आर्थिक विचार-इतिहास आणि विकास : आर्थिक प्रश्न हा मानवापुढे आदिकालापासून उभा रहात आलेला आहे.  प्राचीन भारतीय व ग्रीक वाङ्‍मयात आर्थिक प्रश्नांचा विचार झालेला आढळून येतो. पंधराव्या ते सतराव्या शतकांत झालेली व्यापारी क्रांती, अठराव्या शतकात सुरू झालेली औद्योगिक क्रांती व त्यानंतर गेल्या काही दशकांत प्रगत देशांत स्पष्ट दिसणारी औद्योगिक विकासाची नवी क्रांतिकारक गती यांमुळे आर्थिक प्रश्नांचा साक्षेपी व उत्तरोत्तर सूक्ष्मतर होत जाणारा विचार होणे स्वाभाविक होते.  म्हणूनच आर्थिक विचाराच्या विकासाचा उगम आपण पंधराव्या शतकाच्या मागे शोधावयाचे कारण नाही तसा शोध करावयाचा, तर केवळ ऐतिहासिक कुतूहल म्हणून करावा, परंतु त्या विचारधारेचा नंतरच्या विचारधारेशी संबंध जोडण्याचा खटाटोप करू नये, असा एक मतप्रवाह आहे. आर्थिक विचाराच्या खऱ्या विकासाला पंधराव्या शतकानंतरच गती मिळाली एवढाच या भूमिकेचा अर्थ होय. आर्थिक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या प्रयत्‍नांत अर्थशास्त्राचा विकास झालेला आहे.

आर्थिक विचारांच्या विकासाकडे भिन्न भिन्न दृष्टिकोनांतून पाहिले जाते. जॉन इन्ग्रॅम, कार्ल मार्क्स, एरिक रोल यांनी आर्थिक घटनांच्या आधारे विवेचन केले. एल्. कोसाने आर्थिक विचारांचा रचनात्मक आचार कसा बदलत गेला याचा मागोवा घेतला.  रोशर, स्पॅन, झ्वाईग यांनी मतप्रणालीवर आधारित विवेचन केले डूहरिंग, हेनी, शुंपेटर यांनी तात्त्विक दृष्टिकोनांतून अभ्यास केला आणि सॅलिन, झोंबार्ट यांनी पद्धतिशास्त्रातील विकासाचा मागोवा घेतला. हे सर्व दृष्टिकोन अभ्यसनीय असले, तरी विशिष्ट मतप्रणालीच्या आग्रहामुळे झालेले तत्त्वमंथन आणि केवळ वस्तुनिष्ठ भूमिकेतून आलेले तत्त्वमंथन या गंगायमुनांच्या अपरिहार्य संगमात, हे दोन प्रवाह जितके अधिक दूरवर आपल्याला वेगवेगळे पाहता येतील, तितके पाहण्याचा प्रयत्‍न करणे केवळ कुतूहलजनकच नव्हे, तर उपयुक्तही ठरेल.

व्यावहारिक आर्थिक प्रश्न अर्थशास्त्रविषयक विचाराला प्रेरणा देऊ शकतात, त्याप्रमाणे ते विचारही व्यावहारिक घटनांना नवी दिशा व गती देऊ शकतात. व्यापारवाद व प्रकृतिवाद या विचारप्रणालींच्या काळात हे आढळून आले.  ॲडम स्मिथचा प्रभाव इंग्‍लंडच्या संसदेच्या विचारसरणीवर पडला.  रिकार्डो, मॅल्थस यांच्या विवेचनाचाही शासनाने केलेल्या कायद्यांवर परिणाम घडून आला. फेबिअन समाजवादी गटाने प्रसिद्ध केलेल्या पुस्तिकामालेचा नवीन कायदे घडविण्यात उपयोग झाला. गेल्या तीन तपांच्या काळात केन्सने केलेल्या विवेचनाचा प्रभाव जगातील सर्व राष्ट्रांच्या अर्थकारणावर पडलेला आढळून येतो.

प्राचीन काळ : पाश्चिमात्य जगातील आर्थिक विचाराचा उगम प्राचीन ग्रीसमध्ये आढळून येतो. प्राचीन ग्रीसचा काळ एक विचारवैभवाचा काळ होता. अर्थशास्त्रीय प्रश्नांचे विवेचन त्या काळात नीतिविषयक व राज्यविषयक प्रश्नांशी निगडित होते.

प्लेटो, ॲरिस्टॉटल व झेनोफन यांनी आर्थिक प्रश्नांविषयी विवेचन केले आहे. सामाजिक जीवनाचे एक अविभाज्य अंग म्हणून ते आर्थिक प्रश्नांकडे पाहात होते.  कृषकवर्ग, क्षत्रियवर्ग यांवर आधारित अशी ग्रीक समाजरचना होती. या व्यवस्थेशी अनुरूप अशीच विचारधारा त्या काळात प्रसृत होणे स्वाभाविक होते. वैश्यवृत्तीला तुलनेने गौण स्थान होते. गुलामांचा वर्ग हा तर सामान्यपणे विचाराच्या कक्षेबाहेरच रहात असे. ग्रीक संस्कृतीचा इतर दृष्टींनी उत्कर्ष झालेला असला, तरी त्या संस्कृतीचे वैभव गुलामगिरीच्या संस्थेवर उभे होते. एक आवश्यक संस्था या दृष्टीनेच ग्रीक विचारवंत गुलामगिरीच्या संस्थेकडे पाहात असत.  त्या संस्थेचे समर्थनही ॲरिस्टॉटलने केले आहे.

उत्पादनाच्या क्षेत्रात प्‍लेटोने श्रमविभागणीचे तत्त्व मांडले. अशी श्रणविभागणी ही प्लेटोच्या समाजरचनेचे एक पायाभूत तत्त्व होती. पुढे अठराव्या शतकात ॲडम स्मिथने मांडलेल्या श्रमविभागणीच्या तत्त्वाप्रमाणे, ती वाढत्या बाजारपेठेसाठी करावयाच्या अधिक उत्पादनाच्या गरजेतून निर्माण झालेली नव्हती. झेनोफनने उत्पादनाच्या दृष्टीने शेतीचे मूलभूत महत्त्व सांगितले. पुढे सतराव्या शतकात उदयास आलेल्या प्रकृतिवादी विचारसरणीने शेतीला दिलेल्या महत्त्वाचा एक धागा येथे आपल्याला दिसू शकेल. झेनोफनच्या दृष्टीने जमीन व श्रमशक्ती हे उत्पादनाचे दोन महत्त्वाचे घटक होत. पुढे अर्थशास्त्राने यांत भांडवल व प्रवर्तक अशी आणखी दोन घटकांची भर घातली. साम्यवादी विचारसरणीचा भर जमीन व श्रमशक्ती याच घटकांवर पुढील काळातही राहिला. भांडवलशाहीच्या काही स्वीकृत कल्पनांची मांडणीही झेनोफनच्या विवेचनात आढळते.  व्यापारउद्योगासाठी भाग-भांडवलाच्या संस्था स्थापन करण्याची कल्पना त्याने मांडली होती. त्याचप्रमाणे अधिक श्रमविभागणी शक्य व्हावी म्हणून शहरांचा आकार मोठा असावा, असेही त्याचे म्हणणे होते.

अर्थशास्त्र हे एक स्वतंत्र शास्त्र असल्याची पुसटशी कल्पना ॲरिस्टॉटलला होती. प्लेटोने मांडलेल्या सामाजिक जीवनाच्या साम्यवादी पद्धतीच्या कल्पनेला त्याने विरोध केला. खाजगी मालमत्तेचे त्याने अत्यंत जोरदार समर्थन केले. मानवी स्वभावाशी खाजगी मालमत्तेची संस्था सुसंगत आहे, असे त्याचे सांगणे होते. परंतु खाजगी मालमत्तेच्या धारकांनी काही नैतिक बंधने आपण होऊन स्वीकारली पाहिजेत व खाजगी मालमत्तेचा दुरुपयोग होऊ नये, म्हणून समाजानेही तिच्या वापरावर काही बंधने घालणे सयुक्तिक होईल, हे ‍ॲरिस्टॉटलला मान्य होते. पैसा, विनिमय आणि मूल्य यांवरही ॲरिस्टॉटलने आपले विचार व्यक्त केले आहेत.

ग्रीक विचारवंतांनी राज्यशास्त्र, नीतिशास्त्र, तर्कशास्त्र, कला व अन्य भौतिक शास्त्रे यांच्या तुलनेने अर्थशास्त्राची फारशी दखल घेतलेली दिसत नाही.

मध्ययुगीन काळ : ग्रीक विचारसरणीची छाया रोमच्या वैभवाच्या कालखंडातही राहिली. रोमन साम्राज्याच्या विघटनानंतर आलेल्या असुरक्षिततेच्या व अस्थिरतेच्या काळात छोटेमोठे सरंजामदार सर्व यूरोपभर निर्माण झाले. या सरंजामशाहीला अनुरूप अशी अर्थव्यवस्था निर्माण होऊ लागली.  वस्तूंचे मूल्य मागणी-पुरवठ्याच्या तत्त्वाप्रमाणे ठरविले जाण्याऐवजी समाजातील प्रचलित चालीरीतींच्या अनुरोधाने ठरू लागले.

या काळात यूरोपमध्ये ख्रिश्चन धर्माचा सार्वत्रिक प्रसार झालेला होता. ऐहिक व्यवहारांतही चर्च लक्ष घालू लागले होते. या काळातील बहुतेक विचारवंत धर्मोपदेशकांच्या वर्गातील होते. ॲरिस्टॉटलचा नीतिशास्त्रावरील ग्रंथ हा त्यांचा विज्ञान व व्यवहार यांच्या बाबतीत प्रमाणग्रंथ होता.

या काळातील अर्थशास्त्रविषयक चर्चेतील प्रमुख प्रश्न ‘न्याय्य मूल्य’ कोणते समजावे, हा होता. मागणी व पुरवठा यांच्या आधारे ठरेल ते मूल्य योग्य मानले जात नव्हते. ग्राहकांची पिळवणूक होऊ नये, या दृष्टीने न्याय्य या संकल्पनेचा विचार होत होता व योग्य दर ठरविण्याचा प्रयत्‍न केला जात होता.सेंट टॉमस अक्वायनस (१२२५–१२७४) हा या कालखंडातील अर्थशास्त्राच्या क्षेत्रातील प्रमुख विचारवंत होय. ॲरिस्टॉटलच्या विभाजनाच्या व विनिमयाच्या क्षेत्रातील न्यायाच्या कल्पनेचा त्याने पाठपुरावा केला. प्रत्येकाला त्याच्या समाजातील स्थानाला साजेसे व त्याच्या नेहमीच्या सवयीच्या गरजा भागतील असे वेतन दिले जावे, ही त्याची विभाजनाच्या क्षेत्रातील न्यायाची व्याख्या  होती. परंपरागत समाजरचनेची व्यवस्था तशीच चालू ठेवण्याचा आशय यात सहजच येतो. कर्जाऊ दिलेल्या रकमेवर व्याज आकारण्यास सेंट टॉमसचा विरोध होता. विनिमयाच्या क्षेत्रात ग्राहक व विक्रेता या दोहोंचेही समाधान होईल, असे मूल्य ठरविणे त्याच्या दृष्टीने न्याय्य होते. ग्राहक व विक्रेता यांचे समाधान हा अर्थशास्त्राच्या सखोल अभ्यासाचा विषय म्हणून अनेक शतके टिकून राहिला.

व्यापारवाद: पंधराव्या शतकापासून जागतिक व्यापाराच्या विकासाला सुरुवात झाली. नवीन प्रदेशांचा शोध लागला होता.  अमेरिका, ऑस्ट्रेलिया यांसारखी खंडे इतर जगाला प्रथमच ज्ञात झाली. केप ऑफ गुड होपला वळसा घालून पश्चिम यूरोपकडून सरळ पूर्वेकडील देशांना नेणारा जलमार्ग सापडला. नव्या प्रदेशांतून सोने व चांदी यांचा प्रवाह यूरोपकडे वाहू लागला व त्यावर आधारीत चलनाच्या पुरवठ्यात वाढ झाली.  त्या काळच्या पुढारलेल्या सर्व देशांत व्यापारी हालचाली जोरात सुरू झाल्या. या व्यापाराच्या वेगवान विकासाचा परिणाम अर्थव्यवस्थेवर व आर्थिक विचारप्रणालीवर होणे अपरिहार्य होते.


जुन्या सरंजामशाहीच्या काळात सरंजामदार वर्गाच्या हातात असलेली वर्चस्वाची सूत्रे व्यापारी वर्गाकडे आता संक्रमित होत होती. सरंजामशाहीतील छोट्या छोट्या संस्थानांच्या अस्तित्वामुळे व्यापाराच्या मार्गात करांच्या व इतर बंधनांच्या अडचणी निर्माण होत होत्या. मोठ्या आकाराचे राष्ट्र अस्तित्वात असावे व ते इतर राष्ट्रांशी तुलनेने समर्थ असावे, अशी या परिस्थितीची प्रेरणा होती.

राष्ट्र जर अधिक समर्थ व्हावयास हवे असेल तर त्या राष्ट्राकडे अधिक सुवर्णसंचय असणे आवश्यक आहे, अशी व्यापारवादाची धारणा होती. यासाठी सुवर्णाचा प्रवाह देशातून बाहेर जाऊ देता कामा नये, असा सुवर्णरक्षक लोकांचा (बुलियनिस्ट्स) आग्रह होता.  व्यापारवाद याच्याही पुढे जाऊन अन्य देशांतून आपल्या देशात सुवर्ण आयात व्हावे, यासाठी आयात-निर्यात व्यापाराचा विचार करीत असे. परदेशातून आयात होणाऱ्या मालापेक्षा, परदेशास आपल्या देशातून निर्यात होणारा माल अधिक असेल, तर असा आंतरराष्ट्रीय व्यवहाराचा ताळेबंद इष्ट होय कारण अधिक निर्यात झालेल्या मालाचे मूल्य दुसऱ्या राष्ट्राला आपल्याला सुवर्णाच्या रूपात चुकते करावे लागेल व त्यामुळे आपल्याकडील सुवर्णसाठा वाढत जाईल व राष्ट्र अधिक समर्थ होईल, अशी व्यापारवादाची विचारसरणी होती. यामुळेच निर्यातीपेक्षा आयात अधिक झाल्यास, त्या ताळेबंदाला व्यापारवादी लोक ‘आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अनिष्ट ताळेबंद’ असे म्हणत कारण त्या परिस्थितीत राष्ट्राला सुवर्ण निर्यात करावे लागे.

व्यापारवादाच्या या मुख्य सूत्रातून त्याची इतर आर्थिक धोरणेही आपोआपच ठरून गेली.  कमी वेतन देऊन अधिक काम करून घेता आले, तर वस्तूंच्या किंमती कमी राहून चढाओढीने माल निर्यात करता येण्याची शक्यता निर्माण होते म्हणून मजूरवर्गाला निकृष्ट अवस्थेत ठेवून त्याच्याकडून भरपूर काम करून घेण्याच्या दिशेने धोरणे आखली जाऊ लागली. आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या दृष्टीने उद्योगधंद्यातील उत्पन्न हे अधिक महत्त्वाचे होते. अन्नधान्याच्या किंमती वाढून मजुरीचे दर वाढविण्यात त्याची परिणती करावी लागू नये, म्हणून अन्नधान्यावरील आयात-कर दूर करण्यात आले व अन्नधान्याला त्या काळापर्यंत मिळालेले संरक्षण दूर झाले.  आयात होणाऱ्या तयार मालावर कर लादण्यात येऊ लागले.  या आयातनिर्यात व्यवहाराला पोषक असे आर्थिक शोषणाचे धोरण आखले जाऊ लागले.

या प्रकारची धोरणे वेगवेगळ्या देशांत वेगवेगळ्या वेळी व तात्कालिक परिस्थितीप्रमाणे कमीअधिक प्रमाणात स्वीकारण्यात आली.  आपल्याला व्यापारवादी म्हणवून घेणारा असा एखादा विचारवंतांचा गट अस्तित्वात नव्हता. या पद्धतीचा विचार करणाऱ्या लोकांना नंतर इतरांनी, विशेषतः ॲडम स्मिथने, व्यापारवादी असे नाव दिले. फ्रान्समध्ये ðझां बातीस्त कॉलबेअर (१६१९–१६८३) हा या विचारप्रणालीचा प्रमुख प्रवक्ता होता. राज्यशासनात अधिकारावर असताना त्याला आपले सिद्धांत व्यवहारात पारखून घेण्याची संधीही मिळाली. इंग्‍लंडमध्ये टॉमस मन (१५७१–१६४१) याने त्यात आणखीही भर घातली.  सर्वसाधारण किंमतीची पातळी व चलन पुरवठा यांत काही परस्परसंबंध आहे, याची टॉमस मनला जाणीव झाली होती.  त्याचप्रमाणे चलनाचे आंतरराष्ट्रीय व्यवहारातील तुलनात्मक मूल्य हे आंतरराष्ट्रीय व्यापारातील दोन्ही राष्ट्रांच्या चलनांच्या उपलब्ध पुरवठ्यावर अवलंबून राहते, याचेही आकलन टॉमस मनला झालेले होते.

व्यापारवादी अर्थशास्त्रावर तत्कालीन राजकीय विचारसरणीचा प्रभाव पडलेला दिसून येतो. बहुतेक अर्थशास्त्रज्ञ स्वतः व्यापारउदिमात गुंतलेले होते. त्या त्या वेळी जाणवणाऱ्या अडचणींच्या अनुषंगाने त्यांनी आपले विचार व्यक्त केल्याचे दिसते.  विषयांचा सखोल अभ्यास त्यांत अभावाने दिसतो. परिणामी पद्धतशीर आर्थिक विश्लेषणाची उभारणी व्यापारवाद्यांनी केली नसली, तरी वास्तवाचे भान ठेवून त्यांनी आर्थिक समस्यांचा ऊहापोह केला आणि शासनाच्या धोरणासंबंधीचे मूलग्राही विवेचन केले.

व्यापारवादाच्या जर्मनीतील विशेष प्रवृत्तीला ‘कॅमेरॅलिझम’ असे नाव आहे.  इंग्‍लंड व फ्रान्स यांसारख्या दर्यावर्दी राष्ट्रांतील लोकांचे लक्ष आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या प्रश्नाकडे अधिक केंद्रित होणे स्वाभाविक होते. जर्मनीतील विचारवंतांचे लक्ष, आंतरराष्ट्रीय व्यापारापेक्षाही अन्य कोणता आर्थिक विकास घडवून आणून, जर्मनीत त्या काळात अस्तित्वात असलेल्या अनेक संस्थानांच्या अधिपतींचे उत्पन्न कसे वाढविता येईल व त्या उत्पन्नाचा योग्य विनियोग कसा केला जाऊ शकेल, या गोष्टीकडे लागलेले होते. संस्थानिकांचे उत्पन्न व संस्थानाचे उत्पन्न यांत फारसा भेद त्या काळात अस्तित्वात नव्हता. इतर राष्ट्रांत व्यापारवादाचा प्रभाव अठराव्या शतकात जवळजवळ लयास गेला. जर्मनीमध्ये मात्र एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धापर्यंतही कॅमेरेलिझमचा प्रभाव चालू होता. 

