सार्जंट, टॉमस जे. : (१९ जुलै १९४३– ). अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि अर्थशास्त्राच्या नोबेल पारितोषिकाचे सहमानकरी. साकलिक अर्थशास्त्रातील अनित्य/परिवर्ती घटकांवर (मॅक्रोइकॉनॉमिक व्हेअरिअबल्स) प्रभाव पाडणारी कारणे व त्यांचे परिणाम या संदर्भातील उल्लेखनीय संशोधनाबद्दल (१९७७–८७) टॉमस जे. सार्जंटअमेरिकन अर्थशास्त्रज्ञ ⇨ ख्रिस्तोफर ए. सिम्स यांच्याबरोबर त्यांना हे पारितोषिक देण्यात आले (२०११). त्यांचा जन्म कॅलिफोर्निया राज्यातील पॅसाडीना येथे झाला. त्यांनी बर्कली येथील कॅलिफोर्निया विद्यापीठातून बी. ए. (१९६४) आणि केंब्रिज विद्यापीठातून एम्. ए. या पदव्या प्राप्त केल्या. त्यानंतर त्यांनी हार्व्हर्ड विद्यापीठातून पीएच्. डी. ही पदवी मिळविली (१९६८). अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांनी अमेरिकेतील पुढील विद्यापीठांतून अध्यापन केले : पेनसिल्व्हेनिया विद्यापीठ (१९७०-७१), मिनेसोटा विद्यापीठ (१९७१–८७), शिकागो विद्यापीठ (१९९१–९८), स्टॅनफर्ड विद्यापीठ (१९९८–२००२), प्रिन्स्टन विद्यापीठ (२००९). सध्या ते न्यूयॉर्क विद्यापीठात अर्थशास्त्र व व्यवसाय विभागात अभ्यागत प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तत्पूर्वी त्यांची ‘अमेरिकन राष्ट्रीय मानव्य व विज्ञान संस्थे’चे (अमेरिकन ॲकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस) फेलो म्हणून निवड झालेली होती. १९८७ पासून त्यांनी स्टॅनफर्ड विद्यापीठाच्या ‘हूअर इन्स्टिट्यूट’चे वरिष्ठ सदस्य तसेच पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातील ‘पेन इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक रिसर्च’ या संस्थेच्या सल्लागार मंडळाचे सदस्य म्हणून काम केलेले आहे. त्यांच्या संशोधनकार्यावर सुप्रसिद्घ अमेरिकन अर्थतज्ज्ञ आणि नोबेल पुरस्कार विजेते रॉबर्ट लुकास ज्यू (१९९५) यांचा प्रभाव आहे. सार्जंट यांनी इकॉनॉमिक डायनॅमिक अँड कंट्रोल (१९८९–९२), इकॉनॉमेट्रिक सोसायटी कौन्सिल (२००५) आणि अमेरिकन इकॉनॉमिक्स असोसिएशन (२००७) या संस्थांची अध्यक्षपदे भूषविली आहेत. साकलिक अर्थशास्त्र या विषयावर त्यांनी लिहिलेल्या बारा ग्रंथांबरोबरच त्यांचे विविध नियतकालिकांमधून कित्येक संशोधनपर लेख प्रसिद्घ झालेले आहेत.

