गालब्रेथ, जॉन केनेथ : (१५ ऑक्टोबर १९०८–  ). नामवंत अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ, राजकारणधुरंधर व लेखक. जन्म कॅनडामधील आँटॅरिओ शहरी झाला. पशुसंवर्धन विषय घेऊन १९३१ मध्ये गालब्रेथ ह्यांनी टोराँटो विद्यापीठाची बी. एस्. पदवी संपादन केली. केंब्रिज विद्यापीठात काही काळ अध्ययन. नंतर अर्थशास्त्र विषय घेऊन १९३४ मध्ये त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठाची डॉक्टरेट मिळविली. १९३४–३९ या काळात ते हार्व्हर्ड विद्यापीठात अर्थशास्त्राचे अध्यापक होते. प्रिन्स्टन विद्यापीठात १९३९–४२ या काळात अर्थशास्त्राचे अध्यापन केल्यानंतर १९४३–४८ पर्यंत त्यांनी फॉर्च्युन  मासिकाच्या संपादक-मंडळावर काम केले. १९४८ पासून हार्व्हर्ड विद्यापीठात त्यांची अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली. १९६१–६३ या काळात ते अमेरिकेचे भारतातील वकीलही होते. भारतातील अनुभवांवर आधारलेला द अँबॅसडर्स जर्नल (१९६९) हा वाचनीय ग्रंथ त्यांनी प्रसिद्ध केला. भारतातून अमेरिकेस परतल्यानंतर गालब्रेथ पुन्हा हार्व्हर्ड बिद्यापीठात रुजू झाले. ‘अमेरिकन अकॅडमी ऑफ आर्ट्स अँड सायन्सेस’चे ते सन्मान्य सदस्य आहेत.

अर्थशास्त्रविषयक पारंपरिक कल्पनांवर हल्ला व अर्थशास्त्राचा नव्या दृष्टिकोनातून पुनर्विचार हे गालब्रेथ यांच्या लेखनांचे वैशिष्ट्य आहे. अमेरिकेसारख्या अत्यंत सधन देशात निर्माण होणाऱ्या नव्या आर्थिक समस्यांकडे त्यांनी द ॲफ्ल्युएंट सोसायटी (१९५८) हा ग्रंथ लिहून लक्ष वेधले. औद्योगिक क्षेत्रात प्रचंड प्रमाणात होत असलेल्या तांत्रिक प्रगतीमुळे रशिया आणि अमेरिका या साम्यवादी व भांडवलशाही देशांतील मूलभूत भेद कसा हळूहळू कमी होत आहे, याचे मूलग्राही विवरण त्यांनी द न्यू इंडस्ट्रियल स्टेट (१९६७) या ग्रंथामध्ये केले. अमेरिकन कॅपिटॅलिझम, द कॉन्सेप्ट ऑफ काउंटरव्हेलिंग पॉवर (१९५२), ए थिअरी ऑफ प्राइस कंट्रोल (१९५२) आणि द ग्रेट क्रॅश, १९२९ (१९५५) या तीन ग्रंथांतही त्यांच्या कुशाग्र बुद्धिमत्तेची चमक दिसून येते. द ट्रायम्फ (१९६८) ही कादंबरी, इंडियन पेंटिंग (१९६९) हा मोहिंदर सिंग रंधावा ह्यांच्याबरोबर लिहिलेला ग्रंथ, असे त्यांचे अन्य लेखन आहे. इकॉनॉमिक्स अँड द पब्लिक पर्पज (१९७३) हा त्यांचा अलीकडचा ग्रंथ. समकालीन भाडवलशाहीचे परीक्षण आणि तीमध्ये सुधारणा घडवून आणण्याकरिता सुचविलेल्या दीर्घकालीन उपाययोजना, यांसंबंधी ह्या ग्रंथात विचार करण्यात आला आहे.                                                                  

भेण्डे, सुभाष