प्रकृतिवाद : व्यापारवाद आणि प्रकृतिवाद यांच्या संधिकालात झालेल्या दोन अर्थशास्त्रज्ञांचा येथे निर्देश करणे आवश्यक आहे.  विचारवंताच्या कार्याचे महत्त्व त्याच्या स्वतःच्या काळात ओळखले जातेच असे नाही हा इतर क्षेत्रात येणारा अनुभव अर्थशास्त्राच्याही संदर्भात वारंवार आलेला आढळून येतो. रिचर्ड कांतियाँ (१६८० ?–१७३४) व फेर्नादो गाल्यानी (१७२८–१७८७) या दोघांची उदाहरणेही अशीच आहेत. काहींच्या मते कांतीयाँ हा ॲडम स्मिथच्या पूर्वीच्या काळातील सर्वांत मोठा अर्थशास्त्रज्ञ होय. परंतु याचे कार्य पुढे विल्यम जेव्हन्झने १८८१ मध्ये कांतीयाँचा एक लेख प्रसिद्ध करेपर्यंत असेच नजरेआड झाले होते. अजूनही त्याच्याविषयी किंवा त्याच्या विचारांविषयीची  पूर्ण माहिती उपलब्ध झालेली आहे, असे नाही. यशापयशाच्या अनिश्चिततेचा  धोका पतकरणे, हा प्रवर्तकाच्या कार्याचा महत्त्वाचा भाग आहे, याचे कांतीयाँने व्यापाराच्या संदर्भात विवेचन केले आहे.

गाल्यानी व कांतीयाँ हे व्यापारवाद व प्रकृतिवाद यांना जोडणारे दुवे होते असे मात्र नाही.  किंबहुना त्यांचे कार्य प्रकृतिवादानंतरच्या अर्थशास्त्राच्या विकासाशी अधिक सदृश आहे. पुढे अधिक विकास पावलेल्या खालील कल्पनांचा निर्देश गाल्यानीच्या विवेचनात सापडतो : (१) वस्तूची किंमत आणि तिच्याविषयीची मागणी यांचा परस्परसंबंध असतो. (२) मागणी व पुरवठा यांतील फेरबदलाचे वेगवेगळ्या वस्तूंच्या बाबतीत होणारे परिणाम कमीअधिक तीव्र असू शकतात. (३) वस्तूंच्या किंमती व पैशाची क्रयशक्ती यांचा परस्परसंबंध असतो. (४) वस्तूचा उपभोग घेत असताना उपभोक्त्‍याला तिच्यापासून मिळणारी उपयोगिता प्रत्येक पाठोपाठच्या नगाबाबत कमी होत जाते. या सर्व सिद्धांताना अर्थशास्त्राच्या पुढील विकासाच्या दृष्टीने महत्त्व आहे. परंतु गाल्यानीचे ग्रंथ इंग्रजी भाषेत उपलब्ध नव्हते. या विचारांच्या विकासाला इंग्‍लंड व फ्रान्समधील विचारवंतांच्या विचारक्षेत्रात सुरुवात व्हावयासही एक शतकाहून अधिक काळ अद्याप लोटावयाचा होता. गाल्यानीच्या कार्याचे श्रेय अजूनही त्याला मिळालेले नाही, असा काही लोकांचा दावा आहे.

या दोन विचारवंतांची वैचारिक झेप बाजूला ठेवली, तर व्यापारवादाचे आर्थिक विचाराच्या विकासातील स्थान क्रमशःच प्रकृतिवादाने घेतले. प्रकृतिवाद ही एका दृष्टीने व्यापारवादाच्या धोरणाविरुद्ध झालेली प्रतिक्रिया होती. ð फ्रांस्पा केने (१६९४–१७७४) हा फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ या विचारसरणीच्या लोकांचा नेता होता. केनेचा अनुयायी आन त्यूर्गो (१७२७–१७८१) याला १७६१ ते १७७६ या काळात प्रकृतिवादाचे विचार प्रत्यक्ष राबवून पाहण्याची फ्रान्समधील राज्यशासनात संधीही मिळाली.  त्याच्या धोरणामुळे ज्या वर्गांच्या हितसंबंधांना धक्का पोचला, त्या लोकांनी सोळाव्या लुईला त्याच्या इच्छेविरुद्ध त्यूर्गोला अधिकारावरून दूर करावयास भाग पाडले.

व्यापारवादी लोकांचा भर व्यापारावर होता, तर प्रकृतिवादी लोकांचा भर शेतीवर होता. त्यांच्या मते खरे उत्पादन हे कृषिक्षेत्रातच होत असते कारण तेथेच एक दाणा पेरून अनेक पटींनी फळ मिळू शकेल, असे निसर्गाचे वरदान असते.  ईश्वराने निसर्गाला दिलेल्या शक्तीप्रमाणे निसर्गसत्तेला आपले कार्य करू देणे हे सर्वोत्कृष्ट धोरण होय, अशी प्रकृतिवादाची भूमिका होती. यामुळेच शासनाने निसर्गदत्त अर्थव्यवस्था आपल्या ढवळाढवळीने बिकृत करणे अनिष्ट आहे, असा त्याचा निष्कर्ष होता.  त्याच्यानंतर आलेल्या सनातनवादाप्रमाणे प्रकृतिवादही अनिर्बंध अर्थव्यवस्थेच्या म्हणजेच निर्हस्तक्षेपी धोरणाचा पुरस्कर्ता होता. ‘हस्तक्षेप करू नका, जग आपली काळजी घ्यावयास समर्थ आहे’, अशा आशयाची त्यांची ‘लेसे फेअर’ ची घोषणा व तिचे प्रतिवाद यांनी अर्थशास्त्रातील चर्चा पुढे दीर्घकाल निनादत राहिली. राष्ट्रांच्या आर्थिक व्यवहारांवरही या सूत्राचे दीर्घकालीन परिणाम घडून आले.


राष्ट्राच्या आर्थिक व्यवहारात कृषिक्षेत्रातच (यातच पशुपालनाचाही समावेश आहे) काय ते खरे उत्पादन होत असते, असे प्रकृतिवादाचे मुख्य सूत्र होते. इतर काही व्यवसाय उपयोगी असले, तरी त्यांतून अधिक नवे उत्पादन होत नसल्यामुळे प्रकृतिवाद त्या व्यवसायांना अनुत्पादकच समजत असे. कृषिक्षेत्रातील उत्पन्न हेच राष्ट्राला जीवनधारणेसाठी उपलब्ध असणारे उत्पन्न होय व सर्व व्यावसायिकांना यातूनच आपल्या उपजीविकेसाठी वाटा मिळत असतो, ही त्याची भूमिका होती.  या मूळ उत्पन्नाचे राष्ट्राच्या आर्थिक व्यवहाराच्या प्रक्रियेत कसे अभिसरण होते, हे दर्शविणारा एक अर्थाभिसरणाचा तक्ता केने याने १७५८ मध्ये प्रसिद्ध केला.

राष्ट्राच्या अर्थव्यवस्थेतील अर्थाभिसरणाची केनेची कल्पना पुढीलप्रमाणे होती : त्याच्या मते समाजात तीन वर्ग असतात : (१) उत्पादक कृषिकवर्ग, (२) खाजगी मालमत्तेचे धारक व सरकारी अधिकारी यांचा वर्ग आणि (३) व्यापारी, नोकर व अन्य व्यावसायिक यांचा अनुत्पादक वर्ग.  केनेने घेतलेल्या उदाहरणाप्रमाणे पहिल्या उत्पादक वर्गाने निर्माण केलेले उत्पन्न ५०० कोटी फ्रँकचे धरले, तर या उत्पन्नाचे अभिसरण पुढीलप्रमाणे होते : या उत्पादक वर्गाच्या उपजीविकेसाठी व उत्पादन खर्चासाठी २०० कोटी फ्रँकचे उत्पन्न ठेवून घेण्यात येते उरलेले ३०० कोटी फ्रँक हे नक्त उत्पादन होय. यापैकी १०० कोटी अनुत्पादक वर्गाला कृषिक्षेत्रात उपयोगी पडणाऱ्या ज्या वस्तू तो वर्ग निर्माण करतो, त्यासाठी देण्यात येतात. (वस्तूची तिच्यावर प्रक्रिया करून ती अधिक उपयुक्त करणे-जसे लोखंडापासून नांगर निर्माण करणे- हेही उत्पादनच आहे, ही अर्थशास्त्रात पुढे मान्यता पावलेली व्याख्या प्रकृतिवादाच्या विचाराच्या कक्षेत नव्हती). उरलेले २०० कोटी फ्रँक खाजगी मालमत्तेच्या धारकांना व सरकारला खंड व कर म्हणून देण्यात येतात.  या २०० कोटींपैकी १०० कोटी अन्नखरेदीसाठी कृषकवर्गाकडे परत येतात व उरलेले १०० कोटीही इतर मालाच्या खरेदीच्या मार्गाने कृषकवर्गाकडे परत येतात.  याप्रमाणे मूळ ५०० कोटींचे अभिसरणचक्र पूर्ण होते.

वरील अभिसरणचक्राचे विवेचन हे पुढे विसाव्या शतकात विकसित झालेल्या साकलिक अर्थशास्त्राच्या विवेचनाचा पहिला टप्पा मानता येईल.  केनेच्या क्रांतदर्शित्वाचा हा पुरावाच होय.  हे विचार जवळजवळ दीड शतकांहून अधिक काळ सुप्तपणे पडून राहिले.

व्यापार व व्यवसाय यांना महत्त्वाचे स्थान देऊन शहरांचे महत्व वाढवावयाचे व शेतीला गौण लेखून ग्रामीण विकासाकडे दुर्लक्ष करावयाचे, हे व्यापारवादाचे सूत्र होते.  कॉलबेअरने आपल्या  प्रत्यक्ष राज्यव्यवहारात याच धोरणाचा पाठपुरावा केला होता,  प्रकृतिवाद हे या धोरणाला दुसऱ्या टोकाचे उत्तर होते. प्रकृतिवादाने शेतीला एकमेव उत्पादक म्हणून महत्त्व देऊन व्यापार व व्यवसाय यांना अनुत्पादक या सदरात टाकले. पुढे ॲडम स्मिथने केलेल्या विधानाप्रमाणे, ‘लोखंडी कांब जर एका बाजूला वाकविली गेली असेल, तर सरळ करण्यासाठी ती दुसऱ्या दिशेने तितकीच जोराने ओढावी लागते’. प्रकृतिवाद ही व्यापारवादावरील अशीच विरोधी प्रतिक्रिया होती.

सनातनवाद : (क्लासिकल इकॉनॉमिक्स). ð ॲडम स्मिथ (१७२३-१७९०) याला अर्थशास्त्राचा जनक अशी पदवी देण्यात येते.  ही पदवी ॲडम स्मिथला यथार्थपणे देता येईल की नाही, हा थोडासा वादाचा विषय आहे. कारण त्याच्या आधीपासूनच अर्थशास्त्राच्या चर्चेला काही आकार येऊ लागला होता. परंतु सनातनवादाच जनक हे ॲडम स्मिथचे स्थान मात्र निश्चित आहे.  अर्थशास्त्रातील काही प्रभावी विचारवंत या परंपरेचे पाईक होते व ही परंपरा सुमारे एक शतक आर्थिक विचाराच्या विकासावर व पर्यायाने  राष्ट्रांच्या आर्थिक धोरणावर परिणाम करीत राहिली. ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो (१७७२–१८२३), टॉमस मॅल्थस (१७६६–१८३४), जॉन स्टूअर्ट मिल (१८०६–१८७३) हे आंग्‍ल अर्थशास्त्रज्ञ व झां बातीस्त से (१७६७–१८३२) हा फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ हे या परंपरेतील प्रमुख अर्थशास्त्रज्ञ होत.

ॲडम स्मिथचाॲन इन्क्वायरी इनटू द नेचर अँड कॉझेस ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स  हा ग्रंथ १७७६ मध्ये प्रसिद्ध झाला.  खुला व्यापार, खुली स्पर्धा आणि श्रमविभाग ही तत्त्वे व्यापारवादाला आपल्या राष्ट्राच्या सीमेच्या आत हितावह वाटत होती.  याच तत्त्वांचा आचार आंतरराष्ट्रीय व्यवहारांतही करावा, अशी स्मिथची  भूमिका होती. परंतु याहीबाबत काही व्यावहारिक तडजोड त्याला मान्य होती व राष्ट्राच्या संरक्षणाच्या दृष्टीने या व्यवहाराला मुरड घालावी लागली तरी घालावी, असे त्याचे मत होते. ‘संरक्षण हे समुद्धीपेक्षा अधिक श्रेयस्कर आहे’, असे त्याचे वचन प्रसिद्ध आहे.  इतर राष्ट्रांच्या आयातकरविषयक धोरणाचा प्रतिवाद म्हणून एखाद्या राष्ट्राने आयातकराचे हत्यार काही काळ वापरावयाचे ठरविल्यास, तेही त्याला मान्य होते.

प्रकृतिवादाविषयीचे त्याचे एक मत वर आलेच आहे. उत्पादनाच्या दृष्टीने शेतीचे महत्त्व असले, तरी व्यापार व उद्योग हे प्रकृतिवाद मानतो त्याप्रमाणे अनुत्पादक व्यवसाय नसून तेही उत्पादकच आहेत, अशी त्याची भूमिका होती. परंतु प्रत्यक्ष वस्तूच्या स्वरूपात परिणत न होणाऱ्या वकील, डॉक्टर व तत्सम व्यावसायिकांच्या श्रमांचा मात्र स्मिथही अनुत्पादक याच सदरात समावेथ करीत असे.

शासनाने अर्थव्यवहारात हस्तक्षेप करू नये, अशीच प्रकृतिवादाप्रमाणे सनातनवादाचीही भूमिका होती परंतु शासनालाही योग्य अशी कार्यक्षेत्रे सांगताना संरक्षण, न्याय, शिक्षण यांच्याबरोबरच मक्तेदारी निर्माण होऊ न देणे, सार्वजनिक महत्त्वाच्या व्यवसायांचे नियंत्रण करणे, योग्य करपद्धती आखणे ही कार्येही त्याने सांगितली होती. मात्र एरवी सर्वसाधारणपणे शासनाने अर्थव्यवहारात हस्तक्षेप न करण्याचे धोरणच सर्वोत्कृष्ट होय, अशी त्याची व सर्व सनातनवाद्यांचीही भूमिका होती. प्रत्येक व्यक्ती आपापल्या हितासाठी धडपडत असते आणि समाज हा व्यक्तींचा समुदाय असल्यामुळे व्यक्तीचे हित साध्य झाले की, समाजाच्या एकूण हितातही तेवढी भर पडतेच म्हणून समाजहिताच्या दृष्टीने सर्व व्यक्तींना आपापले हित साधण्याला पूर्ण मोकळीक देण्याचे धोरणच इष्ट होय, अशी  ही विचारसरणी होती.

जगात अनेकविध असंख्य वस्तूंचे उत्पादन केले जाते जगाच्या दूरवरच्या भागांत केले जाते ग्राहकांच्या गरजेप्रमाणे या उत्पादनात फेरबदल होत जातो आणि या सर्व विश्वव्यवहाराचे कोणीही व्यक्ती वा शासन मार्गदर्शन किंवा नियंत्रण करीत नसताना हे सर्व घडून येते. याचे स्मिथला एवढे आश्चर्य व कौतुक वाटत होते की, या सर्व क्रिया एखाद्या अदृश्य हाताच्या (इनव्हिझिबल हँड) मार्गदर्शनानेच एखादी शक्ती करीत असते, असे सुचविणेही त्याला सयुक्तिक वाटत होते.  सनातनवादाच्या नंतरच्या टीकाकारांना या कौतुकाचेच आश्चर्य वाटले आणि अदृश्य हाताच्या मार्गदर्शनाने विश्वव्यवहारात घडणाऱ्या अनेक विपरीत परिणामांचा रागही आला.


परंतु शासनाने आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करू नये, हा सिद्धांत आणि खाजगी मालमत्तेवरील व्यक्तीचा हक्क अबाधिक ठेवावा हा त्यातून निघणारा उपसिद्धांत, हे सनातनवादाचे पायाभूत विचार होते.  या सिद्धांतांचा प्रचार करून मँचेस्टर संप्रदायाने अन्नधान्याच्या  आयातीवर निर्बंध घालणारे कायदे (कॉर्न लॉज) रद्द करून घेण्यात यश मिळविले.  या अन्नधान्य कायद्यांचा इंग्‍लंडच्या औद्योगिक विकासावर विपरीत परिणाम होत होता.  आयातीवरील निर्बंधांमुळे अन्नधान्याच्या किंमती अधिक रहात व त्यामुळे मजुरीचे दरही अधिक वाढवावे लागत. इतर राष्ट्रांना इंग्‍लंडकडे अन्नधान्य पाठविता न आल्यामुळे त्या राष्ट्रांची इंग्‍लंडमधील तयार माल खरेदी करण्याची शक्तीही कमजोर होई.  हे कायदे रद्द होणे इंग्‍लंडच्या औद्योगिक विकासास उपकारक ठरले.

श्रमविभागणीच्या तत्त्वाचे महत्त्व स्मिथने स्पष्ट करून सांगितले आहे. श्रमविभागणी किती सूक्ष्म करता येईल, हे बाजारपेठ किती मोठी आहे व वस्तूला मागणी केवढी आहे यांवर अवलंबून राहील, हे त्याने निदर्शनास आणले. बाजारपेठेचा विस्तार वाहतुकीच्या साधनांच्या विकासावर अवलंबून असतो, असे विवेचनही स्मिथने केले आहे.

वस्तूचे मूल्य कसे ठरते, हा अर्थशास्त्रातील एक महत्त्वाचा प्रश्न असतो.  ते वस्तूची बाजारपेठेतील तात्कालिक किंमत, मागणी व पुरवठा यांबाबतच्या परिस्थितीवर अवलंबून असते.  परंतु वस्तूची दीर्घ काळात ठरणारी  किंमत ही उत्पादन-परिव्ययाशी निगडित असते व हा उत्पादनपरिव्यय त्या वस्तूच्या उत्पादनासाठी किती श्रम खर्च पडतात यांवर अवलंबून असतो, असे याचे ॲडम स्मिथने केलेले श्रममापनावर आधारित मूल्यविवेचन होते.  हे श्रममापन करताना कमीअधिक तंत्रज्ञानाच्या व कौशल्याच्या श्रमांचे मापन एका सरसकट मापाने न करता तुलनात्मक कोष्टकाच्या आधारे करावे लागेल, याची जाणीव स्मिथच्या मांडणीत आहे.  या श्रमानुसार मूल्यनिर्धारण सिद्धांताचा पाठपुरावा नंतर ðडेव्हिड रिकार्डो  याने केला. हाच सिद्धांत वापरून मार्क्सने आपला अधिशेष मूल्याचा व भांडवलशाहीत मजुरांच्या होणाऱ्या आर्थिक शोषणाचा सिद्धांत मांडला.

