चन्नमा राणी : (? –सु १६९७) इक्केरी-बिदनूर येथील केळदी नायक राजघराण्यातील एक शूर राणी. ती चन्नम्माजी या नावाने कर्नाटकात प्रसिद्ध होती. तिच्या पतीचे नाव सोमशेखर नायक. पतीच्या हयातीत व मृत्युनंतर (१६७७) तिने अत्यंत हुशारीने राज्य कारभार चालविला. तिच्या संबंधीची माहिती केळदि-नृप-विजय  या कन्नड ग्रंथात तसेच शिवतत्त्व-रत्नाकर  या संस्कृत ग्रंथात मिळते. याशिवाय काही कोरीव लेखांतूनही माहिती ज्ञात होते. रायगडहून निर्वासित झालेल्या राजारामाला आश्रय देऊन त्याला जिंजीस सुरक्षित पोहोचविण्यात मोलाचे साहाय्य तिने केले. त्याप्रसंगी तिच्या राज्यात घुसलेल्या मोगल सैन्याला तिने परतवून लावले. त्यामुळे तिचा वीर स्त्री म्हणून लौकिक झाला. दळवाय तिम्मप्पाच्या म्हैसूर लष्कराचाही पराभव करून त्याच्या मुलाला कैद करून तिने आपल्या लष्करी सामर्थ्यांची प्रचीती दिली.

आपल्या पतीच्या स्मरणार्थ तिने तुंगभद्रेच्या काठी सोमशेखरपुर हे नगर वसविले. ती धार्मिक व उदार वृत्तीची होती. तिने वाराणसी, रामेश्वरम, तिरुपती व श्रीशैलम्‌ येथे कायमच्या धर्मादाय संस्था स्थापन केल्या व लिंगायतांसाठी निरनिराळ्या ठिकाणी मठ बांधले. ती सहिष्णू होती . अद्वैत व द्वैत पंथांनाही तिने उदार आश्रय दिला. कार्यक्षम प्रशासनव्यवस्था, शुद्ध चारित्र्य, उदार धोरण आणि शौर्य यांबाबतीत तत्कालीन काळात तिची ख्याती होती.

खोडवे, अच्युत