निर्वाह शेती : शेतकरी व त्याचे कुटुंब यांच्या भरणपोषणाचे साधन म्हणून कसली जाणारी शेती. शेतमालाची विक्री करून पैसा मिळविण्याचा तिचा उद्देश नसतो. निर्वाह शेती अर्थातच केवळ अन्नपिकांच्या क्षेत्रातच शक्य आहे. कारण अन्नेतर पिके बव्हंशी विकावीच लागतात. उदरनिर्वाहासाठी त्यांचा प्रत्यक्ष उपयोग करता येत नाही. मात्र ज्यांत अन्नपिके पिकविली जातात, ती सर्व शेते निर्वाह शेते असे म्हणता येणार नाही कारण अन्नपिकेही विक्रीच्या उद्देशाने पिकविता येतात. अन्नपिकांची शेती मोठ्या प्रमाणावरची असेल तर असे करता येईल.निर्वाह शेतीच्या व्याख्येचे घटक दोन : ( १ ) ती अन्नपिकांची शेती असते. (२)तिच्यात होणारे अन्नपिकांचे उत्पादन शेतकऱ्यांच्या कुटुंबाला साधारणपणे पुरेसे एवढेच किंवा त्याहूनही कमी असते. धारणाचे आकारमान लहान असेल, तर शेतीला निर्वाह शेतीचे स्वरूप येणे बऱ्याच वेळा अपरिहार्य ठरते. त्यामुळे लहान प्रमाणावरची शेती व निर्वाह शेती यांचे बहुधा साहचर्य आढळते.ज्या अविकसित देशांत लोकसंख्यावाढीमुळे व इतर कारणांमुळे सर्वसाधारण धारणाचे क्षेत्र फार लहान झालेले आहे,अशा देशांत निर्वाह शेतीचे प्राबल्य दिसून येणे साहजिक आहे. निर्वाह शेती करणारा शेतकरी आपले उत्पादन मुळीच विकत नाही, असेही नाही. काही देणी (उदा., सारा, वाणसामान, काही उत्पादसाधने, व्याज, कर्जाचे हप्ते) पैशाच्या रूपानेच फेडावी लागत असल्यामुळे थोडा माल विकून पैसा कमवणे त्याला आवश्यक असते. पण हा विकला जाणारा माल वाढाव्याच्या स्वरूपात नसतो आणि त्याचे प्रमाण उपेक्षणीय असते.

निर्वाह शेतीची ठळक आर्थिक वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे सांगता येतील. धारणाचे आकारमान लहान असल्यामुळे अशा धारणांवर उत्पादनसाधनांचा उपयोग संयुक्त प्रमाणात (क्वचित दर ०·४ हे.उत्पादन जास्त होत असले तरी) होत नाही. म्हणजेच उत्पादन अधिक खर्चाचे होते. व्यापारपेठांशी संबंध नसल्यामुळे नवे ज्ञान, नव्या जाणिवा, नवी उत्पादक तंत्रे यांच्यापासून अशी शेती वंचित राहण्याचा संभव असतो. नवे तंत्रवापरल्यामुळे उत्पादनात भर पडली, तरी ती निर्वाहाच्या कामीच लागण्याचा संभव असल्यामुळे पैशाच्या रूपाने फायदा होत नाही व त्यामुळे पैशाने विकत घ्यावे लागणारे उत्पादन घटक न वापरण्याचीच शेतकऱ्यांची प्रवृती राहते. मालाची विक्री ठराविक रकमेची देणी भागविण्यापुरतीच होत असल्यामुळे भाव वाढले, तर विक्री कमी व कमी झाले,तर विक्री अधिक असा प्रकार घडतो (म्हणजेच शेतमालाच्या पुरवठ्याचा वक्र नेहमीचा पुरवठावक्रासारखा असत नाही तो विपरीत स्वरूपाचा असतो). अशा शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जाची परतफेड होणेही कठीण असते. शेतकऱ्याला केवळ शेतीवर अवलंबून राहणे शक्य नसल्यामुळे त्याला ‌मोलमजूरीचा धंदा करावा लागतो आणि त्यामुळे शेती व्यवसाय अर्ध-वेळ व्यवसायासारखा बनून राहतो. शेतकरी बहुधा सर्व दृष्टींनी मागासलेले व कर्जबाजारी राहतात. अशा शेतकऱ्यांचे आ​णि त्यांच्या शेतीचे पुनर्वसन ही शेतीच्या क्षेत्रातील फार मोठी समस्या आहे.

सर्वसाधारणपणे दोन हेक्टरांपर्यंतची शेती ​निर्वाह ‌‌‌शेती समजली तर भारतात अशा धारणांचे एकूण धारणांशी प्रमाण पासष्ट टक्के आहे व अशा ‌‌‌शेतीखाली कसली जाणारी जमीन एकूण ज​मिनीच्या पंधरा टक्के आहे.

संदर्भ : Clark, Colin Haswel, Margaret, The Economies of Subsistence Agriculture, London, 1964.

देशपांडे, स. ह.