‘जमिनीचा खंड ही एक अनर्जित मिळकत आहे’, हा सिद्धांत रिकार्डोने पुढे स्पष्ट केला. पण या विचाराची पूर्वसूचना स्मिथच्या विवेचनामध्येही मिळते.  त्याचप्रमाणे राष्ट्रीय उत्पन्न वाढते राहून लोकसंख्या जर त्या प्रमाणात वाढत गेली नाही, तरच मजुरांना वेतनवाढीची अपेक्षा राखता येईल, हेही त्याने सुचविले आहे.  मजुरीचे दर हे मजुराला किमान जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या वेतनाइतकेच नेहमी राहातील, ते त्याहून वर किंवा खाली जाऊ शकणार नाहीत, या रिकार्डो व मॅल्थस यांच्या विवेचनांत अभिप्रेत असलेल्या उपजीविका-वेतन सिद्धांताशी स्मिथची भूमिका मिळतीजुळती आहे. मजुरीचे दर उपजीविका-वेतनापेक्षा अधिक वर नेले, तर मजुरांच्या कुटुंबांचा आकार वाढेल, पर्यायाने मजुरांची संख्या वाढेल व मजुरीचे दर उपजीविका-पातळी पर्यंत खाली येतील. याउलट त्या पातळीच्याही खाली ते ढकलले गेले, तर मजुरांची संख्या कमी होईल व याचा परिणाम मजुरीचे दर पुन्हा उपजीविका-पातळीपर्यंत चढण्यात होईल, असा उपजीविका-वेतनाचा अटळ सिद्धांत आहे.  यात अलीकडे पलीकडे सरकण्यास वाव नसल्यामुळे, या सिद्धांताला वेतनमानाचा पोलादी सिद्धांत असेही नाव होते. त्या काळात अर्थशास्त्राला ‘उदास वृत्तीचे शास्त्र’ (डिस्मल सायन्स) असे नामाभिधान मिळण्याची जी काही  कारणे झाली, त्यांमध्ये सनातनवादाने केलेला या वेतन सिद्धांताचा स्वीकार हे एक प्रमुख कारण होते. कारण या सिद्धांताने मजुरांना अधिक वेतनमान मिळून त्यांचे जीवनमान कधी तरी सुधारेल, या आशेला जागाच शिल्लक ठेवली नाही.

 ‘चलनाचा पुरवठा वाढला की सर्वसाधारण भावमान वाढते’ हे ॲडम स्मिथच्या नजरेस आले होते. हीच गोष्ट रिकार्डोनेही पुढे गणिताचा उपयोग करून मांडण्याचा प्रयत्‍न केला.

रिकार्डोच्या नावाने विशेष प्रसिद्ध असलेला सिद्धांत म्हणजे भूमीचा ‘खंड सिद्धांत’ होय.  अर्थशास्त्रात निसर्गाकडून विनाश्रम प्राप्त झालेल्या कोणत्याही संपत्तीचा भूमी या संज्ञेने निर्देश केला जातो.भूप्रदेशावर होणारी शेती हे आद्य उत्पादनाचे साधन असल्यामुळे अशा दैवदत्त निसर्गसंपत्तीला ‘भूमी’  हे नाव मिळणे साहजिक होते.या निसर्गसंपत्तीवरच मानवी श्रम, भांडवल व प्रवत्रक यांचा वापर करून मानव आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंचे उत्पादन करीत असतो. शेतजमिनीबाबत ही प्रक्रिया कशी घडते, याचे उदाहरण घेऊन खंड सिद्धांत स्पष्ट करता येतो.

रिकार्डोच्या मते माणूस हा लागवडीसाठी जमीन निवडताना साहजिकच सर्वात सुपीक जमिनीची निवड प्रथम करतो.  कारण जमीन निसर्गतः जेवढी अधिक सुपीक, तितकी तेवढ्याच उत्पादनखर्चात अधिक उत्पादन मिळण्याची शक्यता अधिक. हा उत्पादनखर्च भरून निघाला पाहिजे, एवढ्या प्रमाणात उत्पादनाची-या उदाहरणात अन्नधान्याची-किंमत ठरत असते.  अन्नधान्यांची गरज लोकसंख्येच्या वाढीमुळे वाढली, की नवीन जमीन लागवडीखाली आणावी लागते. ही जमीन प्रथम लागवडीखाली आणलेल्या जमिनीपेक्षा साहजिकच कमी सुपीक असते. यामुळे या जमिनीवर तेवढेच उत्पादन करण्यासाठी उत्पादनखर्च अधिक प्रमाणात करावा लागतो.  हा खर्च भागण्याइतके अन्नधान्याचे भाव वाढलेले असतील, तरच ही जमीन लागवडीखाली  ठेवणे परवडते. या वाढलेल्या भावाचा फायदा प्रथम लागवडीखाली आलेल्या जमिनीलाही मिळत असतो.  या वाढलेल्या भावामुळे प्रथम लागवडीखाली आणलेल्या जमिनीतून उत्पादनखर्चापेक्षा मिळणारे अधिक उत्पन्न खंड म्हणून ओळखले जाते.  ज्यावेळी अन्नधान्याची मागणी अधिक वाढते, त्यावेळी तिसऱ्या क्रमांकाची जमीन लागवडीखाली आणली जाते आणि ही प्रक्रिया पुढे चालू राहते.  दुसऱ्या क्रमांकाच्या जमिनीलाही खंड मिळू लागतो व पहिल्या क्रमांकाच्या जमिनीला पूर्वी मिळत असलेल्या खंडात आणखी वाढ होते.

या विवेचनातून रिकार्डोने दोन निष्कर्ष काढले : (१) शेवटी लागवडीखाली आलेल्या जमिनीवरचा (म्हणजे सीमांत जमिनीवरचा) केवळ उत्पादनखर्च भागत असतो. त्या जमिनीला खंड मिळत नाही. या सीमांत जमिनीवरील उत्पादनखर्चाच्या प्रमाणात अन्नधान्याची किंमत ठरत असल्यामुळे व या जमिनीला खंड मिळत नसल्यामुळे खंडाचा समावेश अन्नधान्याच्या किंमतीत होत नसतो. (२) सीमांत जमिनीहून सुपीक असणाऱ्या जमिनींना मिळणारा खंड, केवळ कमी प्रतीची सीमांत जमीन लागवडीखाली आणण्याची गरज निर्माण झाली, या घटनेतून निर्माण होत असतो. या जमिनीच्या धारकांना हा खंड मिळविण्यासाठी काहीही करावे लागत नाही व म्हणून या खंडावर त्यांना काही अधिकार सांगता येणार नाही. ती त्यांची अनर्जित मिळकत होय. हा खंड कररूपाने समाजाने त्यांच्याकडून काढून घ्यावा.

अन्नधान्याच्या किंमती जसजशा वाढत जातील, तसतसे त्या प्रमाणात वेतन वाढवावे लागेल, याचा समावेश रिकार्डोने आपल्या वेतनविषयक उपजीविका-सिद्धांताच्या विवेचनात  केला होता.  उपजीविकावेतन-सिद्धांतामुळे त्याच्या विचारसरणीत मजूर व भांडवलदार यांच्यातील संघर्ष अनुस्यूत होता, त्याचप्रमाणे जमीनधारकांना मिळणाऱ्या अकारण खंडाच्या नफ्यावर होणाऱ्या परिणामामुळे भांडवलदार व जमीनदार यांच्यातील विरोधही त्याच्या विचारांच्या मांडणीत अंतर्भूत होता.


आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या क्षेत्रातही रिकार्डोने महत्त्वपूर्ण विवेचन केले. शासनाने अर्थव्यवस्थेत हस्तक्षेप करू नये, या धोरणाचा तो ॲडम स्मिथपेक्षाही अधिक जोरदार पुरस्कर्ता होता. उद्योगधंद्यांच्या संरक्षणासाठीही आयात कर ठेवणे त्याला मान्य नव्हते. आंतरराष्ट्रीय देण्याघेण्याचा ताळेबंद जुळवावा लागतो हेही त्याने स्पष्ट केले. आंतरराष्ट्रीय व्यापारात दोन्ही राष्ट्रांचा लाभ कसा होतो, हे विशद करणारा सिद्धांत त्याने मांडला त्या विवेचनाच्या आधारावरच पुढे मिल व इतर अर्थशास्त्रज्ञांनी खुल्या व्यापाराचे समर्थन केले.

करपद्धतीचा विचार करताना करापासून किती उत्पन्न होते, यापेक्षा या करांचा कोणावर कसा परिणाम होतो, हे पाहणे महत्त्वाचे आहे असेही रिकार्डोने सुचविले आहे.

तात्त्विक चिंतन व तर्कशास्त्राचा साक्षेपी वापर हे रिकार्डोच्या सिद्धांतांमागील मुख्य आधार होते. वस्तुस्थितीशी या सिद्धांतांचा किती संबंध आहे इकडे त्याचे लक्ष नसे. ðटॉमस मॅल्थस  या आपल्या समकालीन प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाबरोबर रिकार्डोच्या सविस्तर चर्चा होत असत.  या दोघांच्या पत्रव्यवहारात झालेल्या अर्थशास्त्रविषयक चर्चा सुप्रसिद्ध आहेत.  केन्स या विसाव्या शतकातील विश्वविख्यात अर्थशास्त्रज्ञाच्या मते, मॅल्थसची विचारपद्धती मागे पडून रिकार्डोच्या पद्धतीचा प्रभाव एक शतकभर अर्थशास्त्रावर राहिला, ही अर्थशास्त्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत दुर्दैवी घटना होय.  मॅल्थस हा व्यवहाराच्या भूमीवर आपले पाय पक्के रोवून विवेचन करण्याचा प्रयत्‍न करीत होता, तर रिकार्डोचे विवेचन उंच  ढगांतच अधांतरी तरंगत असे.  केवळ तर्कशुद्ध तात्त्विक चिंतनाने सत्यदर्शन होऊ शकत नाही, त्या तत्त्वांना वस्तुस्थितीचा आधार आहे की नाही हे तपासून पाहिले पाहिजे, याची रिकार्डोला नसणारी जाणीव मॅल्थसला होती.

मॅल्थसचे नाव त्याच्या काळापासून आजपर्यंत सर्वसामान्यपणे त्याच्या लोकसंख्याविषयक सिद्धांतामुळे माहीत आहे.  अर्थशास्त्राला ‘उदास शास्त्र’ हे विशेषण मिळावयास हा सिद्धांतही कारणीभूत झालेला होता.

मँल्थसचा मूलभूत सिद्धांत हा स्पष्ट व तसा सोपा होता. लोकसंख्येची वाढ व त्या लोकसंख्येला आवश्यक असणाऱ्या अन्नधान्याच्या पुरवठ्यातील वाढ ही ससा व कासव यांच्यामधील शर्यत आहे. लोकसंख्या  गुणोत्तरश्रेणीने वाढत असते, तर अन्नधान्याचे उत्पादन समांतरश्रेणीने वाढत असते. साहजिकच कालांतराने लोकसंख्या अधिक व अन्नपुरवठा कमी अशी परिस्थिती निर्माण होते.  याचा परिणाम युद्धे, दुष्काळ, रोगराई यांसारख्या आपत्तीमुळे लोकसंख्या कमी होण्यात होतो.  या आपत्तींतून निर्माण होणारे दुःख जर टाळावयाचे असेल, तर उशीरा विवाह करून व वैवाहिक जीवनात आत्मसंयम पाळून लोकसंख्येच्या  वाढीची गती  रोखणे आवश्यक आहे, एरवी वरील दुःखे अटळ आहेत असे मॅल्थसचे विवेचन होते.

औद्योगिक प्रगतीमुळे आता उत्तरोत्तर अधिकाधिक सुखाचा काळ येत जाणार आहे, अशी सुखस्वप्ने रंगविणाऱ्या  लोकांच्या विचारप्रणालीवर मॅल्थसचा हा सिद्धांत म्हणजे एक मोठा आघातच होता. १७९८ मध्ये मॅल्थसने आपला हा सिद्धांत लोकसंख्येवरील आपल्या प्रबंधात मांडला. याचीच दुसरी वाढविलेली आणि सुधारलेली आवृत्ती, उपलब्ध असलेल्या आकडेवारीची अधिक जोड देऊन मॅल्थसने १८०३ मध्ये प्रसिद्ध केली.

संततीची वाढ थांबविण्यासाठी संततिनियमनाच्या साधनांच्या वापराला मात्र मॅल्थसची अनुमती नव्हती.

एकतर फ्रान्सखेरीज इतर देशांत त्या पद्धतींची त्या काळात विशेष माहिती नव्हती व धर्माचा कृत्रिम संततिनियमनाला विरोध असताना मॅल्थससारखा कट्टर कॅथलिक माणूस  त्याचा लोकसंख्येच्या वाढीवरील एक उपाय म्हणून स्वीकार करील, हे संभवनीय नव्हते.  मॅल्थसचा मूलभूत सिद्धांत मानणारे, परंतु संततिनियमनाच्या साधनांचा वापर योग्य समजणारे लोक, काही दशकांनंतर तसाच प्रचार करू लागले व त्यांचा निर्देश नव-मॅल्थसवादी असा होऊ लागला.

आर्थिक इतिहासाच्या क्रमात घटना मात्र अशी घडली की, ज्या पाश्चात्य राष्ट्रांच्या संदर्भात मॅल्थसने आपले हे विवेचन केले, तेथे उत्तरोत्तर विविध शोधांमुळे अन्नधान्य व इतर उत्पादन वाढत गेले व त्यांतून जनतेचे जीवनमान झपाट्याने वर गेले.  या उच्च जीवनमानाची सवय झालेले लोक आपल्या कुटुंबाचे उच्च जीवनमान टिकविता व अधिक उंचावता यावे, यासाठी कुटुंबनियोजनाचा साहजिकच विचार करू लागले.  यातून लोकसंख्येच्या वाढीच्या गतीला आपोआपच पायबंद बसत गेला.  मॅल्थसचे विवेचन चुकीचे आहे, असेही त्या राष्ट्रांतील लोकांना वाटू लागले.

परंतु अप्रगत राष्ट्रांत, विशेषतः  आशिया खंडात, आजही मॅल्थसच्या सिद्धांताचा प्रत्यय आल्याखेरीज रहात नाही. या भागात अनेक कारणांमुळे आर्थिक प्रगती ज्या वेगाने व्हावयास पाहिजे, त्या वेगाने होत नाही याउलट दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात दुष्काळ व रोगराई पुष्कळ प्रमाणात नाहीशी झाल्यामुळे लोकसंख्येची वाढ मात्र झपाट्याने होत आहे.  या वाढच्या लोकसंख्येचे समर्थ पालनपोषण स्वावलंबी पद्धतीने कसे करावयाचे, हा या अप्रगत राष्ट्रांपुढील एक महत्त्वाचा प्रश्न आहे.

रिकार्डोच्या व त्या काळच्या एकूण अर्थशास्त्रातील विचारांच्या पुढे जाऊन मॅल्थसने केलेले दुसरे महत्त्वाचे विवेचन हे प्रभावी मागणीच्या संकल्पनेचे होते. ही संकल्पना तेजीमंदीच्या चक्राच्या विवेचानात पुढे एक शतकानंतरच्या कालावधीनंतर अनुस्यूत झाली, हे लक्षात घेतले तर तिचे  महत्त्व कळून येईल. मॅल्थसने ही संकल्पना अगदी स्पष्ट स्वरूपात मांडली होती असे नाही परंतु पुढे से या अर्थशास्त्रज्ञाने स्पष्टपणे मांडलेल्या बाजारपेठेच्या सिद्धांतापेक्षा हा अस्पष्टपणा अधिक वस्तुस्थितिनिदर्शक होता. ðझां बातीस्त से ह्याच्या बाजारपेठेच्या सिद्धांताप्रमाणे वस्तूंचे जेवढ्या मूल्याचे उत्पादन होते तेवढे मूल्य, उत्पादनकार्यात सहभागी होणाऱ्या गटांना त्यांच्या सहकार्याचे मोल म्हणून वाटले जाते व त्यांच्यामार्फत तयार झालेल्या वस्तूंच्या मागणीसाठी क्रयशक्ती म्हणून ते परत बाजारपेठेत येते. अशा रीतीने एकूण उत्पादनाइतकी एकूण मागणी, असा मेळ बसतो.  एखाद्या वस्तूच्या मागणीपुरवठ्याचा मेळ काही विशिष्ट कारणासाठी बसणार नाही परंतु बाजारपेठेतील एकूण मागणी व एकूण पुरवठा यांचा मेळ वरील विवेचनाप्रमाणे बसणे अटळ आहे , असा सेचा सिद्धांत होता. प्रथम दर्शनी हा सिद्धांत सरळ, स्पष्ट आहे असे वाटते परंतु आर्थिक मंदीच्या काळात एकदम  एकूण मागणी का घटते, याचा उलगडा सेच्या विवेचनात नाही.

सेने ॲडम स्मिथचे विचार फ्रान्समध्ये व यूरोपात प्रसृत केले. ‘उपयोगितेत वाढ करणे म्हणजेच उत्पादन होय’, अशी उत्पादनाची व्याख्या त्याने केली. ‘वस्तूच्या उपयोगितेवर तिचे मूल्य अवलंबून असते’, हा विचारही त्याने मांडला होता. प्रवर्तकाच्या कार्याचे स्वरूप त्याने स्पष्ट केले. भांडवलाच्या वापरासाठी दिले जाणारे व्याज व प्रवर्तकाला मिळणारा विशुद्ध नफा हे अलग दृष्टीने पाहणे यामुळे शक्य झाले.

ð जॉन स्टूअर्ट मिलचा प्रिन्सिपल्स ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी (१८४८) हा ग्रंथ सनातनवादाच्या प्रणालीतील शेवटचा महत्त्वाचा ग्रंथ होय. अनेक दशके अर्थशास्त्रात हा ग्रंथ प्रमाणभूत म्हणून मानला जात होता. परंतु सनातनवादाच्या परिवर्तनाचा एक प्रारंभबिंदू म्हणूनही मिलचे स्थान महत्त्वाचे आहे.


