नाग वंश : भारतातील एक प्राचीन वंश. भारतात नाग राजे फार प्राचीन काळापासून राज्य करीत असावेत पण त्यांचे फार थोडे उल्लेख आढळतात. पुराणांत नाग राजांनी विदिशा, मथुरा, कांतिपुरी आणि पद्मावती येथे राज्य केल्याचा उल्लेख आहे. तसेच विदिशेच्या सदाचंद्र, चंद्रांशू, नखवान, धनधर्मा, भूतिनंद इ. नाग राजांचा नामनिर्देश आहे पण याशिवाय इतर काही माहिती मिळत नाही. याच्या उलट मथुरेत सात आणि पद्मावतीत नऊ नाग राजे होऊन गेले असे म्हटले आहे पण त्यांची नावे दिलेली नाहीत. कांतिपुरी कोठे होती हेही निश्चित माहीत नाही. मो. ब. गर्दे यांच्या मते पद्मावती ही नरवर जिल्ह्यातील पद्‌म पवायापासून ईशान्येस असलेले कोतवाल किंवा कुतवार असावी.

पद्मावतीला मात्र भवनाग, भीमनाग, बृहस्पतिनाग, देवनाग, गणपतिनाग, प्रभाकरनाग, स्कंदनाग अशा अनेक नागराजांची नाणी सापडली आहेत. तेथे शिवनंदी राजाचा (सु. इ. स. तिसरे शतक) लेख सापडला आहे, तोही नाग वंशी असावा. पद्मावतीचे हे राजे भारशिव कुलातील होते. ते आपल्या खांद्यावर शिवलिंग धारण करीत आणि भगवान शंकराच्या प्रसादाने आपला राजवंश उत्पन्न झाला असे मानीत. त्यांनी दहा अश्वमेध यज्ञ केले होते आणि आपल्या पराक्रमाने भागीरथीचे जल मिळवून त्यांनी आपणास राज्याभिषेक करून घेतला होता. भवनागाने आपली कन्या विदर्भाचा वाकाटक राजपुत्र गौतमीपुत्र यास देऊन उत्तर-दक्षिण भारतीय फळी निर्माण केली होती पण समुद्रगुप्ताने नागांचा पराजय करून पद्मावतीचे राज्य गुप्त साम्राज्यात अंतर्भूत केले. त्याने गणपतिनाग, नागसेन, अच्युत आणि नंदी यांचा उच्छेद केला असे त्याच्या प्रयागप्रशस्तीत म्हटले आहे. हे सर्व नागराजे असावेत. गणपतिनागाची नाणी पद्मावती आणि मथुरा येथे सापडली आहेत.

समुद्रगुप्ताने काही नागकुलांशी शरीरसंबंध केला होता. त्याचा पुत्र दुसरा चंद्रगुप्त याची कुबेरनागा ही राणी नाग वंशातील होती. तिची मुलगी प्रभावतीगुप्ता वाकाटक घराण्यात दिली होती. तथापि नाग राजांचे उल्लेख नंतर उत्तर भारतीय लेखांत आढळत नाहीत.

दक्षिण भारतातही नागराज्ये होती. सातवाहनवंशी सिमुक (श्रीमुख) याची राणी ⇨ नागनिका ही नागकन्या होती.

मध्य प्रदेशाच्या छत्तीसगढातील बस्तर येथे आणि रायपूर जिल्ह्यात नागराज्ये चौदाव्या शतकापर्यंत टिकून होती. पद्मगुप्ताच्या नवसाहसांकचरितात धारचा परमारनृपती याने एका नागकन्येशी विवाह केल्याचे वर्णन आहे. ती नागकन्या बस्तर जिल्ह्यात चक्रकोट येथे राज्य करणाऱ्या नाग वंशातील होती, हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.

दक्षिणेत इतरत्रही नागराज्ये होती. कदंबांचे व नंतर बादामीच्या चालुक्यांचे मांडलिक असलेले सेंद्रक राजे भुजगेंद्रान्वयाचे म्हणजे नाग वंशाचे होते. त्यांतील काहींनी आपणास सिंहवंशोद्‌भव असे म्हटले आहे. सिंहवंशी आदित्यवर्मा शक संवत्‌  ८८७ (इ. स. ९६५-६६) मध्ये खानदेशात राज्य करीत होता. तो राष्ट्रकूट सम्राट तृतीय कृष्णाचा मांडलिक असावा.

