक्ष खर्च, नंतरच्या काळातील शिपायांचे निवृत्तिवेतन, राष्ट्रीय कर्जावरील व्याज, विविध प्रकारची वित्तहानी वगुलामांच्या मुक्ततेसाठी मालकांना दिलेली नुकसानभरपाई यांचा विचार करता, आजच्या हिशेबाने या युद्धाचा खर्च सु. बाराशे कोटी रुपये झाला असावा.दक्षिणी राज्यांतील बहुसंख्य घरेदारे, शेते, लोहमार्ग, पूल, रस्ते, काखानेइ. या युद्धात उद्ध्वस्त झाले.पुढे दक्षिणी राज्यांच्या पुनर्वसन काळात स्वतःची तुंबडी भरून घेणारा कारपेटबेगर्स नावाचा वर्ग, स्वार्थासाठी त्यांच्याशी सहकार्य करणारा स्कॅलाबॅग्ज् हा दक्षिणी गट आणि दक्षिणेत गोऱ्‍यांचे महत्त्व टिकविण्यासाठी यत्‍न करणारी गुप्त संघटना  ⇨कू क्‍लक्स क्‍लॅन  यांनी दक्षिणेतील नागरिकांचे अनेक वर्षे फार हाल केले. युद्धामुळे प्रज्वलित झालेली उत्तर-दक्षिणेकडील नागरिकांतील द्वेषबुद्धी व सुडाचीभावना अद्याप पूर्णतः नष्ट झालेली नसून त्यांतून अमेरिकेच्या जीवनातील अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत तरीसुद्धा युद्धामुळे गुलामगिरी कायद्याने नष्ट झाली आणि केंद्राचा प्रभाव जबरदस्त वाढला.

दक्षिणेची साधनसामग्री उत्तरेच्या मानाने अगदीच अपुरी होती व इंग्‍लंडादी यूरोपीयदेशांचे साहाय्य मिळेल ही दाक्षिणात्यांची आशाही फोल ठरल्याने दक्षिणेचा पराभव झाला. साधनसंपन्नता व लिंकनचे खंबीर नेतृत्व ही उत्तरेच्या अंतिम विजयाची कारणे स्पष्टच दिसतात.

या युद्धात ट्रेंट, ॲलाबॅमा इ. प्रकरणे उद्भवली. त्यांपैकी काहींचा लिंकनने व्यक्तिगत मानहानी पतकरून समझोता केला, तर उरलेली १८७१ च्यावॉशिंग्टन-तहाने निकालात काढण्यात आली.

पहा : अमेरिकेची संयुक्त संस्थाने (इतिहास).

संदर्भ : 1. Pressly, T. J. Americans Interpret Their Civil War, New York, 1954.

           2. Wilson, Edmund, Patriotic Gore, New York, 1962.

           ३. करंदीकर, शि. ल. अमेरिकेचे स्वराज्य व सुराज्य, पुणे, १९६६.

ओक, द. ह.