निर्हस्तक्षेपाच्या धोरणामुळे होणारे विपरीत परिणाम मिलच्या लक्षात आले होते.  मार्क्सच्या आधीच्या ‘यूटोपियन’ समाजवादी लेखकांच्या लेखनाचा त्याच्यावर प्रभाव पडला होता.  संपत्तीचे विभाजन एखाद्या अपरिवर्तनीय अशा निसर्गनियमाप्रमाणे होत नसून मानवाला आपल्या इच्छेप्रमाणे त्या विभाजनात बदल करता येतो, अशी त्याची भूमिका होती. लोकसंख्येवर प्रयत्‍नपूर्वक मर्यादा घालता येणे शक्य आहे, वेतनमान केवळ उपजीविका-वेतनाइतके निकृष्ट न राहता ते  सुखी जीवनमानाइतके वर जाऊ शकेल, यांसारख्या विवेचनाने त्याने सनातनवादातील उदास भाग दूर केला.

शासनाचा हस्तक्षेप योग्य की अयोग्य, हे त्या त्या प्रत्यक्ष परिस्थितीच्या संदर्भात ठरविले जावे, असे त्याचे सांगणे होते.  आपल्या आत्मचरित्रात त्याने स्वतःचा ‘समाजवादी’ असा निर्देश केला आहे. परंतु भांडवलशाहीचा नाश अटळ आहे, अशी त्याची विचारसरणी नव्हती. त्याला स्पर्धा इष्ट वाटत होती, व्यक्तिस्वातंत्र्याची त्याला बूज होती, आर्थिक समता त्याला इष्ट वाटत होती व वारसाहक्काने मिळणाऱ्या मिळकतीवर वारसाकर बसवावा, असेही त्याचे मत होते. परंतु व्हावयाचे परिवर्तन हे सावकाश, क्रमाक्रमाने होणे त्याला हिताचे वाटत होते. उत्पादकांच्या व ग्राहकांच्या सहकारी संघटना या प्रक्रियेत उपयोगी ठरतील, अशी त्याची अपेक्षा होती. केवळ भौतिक समृद्धीपलीकडेही मानवी जीवनाचे काही ध्येय असले पाहिजे, असे त्याला वाटत होते.  मिलची ही सर्व भूमिका भावी काळातील लोकशाही समाजवादाच्या विचारसरणीशी मिळतीजुळती आहे.

सनातनवादाच्या मर्यादा या काळापर्यंत व्यवहारात जाणवू लागल्या होत्या. भांडवलशाहीमध्ये उत्पादन वाढत होते, परंतु बहुसंख्य जनतेच्या जीवनमानावर त्याचे विपरीत परिणाम झालेले आढळून येत होते.  प्रसिद्ध इग्रंज साहित्यिक गोल्डस्मिथने वर्णन केल्याप्रमाणे ‘रचले इमले पिचले मानव’ (व्हेअर वेल्थ अक्युम्युलेट्स अँड मेन डीके) अशी अर्थव्यवस्थेची परिणती झालेली होती. ‘अदृश्य हात’ हे प्रश्न सोडवू शकत नाही, हे उघड झाले होते. आर्थिक उत्पादनाला दिशा दाखवून देण्याच्या व उत्पादनाचे योग्य प्रमाण दाखविण्याच्या बाबतीत अदृश्य हाताचे मार्गदर्शन अपुरे पडत होते. अर्थव्यवस्थेत खुली स्पर्धा चालू राहील, उत्पादन घटक सहजपणे कोणत्याही क्षेत्रात प्रवाहित होऊ शकतील व किंमती मोकळेपणाने लवचिक राहतील ही अदृश्य हातामागील सुरुवातीला स्पष्ट न झालेली गृहीतकृत्ये होती. या गृहीतकृत्यांच्या प्रत्यक्ष व्यवहारातील मर्यादांचा परिणाम अदृश्य हाताच्या मार्गदर्शनावर होणे अटळ होते.

 ‘आर्थिक मानव’ (इकॉनॉमिक मॅन) हे सनातनवादाचे एक मूलभूत गृहीतकृत्य होते. आपली गृहीतकृत्ये सनातनवादाला इतकी सूर्यासारखी उघड आणि स्पष्ट वाटत की, त्यांचा काही अधिक पुरावा देण्याची गरज त्याला वाटत नसे.  मानव हा आपले सर्व व्यवहार आर्थिक प्रेरणांमुळेच करतो, ही आर्थिक मानवाच्या कल्पनेमागील धारणा आहे. कमीत कमी कष्टात अधिक भौतिक सुख कसे मिळे, एवढीच या आर्थिक मानवाची चिंता असते व त्यासाठी तो सर्व काही करावयास तयार असतो. हा आर्थिक मानव मान्य केला की, तो कोणत्या परिस्थितीत कसा वागेल, याचे अनुमान करता येते.  सनातनवादाने अशीच अनुमाने केली. परंतु मानवाला मन असते, आर्थिक प्रेरणांखेरीज इतर बलवत्तर मानसिक प्रेरणाही या मनात वास करीत असतात, याचे भान सनातनवादाने ठेवले नाही.

खुल्या स्पर्धेचे अस्तित्व हेही एक गृहीतकृत्य असते. अगदी तात्त्विक कसोटीला उतरणारी अशी खुली स्पर्धा कोठेच कधी अस्तित्वात नसते. तथापि गृहीतकृत्यावर आधारित शास्त्रही उपयोगी होऊ शकते. भूमितिशास्त्राची अशी काही गृहीतकृत्ये आहेतच. बिंदू, रेषा या कल्पनाच आहेत. त्यांच्या तंतोतंत व्याख्यांप्रमाणे व्यवहारात बिंदू किंवा रेषा काढून दाखविणे शक्य नाही. परंतु तरीही अशा कल्पनांवर आधारित भूमितिशास्त्राचा उपयोग होतोच. गृहीतकृत्य वस्तुस्थितीपासून प्रत्यक्षात किती अंतरावर आहे, यावर शास्त्राची व्यावहारिक उपयोगिता अवलंबून असते. सनातनवादातील विचारवंतांनी आपल्या विवेचनात वस्तुस्थितीचा कधीच निर्देश केला नाही असे नाही. ॲडम स्मिथ, मिल यांनी तसा तो केला आहे. परंतु त्या सर्वांचा मुख्य भर तात्त्विक विवेचनावर होता.

ही उणीव लोकांना जाणवणे अटळ होते.  भांडवलशाहीच्या प्राथमिक अवस्थेतील विकासाला पोषक अशी ही विचारसरणी होती.  ती इंग्‍लंडसारख्या औद्योगिक दृष्ट्या प्रगत राष्ट्रांना उपकारक होती.  परंतु ज्या राष्ट्रांचा अद्याप विकास व्हावयाचा होता, त्यांना या विचारसरणीतून निष्पन्न होणाऱ्या खुल्या व्यापाराच्या तत्त्वातील धोका दिसत होता. प्रगत राष्ट्रांतही भांडवलदारांची परिस्थिती सुधारत आहे, परंतु मजुरांचे जीवन निकृष्ट होत आहे, हे आढळून येत होते लोकांना बेकार रहावे लागत आहे तेजीमंदीच्या चक्रात उत्पादनात खंड पडत आहे साधनसंपत्तीचा पूर्ण वापर होत नाही यांसारख्या उणिवा प्रत्यक्षात लोकांना जाणवत होत्या. या सर्व अडचणी काही काळ जाणवणाऱ्या तात्कालिक स्वरूपाच्या आहेत परंतु पुरेसा दीर्घ कालावधी दिला, तर अर्थशास्त्राच्या नैसर्गिक नियमानुसार सर्व काही ठाकठीक व सर्वोत्तम होईल, अशी सनातनवादाची अपेक्षा होती. यामुळे या अडचणी सनातनवाद महत्त्वाच्या  मानत नसे.‘शेवटी सर्व काही ठाकठीक होणारच आहे, कारण पुरेशा कालावधीनंतर आपण सर्वजण कालवश होणारच आहोत’, अशा शब्दात पुढे केन्सने या पद्धतीच्या विचारसरणीवर टीका केली आहे.

या परिस्थितीमुळे तत्कालीन विचारसरणीवर टीका करणारे लोक निर्माण होणे स्वाभाविक होते त्याचप्रमाणे तत्कालीन अर्थव्यवस्थेतील हितसंबंधांचे समर्थन करणारे लोकही पुढे येणे स्वाभाविक होते. फ्रेंच अर्थशास्त्रज्ञ क्लोद फ्रेदेरीक बास्त्या (१८०१–१८५०), अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ हेन्‍री कॅरे (१७९३–१८७९) ही प्रचलित अर्थव्यवस्थेचा पुरस्कार करणारी आशावादी मंडळी होती.  बास्त्या हा सरकारने ‘अर्थव्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप करू नये’ या मताचा कट्टा पुरस्कर्ता होता. ‘सूर्याच्या स्पर्धेपासून संरक्षणासाठी मेणबत्ती-कारखानदारांचा अर्ज’ असे संरक्षणाच्या तत्त्वाचे त्याने केलेले विडंबन प्रसिद्ध आहे.  कॅरेने रिकार्डोच्या खंडसिद्धांताच्या मांडणीला आक्षेप घेतला. मॅल्थसच्या लोकसंख्यासिद्धांतासही या लोकांचा विरोध होता.  भांडवल हे पूर्वीच्या श्रमातून भांडवलदाराने निर्माण केलेले असल्यामुळे भांडवलावर मिळणारे उत्पन्न योग्यच होय, असे या आशावादी विचारवंतांचे प्रतिपादन होते.  एकंदरीत सनातनवादातील निराशाजनक भाग दूर करून त्या वादावरील तो आक्षेप टाळणे, खुल्या स्पर्धेचा व भांडवलदारांचा पुरस्कार करणे आणि समाजवादी विचारसरणीला विरोध करणे हा या आशावादी मंडळीचा रोख होता परंतु अनुभवाने शहाणे झालेले जग अशा आशावादाच्या आहारी जाण्याइतके साधेभोळे राहिले नव्हते.

ॲडम स्मिथच्या विवेचनावर त्याचा समकालीन जेम्स लॉडरडेल (१७५९-१८३९) ह्या इंग्रज अर्थशास्त्रानेदेखील टीका केली होती. वस्तूचे मूल्य तिच्या पुरवठ्याच्या दुर्मिळतेवर अवलंबून असते, या व्यवहारातून व्यक्तींना संपत्ती मिळते व व्यक्तींची संपत्ती वाढली की, राष्ट्राची संपत्ती आपोआपच वाढते, हे विवेचन लॉडरडेलला मान्य होते.  हे विवेचन मान्य केले , तर कृत्रिम टंचाई निर्माण करून वस्तूचे मूल्य वाढविणे, (किंवा पाण्यासारखी एखादी वस्तू पूर्वी फुकट असेल, ती विकत घेण्यास लोकांना भाग पाडणे) हा संपत्ती वाढविण्याचा मार्ग म्हणून त्याची प्रशंसा करावी लागेल.  कृत्रिम टंचाई निर्माण करून मूल्य वाढविण्याचा हा प्रकार अगदीच काल्पनिक नाही, हे मान्य करावयास हवे.  आर्थिक मंदीच्या इतिहासात लोक उपासमारीचे क्लेश भोगत असतानाही भाव चढावेत म्हणून उत्पादित अन्नधान्याचा व फळाफळावळीचा मुद्दाम नाश करण्यात आल्याची उदाहरणे आहेत.

इतिहासवाद : (हिस्टॉरिकल स्कूल) सनातनवादाच्या विचारसरणीच्या विरोधी आवाज उठविणाऱ्‍यामध्ये ⇨ गेओर्ख फ्रीडरिख लिस्टचे (१७८९-१८४६) महत्त्वाचे स्थान आहे. सनातनवादाचे लक्ष्यकेंद्र व्यक्ती हे होते, तर लिस्टचे लक्ष्यकेंद्र राष्ट्र हे होते. राष्ट्राचे कल्याण व्हावयाला हवे असेल, तर राष्ट्राची उत्पादनशक्ती वाढली पाहिजे आणि शिक्षक, डॉक्टर, प्रशासक हे राष्ट्राची उत्पादनशक्ती वाढवावयास मदत करतात म्हणून हे वर्ग उत्पादक वर्गच समजले पाहिजेत, असे लिस्टने सांगितले. ॲडम स्मिथ या वर्गाना उत्पादक समजत नसे.  त्याचप्रमाणे मागास राष्ट्राच्या औद्योगिक विकासासाठी संरक्षक आयात करांची आवश्यकता लिस्टने प्रतिपादन केली. आर्थिक निर्णय हे प्रत्यक्ष वस्तुस्थितीच्या संदर्भाचा विचार करून घेतले पाहिजेत व जरूर तेथे शासनाने हस्तक्षेप केला पाहिजे, अशी त्याची भूमिका होती.  इतिहासवादी विचारसरणीचीच ही प्राथमिक मांडणी होय, असे म्हणावयास हरकत नाही.

सनातनवादाच्या विरोधी उठलेला दुसरा महत्त्वाचा आवाज आडाम म्यूलरचा (१७७९–१८२९) होता.  सनातनवादाने दिलेला व्यक्तिवादावरील व भौतिक समृद्धीवरील भर त्याला मान्य नव्हता.  व्यक्तीपेक्षाही समाज अधिक महत्त्वाचा आहे व समाजजीवनात समरस होणे हेच व्यक्तिजीवनाचे ध्येस असले पाहिजे, हा जर्मनीमध्ये त्या काळात मांडला जात असणारा तत्‍वज्ञानातील विचार त्याने आर्थिक क्षेत्रातही स्वीकारला. आर्थिक समृद्धी साधत असताना राष्ट्राने आपल्या सांस्कृतिक मूल्यांचेही भान ठेवले पाहिजे, असे त्याचे सांगणे होते. या प्रकारची प्रतिक्रिया ही स्वच्छंदतावादी संप्रदाय (रोमँटिक स्कूल) या नावाने ओळखली जाते. आर्थिक समृद्धीच्या प्रयत्‍नात होत असलेल्या इतर मूल्यांच्या र्‍हासाची या विचारसरणीच्या लोकांना जाणीव होती. इंग्‍लंडमध्ये विल्यम मॉरिस (१८३४–१८९६) या समाजवादी विचारवंताने हस्तव्यवसायाचे कलात्मक व सांस्कृतिक मूल्यांच्या रक्षणासाठी असेच समर्थन केले.

लिस्ट व म्यूलर यांच्या विचारधारांच्या पुढील इतिहासावर प्रभाव पडला.  सनातनवादाने अर्थशास्त्रीय प्रश्नांचे विवेचन मानवी जीवनाच्या इतर अंगांपासून  अलग काढण्याचा प्रयत्‍न केला होता. इतिहासवादाने या व विवेचनाचा मानवाच्या सामाजिक जीवनाशी संबद्ध असणाऱ्या इतर सर्व अंगांशी संबंध जोडण्याचा प्रयत्‍न केला.  अर्थशास्त्राच्या सामाजिक विवेचनाची ही सुरुवात होती.  व्हिल्हेल्म रोशन (१८१७–१८९४), ब्रूनो हिल्डेब्रांट (१८१२–१८७८), कार्ल नीस (१८२१–१८९८), गुस्टाफ श्मोलर (१८३८–१९१७), कार्ल ब्यूखर (१८४७–१९३०), व्हेर्नर झोंबार्ट (१८६३–१९४१) हे या परंपरेतील जर्मन विचारवंत होत. या विचारसरणीचा मुख्य प्रभाव जर्मनीमध्ये दिसून आला परंतु इंग्‍लंडमध्येही रिचर्ड जोन्स (१७९०–१८५५), क्‍लिफ लेस्ली (१८२५–१८८२), जेम्स थोरॉल्ड राजर्झ (१८२३–१८९०) व ðवॉल्टर बॅजट (१८२६–१८७७) यांसारखे या विचारसरणीने प्रभावित झालेले लोक होते.  अमेरिकेत विसाव्या शतकात जोराने पुढे आलेल्या संस्थावादालाही याच इतिहासवादाची पार्श्वभूमी होती.

सर्व कालखंडात सर्व जगाला सारख्याच पद्धतीने लागू होणारे, चिरतंन, जागतिक स्वरूपाचे अर्थशास्त्राचे सिद्धांत असू शकत नाहीत,  अशी इतिहासवादाची भूमिका होती.  त्या त्या काळच्या  व त्या त्या देशाच्या परिस्थितीच्या संदर्भात आर्थिक सिद्धांतांचा विचार व वापर करावा लागतो.  सनातनवादाशी इतिहासवादाचा असा विरोध होता.  त्याचप्रमाणे आर्थिक सिद्धांतांचा विचार करताना मानव हा केवळ एक आर्थिक प्रेरणा असणारा प्राणी आहे, अशा प्रमेयाच्या आधारे विचार न करता, त्याच्या जीवनाशी निगडित असणाऱ्या इतर सामाजिक  संदर्भांचाही विचार केला पाहिजे, असा इतिहासवादाचा आग्रह होता. देशातील परिस्थिती, समाजजीवनाचे संदर्भ यांविषयीही केवळ काल्पनिक अनुमाने न बांधता, प्रत्यक्ष अभ्यासाच्या व पाहणीच्या आधारे आपले विवेचन केले पाहिजे, असे इतिहासवादाचे सांगणे होते.  केवळ अशा अभ्यासानेच सिद्धांत शोधता येतात व परिस्थितीचा संदर्भ कालांतराने बदलला की, त्याच देशात एकदा स्वीकारलेले सिद्धांतही अग्राह्य होऊ शकतात, ही गोष्ट त्यांना एक मूलभूत सिद्धांत म्हणून मान्य होती.  अर्थशास्त्राने प्रश्नाच्या आर्थिक बाजूबरोबरच त्याच्या नैतिक बाजूचाही विचार केला पाहिजे, असेही पुढेपुढे इतिहासवादी प्रतिपादन करू लागले.  सनातनवादी नैतिक बाजूच्या विवेचनात शिरत नसत.  नैतिक अनैतिक याची त्यांना चाड नव्हती असे नव्हे परंतु तो विचार एक आर्थिक अंगाचा विचार करणारे शास्त्र या दृष्टीने, अर्थशास्त्राच्या कक्षेत येऊ शकत नाही, अशी त्यांची तटस्थ ‘शास्त्रीय’ भूमिका होती.  सनातनवाद व इतिहासवाद यांत असा मूलभूत भेद होता.

सभोवतालच्या आर्थिक परिस्थितीविषयी मनात तीव्र असमाधान असणारे इतरही अनेक विचारवंत होते. गरिबांविषयीच्या कळवळ्याने त्यांची परिस्थिती सुधारावी, म्हणून विचार करणारे धार्मिक वृत्तीचे ख्रिश्चन विचारवंत होते.  या लोकांचा समाजवादाला विरोध होता.  खाजगी मालमत्तेचा हक्क नाहीसा करणे त्यांना मान्य नव्हते परंतु त्या हक्काचा गैरवापर होता कामा नये, असा त्यांचा आग्रह होता. ‘मजुरांची स्थिती’ या विषयावर १८९१ मध्ये तेरावा पोप लिओ याने काढलेले प्रकटन (एनसायक्लिकल) या विचारसरणीच्या अधिकृत मांडणीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.  अकरावा पोप पायस याने १९३१ मध्ये या प्रकटनाच्या चाळिसाव्या वार्षिक दिनानिमित्त काढलेले प्रकटन याच विचारसरणीचा पुरस्कार करणारे आहे.

