ग्रामराज्य : एखाद्या गावातील शासकीय कारभार हा संपूर्णतया अगर बव्हंशी त्या गावातील रहिवाशांच्या संमतीने, सहकार्याने आणि सल्ल्यानुसार चालत असल्यास, तेथे ग्रामराज्य अस्तित्वात आहे असे समजले जाते. ग्रामराज्याची वैधता, तसेच शासकीय अधिकारांचे वाटप, वैयक्तिक व सामायिक मालमत्तेबद्दल नियम, शासकीय व्यवहाराचे अधिनियम, त्यांची कार्यवाही, न्यायनिवाड्याचे स्वरूप व त्याची पद्धत, राज्यकारभाराची विविध अंगे ही संबंधित ग्रामजीवनाशी निगडित असून त्या ग्रामजीवनाचे मर्यादित आणि ग्रामजीवनाच्या परंपरेने निश्चित झालेली असतात. शेतीप्रधान अशा सर्वच पुरातन समाजांमध्ये, विशेषतः भारत, चीन, जपान आणि रशिया या देशांमध्ये, कमीअधिक फरकाने अशा प्रकारची ग्रामराज्ये होती, हे संशोधनान्ती सिद्ध झाले आहे. ग्रामीण जीवन हे आर्थिक-सांस्कृतिक दृष्ट्या बाह्य संपर्कापासून अगर प्रभावापासून जितके अलिप्त असेल, तितके तेथील शासकीय व्यवहार तिथल्या परंपरेवर अवलंबून असतात आणि तेथील जनता स्वयंशासित असते.

बाह्य संपर्कापासून अलग पडलेल्या गावातील राजकीय व्यवस्था ही कौटुंबिक स्वरूपाची असते. सांस्कृतिक एकजिनसीपणा, कारभाराचे नियम वा संकेत ठरविताना दिसून येणारी अनौपचारिकता, ग्रामप्रमुखाविषयी लोकांत दिसून येणारा आपलेपणा व विश्वास, ग्रामप्रमुखाच्या अधिकारकक्षेविषयी असलेला काटेकोरपणाचा अभाव, नियमबाह्य वर्तन करणाऱ्याविषयीची क्षमाशील दृष्टी इ. लक्षणे कुटुंबाप्रमाणेच या ग्रामराज्यातही प्रकर्षाने दिसून येतात. नागरी संस्कारापासून अलिप्त असलेल्या ग्रामराज्याची पुढीलप्रमाणे पाच वैशिष्ट्ये आहेत : (१) स्थानिक स्वायत्तता, (२) लोकनीतीवर आधारलेले अनौपचारिक शासन, (३) शासकीय नेतृत्वाची स्थिरता व शाश्वती (४) विविध क्षेत्रांतील परस्परव्यापी नेतृत्व आणि (५) स्वेच्छानुसारी शासन.

भारतात वैदिक काळापासून ग्रामराज्ये अस्तित्वात होती, असे तज्ञांचे मत आहे. पुढे आर्थिक-सांस्कृतिक दृष्ट्या बाह्य प्रदेशाचा प्रभाव वाढला किंवा गावे ही एखाद्या साम्राज्याची घटक बनली, तरी शासकीय स्वायत्ततेत निदान मध्ययुगीन कालापर्यंत तरी फारसा फरक पडला नाही, असे म्हटले जाते.

ग्रामस्वराज्य : महात्मा गांधींनी भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाच्या ज्या अनेक पायऱ्या सुचविल्या आणि ग्रामोद्धाराकरिता ज्या विविध विधायक योजना देशापुढे मांडल्या, त्यांपैकी ग्रामस्वराज्याची योजना ही मूलभूत आणि सर्वस्पर्शी अशी आहे. प्रत्येक गावातील रहिवाशांनी बाह्य प्रलोभनाला बळी न पडता स्वतःचे गाव आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण बनविणे, तेथील शासकीय कारभार संपूर्णतया स्वतःच्या हातात ठेवणे आणि शिक्षण, आरोग्य इ. सांस्कृतिक गरजा, त्यांची व्यावहारिक उपयुक्तता लक्षात घेऊन स्वप्रयत्नाने भागविणे, ही ग्रामस्वराज्याची प्रमुख उद्दिष्टे आहेत.

