पतियाळा संस्थान: ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील पूर्व पंजाबमधील एक मोठे शीख संस्थान. हे फूलकियान संस्थानांपैकी एक होय. क्षेत्रफळ १५,२११ किमी. लोकसंख्या सु,. १९,३६,२५९ (१९४१). उत्पन्न सु, २ कोटी ७० लाख रुपये. या संस्थानचा प्रदेश सलग नसून सामान्यतः लुधियाना-फिरोझपूर-कर्णाल हे ब्रिटिश जिल्हे, नाभा, जींद, मालेर-कोटल या संस्थानांतील काही प्रदेश व सिमला टेकड्या आणि नारनौल इलाखा हे प्रदेश यात समाविष्ट होत. मुख्यतः पंजाबच्या पूर्वेस गंगा-सिंधू खोरे हा प्रदेश पसरला आहे.

संस्थानचा मूळ पुरुष फूल याचा नातू सरदार अलसिंग याने १७५३ मध्ये सतलजच्या दक्षिणेस पतियाळा बसविले. त्याचे स्वतंत्र संस्थान म्हणून अस्तित्व १७६२ पासून, अहमदशाह दुर्रानीने त्यास राजा हा किताब दिल्यापासून, सुरू झाले. पुढे १७६३ मध्ये अहमदशाहच्या राज्यपालाकडून अलसिंगने सरहिंद किल्ला घेतला आणि सरहिंद प्रांताची शकले झाली. यामुळे सरहिंदच्या आसपासचा बराच मुलूख त्यास मिळाला. त्याच्या मृत्यूनंतर (१७६५) त्याचा नातू अमरसिंग (१७६५–८१) याने राज्यविस्तार केला.  त्याला अहमदशाह दुर्रानीने राजा-इ-राजगान हा किताब दिला. परंतु त्याचा सावत्र भाऊ हिम्मतसिंग याने गादीसाठी तंटा निर्माण केला. त्याला त्याने भवानीगढ हा प्रदेश देऊन गप्प बसविले. पुढील वर्षी अमरसिंगाने पैल व इस्त्रू हे मालेर-कोटलमधील प्रदेश घेतले. तसेच पिंजोर, गोविंदगढ, फतेहाबाद वगैरे किल्ले घेतले. १७७९ मध्ये मोगल सैन्याने पतियाळा घेण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्या प्रतिकारामुळे त्यास परतावे लागले. अमरसिंगाचा मुलगा साहेबसिंग (१७८१–१३) गादीवर आला. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याच्या कारकीर्दीत त्याच्या नातलगांनी बंडे आरंभिली. तेव्हा त्याचा दिवाण नानुमल याने मराठ्यांना मदतीकरिता पाचारण केले आणि शांतता स्थापन केली पण ही शांतता काही काळ टिकली. पुढे साहेबसिंगाने साहेब कौर या आपल्या बहिणीच्या हातात सर्व सूत्रे सुपूर्द केली, पण तिच्याशीही त्याचे पटेना. ती लवकरच मृत्यू पावली. या वेळी महादजी शिंदे आणि साहसी यूरोपीय जॉर्ज टॉमस यांनी संस्थानवर आक्रमणे केली. ती संस्थानने परतवून लावली. साहेबसिंग आणि राणी कौर यांच्या भांडणाचा फायदा रणजितसिंगाने घेतला. तेव्हा पतियाळा, जींद आणि कैथळ या संस्थानांनी ब्रिटिशांच्या मदतीची मागणी केली आणि १८०९ मध्ये संस्थान ब्रिटिशांचे मांडलिक झाले. राणी कौरने पुढे साहेबसिंगाच्या मृत्यूपर्यंत (१८१३) संस्थानचा कारभार चोख केला. साहेबसिंगानंतर करमसिंग, नरेंद्रसिंग, मोहिंद्रसिंग व राजेंद्रसिंग हे अनुक्रमे गादीवर आले. करमसिंग (१८१३–४५) याच्या वेळी त्याची आई कौर व दिवाण नौनिध्राई यांचे संस्थानात वर्चस्व होते. या सुमारास १८१४ चे गुरखा युद्ध झाले आणि संस्थानने ब्रिटिशांना चांगली मदत केली. त्याबद्दल ब्रिटिशांनी सिमला टेकड्यांतील १६ परगणे दिले आणि संस्थाननेही त्याबद्दल २,८०,००० रु. नजराणा दिला. यानंतर संस्थानात कलह निर्माण झाला. करमसिंगानंतर त्याचा मुलगा नरेंद्रसिंग (१८४५–६२) गादीवर आला. १८५७ च्या उठावात त्याने इंग्रजांना सर्वतोपरी साहाय्य दिले. त्यामुळे ब्रिटिशांनी काही मुलूख व किताब राजास दिले. संस्थानास दत्तक घेण्याची तसेच देहान्त शासन देण्याची परवानगी मिळाली. नरेंद्रसिंग हा के. सी. एस्. आय्. हा किताब घेणारा पहिला भारतीय राजा असून त्याची प्रशासनव्यवस्था कार्यक्षम होती. त्याचा मुलगा मोहिंद्रसिंग (१८६२–७६) वयाच्या दहाव्या वर्षी गादीवर आला. याच्या कारकीर्दीत सरहिंद कालव्याच्या कामास सुरुवात झाली. त्याने अनेक शैक्षणिक संस्थांना देणग्या दिल्या. तो अल्पवयातच मृत्यू पावला. त्याच्यानंतर अज्ञान राजेंद्रसिंग (१८७६–१९००) गादीवर आला. त्याने रेल्वेमार्ग बांधले. १८७९ मध्ये संस्थानने ब्रिटिशांच्या अफगाण युद्धाकरिता मदत धाडली. त्यानंतर त्याचा मुलगा भूपेंद्रसिंग (१९००-१९३८) गादीवर आला. पहिल्या महायुद्धात संस्थानने ब्रिटिशांना फार मोठी मदत केली. त्याबद्दल ब्रिटिशांनी संस्थानास अनेक सवलती, किताब व एकोणीस तोफांच्या सलामीचा मान दिला. यादवेंद्रसिंग (१९३८–४८) हे विलीनीकरणाच्या वेळी होते.