केवळ भौतिक समृद्धीच्या मागे लागल्यामुळे होणाऱ्या अनर्थाने अस्वस्थ होऊन एमर्सन (१८०३–१८८२), थोरो (१८१७–१८६२) यांसारख्या अमेरिकेतील व कार्लाइल (१७९५–१८८१), जॉन रस्किन (१८१९–१९००) यांसारख्या ब्रिटिश विचारवंतांनाही आपले विचार मांडले आहेत.

आर्थिक समृद्धीच्या प्रयत्‍नात निर्माण होणाऱ्या दुःखाने व्यथित झालेल्या या परंपरेचे प्रतिबिंब पुढे आपल्याकडे गांधीजींच्या विचारांत आढळून येते.  जॉन रस्किन याच्या अनटू धिस लास्ट या ग्रंथाचे वाचन गांधीजींच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यास कारणीभूत झाले. सुसंस्कृत समाधानी जीवन हेच खरे वैभव आहे, हे रस्किनच्या विवेचनाचे मुख्य सूत्र आहे.  आपल्या जीवनाचा असा विकास करून आपली शक्ती व साधनसंपत्ती वापरणारा माणूस हा सर्वात वैभवशाली होय, असे रस्किनचे सांगणे होते.

समाजवाद : चालू परिस्थितीविषयी तीव्र असमाधान असणारी आणखी एक महत्वाची विचारधार  या काळात प्रभावी होत होती ती समाजवादी विचारधारा होय.  या विचाराच्या मांडणीत ð कार्ल मार्क्सचे (१८१८–१८८३) स्थान अनन्यसाधारण आहे.  यामुळे या विचारसरणीचा विचार करताना मार्क्सच्या आधीच्या कालखंडातील  विचार व मार्क्सनंतरच्या कालखंडातील विचार असे भाग सहजपणे करता येतात.

साम्यवाद व समाजवाद यांत अलीकडे भेद करण्यात येतो. मार्क्सच्या विवेचनात असा स्पष्ट फरक नाही परंतु अलीकडे मार्क्सप्रणीत विचारसरणीला ‘साम्यवाद’ अशी संज्ञा सामान्यपणे वापरण्यात येते आणि साम्यवादी पद्धतीतून हिंसा व हुकूमशाही ही बाजूला काढून स्वातंत्र्य व लोकशाही यांच्याशी अनुसंधान राखणाऱ्या विचारसरणीचा निर्देश ‘समाजवाद’ या संज्ञेने करण्यात येतो.  परंतु उत्पादनाच्या साधनांच्या खाजगी मालकीचे निराकरण व उत्पादनाचे समविभाजन यांविषयी दोघांचीही भूमिका एकच आहे.  साम्यवादी विचारसरणीच्या विभाजनाचे अंतिम ‘ध्येयसूत्र कुवतीप्रमाणे काम व गरजेप्रमाणे दाम’ असे असले, तरी आज व्यावहारिक तत्त्व म्हणून ‘कामाप्रमाणे दाम’ हे सूत्र स्वीकारावयास समाजवादाप्रमाणे साम्यवादाचीही तयारी आहे.  किंबहुना आज साम्यवादी रशियात विभाजन त्याच तत्त्वानुसार चालू आहे.


मानवसमाजाच्या आदिकाळात, एखाद्या जिव्हाळ्याच्या कुटुंबात असावी, त्या पद्धतीची ‘कुवतीप्रमाणे काम व गरजेप्रमाणे दाम’ ही पद्धत अस्तित्वात असल्याची माहिती मिळते.  त्या काळात लोक टोळीने राहत असत, एकत्रित उत्पादन करीत व गरजेप्रमाणे प्रत्येकाला देत असत. हीच अवस्था ‘आदिम साम्यवाद’ म्हणून ओळखली जाते.  या व्यवस्थेत वेगवेगळ्या ठिकाणी तपशीलाचे भेद आढळून येतात. कालांतराने स्वतंत्र कुटुंबे व प्रत्येकाची खाजगी मालमत्ता यांचा विकास या समाजव्यवस्थेतही होत गेला.

या प्राचीन काळानंतर दीर्घकाळपर्यंत सरंजामशाही अस्तित्वात राहिली.  व्यापारी क्रांती व औद्योगिक क्रांती यांचे कालखंड सुरू झाल्यानंतर अर्थव्यवस्थेविषयी नव्याने विचार सुरू झाले.  नव्या परिस्थितीविषयी असमाधान असणारे लोक आपल्याला आदर्श वाटणाऱ्या समाजाची स्वप्ने रंगवीत होते.  टॉमस मोरने (१४७८–१५३५) आपल्या अशा स्वप्नराज्याला यूटोपिया असे नाव दिले.  फ्रान्सिस बेकन (१५६१–१६२६), तोम्माझो कांपानेल्ला (१५६८–१६३९), जेम्स हॅरिंग्टन (१६११–१६७७) यांनीही आपल्या ग्रंथांतून आदर्श समाजाची चित्रे रंगविली आहेत.

अशा प्रकारचे स्वप्नरंजन करणाऱ्या समाजपरिवर्तनाच्या कल्पनांचा मार्क्सने ‘यूटोपीय समाजवाद’ असा निर्देश केला आहे. ‘यूटोपीय’ हे अभिधान मोर ह्याच्या यूटोपिया (१५१६) या ग्रंथाच्या नावावरून तयार झाले.  आपला समाजवाद हा अशा स्वप्नरंजनावर आधारित नसून वास्तव शास्त्रीय दृष्टिकोनावर आधारित आहे, असा मार्क्सचा दावा होता.  आपल्या समाजवादाचा निर्देश तो ‘शास्त्रीय समाजवाद’ असा करतो.

स्वप्नदर्शी समाजवादी केवळ आरामखुर्चीत स्वप्ने रंगविणारे मात्र नव्हते हॅरिंग्टन, कांपानेल्ला यांना आपल्या मतासाठी तुरुंगवास भोगावा लागला, तर मोरला राजाची धार्मिक सत्ता अमान्य केल्याबद्दल देहान्ताची शिक्षा झाली.

अशा प्रकारची चित्र मनाशी वागवून ती वस्तुस्थितीत आणण्याचा प्रयत्‍न करणारे अन्य लोकही निघाले. ⇨रॉबर्ट ओएन (१७७१–१८५८) हा अशा लोकांपैकी एक प्रमुख होय.  ओएन हा एक यशस्वी कारखानदार होता व आपल्या कारखान्यातील मजुरांची स्थिती सुधारावी म्हणून आपल्या भागीदारांच्या विरोधाला न जुमानता त्याने अनेक प्रयत्‍न केले.  आपल्याला आदर्श अशी समाजरचना, काही सहकारी तत्त्वांवर आधारित अशा वसाहती स्थापन करून करता येईल,  अशी त्याची अपेक्षा होती.  हे लोक एकत्र राहतील, जमिनीची मशागत एकत्र करतील, प्रत्येक जण आपल्या कुवतीप्रमाणे काम करील व एकूण उत्पादनात सर्वाना सहभाग मिळेल अशी व्यवस्था त्याला अभिप्रेत होती. अमेरिकेत इंडियानामध्ये अशा तर्‍हेची एक वसाहत ‘न्यू  हार्मनी’  या नावाने त्याने स्थापन केली अत्यंत आर्थिक झीज सोसून ती तीन वर्षे चालविली.  इंग्‍लंडला परत आल्यानंतर तेथही दुसरी एक वसाहत स्थापण्याचा त्याने प्रयत्‍न केला परंतु तोही अयशस्वी झाला. फ्रान्समध्ये फ्रांस्वा मारी फूर्ये (१७७२–१८३७) यानेही आपल्या कल्पनेप्रमाणे अशा वसाहतींचा प्रचार केला. पुरेशा भांडवलाच्या अभावी या वसाहतीचा प्रयोग फ्रान्समध्ये होऊ शकला नाही.  परंतु अमेरिकेत अशा काही वसाहती स्थापन झाल्या परंतु त्यातील कोणतीच वसाहत शेवटी तग धरू शकली नाही.

ल्वी ब्‍लां या फ्रेंच समाजवाद्याच्या (१८११–१८८२) मनात सहकारी उत्पादक संघटना स्थापण्याची कल्पना होती. मजुरांनी असे सहकारी कारखाने काढावेत व सरकारने या कारखान्यांना सुरुवातीला भांडवल पुरवावे, अशी त्याची सूचना होती. १८४८ च्या क्रांतीनंतर असे सहकारी कारखाने फ्रान्समध्ये काढण्यात आले, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. परंतु ओएन व फूर्ये यांच्या वसाहतीच्या कल्पनेपेक्षा ब्‍लांची योजना अधिक व्यवहार्य होती. उत्पादनक्षेत्रातील सहकार पुढे अनेक ठिकाणी यशस्वी झाल्याचे आढळून येते.

अशा सहकारासाठी शासनाकडून भांडवल घेण्याच्या कल्पनेला ⇨ प्येअर झोझेफ प्रुदाँ (१८०९–१८६५) याचा विरोध होता.  सहकारी उत्पादक संघटनांना आर्थिक मदत देण्यासाठी एक बँक स्थापन करावी, असे त्याचे मत होते.  अशा पद्धतीची एक बँक, बँक ऑफ द पीपल या नावाने त्याने १८४९ मध्ये स्थापन केली.  हा प्रयोगही अयशस्वी झाला.

 ‘खाजगी मालमत्ता ही चोरी आहे’, हे प्रुदाँचे प्रसिद्ध वाक्य समाजवादी विचारसरणीला पोषक आहे. परंतु प्रुदाँचा शासनाच्या अधिकारांना विरोध होता. त्या दृष्टीने तो अराज्यवादी होता. समाजवादाचा मुख्य भर राज्यसत्तेच्या वापरावर असल्यामुळे त्याचे आणि समाजवादाचे या बाबतीत जमले नसते. या असल्या उपाययोजनांनी समाजातील दुःस्थिती पालटता येईल, हे शास्त्रीय समाजवाद्यांना मान्य नव्हते.  त्यांच्या मते या दुःस्थितीची कारणे अधिक मूलभूत होती व ती समजून घेऊनच त्यांच्यावर योग्य उपाययोजना करणे आवश्यक होते.

याविषयीच्या आपल्या विवेचनात मार्क्सने सनातनवादातील सिद्धांतांचा उपयोग करून घेतला.  द कॅपिटल (१८६७) या ग्रंथात मार्क्सने आपल्या विवेचनाला वस्तुनिष्ठ अभ्यासाचा आधार देण्याचा प्रयत्‍न केला असला, तरी त्याची मांडणी ही मूळ प्रमेयापासून तार्किक आधाराने पुढील सिद्धांतांकडे जाण्याचीच होती.  या अर्थाने तो सनातनवादाचेच तंत्र अवलंबीत होता.  त्याच्या विचारावर प्रभाव पाडणाऱ्या गोष्टीमध्ये लेनिनने इंग्रजी अर्थशास्त्रातील सनातनवादाचा प्रामुख्याने निर्देश केला आहे.

वस्तूचे मूल्य त्या वस्तूच्या निर्मितीसाठी व्यय झालेल्या श्रमावर अवलंबून असते, हा श्रमानुसार मूल्यनिर्धारण सिद्धांत मार्क्सने आपल्या विवेचनासाठी उपयोगात आणला.  मार्क्सच्या आधी कार्ल योहान रोटबेर्टुस (१८०५–१८७५)  यानेही भांडवलशाहीतील मूलभूत दोष दाखवून शास्त्रीय विवेचनाला सुरुवात केली होती.  रोटबेर्टुसच्या विचारांचाही मार्क्सच्या विवेचनावर परिणाम झालेला आहे.  भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आर्थिक उत्पादन कितीही वाढले, तरी ते सगळे खंडरूपाने जमीनदाराकडे किंवा नफारूपाने भांडवलदाराकडे जाते व मजुराती स्थिती तशीच राहते, किंबहुना तुलनेने ती उत्तरोत्तर घसरत जाते, असे रोटबेर्टुसचे विवेचन होते.  या विवेचनाला रिकार्डोचे खंडसिद्धांत व उपजीविका-वेतनसिद्धांत त्याला उपयोगी पडत होते.  सर्व जमीन व भांडवलही शासनाच्या मालकीचे करणे, हाच रोटबेर्टुसने यावर उपाय सुचविलेला होता.  त्याच्या मते, मजुरांचे शोषण हेच जनतेच्या दारिद्र्याचे व आर्थिक तेजीमंदीच्या चक्राचे कारण होते.  रोटबेर्टुस हा राष्ट्रीय समाजवादाचा पुरस्कर्ता होता.  समाजवादी  विचारवंतांमध्ये त्या काळात प्रसृत असलेल्या आंतरराष्ट्रीय समाजवाद्याविषयी त्याचे मत अनुकूल नव्हते.


मार्क्सने रोटबेर्टुसच्या विवेचनातील काही भाग स्वीकारला व ते विवेचन आणखी पुढे नेले.  वस्तूचे मूल्य हे तिच्या उत्पादनात अंतर्भूत असलेल्या श्रमावर अवलंबून असते,  या मूळ सिद्धांताला ‘सामाजिक दृष्ट्या आवश्‍यक असलेल्या श्रमावर’ अशी पुस्ती  मार्क्सने जोडली.  भांडवलशाही अर्थव्यवस्थेत केवळ उत्पादनाला उपयोगी अशी एक वस्तू एवढ्याच दृष्टीने मजुराकडे पाहिले जाते व त्याच्या श्रमाचे मूल्य तो तंदुरुस्त राहील व मजुरांचा भावी पुरवठा हवा तितक्या प्रमाणात चालू राहील, याच दृष्टिकोनातून ठरविले जाते.  यासाठी द्यावी लागणारी मजुरी ही मजूर आपल्या श्रमाने निर्माण करीत असलेल्या  मूल्यापेक्षा कमी असते.  आपल्या चरितार्थासाठी आवश्यक असलेल्या कामाच्या वेळेपेक्षा अधिक वेळ जे काम मजुराला भांडवलदार करावयास भाग पाडत असतो, त्यातून अधिशेष मूल्याची निर्मिती होत असते. हे अधिशेष  मूल्य मजुराला न मिळता भांडवलदार आपल्याकडे घेतो.  अशा अधिशेष मूल्याच्या विवेचनावर आधारित असा मार्क्सचा भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील मजुरांच्या शोषणाविषयीचा सिद्धांत होता.  यंत्राच्या साहाय्याने उत्पादन सुरू झाले की, चरितार्थासाठी करावयाच्या कामासाठी कमी वेळ पुरतो व भांडवलदाराच्या पदरात पडणारे अधिशेष मूल्य वाढते, यातून भांडवलदाराच्या हाती येणारा नफा वाढतो, त्याचा भांडवलसंचय वाढतो, अधिक यांत्रिक उत्पादन होऊ लागते व मजुरांच्या शोषणातही त्या प्रमाणात वाढ होते. 

मार्क्सचा भांडवलाला विरोध नव्हता. भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील दुःखे त्याला दिसत होतीपरंतु त्यांमुळे भिऊन पुन्हा पूर्वीच्या सरंजामशाही व्यवस्थेकडे परत फिरावे, असे त्याचे मत नव्हते. सरंजामशाही अर्थव्यवस्थेपेक्षा भांडवलशाही अर्थव्यवस्था अधिक चांगली आहे. कारण उत्पादनाची  प्रगत तंत्रे वापरून ही अर्थव्यवस्था मानवाला अधिक उत्पादनाची शक्यता निर्माण करून देते, हे त्याला मान्य होते. भांडवलशाही अर्थव्यवस्थेत या उत्पादनाचे विभाजन अत्यंत विषम होते, ही त्याची मुख्य तक्रार होती.

मजुरांना कमी मजुरी वाटण्याच्या प्रक्रियेतून दोन गोष्टी निर्माण होत होत्या. वस्तूंचे उत्पादन होत होते परंतु त्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी पुरेशी क्रयशक्ती मजुरीच्या रूपाने वाटली जात नव्हती.  यातून मागणी अपुरी पडून आर्थिक मंदीचा परिणाम घडून येण्याची शक्यता होती. हा धोका टाळता यावा व आपल्या देशात मालाचा उठाव होणे अशक्य असेल, तर तो परदेशात विकला जावा, या हेतूने भांडवलशाही राष्ट्रांची स्वाभाविक प्रेरणा साम्राज्यवादी विस्ताराकडे झुकू लागते.  साम्राज्य मिळविण्यासाठी दोन भांडवलशाही राष्ट्रांत किंवा राष्ट्रांच्या गटांत संघर्ष सुरू झाला की, त्यातून साम्राज्यशाही युद्धे निर्माण होतात. ‘साम्राज्यवाद हा भांडवलशाहीच्या मक्तेदारी अवस्थेचा परिपाक होय’,  हे मार्क्सचा अनुयायी लेनिन याचे वचन प्रसिद्ध आहे.

एका बाजूने भांडवलशाहीचे परिणाम कसे अटळ आहेत हे दाखवून  देत असताना, भांडवलशाहीचा अंतिम नाश व समाजवादाची प्रस्थापना या गोष्टीही कशा अटळ आहेत, हे दाखवून देण्याचा मार्क्सने प्रयत्‍न केला.  भांडवलदार व मजूर यांच्यामधील संघर्ष अटळ आहे कारण मजुरीचे प्रमाण वाढले, तर नफा कमी होतो व नफ्याचे प्रमाण वाढवावयाचे असेल, तर मजुरी कमी करावी लागते, हा मूलभूत वर्गसंघर्ष आहे.  (मजुरांची उत्पादनक्षमता  वाढत असताना, मजुरीचे दर व नफा या दोहोंतही वाढ होण्याची शक्यता असते, हे या विवेचनात नजरेआड केले आहे.  प्रगत भांडवलशाही राष्ट्रांत पुढे हा अनुभव आला.  परंतु अशा परिस्थितीतही मूलभूत विरोध नाहीसा होत नाही, मात्र त्याची तीव्रता परिणामकारकपणे कमी होते).  या संघर्षात मजुरांचा विजय हा निश्चित ठरलेला आहे कारण उत्पादनाचे मुख्य कार्य मजूरच करीत असतात, त्यांची संख्याही मोठी असते इतकेच नव्हे, तर भांडवलशाहीच्या विकासक्रमात मोठे भांडवलदार व छोटे भांडवलदार यांच्यामधील खुल्या स्पर्धेत (मोठा मासा व छोटा मासा यांच्यामधीलच ही खुली स्पर्धा असते)  छोटे भांडवलदार नष्ट होतात व त्यांना श्रमिकवर्गात जाऊन सामील व्हावे लागते.  यामुळे श्रमिकांचे प्रमाण वाढत असते व भांडवलदारांचे प्रमाण उत्तरोत्तर कमी होत असते.  अशा परिस्थितीत आपल्या हितसंबंधांची जाणीव होऊन कामगारवर्ग संघटित झाला की त्याचा विजय अटळ असतो.