काश्मीरातील कर्कोट वंशही नागांपैकी होता. कल्हणाने त्याला कार्कोटाही वंश (कर्कोट नागापासून उत्पन्न झालेला नाग वंश) म्हटले आहे. याचा मूळपुरुष दुर्लभवर्धन हा ६५०च्या सुमारास गादीवर आला. त्याने पूर्वीचा गोनंदवंशी राजा बालादित्य याच्या कन्येशी विवाह केला होता. याच्या काळी चिनी यात्रेकरू ह्युएनत्संग काश्मीरात आला होता. त्याने म्हटले आहे की, दुर्लभवर्धनाचे राज्य वायव्येस पंजाबपर्यंत पसरले होते. त्याचा ज्येष्ठ पुत्र चंद्रापीड याला चिनी सम्राटाने ७२०मध्ये राजा म्हणून मान्यता देऊन त्याच्याशी सख्य केले होते. हा न्यायीपणाबद्दल प्रसिद्ध होता. याने सुरू केलेल्या एका देवळाच्या बांधकामात एका चांभाराची वडिलोपार्जित झोपडी जात होती. त्याबद्दल त्या चांभाराने तक्रार करताच दुर्लभवर्धनाने आपल्या अधिकाऱ्यांना बांधकाम ताबडतोब थांबवण्याचा आदेश दिला आणि पुढे त्या चांभाराच्या झोपडीत जाऊन त्याला उदार हस्ताने त्याच्या झोपडीची व जमिनीची किंमत देऊन त्याची संमती मिळविली आणि मगच देवळाचे बांधकाम सुरू केले. हा पुढे त्याच्या तारापीडनामक पुत्राकडून अभिचाराने मारला गेला.

तारापीडाची कारकीर्द चारच वर्षे टिकली. नंतर ललितादित्यमुक्तापीड हा ७२४मध्ये गादीवर आला. हा काश्मीरचा सर्वश्रेष्ठ राजा होय. याने अनेक विजय मिळविले. याने उत्तरेत तिबेटच्या राजाचा तसेच दरद, कंबोज आणि तुर्की अधिपतींचा पराभव केला. तसेच दक्षिणेत कान्यकुब्जनृपती यशोवर्मा याचा पराजय करून त्यालाही आपली स्तुतिस्तोत्रे गाण्यास भाग पाडले. पुढे याने गौड, कामरूप, कलिंग, कर्णाट, कावेरी, कोकण, सौराष्ट्र, उत्तर कुरू, जलंदर इ. देश जिंकून आपला दिग्विजय पुरा केला पण या दिग्विजयाचे उल्लेख राजतरंगिणी शिवाय इतरत्र आढळत नाहीत.

ललितादित्याने काश्मीरात व इतरत्र शिव, विष्णु, आदित्य इत्यादिकांची अनेक देवालये तसेच बौद्ध स्तूप व विहार बांधले. ललितपूर हे नगर त्याच्या नावे वसविलेले दिसते. तेथील आदित्याला त्याने सबंध कान्यकुब्ज प्रांत दान दिला. काश्मीरातील सुप्रसिद्ध मार्तंड देवालय यानेच बांधले. त्याचे भव्य अवशेष अद्यापि श्रीनगरपासून काही अंतरावर मत्तन गावाजवळ दिसतात. त्याची राणी व अमात्य यांनीही अनेक देवालये बांधली. तसेच ललितादित्याने अनेक अन्नसत्रे आणि पाणपोयाही स्थापिल्या.

कल्हणाने याची काही अविचारी कृत्येही वर्णिली आहेत. याने एकदा परिहासपुरातील विष्णूची शपथ घेऊन गौड राजाला आपल्या राज्यात बोलाविले आणि त्याचा विश्वासघाताने वध केला, तेव्हा गौड राजाचे काही सेवक शारदा देवीच्या दर्शनाच्या मिषाने काश्मीरात आले. ललितादित्य इतरत्र गेल्यामुळे त्यांच्या तावडीत सापडला नाही पण त्यांनी परिहासस्वामी समजून एका रामस्वामी नामक विष्णुमूर्तीचे तुकडे केले. इतक्यात राजसैनिकांनी येऊन त्यांची खांडोळी केली, असे कल्हणाने वर्णिले आहे.

ललितादित्य पुन्हा उत्तरेच्या विजयार्थ गेला पण तो परत आला नाही. त्याने इ. स. ७२४–४०पर्यंत राज्य केले. त्याच्यानंतर काही दुर्बल राजे गादीवर आले. त्यांना राज्यात शांतता व सुव्यवस्था राखता आली नाही. ललितादित्यापासून पाचव्या पिढीतील जयापीड याने काही विजय मिळविले. त्यानंतर काश्मीरात दुर्नीती आणि अराजक पसरले. जयापीडाचा पुत्र ललितापीड याच्यानंतर त्याला एका वेश्येपासून झालेला बृहस्पतिनामक पुत्र गादीवर आला. त्या वेश्येच्या भावांनी सत्ता बळकावून संपत्तीची उधळपट्टी केली. या प्रदेशात सर्वत्र युद्धे उत्पन्न होऊन अराजक माजले. शेवटी उत्पलवंशी अवन्तिवर्मन्‌ या राजाला ८५५ च्या सुमारास सूरनामक अमात्याने गादीवर बसविले.

मिराशी, वा. वि.