जावरा संस्थान : ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्वीच्या माळवा एजन्सीमधील एक संस्थान. सध्या हा प्रवेश मध्य प्रदेशातील रतलाम जिल्ह्यात समाविष्ट झाला आहे. क्षेत्रफळ १,४६५ चौ. किमी. लोकसंख्या १,१६,९५३ (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. साडे आठ लाख रुपये. इंदूर, ग्वाल्हेर, रतलाम, प्रतापगढ, पिपलोदा या संस्थानांनी सीमित असलेल्या या संस्थानचा प्रदेश सलग नव्हता. यात जावरा व ताल ही शहरे, ३३७ खेडी व सात तहसील होते. संस्थापक अब्दुल गफूर खानचे पूर्वज स्वातहून प्रथम दिल्लीला गुलाम खानच्या पदरी नोकरीस राहिले व पुढे अठराव्या शतकाच्या अखेरीस रोहिलखंडात स्थायिक झाले. टोंकचा संस्थापक अमीरखान याला दिलेल्या मदतीमुळे अब्दुल गफूर खान त्याचा साडू झाला. अमीरखानने त्याला होळकरांकडे नोकरीस नेमले. मेहिदपूरच्या लढाईनंतर (२१ डिसेंबर १८१७) होळकरांना इंग्रजीबरोबर मंदसोरचा तह करणे भाग पडले (१९१७). त्या तहातील बाराव्या कलमानुसार नबाब गफूर खानला संजीत, मल्हारगढ, ‘ताल’ जाबरा आणि बारौदा हे तहसील (प्रदेश) व पिपलोदाकडून खंडणी मान्य झाली. हीच जावरा संस्थानची स्थापना. या वेळी नबाबाने ५०० घोडे, ५०० सैनिक व चार तोफा यांची मदत ब्रिटिशांना द्यावी, असे ठरले. पुढे याबद्दल संस्थानने रोख रक्कम द्यावी, असे ठरले. १८२१ मध्ये मल्हारगढचे ठाकूर आणि नबाब यांमध्ये काही करार झाले आणि मल्हारगढ ही मांडलिक जहागीर मानण्यात येऊ लागली. तथापि १८९० पर्यंत त्यांचा संस्थानला सतत त्रास होई. होळकरांना गादीवर येणाऱ्या प्रत्येक नव्या नबाबाकडून दोन लाख रु. नजराणा मिळे, मात्र मांडलिकी इंग्रजांची होती.

गफूरखान १८२५ मध्ये मृत्यू पावला. त्याचा लहान मुलगा घौस मुहम्मद खान (१८२५–६५) गादीवर आला. तो लहान असल्यामुळे विधवा बेगम कारभार पाही. पण तिच्या गैरकारभारामुळे इंग्रजांनी तिला बडतर्फ केले. बहुतेक सर्व कारभार इंग्रजांच्या पोलिटिकल एजंटकडे असे. घौस मुहम्मदाचे दादोबा पांडुरंग तर्खडकर हे काही दिवस शिक्षक होते. १८४२ मध्ये घौस मुहम्मदाने संस्थानची सूत्रे हाती घेतली. या सुमारास ब्रिटिशांना सैन्याच्या मोबदल्यात त्याने १·६ लाख रु. देण्याचे कबूल केले. १८५७ च्या उठावात इंग्रजांना केलेल्या मदतीबद्दल संस्थानची खंडणी १·४ लाख. रु. करण्यात आली. याशिवाय नबाबगंज, बडखेडा हे आणखी काही तहसील संस्थानला मिळाले. घौस मुहम्मदनंतर मुहम्मद इस्माइल खान (१८६५–९५) हा अकरा वर्षांचा मुलगा गादीवर आला. त्याच्या कारकीर्दीत संस्थानला अतोनात कर्ज झाले. इस्माइलनंतर त्याचा मुलगा इफ्तिखार अली खान १८९५ मध्ये गादीवर आला. इफ्तिखार अली खानने इंग्रजांना पहिल्या महायुद्धात हरेक प्रकारे मदत केली. त्याला ब्रिटिशांनी फख्र उद्दौला नबाब सौलत जंग हा किताब व १३ तोफांची सलामी जाहीर केली. विसाव्या शतकात संस्थानात अफूचा व्यापार बऱ्यापैकी होता. शिवाय कापडगिरण्या, साखर कारखाना, स्वस्त धान्ये दुकाने, शिक्षण, रेल्वे, पक्क्या सडका अशा अनेक सुधारणा झाल्या. उर्दूला राजाश्रय मिळाला. खुद्द जावरा शहर सोडले, तर हिंदूच बहुसंख्य होते. १९२० मध्ये मंडईकराविरुद्धचे आंदोलन यशस्वी झाले. १९४३ मध्ये धान्याच्या दंग्यानिमित्त नबाबास पदच्युत केले व प्रजामंडळाचा जोर वाढला. १९४८ मध्ये संस्थान मध्य भारत संघात प्रथम विलीन करण्यात आले आणि १ नोव्हेंबर १९५६ रोजी ते मध्य प्रदेशात समाविष्ट केले.

कुलकर्णी, ना. ह.