मार्क्सच्या विवेचनाची राजकीय अंगेही आहेत, त्यांचा विचार या ठिकाणी करावयाचे कारण नाही.  मार्क्सच्या मांडणीतील  ‘अटळता’ हा तिच्यातील शास्त्रीयतेचा मुख्य भाग होता.  प्रत्यक्षात मार्क्सने केलेले विवेचन पुष्कळ बाबतींत अपुरे किंवा चुकीचे आहे, असे पुढे आढळून आले.  परंतु मार्क्सच्या निधनानंतर पन्नास वर्षांच्या आत रशियात साम्यवादी क्रांती घडून आली व आज साम्यवादी राष्ट्रांत इतर कोणतेही भेद असले, तरी ती सर्व राष्ट्रे मार्क्सला पितृस्थानी मानतात, हे मार्क्सच्या जागतिक घटनांवरील प्रभावाचे स्पष्ट गमक आहे.  जागतिक घटनांवर एवढा मोठा प्रभाव दुसऱ्या कोणत्याही विचारवंताचा पडलेला नाही.

मार्क्सवाद हे एक नवदर्शन होते.  मानवी संस्कृतीतील व इतिहासातील सर्व घटनांची उपपत्ती एका सूत्राच्या आधारे लावण्याचा त्यात प्रयत्‍न होता.  आर्थिक उत्पादनाचे तंत्र हे मार्क्सच्या विवेचनातील मुख्य सूत्र होते.  मानव अधिकाधिक उत्पादक अशी तंत्रे शोधत असतो किंवा ती त्याला उपलब्ध होत असतात भौतिक समृद्धीसाठी अधिक उत्पादनक्षम तंत्राचा वापर मानव साहजिकच करू लागतो परंतु प्रत्येक तंत्र यशस्वी करावयाचे, तर त्यासाठी काही आनुषंगिक गोष्टी आवश्यक असतात.  या आनुषंगिक गोष्टी अस्तित्वात याव्यात, यासाठी समाजाच्या विविध क्षेत्रांत जरूर ते परिवर्तन आपोआप होऊ लागते.  यामुळे अर्थकारणाचे परिणाम राजकारण, धर्मकारण, साहित्य, कला, शिक्षण, संस्कृती अशा सर्व क्षेत्रांत घडून येतात.  हे परिणाम रोखण्याचा कोणी प्रयत्‍न केल्यास आर्थिक प्रेरणांच्या बलवत्तरतेमुळे क्रांती होते व विरोधी शक्तींचा पराभव होतो.  इतिहासवाद आर्थिक सिद्धांत इतर घटनांच्या व संघटनांच्या संदर्भात तपासून पहात होता, तर याच्या उलट मार्क्सवाद सर्व सामाजिक घटनांची व संघटनांचीच उपपत्ती अर्थकारणाच्या आधारे लावू पहात होता.  आर्थिक प्रेरणांहूनही बलवत्तर अशा अन्य प्रेरणा असू शकतात, हा मानवी इतिहासात पूर्वी आलेला अनुभव मार्क्सने जमेस धरला नाही.  मार्क्सनंतर फॅसिस्ट चळवळीच्या बाबतीत आलेला असाच अनुभवही शास्त्रीय उपपत्तीत ओढूनताणून बसविण्याचा प्रयत्‍न मार्क्सवादी लोकांनी केला.

साम्यवादी क्रांती होऊन कामगारवर्गाच्या हाती सत्ता आली व उत्पादनाची सर्व साधने राष्ट्राच्या मालकीची झाली म्हणजे अर्थव्यवस्था कोणत्या पद्धतीने चालेल, याचे तपशीलवार चित्र मार्क्सने काढले नाही.  साम्यवादी क्रांती झाल्यानंतर मार्क्सने तयार केलेला असा एखादा आराखडा रशियाला उपलब्ध नव्हता.  साम्यवादी अर्थव्यवस्था प्रत्यक्ष व्यवहारात टिकू शकेल की नाही, याविषयी अनेकांच्या मनात संदेह होता.  कारण कामगारवर्गाचे राज्य होऊन उत्पादनाची सर्व साधने राष्ट्राच्या मालकीची झाल्यानंतर, बाजारपेठेतील स्पर्धेवर काम करणाऱ्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या ‘अदृश्य हाताचे’ मार्गदर्शन यापुढे मिळणार नव्हते.  या अशा अडचणीतून रशियातील अर्थव्यवस्थेला चाचपडत प्रयोग करीत करीत मार्ग काढावा लागला.  परंतु तात्त्विक दृष्ट्या अवघड वाटणाऱ्या प्रश्नांना शेवटी व्यावहारिक उत्तरे मिळू शकली. अर्थशास्त्राच्या विकासाच्या इतिहासात दुसऱ्या कोणत्याही विचारप्रणालीला इतक्या निकडीने व्यावहारिक चिंतन करावे लागलेले नाही.


सनातनवादाला परिस्थितीने दिलेला धक्का सनातनवादाच्या पुरस्कर्त्यांनाही जाणवला होता. ðजॉन केअर्न्झसारख्या (१८२३–१८७५) काही अर्थशास्त्रज्ञांनी गृहीतकृत्यांपासून तार्किक विचाराने पुढील अनुमाने काढण्याच्या सनातनवादाच्या पद्धतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला.  त्यांच्या मते सामाजिक शास्त्रांना प्रयोगशाळेत प्रयोग करणे शक्य नसल्यामुळे वस्तुस्थितीचा अभ्यास करून आपले सिद्धांत मांडण्याचा प्रयत्‍न करणे धोक्याचे आहे कारण वस्तुस्थितीवर अनेक विविध घटनांचा परिणाम होत असतो.  त्यांतून एका पद्धतीच्या घटनांचे परिणाम अभ्यासासाठी वेगळे काढणे अशक्य असते.  याउलट काही मूलभूत सिद्धांत कल्पून पुढील विवेचन केले, तर सत्य कळण्याची अधिक शक्यता राहते.  परंतु केअर्न्झलादेखील मूलभूत सिद्धांतच कधीकधी परत पारखून घ्यावे लागतील, याची जाणीव झाली होती.  मजूर व भांडवल या गोष्टी जितक्या सहजपणे प्रवाही आहेत असे मानण्यात येते, तशा त्या नाहीत व अशा घटनांनी खुल्या स्पर्धेवर आधारित विवेचनाला बाध येतो, हे त्याला जाणवले होते.

सनातनवाद अशा रीतीने आपल्या मतप्रणालीचा फेरविचार करण्याच्या मनःस्थितीत असताना शास्त्रीय विवरण या नात्याने सनातनवादाची प्रतिष्ठा वाढविणारा दोन दिशांनी होणारा विकास वैचारिक क्षेत्रात सुरू होता.  एक दिशा गणितीय विवेचनाची होती, तर दुसरी दिशा सीमांत विश्लेषणाची होती.

गणिताची पद्धत सनातनवादाच्या विवेचनपद्धतीला विशेष अनुकूल होती.  मूलभूत गृहीतकृत्यावरून तार्किक पद्धतीने नंतरचे निष्कर्ष काढण्याचा मार्ग गणिताला रुचणारा असतो.  कारण गणितशास्त्राची तीच पद्धती असते.  त्यामुळे गणितात गती असणाऱ्या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांना अर्थशास्त्रीय विवेचनात गणिताचा वापर करावेसे वाटणे साहजिकच होते.  यामुळे विचार संक्षिप्तपणे मांडता येतात व एखाद्या घटनेचे परिणाम अधिक सूक्ष्मपणे शोधता येतात.  आंत्वान कूर्नो (१८०१–१८७७) व हेरमान गोसेन (१८१०–१८५८) या अर्थशास्त्रज्ञांनी अशा पद्धतीचा वापर केला.  दुर्दैवाने त्या दोघांनाही त्यांच्या कार्याचे श्रेय त्यांच्या आयुष्यात मिळाले नाही. ð विल्यम स्टॅन्ली  जेव्हन्झ (१८३५–१८८२)  या इंग्रज अर्थशास्त्रज्ञाने दोघांचे कार्य पुढे प्रकाशात आणले.  यानंतरही गणितीय पद्धतीचा वापर अर्थशास्त्रीय विवेचनात सतत वाढत्या प्रमाणात होत राहिला आहे.  परंतु गणितीय पद्धतीचा समर्थ वापर करू शकणाऱ्या ॲल्फ्रेड मार्शलसारख्या नामवंत अर्थशास्त्रज्ञाने त्या पद्धतीच्या मर्यादाही सांगितल्या आहेत.  मूळ मांडणी बरोबर असेल, तर तीतून उत्तरोत्तर क्रमाने काय निष्पन्न होईल हे गणित सांगू शकते परंतु मूळ मांडणी बरोबर असेल, असा निर्वाळा गणितशास्त्र देऊ शकत नाही.  त्याचप्रमाणे उत्तरोत्तर प्रत्येक पायरीवर गणितीय क्रमाने जात असता मूळ गृहीतकृत्यात काही अंतर्गत बदल होत नाहीत, असे गणितशास्त्र गृहीत धरीत असते.  या दोन गोष्टी जितक्या बरोबर असतील, तितक्या प्रमाणात गणितीय पद्धतीचा वापर उपयोगी होऊ शकतो.  यो दोन गोष्टी नीट तपासून घेणे, हे अर्थशास्त्रज्ञाचे खरे काम असते.  गणितीय पद्धत त्याला या जबाबदारीतून मुक्त करू शकत नाही.

सीमांत विश्लेषण ही सनातनवादाच्या विकासाची दुसरी दिशा होती.  सीमांत विश्लेशणाची मांडणीही गणितीय पद्धतीच्या वापरास प्रोत्साहक ठरली.  सीमांत विश्लेषणाचे तंत्र माहीत झाल्यानंतर विविध प्रश्नांची उत्तरे शोधताना ते वापरले जाऊ लागले.

वस्तूचे मूल्य कसे ठरते, हा अर्थशास्त्रापुढील एक महत्त्वाचा आणि मध्यवर्ती प्रश्न होय.  श्रमानुसार मूल्यनिर्धारण सिद्धांताचा उपयोग करून सनातनवादने या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्‍न केला होता.  याच सिद्धांताचा वापर समाजवादी विचारवंतांनी मजुरांच्या आर्थिक शोषणाच्या सिद्धांतासाठी केला होता.  अल्पकालावधीत मागणीच्या परिस्थितीचा प्रभाव मूल्यावर पडतो, हे या सर्वांना मान्य होते परंतु त्याच्या स्वरूपाचे अधिक विश्लेषण केले गेले नव्हते.

प्रत्येक  माणूस अधिकात अधिक सुखी होण्याचा प्रयत्‍न करीत असतो.  ज्या धोरणाने समाजातील सर्व व्यक्तींच्या सुखाची बेरीज सर्वांत अधिक होईल, ते धोरण सर्वोत्कृष्ट होय, असे विवेचन जेरेमी बेंथॅमने (१७४८–१८३२) यापूर्वीच केलेले होते.  माणूस जसजसा अधिकाधिक श्रीमंत होत जाईल, तसतसे अधिक संपत्तीमुळे त्याला मिळणारे अधिक सुख हे उत्तरोत्तर कमी होत जाईल, हे बेंथॅमने सांगितले होते.  ते नेमके किती प्रमाणात घसरत जाईल हे मोजणे अशक्यप्राय आहे, याचीही जाणीव बेंथॅमला होती.  सीमांत विश्लेषणातील घटत्या उपयोगितेच्या सिद्धांताचे हे बीज होते. घटत्या उपयोगितेचा सिद्धांत व वस्तूचे मूल्य ठरविताना त्याचा येणारा संबंध याची सूचना ‍ॲडम स्मिथच्या आधीच्या आर्थिक विचारांतही ठिकठिकाणी आढळून येते.  उदा.,  ह्यूगो ग्रोशिअस (१५८३–१६४५), जॉन लॉक (१६३२–१७०४), गाल्यानी, डानिएल बेर्नली (१७००–१७८२) वगैरे.  परंतु ॲडम स्मिथने मूल्यसिद्धांताच्या आपल्या विवेचनात हा धागा उचलला नाही व सनातनवादाच्या उत्कर्षाच्या कालखंडात तो जवळजवळ विस्मरणातच लुप्त झाला.

गोसेन या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने घटत्या उपयोगितेच्या सिद्धांताची मांडणी आपल्या विवेचनात केली होती.  सर्वात अधिक उपयोगिता मिळवावयाची असेल, तर उपभोक्ता खरेदी करीत असलेल्या वस्तूपासून मिळणारी सीमांत उपयोगिता सारखी राहील हे पाहिले पाहिजे, याचेही विवेचन गोसेनने केले होते.  फ्रेंच अभियंता द्यूप्यूई (१८०४-१८६६) याने आलेख काढून ही गोष्ट स्पष्ट करण्याचा प्रयत्‍न केला.   उपभोक्ता वस्तूंचा खरेदी करताना ज्या क्रमांकाच्या नगाची सीमांत उपयोगिता त्याच्या दृष्टीने त्यासाठी द्याव्या लागणाऱ्या मूल्याच्या उपयोगितेइतकी असेल, त्या नगापर्यंत आपली खरेदी चालू ठेवील व त्याआधीच्या नगांची बाजारातील किंमत तीच असली, तरी उपभोक्त्याला त्याआधीच्या नगापासून मिळणारी उपयोगिता अधिक असल्यामुळे त्याला तो देत असलेल्या मूल्याहून अधिक मोलाचे असे काही मिळेल, हे मार्शलने केलेले मूल्यविवरण व उपभोक्त्याच्या संतोषाधिक्याचे विवेचन द्यूप्यूईच्या विवेचनातही आढळते.

जेव्हन्झचा थिअरी ऑफ पॉलिटिकल इकॉनॉमी  हा ग्रंथ १८७१ मध्ये प्रसिद्ध झाला.  या ग्रंथात त्याने मिलच्या विवेचनावर कठोर टीका केली आणि परंपरागत सनातनवादाला पहिला मोठा धक्का मिळाला.  आपल्या विवेचनात जेव्हन्झने गणितीय पद्धतीचाही वापर करून त्या दिशेच्या वाटचालीला गती दिली.  आलेखांचा व बीजगणिताचा वापर करून सीमांत उपयोगितेच्या विश्लेषणाच्या आधारे मूल्यसिद्धांताचे परिपूर्ण विवेचन करणारा ग्रंथ, म्हणून या ग्रंथास मान्यता आहे.  उत्पादनखर्चाच्या अनुरोधाने पुरवठ्याचे प्रमाण ठरते, पुरवठ्याच्या प्रमाणात सीमांत उपयोगिता ठरते व सीमांत उपयोगितेनुसार वस्तूचे मूल्य ठरते असे जेव्हन्झचे विवेचन आहे.  गोसेन याने यापैकी काही भाग आपल्या विवेचनात मांडला होता.  त्यातील सादृश्य इतके मोठे होते की, गोसेनचे विवेचन आपल्या विवेचनानंतर निदर्शनास आले, असे आपल्या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या वेळी जेव्हन्झाला आवर्जून नमूद करावे लागले.

या विवेचनाच्या मांडणीबाबत याहूनही अधिक आश्चर्यकारक अशी घटना घडून आली.  याच सुमारास लिहिलेल्या ðकार्ल मेंगर (१८४०–१९२१) व ðलेआँ व्हालरा (१८३४–१९१०) ह्या अनुक्रमे ऑस्ट्रियन व फ्रेंच अर्थशास्त्रज्ञांच्या ग्रंथांतही याच पद्धतीचे विवेचन केलेले आढळते.  जेव्हन्झ, मेंगर व व्हालरा यांपैकी कोणीही एकमेंकापासून आपले विचार घेतले नव्हते.  प्रत्येकाने सीमांत विश्लेषणाच्या सिद्धांताखेरीज इतर महत्त्वाचे विवेचन केले आहे.  मेंगर व व्हालरा या दोघांनीही मक्तेदारीत वस्तूचे मूल्य कसे ठरते, याचा विचार केला आहे.  व्हालरा याने जेव्हन्झ व मेंगर यांच्या पुढे जाऊन केवळ वेगवेगळ्या वस्तूंचे मूल्य कसे ठरते, एवढाच विचार न करता सर्व वस्तूंच्या परस्परमूल्यांचा मेळ अर्थव्यवस्थेत कसा घातला जात असतो, याचेही विश्लेषण करण्याचा प्रयत्‍ केला.  यासाठी आवश्यक ती समीकरणे मांडताना जेव्हन्झने केला त्याहूनही बीजगणिताचा फार मोठ्या प्रमाणावर वापर व्हालराने केला.


मेंगर हा ऑस्ट्रियन होता. त्याच्या विवेचनाचा प्रसार करणारे व त्या विवेचनात भर घालणारे ðऑइगेन पोन बंबाव्हेर्क (१८५१–१९१४) व ðफ्रीडरिख फोन व्हीझर (१८५१–१९२६) यांसारखे समर्थ अनुयायी त्याला मिळाले.  या विचारप्रणालीचा निर्देश म्हणूनच  ‘ऑस्ट्रियन संप्रदाय’ असाही केला जातो.

सीमांत विश्लेषण हे एक प्रभावी तंत्रच अर्थशास्त्राला उपलब्ध झाले.  ग्राहक कोणती किंमत द्यावयास तयार होतो, याचे विवेचन करताना त्याचा उपयोग झाला त्याचप्रमाणे उत्पादक किती उत्पादन करतो, हे ठरविण्यासाठीही हे तंत्र वापरता येऊ लागले.  उत्पादक घटकांना उत्पादनाच्या विभाजनात मिळणारा वाटा कसा ठरतो, याचे विवेचनही या तंत्राच्या आधारे केले जाऊ लागले.  जमिनीचा खंड ठरविण्याच्या प्रक्रियेत सीमांत जमिनीच्या स्थानाचा निर्देश रिकार्डोने यापूर्वी केला होता योहान हाइन्‍रीख थूनेन (१७८३–१८५९) यानेही आपल्या वेतनाच्या व व्याजाच्या सिद्धांताच्या मांडणीत सीमांत उत्पादनक्षमतेची कल्पना उपयोगात आणली होती.  सीमांत विश्लेषणाची पद्धत सुप्रतिष्ठित झाल्यानंतर या पद्धतीच्या विवेचनाला जोर आला व त्यातील सूक्ष्मताही वाढली. ‘उत्पादक घटकाला मिळणारा उत्पादनातील वाटा त्या घटकाच्या सीमांत उत्पादनक्षमतेवर अवलंबून असतो’,  या सिद्धांताचा पुढे जॉन बेट्स क्लार्कने (१८४७–१९३८) जोरदार पुरस्कार केला.  आंतरराष्ट्रीय कीर्ती संपादन केलेला क्लार्क हा पहिला अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ होय.

