जॉन चार्ल्स हॅर्‌सॅन्यी

हॅर्‌सॅन्यी, जॉन चार्ल्स :(२९ मे १९२०–९ ऑगस्ट २०००). हंगेरियन-अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ. १९९४ मध्ये जॉन नॅश व राइनहार्ट सेल्टन यांत विभागून त्याला अर्थशास्त्राचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्याचा जन्म हंगेरीतील बुडापेस्ट येथे झाला. त्याचे वडील एका औषध-दुकानाचे मालक होते. लुथेरन जिम्नॅशियममधून (बुडापेस्ट) त्याने शालेय व पदवी शिक्षण (१९३७) घेतले. पुढे बुडापेस्ट विद्यापीठातून त्याने पीएच्.डी. (१९४७) मिळविली व एक वर्ष त्याच विद्यापीठात नोकरी केली. त्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला गेला (३० डिसेंबर १९५०). तिथे त्याने ॲन क्लाउबर या युवतीबरोबर विवाह केला (१९५१). सिडनी येथील एका कारखान्यात त्याने तीन वर्षे काम केले. तसेच अर्थशास्त्र विषयात सिडनी विद्यापीठातून त्याने एम्.ए. (१९५३) ही पदवी संपादन केली. त्याची क्वीन्सलँड विद्यापीठात (ब्रिस्बेन) अधिव्याख्यात म्हणून नियुक्ती झाली (१९५४). त्याला रॉकफेलर अधिछात्रवृत्ती मिळाली (१९५६). त्यामुळे तो अमेरिकेत गेला. तिथे स्टॅनफर्ड विद्यापीठातून त्याने ‘गेम थिअरी’ या विषयावर प्रबंध लिहून केनेथ ॲरो याच्या मार्गदर्शनाखाली पीएच्.डी. (१९५९) मिळविली व पुन्हा तो पत्नीसह ऑस्ट्रेलियात आला. तिथे त्याला ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीत (कॅनबेरा) संशोधकाची नोकरी मिळाली.

सिडनी विद्यापीठात शिकत असताना हॅर्‌सॅन्यीचे इकॉनॉमिक अँड पोलिटिकल वीकली आणि रिव्ह्यू ऑफ इकॉनॉमिक स्टडीज या मासिकांतून संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले. त्यांतील त्याने विकसित केलेल्या ‘गेम थिअरी’ संशोधनास फारसा प्रतिसाद न मिळाल्याने तो पुन्हा अमेरिकेत परतला. तेथील वेन स्टेट युनिव्हर्सिटी, डिट्राइट येथे अर्थशास्त्राचा प्राध्यापक म्हणून त्याने काम केले (१९९०). तत्पूर्वी त्याने कॅलिफोर्निया विद्यापीठातील हास बिझनेस स्कूल (बर्कली) यात १९६४–९० दरम्यान अर्थशास्त्र विभागात ‘गेम थिअरी’ संदर्भात व्यापक संशोधनकार्य केले.

आपल्या प्रदीर्घ संशोधनकार्यादरम्यान ‘गेम थिअरी’ हे निर्णयप्रक्रियेसंदर्भातील सांख्यिकी तंत्र हॅर्सॅन्यीने विकसित केले. बुद्धिजीवी व विवेकी निर्णय घेणाऱ्यांमधील संघर्ष (कॉन्फ्लिक्ट) व सहकार्य यांबाबतची गणिती प्रतिकृती (मॉडेल), असे त्या तंत्राचे वर्णन करता येईल. स्पर्धात्मक वातावरणात निर्णय घेताना व विशेषतः व्यक्तीचा विवेकपूर्ण (रॅशनल) निर्णय हा त्याच्या एकट्यावर नव्हे, तर समान समस्या हाताळणाऱ्या इतरांच्या कृतीवर अवलंबून असतो, तेव्हा हे तंत्र वापरले जाते. दोन किंवा अधिक स्पर्धकांची रणनीती खेळाची निष्पत्ती ठरविते. खेळातील प्रतिस्पर्ध्याची रणनीती गुलदस्त्यात असल्याने त्यावर मात करण्यासाठी योग्य निर्णय घेणे प्रत्येक स्पर्धकाला क्रमप्राप्त असते. या ‘गेम थिअरी’चा उपयोग व्यवस्थापन, विपणन, निवडणुका, युद्ध यांबाबतची रणनीती ठरविताना घेतल्या जाणाऱ्या निर्णयप्रक्रियेत होतो. शिवाय अर्थशास्त्राबरोबरच राज्यशास्त्र, मानसशास्त्र, जीवशास्त्र तसेच तर्कशास्त्रात वर्तनवादी संबंधाचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते.

सामाजिक शास्त्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल हॅर्‌सॅन्यीला नोबेल पारितोषिकाव्यतिरिक्त जॉन वोन न्यूमन अवॉर्ड (१९९५), नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सिसचे सदस्यत्व, अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सिस आणि इकॉनॉमिट्रिक सोसायटी यांची अधिछात्रवृत्ती, अमेरिकन इकॉनॉमिक असोसिएशनचे सन्माननीय अधिछात्र, नॉर्थवेस्टर्न विद्यापीठाची मानद डॉक्टरेट इ. सन्मानही मिळाले.

त्याचे बर्कली (कॅलिफोर्निया) येथे निधन झाले.

चौधरी, जयवंत