गॅरिबॉल्डी, जूझेप्पे: (४ जुलै १८०७–२ जून १८८२). इटालियन देशभक्त, इटलीच्या एकीकरणाचा एक प्रमुख पुरस्कर्ता आणि स्वातंत्र्ययुद्धाचा सेनानी. नीस (सार्डिनिया) येथे सुखवस्तू कुटुंबात जन्म. त्याचे वडील व आजोबा नाविक दलात कॅप्टनच्या हुद्यावर होते. त्याने पहिली काही वर्षे व्यापारी जहाजावरील खलाशी म्हणून घालविली व १८३३ मध्ये सार्डिनियाच्या नाविक दलात प्रवेश केला. त्या वेळी त्याची तत्कालीन क्रांतिकारक व राष्ट्रीय पुढारी मॅझिनीशी ओळख झाली. त्याने ‘यंग इटली’ ह्या संघटनेत सामील होऊन मॅझिनीच्या अयशस्वी बंडात भाग घेतला, म्हणून तो फ्रान्समार्गे दक्षिण अमेरिकेत पळून गेला. त्यास फाशीची शिक्षा फर्माविण्यात आली होती. तेथे तो चौदा वर्षे होता. या काळात त्याने यूरग्वायच्या बाजूने अर्जेंटिनाविरूद्ध लढाईत भाग घेतला. ह्या सुमारास त्याने रेडशर्ट्‌स हे सैनिक दल उभारण्यास मदत केली आणि १८४६ मध्ये साँतांतॉन्यॉ येथील युद्धात गनिमी तंत्राचा अनुभव मिळविला. तत्पूर्वी त्याने आनीता या विधवेशी विवाह केला.

जूझेप्पे गॅरिबॉल्डी

इटलीत क्रांतीला अनुकूल अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे समजल्यावरून १८४८ मध्ये तो काही स्वयंसेवक बरोबर घेऊन इटलीत परत आला. स्वतः लोकशाहीवादी असूनही प्रथम त्याने ऑस्ट्रियाविरूद्धच्या युद्धात सार्डिनियाच्या राजाला मदत देऊ केली पण ती नाकारण्यात आली. नंतर मिलान शहरातील स्वातंत्र्यवाद्यांच्या मदतीला तो गेला पण मिलानही पडले व ऑस्ट्रियन सैन्याला गनिमी तंत्राने हैराण करण्याचे त्याचे प्रयत्‍न फसले. त्याला स्वित्झर्लंडमध्ये आश्रय घ्यावा लागला.

इटलीच्या निरनिराळ्या संस्थानांत क्रांतिकारक सत्ता टिकून राहिल्या होत्या. १८४९ मध्ये प्रजासत्ताक सरकारने रोमचे फ्रेंच आक्रमकांपासून संरक्षण करण्याची प्रमुख जबाबदारी त्याच्यावर सोपविली. लढाईत गॅरिबॉल्डीने असामान्य पराक्रम केला. गॅरिबॉल्डीच्या शौर्याने व जिद्दीमुळे इटालियन लोक स्वातंत्र्यासाठी लढू शकतात, याची जगाला साक्ष पटली. या लढाईत पराभव होऊनसुद्धा त्याने जे शौर्य व धैर्य दाखविले, त्यामुळेच तो इटालियन राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या प्रेरणेचा प्रतीक मानला जाऊ लागला. युद्धातील, विशेषतः गनिमी युद्धातील, चतुर व असामान्य सेनानी म्हणून त्याचा लौकिक झाला.

स्वातंत्र्ययुद्धाची दुसरी फेरी १८५९ मध्ये झाली. सार्डिनियाचे राजे व्हिक्टर इमॅन्युएल आणि पंतप्रधान काव्हूर यांनी ऑस्ट्रियाविरूद्ध नव्या युद्धाची तयारी करताना गॅरिबॉल्डीची मदत घेण्याचे ठरविले. सार्डिनियन सैन्यात मेजर जनरल म्हणून त्याची नेमणूक झाली. त्याच्या सैन्याने ऑस्ट्रियन सैन्याचा पराभव करून टायरॉलपर्यंत अल्पाइन प्रदेश मुक्त केला. व्हीला फ्रांका येथील तहाने या युद्धाचा शेवट झाला.

१८६० मध्ये सिसिली व नेपल्स फ्रेंचांपासून मुक्त करण्यासाठी त्याने जी लढाई दिली, तेच त्याच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ यशस्वी कार्य होते. फक्त १,००० स्वयंसेवक घेऊन त्याने ही स्वारी केली व प्रचंड फ्रेंच सैन्याचा पराभव केला. वीस हजार फ्रेंच सैनिक शरण आले. हा संपूर्ण प्रदेश मुक्त करून त्याने राजे व्हिक्टर इमॅन्युएल यांना अर्पण केला आणि काप्रेअरा येथे आपल्या घरी परतला. १८६२ व १८६४ मध्ये त्याने पोपकडून रोम जिंकण्याचा अयशस्वी प्रयत्‍न केला पण आंतरराष्ट्रीय दडपणामुळे इटलीच्या राजाने त्यास मनाई केली. १८६७ मध्येही त्याचा फ्रेंच व पोपच्या सैन्याने पराभव केला. १८७० मध्ये फ्रेंच प्रजासत्ताकास त्याने जर्मनीविरूद्ध मदत केली. ह्या सुमारास रोम इटलीत सामील झाले. १८७४ मध्ये तो इटलीच्या संसदेवर निवडून आला पण त्याचा पिंड राजकारणी नव्हता, त्यामुळे तो अयशस्वी झाला. उर्वरित आयुष्य त्याने आपल्या काप्रेअरा येथील घरी व्यतीत केले व तेथेच तो मरण पावला.

गॅरिबॉल्डीने एकूण तीन लग्‍ने केली तथापि त्यास ऐहिक सुख फारसे मिळाले नाही. त्याचा पिंड सैनिकाचा होता. तोराजकारणी वा मुत्सद्दी नव्हता, पण प्रामाणिक देशभक्त होता. त्याने तीन कादंबऱ्या व इतर काही स्फुट लेख लिहिले. त्याचे आत्मचरित्र प्रसिद्ध असून इंग्रजीत १८८८ मध्ये त्याचे भाषांतर झाले आहे.

संदर्भ: Smith, D. M. Cavour and Garibaldi, London, 1954.

देशपांडे, अरविंद