ऑस्ट्रियन घराण्यापासून स्फूर्ती घेऊन ð नट विकसेल (१८५१–१९२६) या स्वीडिश अर्थशास्त्रज्ञानेही सीमांत  उत्पादनक्षमतेच्या विभाजनसिद्धांताची मांडणी केली.  स्वीडन व नॉर्वे या देशांतील अर्थशास्त्रज्ञांच्या परंपरेत विकसेलचे अग्रक्रमाचे स्थान आहे.  गस्टाव्ह कासेल, एली हेकशेर, बर्टिल ओहलिन, गन्नार मिर्डाल, ðफ्रिश  हे या परंपरेतील काही प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होत.  शुंपेटरने विकसेलचा निर्देश ‘स्वीडिश मार्शल’ असा केला आहे.  स्वीडिश अर्थशास्त्रज्ञांचा गट ‘स्टॉकहोम संप्रदाय’ म्हणून ओळखला जातो.  गणितीय पद्धतीचा  वापर, चलनव्यवहाराचे विवेचन, व्याजाच्या दराचे विश्लेषण ही विकसेलची इतर विशेष कामगिरी होय.  त्याच्या विवेचनाचा प्रभाव त्याच्यानंतरच्या अर्थशास्त्रीय विवेचनावर मोठ्या प्रमाणात पडलेला आढळून येतो.

अर्व्हिंग फिशर (१८६७–१९४७) या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाच्या भांडवल व व्याज यांच्या विवेचनावरही ऑस्ट्रियन संप्रदायाचा परिणाम आढळून येतो.  द्रव्यराशिसिद्धांत मांडताना फिशरने केलेल्या समीकरणाच्या रचनेत गणितीय पद्धतीचा प्रभाव आढळतो.

सीमांत उपयोगितेच्या सिद्धांताच्या आधारावर केलेल्या मूल्यविवेचनाच्या मांडणीत एक मोठी उणीव राहिली होती.  उपयोगितेचे मापन करता येणे शक्य आहे, असे त्या विवेचनात गृहीत धरले होते.  प्रत्यक्षात मापनाचे कोणतेही साधन उपलब्ध नव्हते, आजही नाही व भविष्यकाळातही कधी उपलब्ध होईल, असे नाही.  यामुळे त्या विवेचनाचा पायाच जरा डळमळीत होता. ð व्हिलफ्रेदो पारेअतो (१८४८–१९२३) या इटालियन अर्थशास्त्रज्ञाने त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्‍न केला.  समतुष्टी वक्रांची कल्पना मांडून त्यांच्या साहाय्याने उपयोगितेचे प्रत्यक्ष मापन न करताही मागणीचा सिद्धांत कसा निष्पन्न करता येतो, हे त्याने दाखवून दिले.  १८९३  मध्ये व्हालरानंतर स्वित्झर्लंडमध्ये लोझॅन विद्यापीठात त्याच्या जागी प्राध्यापक म्हणून पारेअतोची नेमणूक झाली.  व्हालराचा गणितीय पद्धतीचा वापर व आर्थिक सामान्य तोलाचे विवेचन यांची परंपरा पारेअतोने पुढे चालविली.  व्हालरा-पारेअतो यांची परंपरा ‘लोझॅन संप्रदाय’ म्हणून ओळखली जाऊ लागली.पारेअतोचा ‘संपत्तिविभाजनाचा सिद्धांत’ प्रसिद्ध आहे.  करविषयक व इतर धोरणे कशीही असली, तरी समाजात संपत्तीचे विभाजन अखेर एका विशिष्ट पद्धतीनेच होते, असे हा सिद्धांत सांगतो.  वेगवेगळ्या काळांतील व वेगवेगळ्या देशांतील संपत्तिविभाजनाचा अभ्यास करून पारेअतोने हा सिद्धांत तयार केला.  गुणवत्तेतील फरक हा लोकसंख्येत सामान्यपणे एका विशिष्ट पद्धतीनेच  विभागला गेल्याचे आढळून येत असल्यामुळे हा परिणाम घडून येतो, असे पारेअतोचे म्हणणे होते.

नवसनातनवाद : नवसनातनवादाचाच  ‘केंब्रिज संप्रदाय’ म्हणून निर्देश करण्यात येतो. ⇨ अल्फ्रेड मार्शल  (१८४२–१९२४) हा या संप्रदायाचा आद्य प्रवर्तक मानला जातो.  केन्सच्या मते तो मान खरा मॅल्थसलाच दिला पाहिजे.  सनातनवादावर झालेल्या टीकेतून काही ग्राह्यांश नवसनातनवादाने स्वीकारला.  अर्थशास्त्राच्या सिद्धांतांचा विचार करताना इतिहाससिद्ध परिस्थितीचाही अभ्यास करणे आवश्यक आहे,  एवढा सारांश नवसनातनवादाने इतिहासवादातून घेतला अर्थशास्त्रीय विवेचनाची एक पद्धत म्हणून त्याने गणितीय मांडणीची उपयुक्तता मान्य केली सीमांत विश्लेषण पद्धतीने स्पष्ट केलेल्या सीमांत उपयोगितेच्या तत्त्वांचा स्वीकार केला व वस्तूच्या मूल्याचा सिद्धांत मांडला. मूल्य निर्धारणात मागणी व पुरवठा या दोन्ही बाजूंचे महत्व  आहे व या दोन्ही गोष्टीच्या परस्पर प्रतिक्रियेतून बाजारपेठेत मूल्य निश्चित होत असते, असे त्याने सिद्ध केले.  याखेरीज चलन, आंतरराष्ट्रीय व्यापार यांसारख्या क्षेत्रांतही नवसनातनवादाने विवेचन पुढे नेण्याचा प्रयत्‍न केला. सनातनवादाने पुरस्कारिलेल्या निर्हस्तक्षेप  धोरणाच्या मर्यादा प्रत्यक्ष व्यवहारात स्पष्ट झाल्या होत्या. इतिहासवाद व समाजवाद यांनी त्या धोरणावर टीका केली होती. मजूरविषयक कायदे करून व देशाच्या हिताच्या दृष्टीने अन्य आर्थिक धोरणे आखून विविध देशांतील शासनसंस्था आर्थिक व्यवहारात हस्तक्षेप करू लागल्या होत्या.  नवसनातनवादाने  ही व्यावहारिक परिस्थिती स्वीकारली व निर्हस्तक्षेप धोरणाच्या मर्यादा मान्य केल्या.

मार्शलचा द प्रिंसिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हा ग्रंथ १८९० मध्ये प्रसिद्ध झाला.  स्वतंत्र प्रज्ञेने समकालीन सैद्धांतिक विचारांचे सर्वसमावेशक विवेचन करणारा दुसरा अर्थशास्त्रावरील ग्रंथ यानंतर अद्याप प्रसिद्ध झालेला नाही.  अवघड सिद्धांतांचे विवेचनही सुगम पद्धतीने करण्याची मार्शलची विशेष शैली होती.  त्यामुळे प्रथमदर्शनी त्याचे विवेचन साधे आहे असे वाटे.   हा सोपेपणा चांगल्या बुद्धिमान अभ्यासकांच्या दृष्टीनेही फसवा ठरेल, अशी ग्वाही  केन्सने दिली आहे.  आपण नवीन म्हणून काही शोधून काढावे आणि नंतर मार्शलने ते आधीच सहज सोप्या पद्धतीने, परंतु रेखीव सुस्पष्टपणे मांडले आहे असे आढळून यावे असे अनुभव येतात, असे केन्सने नमूद केले आहे.  जेव्हन्झच्या आधीच मार्शलने सीमांत विश्लेषणाची पद्धती शोधिली होती परंतु जेव्हन्झने आपल्या नेहमीच्या धडाडीने आपले विवरण प्रसिद्ध केले व मार्शलने आपल्या नेहमीच्या सावध वृत्तीने  प्रकाशनास विलंब करण्याचे ठरविले व मार्शलचे ते श्रेय गेले, असेही सांगितले जाते.


रिकार्डोने मूल्याच्या संदर्भात श्रमानुसारी मूल्यनिर्धारणसिद्धांत मांडला होता व जेव्हन्झने उलट टोकाला जाऊन सीमांत उपयोगितेवर भर दिला होता.  मूल्य हे पुरवठ्याच्या संदर्भात ठरते की मागणीच्या संदर्भात ठरते, यावरही ऊहापोह  होत होता.  मूल्यनिर्धारणात मागणी व पुरवठा या दोहोंचेही महत्त्व करून मार्शलने हे वाद कायमचे निकालात काढले. मूल्य ठरविताना पुरवठा ताबडतोब बदलता येणे शक्य नसेल, अशा अल्प मुदतीच्या कालखंडात मूल्यनिर्धारणावर पुरवठ्याच्या बाजूपेक्षा मागणीच्या बाजूचा प्रभाव अधिक असतो व दीर्घ मुदतीत बदललेल्या मागणीप्रमाणे पुरवठ्यातही बदल झाला की, मूल्यनिर्धारणात पुरवठ्याच्या बाजूला म्हणजेच उत्पादन परिव्ययाला अधिक महत्व येते, हेही मार्शलने स्पष्ट केले. अंतर्गत काटकसरी व बाह्य काटकसरी, प्रमुख परिव्यय व पूरक परिव्यय या कल्पनाही मार्शलने स्पष्ट केल्या.  सीमांत संकल्पनेचा त्याने उपयोगितेच्याखेरीज अन्य क्षेत्रांतही वापर केला.

पर्यायाच्या तत्‍वाचीही त्याने मांडणी केली प्रातिनिधिक उत्पादन संस्था या संकल्पनेचा विकास केला व मागणीच्या लवचिकतेची संकल्पनाही मांडली.  या संकल्पनेचा आधार नसता तर अर्थशास्त्रातील मूल्यनिर्धारण सिद्धांतविवेचन किंवा विभाजनसिद्धांतविवेचन फार प्रगती करू शकले नसते.  खंडनिभ व सामान्य नफा या संकल्पनाही मार्शलनेच स्पष्ट केल्या उपभोक्त्याचे संतोषाधिक्य ही कल्पनाही त्याने मांडली होती.  जोसेफ शील्ड निकल्सन (१८५०–१९२७), युलीसे गोबी आदी अर्थशास्त्रज्ञांनी ह्या कल्पनेवर कडाडून टीका केली.  परंतु ðजॉन रिचर्ड हिक्स  (१९०४–     ) या नामवंत इंग्रज अर्थशास्त्रज्ञाने समतुष्टी वक्रतंत्राचा उपयोग करून मांडलेली उपभोक्त्याच्या संतोषाधिक्याची कल्पना आता मान्य झाली आहे.  केनेथ यूअर्ट बोल्डिंग (१९१०–    ) या इंग्रज अर्थशास्त्रज्ञाने अलीकडे या कल्पनेस ‘खरेदीदाराचे संतोषाधिक्य’ असे नाव दिले आहे.  अर्थशास्त्रीय विवेचनाला अनेक नवीन वैचारिक उपकरणे मार्शलने उपलब्ध करून दिली, यात शंका नाही.

मूल्यनिर्धारण आणि विभाजन या क्षेत्रांखेरीज अर्थशास्त्राच्या अन्य विभागांतही मार्शलने महत्त्वाची भर घातली.  गणितीय पद्धतीचा व आलेखांचा अर्थशास्त्राच्या विवेचनातील वापर त्याने सुप्रतिष्ठित केला.  परंतु गणितीय पद्धतीने विवेचन करण्याच्या भरात वस्तुस्थितीचा संदर्भ  सुटणार नाही, अशी दक्षता घेणे आवश्यक आहे असा त्याचा आग्रह होता.  सांख्यिकीच्या अर्थशास्त्रातील उपयोगविषयीही त्याचे असेच मत होते.  आकडेवारीचा उपयोग अर्थशास्त्राने केला पाहिजे, परंतु केवळ आकडेवारीने दिपून जाता कामा नये आकडेवारीचा योग्य उपयोग करून विचारांच्या साहाय्याने योग्य सिद्धांत बनविणे हे अर्थशास्त्राचे कार्य आहे, असे त्याचे सांगणे होते.  चलनाचा पुरवठा व सर्वसाधारण किंमतीचे मान आणि खरा व्याजाचा दर व पैशाच्या स्वरूपातील व्याजाचा दर या दोहांचा अर्थचक्राच्या परिवर्तनाशी असणारा संबंध, साखळी निर्देशांकांची रचना, सोने व चांदी यांवर आधारित कागदी चलनाची योजना, चलनाच्या आंतरराष्ट्रीय मूल्याचा क्रयशक्तिसमानता सिद्धांत यांसारख्या अनेकविध विभागांत मार्शलने महत्त्वपूर्ण विवेचन केले आहे.  हे सर्व करीत असताना अर्थशास्त्र हे आपल्याला वस्तुनिष्ठ सत्य उपलब्ध करून देते असे नसून वस्तुनिष्ठ सत्याचा शोध कसा घ्यावा याचे मार्गदर्शन करणे, एवढीच अर्थशास्त्राची भूमिका असते, हेही त्याने स्पष्ट केले.  केन्सनेही पुढे याच मताचा पाठपुरावा केला.

निर्हस्तक्षेपाच्या सनातनवादाच्या धोरणापासून नवसनातनवाद दूर जात होता.  निर्हस्तक्षेपाचे धोरण केवळ व्यावहारिक कसोटीवरच उणे ठरते असे नसून तात्त्विक मांडणीच्या दृष्टीनेही त्यात अडचणी आहेत, हे मार्शलने दाखवून दिले.  निर्हस्तक्षेपाच्या धोरणातून समाजाचे सर्वोत्तम हित साध्य होईलच असे म्हणता येणार नाही, असे त्याचे म्हणणे होते.  पुढे विकास पावलेल्या कल्याणाच्या अर्थशास्त्राला या विवेचनाचा चांगला आधार मिळाला.

भांडवलशाहीतील दोषांची मार्शलला जाणीव होती परंतु समाजवादाला त्याचा विरोध होता.  खाजगी भांडवलदार काही आर्थिक नीतिनियमांचे पालन करू लागेपर्यंत भांडवलशाहीतील दोष नाहीसे होणे कठीण आहे, असे त्याचे मत होते.  परंतु अशी नीतिमत्ता निर्माण होत नाही म्हणून साम्यवादाचा मार्ग स्वीकारल्यास सध्या भांडवलशाहीत आढळून येते तेवढीही प्रगती होऊ शकणार नाही, अशी त्याची धारणा होती.  छोटेछोटे उद्योगपती अस्तित्वात असणे व त्यांच्याकरवी उत्पादन चालू रहाणे ही सर्वोत्कृष्ट व्यवस्था होय, असे त्याला वाटे.  कारण या व्यवस्थेत स्वतंत्र कर्तृत्वालाभरपूर वाव राहतो, अशी मार्शलची विचारसरणी होती.  या व्यवस्थेच्या तुलनेत भाग-भांडवली संस्थांमार्फत  उत्पादन हा उत्पादनव्यवस्थेचा प्रकारही त्याला कनिष्ठ वाटे.  परंतु तरीही भाग-भांडवली संस्थांमार्फत उत्पादन हे शासनाच्या एखाद्या खात्यामार्फत चालणाऱ्या उत्पादनव्यवस्थेपेक्षा अधिक इष्ट होय, अशी त्याची भूमिका होती.  शासनाने चालविलेल्या व्यवसायात उत्पादनावर विपरीत परिणाम होईल व मतांचा अनुनय करण्याच्या प्रयत्‍नांत कार्यक्षमतेचा बळी दिला जाईल, अशी भीती त्याने व्यक्त केली.

मक्तेदारी स्पर्धेचा सिद्धांत : एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस अर्थशास्त्राचे विश्लेषण प्रामुख्याने खुली स्पर्धा आणि पूर्ण रोजगारी या गृहीतत्त्वांवर आधारलेले होते.  याउलट वास्तव परिस्थिती फार वेगळी होती.  विसाव्या शतकाच्या प्रारंभीच्या चाळीस वर्षात आर्थिक सिद्धांत आणि आर्थिक वास्तव यांतील जाणवण्याजोगे अंतर कमी करण्याचे कार्य ज्यांनी केले, त्यांत एडवर्ड एच्. चेंबरलीन, जोन रॉबिन्सन आणि जॉन मेनार्ड केन्स यांचा प्रामुख्याने अंतर्भाव करावा लागेल.

चेंबरलिन आणि जोन रॉबिन्सन या दोघांनी केलेल्या कामगिरीचा आढावा घेण्यापूर्वी मार्शल व अन्य सनातनवाद्यांचे सिद्धांत निश्चित कोणत्या स्वरूपाचे होते, हे पाहणे सयुक्तिक होईल.  विसाव्या शतकाला प्रारंभ होण्यापूर्वी मूल्यनिर्धारण यंत्रणेचे सिद्धांत खुली स्पर्धा आणि मक्तेदारी यांभोवती गोवलेले होते.  ज्या जगात आपण वावरतो, त्यात या तर्‍हेच्या बाजारपेठा अभावानेच आढळून येतात.  किंमतींवर  काहीही नियंत्रण न ठेवणाऱ्या अगणित  दुकानांत होणारी खुली स्पर्धा आणि बाजारातील एका वस्तूच्या संपूर्ण पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारी मक्तेदारी या दोन्ही टोकांचा सुवर्णमध्य गाठलेला व्यवहारात आढळून येतो.  प्रत्यक्ष बाजारपेठ या दोन्ही गृहीततत्त्वांचा मेळ साधून बनलेली असते.  खुल्या स्पर्धेच्या गृहीतत्त्वांत अनुस्यूत असलेल्या एकजातीय वस्तू बाजारात विक्रीस येत नाहीत.  नुसता अंगाला लावायचा साबण ही वस्तू घ्या.  बाजारात विविध आकारांचे, विविध वासांचे व विविध रंगांचे तर्‍हेतर्‍हेचे साबण उपलब्ध असतात आणि या प्रत्येक साबणाचा उत्पादक एका दृष्टीने मर्यादित स्वरूपाची मक्तेदारी उपभोगीत असतो.  स्वनिर्मित वस्तूच्या किंमतीवर व पुरवठ्यावर त्याचे नियंत्रण असते.  त्याचबरोबर अन्य प्रकारचे साबण बाजारात आणणाऱ्या उत्पादकांशी एका मर्यादेपलीकडे त्याला स्पर्धा करावी लागते.

