चुंद्रगुप्त, दुसरा : (सु. ३७६—४१४). गुप्तवंशातील प्रसिद्ध कलाभिज्ञ राजा. समुद्रगुप्तानंतर दुसरा चंद्रगुप्त सु. ३७६ किंवा ३८६ मध्ये गुप्त साम्राज्याच्या गादीवर आला. तो दत्तदेवी या समुद्रगुप्ताच्या पट्टराणीचा मुलगा. समुद्रगुप्त सु. ३७६ मध्ये कालवश झाल्यावर तो गादीवर आला. समुद्रगुप्तानंतर गादीवर नक्की कोण आला, याबद्दल विद्वानांत मतभेद आहेत. एक मत असे, की त्याचा पुत्र चंद्रगुप्त विक्रमादित्य गादीवर बसला, तर दुसऱ्या मताप्रमाणे त्याचा ज्येष्ठ पुत्र रामगुप्त याला गादी मिळाली. ह्या मताप्रमाणे रामगुप्ताचा तपशील असा : गादीवर आल्यावर थोड्याच काळात समुद्रगुप्ताचा कनिष्ठ भ्राता चंद्रगुप्त याने त्याला ठार करून त्याची गादी मिळविली व त्याच्या पत्नीशी विवाह केला. पश्चात्कालीन वाङ्‌मयीन आणि उत्कीर्ण लेखांतील उल्लेखांवरून असे दिसते, की शक राजाच्या आक्रमणापासून मुक्त होण्याकरिता रामगुप्ताने आपली पत्नी शत्रूकडे पाठविण्याची अपमानास्पद अट मान्य केली तेव्हा त्याचा धाकटा भाऊ चंद्रगुप्त याने स्त्रीवेष घेऊन शक राजाला ठार मारले व त्याच्या सेनेचा धुव्वा उडविला.

वरील रामगुप्ताच्या कथेतील काही घटना अशा आहेत, की अन्य स्वतंत्र निःसंदिग्ध पुराव्याशिवाय त्यांवर विश्वास ठेवणे कठीण आहे. गुप्तांच्या अनेक लेखांतील वंशावळीत किंवा इतरत्रदेखील रामगुप्ताचा उल्लेख नाही. रामगुप्त नाव असलेली काही तांब्याची नाणी अलीकडे विदिशेजवळ सापडली आहेत, पण ती गुप्तांच्या नाण्यांहून भिन्न आहेत. तेव्हा हा रामगुप्त माळव्यातील स्थानिक राजा असावा.

अनेक विद्वान गुप्तवंशीय रामगुप्ताच्या अस्तित्वाबद्दल साशंक आहेत पण याबरोबरच रामगुप्तविषयक कथेचा विस्तृत प्रसार आणि स्वीकार यांचा विचार करता ती केवळ काल्पनिक कथा आहे, असे म्हणणेही कठीण आहे. सध्याच्या परिस्थितीत अन्य सबळ, निश्चित प्रमाणभूत पुरावा उपलब्ध होईपर्यंत रामगुप्ताच्या ऐतिहासिकत्वावर व त्याच्या अद्‌भुत, विलक्षण आणि महत्त्वपूर्ण राजवटीबद्दलचा आपला निर्णय स्थगित ठेवणेच युक्त ठरेल.

चंद्रगुप्ताच्या दोन राण्यांची नावे ध्रुवदेवी किंवा ध्रुवस्वामिनी आणि कुबेरनागा. ध्रुवदेवीपासून त्याला कुमारगुप्त व गोविंदगुप्त हे पुत्र झाले व कुबेरनागेपासून प्रभावतीगुप्ता ही मुलगी झाली. गादीवर आल्यावर चंद्रगुप्ताने प्रथम सिंधू नदी पार करून बॅक्ट्रियापर्यंत चाल केली आणि कुशाण राजांचा उच्छेद केला. नंतर त्याने बंगाल जिंकला आणि त्यानंतर माळवा व काठेवाड येथे राज्य करणाऱ्या क्षत्रपांवर स्वारी केली. ते फार प्रबळ झाले होते, म्हणून त्याने या प्रसंगी विदर्भाचा वाकाटक नृपती पृथिवीषेण याचे साहाय्य घेतले असावे. क्षत्रपांचा पुरा नायनाट केल्यावर चंद्रगुप्ताने वाकाटकांशी आलेला राजकीय संबंध दृढ करण्याकरिता आपली मुलगी प्रभावतीगुप्ता पृथिवीषेणाच्या रुद्रसेन नामक मुलास ३९५ मध्ये दिली.

क्षत्रपांचे माळवा व काठेवाड हे प्रांत चंद्रगुप्ताने आपल्या राज्यास जोडले आणि उज्जयिनी येथे आपली राजधानी नेली. पुढे विक्रमादित्य ही पदवी धारण केली. एवढेच नव्हे, तर परम भागवत ही उपाधी घेतली. यावरून ते वैष्णवधर्माचा पुरस्कर्ता असावा असे वाटते. विक्रमादित्याचे नाव उज्जयिनीशी संलग्न झाले आहे. यानंतर थोड्या वर्षांनी चंद्रगुप्ताचा जामात दुसरा रुद्रसेन निधन पावला. त्या वेळी त्याचे दिवाकरसेन आणि दामोदरसेन ऊर्फ दुसरा प्रवरसेन हे मुलगे अल्पवयी होते. म्हणून चंद्रगुप्ताने आपल्या धोरणी व कर्तबगार अधिकाऱ्यांस विदर्भात पाठवून आपली मुलगी प्रभावतीगुप्ता हिला राज्यकारभार चालविण्यास मदत केली. त्यांमध्ये कविकुलगुरू कालिदास हाही होता. प्रवरसेन वयात आल्यावर कालिदास पुन्हा विदर्भात आला असावा. त्या वेळी त्याने प्रवरसेनास सेतुबंध  या प्राकृत काव्याच्या रचनेत मदत केली असावी.