पतियाळा प्रथमपासून इंग्रजांना एकनिष्ठ होते. अफगाण युद्धे, पहिले महायुद्ध यांत त्याने ससैन्य ब्रिटिशांना मदत तर केलीच पण देणगीरूपाने इंग्रजांना अमाप पैसा दिला. रौलट बिलाविरुद्ध झालेल्या पंजाबातील आंदोलनात संस्थानचा इंग्रजांना पाठिंबा होता. महाराजा नरेद्रसिंग केंद्रीय विधिमंडळाचे सदस्य (१८६१), तर भूपेंद्रसिंग हे नरेंद्र मंडळाचे अध्यक्ष होते आणि शेवटचे यादवेंद्रसिंग घटना समितीचे सदस्य झाले. भूपेंद्रसिंगानी गोलमेज परिषदांतून भाग घेतला. १९१९ मध्ये संस्थानात जातीय दंगली उसळल्या. संस्थान १५ जुलै १९४८ रोजी विलीन होऊन पेप्सू संघात समाविष्ट करण्यात आले आणि महाराज त्या संघाचे राजप्रमुख झाले.

संस्थानात १४ शहरे आणि ३,५८० खेडी होती. कर्मगढ, पिंजौर, अमरगढ, अनाहदगढ, मोहिंद्रगढ ह्या शासकीय विभागांमध्ये संस्थानची प्रशासकीय व्यवस्था केली होती. संस्थानचे स्वतःचे सैन्य होते आणि चलनव्यवस्था (नाणी) होती. संस्थानने सरहिंद कालवा, रेल्वे, डाकतारघर, पक्के रस्ते, ग्रामपंचायती, आरोग्य वगैरे बाबतींत अनेक सुधारणा केल्या. शैक्षणिक बाबतीत संस्थानिकांचे धोरण सढळ मदत व शिक्षणप्रसाराचे होते.

कुलकर्णी, ना. ह.