ब्रूटस – ॲल्बायनस, डेसिमस जूनिअस : (इ. स. पू. ८४ – ४३). रोमन सेनानी आणि ⇨ज्यूलिअस सीझरच्या खून-कटातील एक सूत्रधार. त्याचे मूळ नाव ब्रूटस परंतु तो ऑलस पॉस्ट्यूमिअस ॲल्बायनस याला दत्तक गेल्यामुळे त्याचे नाव ब्रूटस ॲल्बायनस झाले. ब्रूटस हे रोममधील एका महत्त्वाच्या कुळाचे नाव आहे.‘ब्रूटस’ शब्दाचा अर्थ मूर्ख असा असून या कुळातील अनेक व्यक्ती इतिहासप्रसिद्ध आहेत.

ब्रूटस-ॲल्बायनस सीझरचा एक अत्यंत विश्वासू सहकारी सेवक होता. गॉल येथे काही दिवस त्याने सीझरच्या हाताखाली काम केले होते. त्यानंतर सीझरने आपल्या नौदलाचे नेतृत्व त्याच्याकडे सोपविले. सीझर आणि पॉम्पी (इ. स. पू. १०६ – ४८) या दोघांतील यादवी युद्धात (इ.स.पू. ४९) मार्से येथे ब्रूटसने विशेष पराक्रम दाखविल्यामुळे सीझरने ट्रान्स-अल्पाइन-गॉलचा राज्यपाल म्हणून त्याची नियुक्ती केली (इ.स.पू. ४८). सीझरने ऑक्टेव्हियन (ऑगस्टस) याला भावी वारस निवडले होते तो अकाली निधन पावल्यास ब्रूटस यास दुसरा वारस नेमले होते. सीझरच्या मृत्यूनंतर (इ. स. पू. ४४) त्याने प्रजासत्ताकाच्या सैन्याचे अँटोनीविरुद्ध नेतृत्व स्वीकारले आणि रोम सोडले व सिसॅल्पाइन गॉलच्या स्वारीवर तो गेला. सीझरच्या हत्येनंतर सिनेटने ट्रान्स-अल्पाइन-गॉल प्रांत अँटोनीकडे सोपविला. त्यामुळे त्याच्याशी ब्रूटसचा झगडा सुरू झाला. अँटोनीने त्याला म्युतीना (विद्यमान मॉडेना) येथे वेढा घालून अडविले. पुढे ब्रूटसच्या सैनिकांनी त्याचा विश्वासघात करून त्यास सहकार्य देण्याचे नाकारले तेव्हा तो सीझरच्या खून-कटातील आपल्या इतर सहकाऱ्यांकडे मदतीसाठी मॅसेडोनियात गेला. तेथे त्याला गॉलिक टोळीच्या प्रमुखाने पकडले व अँटोनीच्या हुकूमानुसार ठार मारले.

शेख,रुक्साना