दक्षिणेतील सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागांत त्या काळी पूर्वकालीन राष्ट्रकूटांचे राज्य होते. हा प्रदेश कुंतल देशात मोडत असल्याने राष्ट्रकूटांस कुंतलेश म्हणत. कालिदास चंद्रगुप्त विक्रमादित्याचा दूत म्हणून या कुंतलेशाच्या दरबारीही गेला होता, असे त्याच्या कुंतलेश्वर दौत्य नामक ग्रंथात उद्‌धृत केलेल्या काही उताऱ्यांवरून दिसते. त्या प्रदेशाचाही कारभार चंद्रगुप्ताच्या तंत्राने चालला होता.

याप्रमाणे चंद्रगुप्ताचे राज्य सर्व उत्तर भारतावर पसरले होते आणि दक्षिणेतील विदर्भ व कुंतल देशांचा कारभार त्याच्या तंत्राने चालला होता. त्याच्या साम्राज्यात हिंदू धर्माची भरभराट झाली. त्या काळापासून हिंदू देवतांस व ब्राह्मणांस दिलेल्या दानांचे उल्लेख कोरीव लेखांत दृष्टीस पडतात. मथुरेच्या शिलालेखात एका शैव आचार्याने शिवलिंगाची प्रतिष्ठा केल्याचा उल्लेख आहे. चंद्रगुप्ताच्या एका मांडलिकाने विदिशेजवळ उदयगिरी गुहांत विष्णू व चंडिका यांच्या मूर्ती कोरविलेल्या अद्यापि विद्यमान आहेत. तेथेच विष्णूच्या वराहावताराचे भव्य शिल्प दृष्टीस पडते. तेथील दुसऱ्या एका शिलालेखात चंद्रगुप्ताच्या वीरसेननामक मंत्र्याने शिवाच्या पूजेकरिता एक गुहा कोरल्याचा निर्देश आहे. चंद्रगुप्ताच्या काळी बौद्ध धर्मही ऊर्जितावस्थेत होता. त्याच्या आम्रकार्दवनामक मंत्र्याने सांचीच्या पंच मंडलीला (पंचायतीला) एक गाव व पंचवीस दीनार देऊन त्यांच्या व्याजातून आपल्या आणि चंद्रगुप्ताच्या नावे पाच पाच भिक्षूंच्या भोजनाची आणि रत्नगृहात एक एक दिवा सदैव तेवत ठेवण्याची व्यवस्था केली होती.

चंद्रगुप्ताच्या राज्यात सर्वत्र शांतता, सुव्यवस्था व सुराज्य होते. सर्व धर्मांच्या अनुयायांना आपल्या धर्माप्रमाणे वागण्यास स्वातंत्र्य होते. चंद्रगुप्त हा स्वतः मोठा विद्वान, रसिक व संस्कृत विद्येचा अभिमानी होता. त्याने कालिदासादी काही कवींप्रमाणे उज्जयिनीच्या विद्वत्‌सभेपुढे परीक्षा दिली होती. त्याने आपल्या अंतःपुरातही संस्कृती भाषाच उपयोगात आणली पाहिजे, असा नियम केला होता, असे राजशेखर सांगतो. अनेक सुभाषितसंग्रहात विक्रमादित्याच्या नावावर श्लोक दिले आहेत, ते त्याने रचले असावेत. तो विद्वान लोकांना मोठमोठ्या अधिकाराच्या जागांवर नेमी, असे कोरीव लेखांतील निर्देशांवरून दिसते. त्याच्या काळात स्थापत्य, शिल्प व चित्रकला ऊर्जितावस्थेस आल्या, हे तत्कालीन अवशेषांवरून स्पष्ट आहे. चंद्रगुप्ताने आठ विविध प्रकारची सुंदर सोन्याची नाणी पाडली होती. त्यांवरून त्याच्या राज्यातील सुबत्तेची कल्पना येते. समुद्रगुप्ताच्या नाण्यांप्रमाणे या नाण्यांवर विविध वृत्तांतील श्लोकार्ध आहेत.

चंद्रगुप्ताच्या क्षत्रपांवरील विजयाने पश्चिम किनाऱ्यावरील बंदरे खुली होऊन परदेशाशी व्यापार वाढला.

भारतीय दंतकथांत विक्रमादित्य मोठा शूर, न्यायी आणि उदार राजा होता असे वर्णिले आहे, ते गुप्तवंशी दुसऱ्या चंद्रगुप्ताच्या राजवटीस अनुलक्षून असावे. कालांतराने त्याचा प्राचीन मालव संवताशी संबंधी जोडला जाऊन तो संवत् विक्रमादित्याने स्थापला, अशी समजूत प्रचलित झाली, असे दिसते. तत्कालीन चिनी प्रवासी फाहियान याने वर्णन केलेल्या एकूण वृत्तांतावरून त्या वेळी समृद्धी व राजकीय स्थैर्य होते, हे निश्चित. 

पहा : गुप्तकाल.

संदर्भ : 1. Majumdar, R. C. Altekar, A. S. Ed. The Vakataka- Gupta Age, Delhi, 1967.

            2. Majumdar, R. C. Ed. Classical Age, Bombay, 1970.   

             

मिराशी, वा. वि.