१९१५ साली भारतात पदार्पण केल्यापासून या ना त्या रीतीने गांधीजींनी ग्रामस्वराज्यांचा पाठपुरावा केला. हे वेदकालापासून चालत आलेले ग्रामस्वराज्य आंग्ल राजवटीत उद्ध्वस्त झाल्यामुळे भारतीय जीवन अधिक शोचनीय झाले आहे, अशी त्यांची धारणा होती. याच सुमारास भारतीय तत्त्वज्ञान आणि साधे जीवन यांनी प्रभावित झालेले ॲनी बेझंट आदी परकीय कार्यकर्तेदेखील प्राचीन भारतीय ग्रामराज्याची प्रशंसा करीत होते. भारतीय खेड्यांच्या आर्थिक स्वायत्ततेविषयी, जनजीवनाच्या अभेद्यतेविषयी पाचव्या संसदीय समितीच्या अहवालात (१८१२), एल्‌फिन्स्टन यांच्या पेशवेकालीन ग्रामव्यवस्थेवरील अहवालात (१८१९) आणि १८३o सालच्या मेट्‌काफ यांच्या टिपणीत प्रशंसोद्‌गार काढलेले आहेत.

राजकीय चळवळीबरोबरच गांधीजींनी ग्रामस्वराज्याविषयी वेळोवेळी विधायक विचार मांडले आहेत. या सुमारास यूरोप खंडात आणि भारतात आकर्षक बनत चाललेल्या मार्क्स-लेनिनप्रणीत साम्यवादामध्येसुद्धा सोव्हिएट म्हणजे स्वायत्त ग्रामराज्य ही मुख्य पायाभूत घटकसंस्था मानली गेली हाती परंतु कम्युनिस्ट पक्षात सत्ता केंद्रित झाल्यामुळे ही संस्था नाममात्र राहिली आहे. याउलट गांधीजींनी मात्र ग्रामस्वराज्याची योजना हिरिरीने मांडली. अहिंसा, विश्वस्त भूमिका (ट्रस्टीशिप), सहकार व समता ही ग्रामस्वराज्याची चतुःसूत्री आहे.

ग्रामराज्य हे कोण्या एका व्यक्तीचे (एकायतन) किंवा अल्पसंख्य अगर बहुसंख्य लोकांचे (अनेकायतन) न बनता सर्वांचे (सर्वायतन) बनावे, असे सांगून विनोबांनी ग्रामस्वराज्याचे चार आधारस्तंभ पुढीलप्रमाणे सांगितले आहेत : (१) समर्थांचे सामर्थ्य जनसेवेकरिता असावे, (२) जनता पूर्णपणे स्वावलंबी व परस्पर सहकार्य करणारी असावी, (३) नित्याचे सहकार्य वा प्रासंगिक असहकार अहिंसात्मकच असावा व (४) प्रत्येकाच्या प्रामाणिक परिश्रमाचा मोबदला समान असावा. बुद्धीने, शारीरिक बळाने अगर संपत्तीने समर्थ असलेल्यांनी असमर्थांचे रक्षण करावे, यात गांधीजींच्या विश्वस्त कल्पनेचा आविष्कार दिसून येतो. स्वावलंबन हे ग्रामोद्योगांच्या विकासामुळे, जनतेतील ऐक्य हे अहिंसा आणि सहकार्य यांमुळे तर समता ही समान मोबदल्यामुळे प्रस्थापित होते, अशी यामागील श्रद्धा आहे.

संदर्भ : 1. Gandhi, M. K. Rebuilding Our Villages, Ahmedabad, 1952.

   2. Malaviya, H. D. Village Panchayats in India, New Delhi, 1956

   3. Sorokin, P. A.  Zimmerman, C. C.  Galpin, C. J. A  Systematic Source Book in       Rural Sociology,  Vol. II, New York, 1965.

   ४. भावे विनोबा, सर्वोदय विचार और स्वराज्यशास्त्र, काशी, १९५८.

कुलकर्णी. मा. गु.