सार्जंट यांनी देशाच्या आर्थिक धोरणातील कायमस्वरूपी बदलांचे विश्लेषण करण्यासाठी स्थूल अर्थमिती पद्घती विकसित केली. तात्पुरत्या स्वरूपातील व्याजदरातील वाढ अगर करकपात यांचा चलनवाढीवर कसा परिणाम होतो, चलनवाढ रोखण्यासाठी देशाच्या मध्यवर्ती बँकेने वित्तीय धोरणात कायमस्वरूपी बदल केल्यास काय परिणाम संभवतात आर्थिक धोरण, सकल राष्ट्रीय उत्पन्न, चलनवाढ, गुंतवणूक, रोजगारी यांचा परस्परसंबंध काय, या संदर्भातील उत्तरे त्यांनी शोधलेली आहेत. वरील घटक एकमेकांवर सतत परिणाम करीत असतात. देशाच्या आर्थिक धोरणांचे परिणाम जसे अर्थव्यवस्थेवर होतात, तसेच अर्थव्यवस्थेतील बदलांचे परिणाम धोरणावर होत असतात. खाजगी क्षेत्राच्या भविष्यकालीन कार्याचा व धोरणाचा वेतन, बचत व गुंतवणूक यांवर जसा परिणाम होतो, तसाच आर्थिक धोरणासंबंधीच्या निर्णयांचा खाजगी क्षेत्राच्या विकासावर सातत्याने परिणाम होतो. बदलत्या आर्थिक धोरणानुसार व्यक्ती, कुटुंबे व व्यावसायिक आर्थिक धोरणानुसार आपल्या अपेक्षा लवचीक करतात. हा बदल अभ्यासण्यासाठी सार्जंट यांच्या साकलिक अर्थशास्त्रीय सांख्यिकी पद्घतीचा उपयोग होतो. दुसऱ्या जागतिक महायुद्घपश्चात अनेक देशांनी सुरुवातीला चलनवाढीचे धोरण अंमलात आणले आणि नंतरच्या काळात आर्थिक धोरणात शिस्त आणण्याबरोबरच घटत्या व्याजदराचे धोरण कसे राबविले, याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे.

सार्जंट यांचे संशोधन सकारात्मक स्पष्टीकरणाच्या गृहीतकावर (हायपॉथिसिस) आधारलेले आहे. ते बुद्घिवादी अपेक्षांचा सिद्घांत (नॅशनल एक्स्पेक्टेशन थिअरी) मांडणाऱ्यांमध्ये अग्रभागी असून त्यांच्या मतानुसार अर्थव्यवस्थेतील संभाव्य बदलांच्या आधारे शासकीय धोरण आखणारे संपूर्ण अर्थव्यवस्थेवर विशिष्ट पद्घतीने प्रभाव पाडू शकणार नाहीत देशाची मध्यवर्ती बँक आपल्या वित्तीय धोरणात सवलती देऊन कायमस्वरूपाची बेरोजगारी कमी करू शकणार नाही कारण लोक भविष्यात चलनवाढ होण्याच्या आशेने श्रमाचा जादा मोबदला मिळावा, गुंतवणुकीवर जादा व्याज मिळावे, असा आग्रह धरतील. यूरोपीय देशांचे बेकारभत्ता देण्याचे उदार धोरण, नोकऱ्यांमधील अस्थिरता यासाठी श्रमिक बाजारपेठेतील विविध घटक तितकेच जबाबदार आहेत. खाजगी क्षेत्राच्या उपद्रवी मालमत्तांच्या (जिंदगीच्या) खरेदीला प्रोत्साहन देण्याचे धोरण तसेच सामान्य करदात्यांकडून गोळा केलेला निधी उद्योगधंद्यांची खाजगी मालकी असणाऱ्यांकडे हस्तांतरित करण्याच्या–सार्वजनिक–खाजगी गुंतवणूक–कार्यक्रमाबद्दल त्यांनी ओबामा प्रशासनावर टीका केलेली आहे. नील वॉलेस या पेन स्टेट विद्यापीठाच्या अर्थतज्ज्ञाच्या सहकार्याने सार्जंट यांनी बुद्घिवादी अपेक्षांचा समतोल नियम २०११ (नॅशनल एक्स्पेक्टेशन ईक्विलिब्रिअम ॲक्ट, २०११) ची अर्थव्यवस्थेला स्थैर्य प्राप्त करू देणारी मार्गदर्शक तत्त्वे विकसित केलेली असून त्यांचे या क्षेत्रातील योगदान विचारात घेता, त्यांचा जगातल्या श्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञांमध्ये सतरावा क्रमांक लागतो.

सार्जंट यांना राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे (नॅशनल ॲकॅडेमी ऑफ सायन्स) साकलिक अर्थशास्त्रीय संशोधनाकरिता नॅस (NAS) हा पुरस्कार देण्यात आला (२०११). त्याशिवाय त्यांनी शोधून काढलेल्या संख्यात्मक उपयोगितेबद्दल (क्वॉन्टिटेटिव्ह ॲप्लिकेशन) त्यांना ‘सीएम्इ ग्रुप’चे एम्एस्एस्आर् हे पारितोषिक देण्यात आले (नोव्हेंबर २०११).

चौधरी, जयवंत