बिकानेर संस्थान : ब्रिटिश भारतातील राजस्थान राज्यातील एक संस्थान. क्षेत्रफळ सु. ५९,६९१.५२ चौ. किमी. लोकसंख्या सु. तेरा लाख (१९४१). वार्षिक उत्पन्न सु. दीड कोटी रुपये. उत्तरपश्चिमेस बहावलपूर दक्षिणेस जोधपूर, जयपूर ही संस्थाने पूर्वेस लोहारू संस्थान व हिस्सार-फिरोझपूर जिल्हे यांनी सीमित. बिकानेर, रेणी, सूजानगढ, सूरतगढ अशा चार निजामती असून त्या ११ तहसिलांत विभागल्या गेल्या होत्या. बिकानेर, चुरू, रतनगढ, सरदारशहर ही चार शहरे असून उरलेली २,१०६ खेडी होती. १४६५ मध्ये मारवाडच्या राठोडांपैकी राव जोधाचा सहावा मुलगा राव बीका (१४३९-१५०४) याने भाटी राजपूत व गोदार जाटांवर वर्चस्व मिळवून किल्ला बांधला आणि बिकानेर शहर व संस्थान वसविले (१४८८). कल्याणसिंगने जोधपूर राजांनी बळकाविलेला भाग परत मिळविला. रायसिंगने (१५७१-१६११) जहांगीरला आपली मुलगी दिली (१५८६) आणि अकबरासाठी पुढे युद्धे करून राज्यविस्तार केला. त्यानेच बिकानेरच्या किल्ल्याचा प्रमुख भाग बांधला आणि कलेला आश्रय दिला. करणसिंग (१६३१-६९) व अनूपसिंग (१६६९-९८) यांनीही मोगलांची सेवा केली. अनूपसिंगाने चित्रकलेला उत्तेजन दिले आणि ग्रंथालय स्थापले. त्यासाठी दक्षिणेतून अनेक ग्रंथ, मूर्ती, चित्रे इ. मिळविली. गजसिंग (१७४५-८७) व सूरतसिंग (१७८८-१८२८) यांच्या कारकीर्दीत जोधपूरशी अनेक युद्धे झाली. सूरतसिंग याने ब्रिटिशांची मांडलिकी पतकरून (१८२८) ठाकूरांचे बंड मोडले पण एकोणिसाव्या शतकातही त्यांच्याशी संघर्ष चालूच राहिला. त्यासाठी इंग्रजांना दोनदा हस्तक्षेप करावा लागला (१८६८ आणि १८८३). सुव्यवस्थेसाठी इंग्रजांनी संस्थानकडून रु. २२,००० खर्च घेऊन शेखावती ब्रिगेड उभारली. बिकानेरची जेसलमीरवरील स्वारी त्यांनी व उदयपूरच्या राजांनी मध्यस्थी करून थांबविली (१८२८). १८४२ मधील अफगाण युद्धात व १८५७ च्या उठावात संस्थानने दिलेल्या मदतीबद्दल बिकानेरला ४१ खेडी (सिर्सा जिल्ह्यातील, टिबी परगणा) मिळाली (१८६१). सरदारसिंग (१८५१-७२) याने एकूण १८ दिवाण बदलले पण १८८७ मध्ये गादीवर आलेल्या गंगसिंगाने प्रजाहितदक्ष संस्थानिक म्हणून नावलौकिक मिळविला. त्याच्या प्रदीर्घ कारकीर्दीत (१८८७-१९४२) रेल्वे (१,३६४ किमी.), कालवे, आरोग्य (५२ रुग्णालये), शेती, सहकारी पतपेढ्या अशा अनेक क्षेत्रांत सुधारणा झाल्या. शहरातून प्राथमिक शिक्षण सक्तीचे झाले (१९२८) पण साक्षरता ७% होती, १९१३ पासून मर्यादित अधिकारांचे विधिमंडळ अस्तित्वात आले. जास्त हक्कांसाठी १९३९ मध्ये प्रजामंडलही स्थापन झाले पण सर गंगसिंगांनी चळवळ दडपली. ते स्वतः नरेंद्रमंडळात प्रमुख असत. १९४७ मध्ये बिकानेरला घटनासमितीचे सदस्यत्वही मिळाले. संस्थानचे स्वतःचे सैन्य असून ते पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांच्या उपयोगी पडले. १९४९ मध्ये संस्थान राजस्थान संघात विलीन झाले.

कुलकर्णी, ना. ह.