खुली स्पर्धा आणि मक्तेदारी यांचा मेळ घालण्याची आवश्यकता प्रथम प्येअरो स्त्राफा (१८९८–    )  या केंब्रिज अर्थशास्त्रज्ञाने इकॉनॉमिक जर्नलच्या डिसेंबर १९२६ च्या अंकात एक लेख लिहून प्रतिपादन केली.  या विषयाचे सांगोपांग विवेचन करणारा प्रबंध पुढल्याच वर्षी अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ एडवर्ड एच. चेंबरलिनने (१८९९–    ) हार्व्हर्ड विद्यापीठाला डॉक्टरेटसाठी सादर केला आणि तो द थिअरी ऑफ मोनॉपॉलिस्ट्रिक काँपिटिशन  या शीर्षकाखाली १९३३ मध्ये प्रसिद्ध झाला.  त्याच वर्षी त्या विषयावर द थिअरी ऑफ इंपरफेक्ट काँपिटिशन हा ग्रंथ केंब्रिज अर्थशास्त्रज्ञा ð जोन रॉबिन्सन (१९०३–     )  हिने प्रसिद्ध केला.  दोन्ही ग्रंथ स्वतंत्रपणे लिहिलेले आणि सारख्याच मोलाचे असले, तरी चेंबरलिनच्या सिद्धांताला अधिक मान्यता मिळाल्याचे दिसते.


खुल्या स्पर्धेत वस्तूचे जे मूल्य ठरविले जाते आणि माल जितक्या प्रमाणात उत्पादन केला जातो, त्यापेक्षा मक्तेदारी स्पर्धेत आढळून येणारे वस्तुमूल्य अधिक असते आणि उत्पादनाचे प्रमाण कमी असते, असे चेंबरलिनने दाखवून दिले,  खुल्या स्पर्धेत बाजारात निश्चित होणारी किंमत सर्व विक्रेत्यांना विनातक्रार स्वीकारावी लागते,  परंतु मक्तेदारी स्पर्धेत अधिक माल खपवावयाचा, तर किंमती खाली आणण्यावाचून उत्पादकाला गत्यंतर उरत नाही.  साहजिकच माल मर्यादित प्रमाणात उत्पादित करण्याकडे त्याचा कल असतो.  खुल्या स्पर्धेतील प्रत्येक उत्पादकाला बाजारातील किंमत डोळ्यापुढे  ठेवून त्या प्रमाणात उत्पादन खर्च कमी  करणे व जास्तीत जास्त नफा मिळेल एवढा माल उत्पादन करणे, एवढेच काम उरते.  मक्तेदारी स्पर्धेत स्पर्धकाशी टक्कर देताना उत्पादकाला किंमत खाली आणण्यापेक्षा वस्तूंचा दर्जा व स्वरूप बदलणे अनेकदा अधिक श्रेयस्कर वाटते.

खुल्या स्पर्धेत मालाच्या जाहिरातीची मुळीत गरज नसते. एकजिनसी मालाला जाहिरातीची गरजच काय? निव्वळ मक्तेदारीत वस्तूचे अस्तित्व ग्राहकांना माहीत करून देण्यापलीकडे जाहिरातीचे महत्त्व नसते.  मात्र वस्तूवस्तूंत थोडाबहुत फरक असेल व बाजारावर काही प्रमाणात नियंत्रण असेल,  तर जाहिरात हे स्पर्धायुक्त विक्रीचे आवश्यक अंग होऊन बसते.  जाहिरातीचे तंत्र विसाव्या शतकात झपाट्याने विकास पावत असताना व एकूण खर्चात जाहिरात व प्रचार  यांवरील खर्चाचा मोठा वाटा असताना त्या तंत्राची दखल न घेणे म्हणजे वास्तवापासून दूर जाणे होय, हे चेंबरलिनने आपल्या प्रबंधात सिद्ध केले.  जाहिरातींचे व त्यांवरील खर्चाचे पद्धतशीर आर्थिक विश्लेषण त्याने प्रथमच केले, असे म्हणावयास प्रत्यवाय नाही. 

चेंबरलिनच्या सिद्धांताचे अनेकांनी उत्साहाने स्वागत केले.  अलीकडच्या काळातील औद्योगिक जगात काय घडते, याचे वास्तव विवेचन त्याच्या व जोन रॉबिन्सनच्या प्रबंधांत आहे.  त्या दोघांनी पुस्तकी आर्थिक सिद्धांत वास्तवाच्या अधिक निकट आणले, ही गोष्ट खरी परंतु त्यामुळे खुल्या स्पर्धेच्या गृहीततत्त्वाला फारशी झळ पोचली नाही,  हे या संदर्भात नमूद केले पाहिजे.  वस्तुमूल्य व राष्ट्रीय मिळकतीची  विभागणी यांच्या आधाराने बेकारी, मंदी आणि आर्थिक विकास यांचा ऊहापोह करताना आणि कल्याणकारी अर्थशास्त्राचे विवेचन करताना आजही अर्थशास्त्राच्या अभ्यासकांना खुल्या स्पर्धेची सोपपत्तिक मांडणी उपयोगी पडत आहे.

केन्सचे अर्थशास्त्र : पुस्तकी सिद्धांताची वास्तवाशी सांगड घालणारा विसाव्या शतकातील आणखी एक नामवंत इंग्रज अर्थशास्त्रज्ञ म्हणजे ðजॉन मेनार्ड केन्स (१८८३–१९४६) हा होय.  सनातनवाद व नवसनातनवाद यांचे ऋण त्याने मान्य केले आहे.  परंतु त्यापुढे त्याने केलेली प्रगती एवढी वैशिष्ट्यपूर्ण व महत्त्वाची आहे की, त्याने केलेल्या विवेचनाला केन्सप्रणीत क्रांती असेच संबोधन अनेकदा लावण्यात येते.  त्याने मांडलेल्या सिद्धांतांचाही आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय अर्थकारणावर फार मोठ्या प्रमाणात घडून आला.

केन्सच्या  विवेचनाच्या आधीची विवेचनपद्धती ही अर्थशास्त्राच्या अभ्यासाची सूक्ष्मलक्षी पद्धत होती.  मागणी, पुरवठा, उत्पादन इत्यादींविषयी विवेचन करीत असताना सीमांतावर एखादा नग कमी किंवा अधिक केला तर त्याचा परिणाम काय होईल, याचा सूक्ष्मलक्षी पद्धत विचार करीत असते.  केन्सने आपल्या विवेचनात आवश्यक तेथे या पद्धतीचा उपयोग केला आहे.  पूर्वी  विकसित झालेली समतोलाची कल्पना व गणितीय पद्धत यांचाही वापर त्याने  केला आहे.  परंतु त्याच्या विवेचनाचा मुख्य भर सर्व राष्ट्रीय उत्पन्नाचा साकल्याने विचार करण्यावर  होता.  राष्ट्रांचे एकूण उत्पन्न किती, त्यातून उपभोगासाठी एकूण विनियोग किती, एकूण बचत किती व एकूण अर्थव्यवस्थेत होणारी भांडवल गुंतवणूक किती असा साकलिक विचार करावयास केन्सने सुरुवात केली.  या साकलिक अर्थशास्त्राने अर्थशास्त्रीय विवेचनाचा एक स्वतंत्र मोठा विभागच खुला  केला.

अर्थव्यवस्थेत शासनाच्या हस्तक्षेपाची गरज नाही, हा सनातनवादाच सिद्धांत होता.  नवसनातनवादाने त्याला थोडी मुरड घातली, तरी कोणत्या परिस्थितीत शासनाने अनिवार्यपणे हस्तक्षेप  केला पाहिजे, याचे दिग्दर्शन त्याच्या विवेचनात नव्हते.  मजुरीविषयक कायदे, शिक्षणाचा प्रसार, बेकारीच्या काळात रोजगारी देण्यासाठी सार्वजनिक कामे इ.  व्यावहारिक दृष्ट्या अटळ गोष्टींना नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मान्यता दिली होती व काही योजना सुचविल्याही होत्या.  परंतु त्यांची सुव्यवस्थित सैद्धांतिक बैठक तयार झाली नव्हती.  चक्रनेमिक्रमाने परत परत येणारी आर्थिक मंदी हा भांडवलशाही अर्थव्यवस्थेचा एक मोठा अडचणीचा प्रश्न होता.  सरंजामशाहीपेक्षा भांडवलशाही अधिक उत्पादन देते हे मार्क्सने मोकळेपणाने मान्य केले होते परंतु आर्थिक मंदीच्या काळात अधिक उत्पादनाच्या कसोटीवरही भांडवलशाही उणी ठरते.  या मर्मावरही त्याने आपल्या विवेचनात नेमके बोट ठेवले होते.  समाजवाद्यांच्या भांडवलशाहीवरील टीकास्त्रांपैकी ते एक प्रभावी अस्त्र होते.

केन्सच्या आधीच्या सनातनवादी किंवा नवसनातनवादी अर्शशास्त्रज्ञांना आर्थिक मंदीच्या स्वरूपाचा नीट उलगडाच होत नव्हता.  शासनाने हस्तक्षेप न करता अर्थव्यवस्था नीट चालली पाहिजे, असा त्यांचा  विश्वास होता.  किंबहुना शासनाने हस्तक्षेप केला, तर त्याचे विपरीत परिणाम होतील अशी त्यांची अपेक्षा होती.  एखाद्या वस्तूच्या मागणी-पुरवठ्याचा तोल बिघडून त्या वस्तूची किंमत घसरू शकेल हे त्यांना मान्य होते परंतु सर्व वस्तूंच्या किंमती एकाच वेळी खाली घसरतील हे घडणार नाही, असे झां बातीस्त सेचा बाजारपेठेचा सिद्धांत सांगत होता. कारण जितके उत्पादन होईल, तितकी क्रयशक्ती समाजात  उत्पादक घटकांना वाटली जात असते व यामुळे एका  बाजूने पुरवठा बाजारात येत असता दुसऱ्या बाजूने तितक्याच प्रमाणात मागणीही बाजारात येते, या विवेचनावर सेचा सिद्धांत आधारित होता.  सनातनवादाला हा सिद्धांत मान्य होता.  या सिद्धांतात कोठे बोट शिरकवण्यास जागा नाही, असे त्याला वाटत होते.

परंतु प्रत्यक्ष परिस्थिती मात्र जेथे बोट शिरकवण्यास जागा नाही असे वाटावे, तेथून हत्ती आरपार जाताना दिसावा अशी होती.  आर्थिक मंदीचे चटके अर्थव्यवस्थेला वारंवार बसत होते.  याचा तोपर्यंत कोणी न केलेला उलगडा केन्सने यशस्वीपणे केला.  त्याच्या सिद्धांतांना अद्याप अधिक विवेचनाची, अधिक तपशीलवार अभ्यासाची आवश्यकता असली तरी त्याने मांडलेल्या मूलभूत भूमिकेला यापुढे कधी ढळ पोचेल, असे वाटत नाही.  किंबहुना त्याच्या सिद्धांताच्या आधारावर  राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय अर्थकारणांत आचारही सुरू झालेला आहे.  जगाच्या आर्थिक इतिहासातील सर्वात मोठी मंदी १९२९ साली घडून आली. ‘जागतिक महामंदी’ असाच तिचा निर्देश करण्यात येतो.  केन्सचा क्रांतिकारक विचार मांडणारा ग्रंथ द जनरल थिअरी ऑफ एम्प्‍लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी १९३६ मध्ये प्रसिद्ध झाला.  त्यानंतरच्या काळात तेवढी महामंदी आली नाही व राष्ट्रीय आर्थिक धोरणे नीट  सांभाळली गेली, तर यानंतर कधी येईल अशी अपेक्षा नाही.  गेल्या तीन दशकांच्या काळात काही कमीअधिक तीव्रतेने मंदीचे आघात जगाला सोसावे लागलेले आहेत पण त्यातून महामंदी निर्माण झाली नाही, याचे सर्व श्रेय केन्सला देणे सत्याला धरून होणार नाही.  विशिष्ट अनुकूल  परिस्थितीही त्यासाठी उपयोगी पडली आहे.  परंतु केन्सच्या विवेचनाचा राष्ट्रांना अशा अडचणीच्या वेळी आपली उपाययोजना ठरविताना मोठा उपयोग झाला आहे, यात शंका नाही.  आधीच्या वैचारिक बैठकीशी विरोध करणारे एखादे विवेचन इतक्या झपाट्याने स्वीकारले गेले व व्यवहारात त्याचा आचारही झाला, असे अन्य उदाहरण अर्थशास्त्राच्या इतिहासात आढळणार नाही.


सनातनवादाने केलेले विवेचन हे ज्या अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगारीची अवस्था ठाकठीक अस्तित्वात आहे, त्या अर्थव्यवस्थेतील समतोलाचे दर्शन घडविणारे आहे,  एवढे श्रेय केन्सने सनातनवादाला दिले परंतु हा तोल फार मोठ्या प्रमाणावर कधी ढळू शकणार नाही, ही सनातनवादाची मांडणी त्याला मान्य नव्हती.  जगाचा प्रत्यक्ष अनुभवही  तसा नव्हता.  त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेत समतोल आहे, म्हणजे पूर्ण रोजगारीची ठाकठीक अवस्था अस्तित्वात आहे, असे नव्हे.  अपूर्ण  रोजगारीच्या अवस्थेतही अर्थव्यवस्थेत समतोल निर्माण होऊ शकतो,  हेही केन्सने निदर्शनास आणून दिले.  यामुळे अपूर्ण रोजगारीच्या अवस्थेकडून  पूर्ण रोजगारीच्या अवस्थेकडे जाण्यासाठी व तेथे पोचल्यानंतर तेथील तोल सांभाळण्यासाठी जागरूकपणे योग्य धोरणे अंमलात आणणे आवश्यक आहे, असे केन्सचे प्रतिपादन होते.

अर्थव्यवस्थेत एकूण मागणी कधीच कमी पडण्याचे कारण नाही,  असे सनातनवाद्यांचे विवेचन होते.  हातात असलेली क्रयशक्ती व प्रत्यक्षात बाजारपेठेत खरेदीसाठी वापरली जाणारी क्रयशक्ती यांत काही फरक पडू शकेल, अशी त्यांची कल्पना नव्हती.  क्रयशक्तीचा नुसता संचय झाला,  तर ते घडून येऊन शकते व प्रभावी मागणी एकूण उत्पादनाच्या  मूल्याच्या मानाने कमी पडू लागते.  प्रभावी मागणीचे हे स्वरूप मॅल्थसच्या ध्यानात आले होते परंतु मार्शल, एजवर्थ (१८४५–१९२६), पिगू (१८७७–१९५९)  यांनी मॅल्थसच्या या कल्पनेचा विकास तर राहोच, परंतु एकदाही निर्देशदेखील केला नाही, अशी केन्सने तक्रार केली आहे.

स्वीडिश अर्थशास्त्रज्ञ विकसेल याने मात्र सेच्या सिद्धांताच्या पलीकडे जाऊन एकूण राष्ट्रीय उत्पन्नापैकी किती भाग उपभोगाच्या किंवा उत्पादक वस्तूंच्या मागणीच्या रूपात प्रभावी होतो, यावर सार्वत्रिक किंमती खाली जाणे किंवा न जाणे अवलंबून असते,  असे सांगितले आहे.  गन्नार मिर्डाल (१८९८–         ),  बर्टिल ओहलिन (१८९९–      ) यांच्या विचारसरणीवरही विकसेलचा प्रभाव आहे.  विकसेलचे वैचारिक ऋण केन्सने मान्य केले आहे.

केन्सच्या विवेचनातील मुख्य आशय असा : राष्ट्रीय उत्पन्न क्रयशक्ती म्हणून लोकांच्या हाती जाते.  ही सर्वच्या सर्व क्रयशक्ती उपभोगाच्या वस्तूच्या खरेदीसाठी वापरली जाते असे नाही.  त्या क्रयशक्तीपैकी किती भाग उपभोगासाठी वापरला जातो, हे लोकांच्या उपभोग- प्रवृत्तीवर अवलंबून असते.  उपभोगावर खर्च झालेले उत्पन्न वजा करता लोकांच्या जवळ काही शिल्लक राहते.  याचाच अर्थ उपभोग-प्रवृत्ती जर शंभर  टक्के अस्तित्वात नसेल (आणि ती तशी नसते),  तर बाजारात एकूण येणारी क्रयशक्ती ही उत्पन्न झालेल्या वस्तूच्या मानाने कमी पडते, मागणी पुरवठ्याच्या मानाने अपुरी पडू लागते व भाव घसरतात.

परंतु उत्पादन होणाऱ्या वस्तू केवळ उपभोगाच्याच असल्या पाहिजेत असे नाही भावी उत्पादनात वाढ करण्याच्या दृष्टीने उपयोगी अशा भांडवली वस्तूंचे उत्पादनही होत असते.  त्यामुळे क्रयशक्तीची  झालेली बचत जर अशा वस्तूंच्या खरेदीसाठी म्हणून पुढे आली, म्हणजेच त्या बचतीचे भांडवलात रूपांतर झाले, तर बाजारपेठेत एकूण प्रभावी मागणी कमी पडत नाही व भाव घसरण्याचे कारण रहात नाही.  म्हणजेच अपेक्षित बचतीइतकीच अपेक्षित भांडवल गुंतवणूक सदैव होत राहिली पाहिजे, तरच आर्थिक मंदी टाळता येईल.

बचत आणि भांडवल गुंतवणूक यांत फरक पडण्याचे सनातनवादाच्या विवेचनाप्रमाणे कारण नव्हते.  कारण त्याच्या सीमांत विश्लेषणाप्रमाणे आवश्यक त्या प्रमाणात व्याजाचा दर वरखाली होऊन हा तोल सांभाळला जातो.  बचत अधिक झाली, तर व्याजाचा दर खाली उतरतो व व्याजाचा दर खाली आल्यानंतर भांडवलाच्या उपयोगासाठी द्यावी लागणारी व्याजरूपी किंमत कमी झाल्यामुळे भांडवलाची मागणी  वाढते.  बचत कमी झाली तर याउलट परिस्थिती निर्माण होते.  व्याजाचे दर वाढतात, वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी लोक अधिकाधिक बचत करू लागतात आणि बचत व भांडवल गुंतवणूक यांचा तोल पुन्हा साधला जातो.

केन्सला हे विवेचन मान्य नव्हते.  बचत व भांडवल गुंतवणूक यांवर व्याजाच्या दराचा काही परिणाम होत असला, तरी त्यामागील मुख्य प्रेरणा वेगळ्या आहेत, असे त्याचे म्हणणे होते.  बचतीच्या पाठीमागील मुख्य भाग लोकांच्या उपभोग-प्रवृत्तीच्या प्रमाणात असतो व उपभोग-प्रवृत्ती ही मानसिक व इतर कारणांवर अवलंबून असते.  त्याचप्रमाणे भांडवल गुंतवणूक करताना प्रवर्तकाचे लक्ष व्याजाच्या दरावर असण्यापेक्षा त्या भांडवलाची अपेक्षित सीमांत उत्पादनक्षमता किती, याकडे लागलेले असते.  ही क्षमता जर फारच घसरली असेल,  तर व्याजाचा दर उतरला किंबहुना शून्यावर आणला, तरी त्याला भांडवल गुंतवणुकीविषयी उत्साह वाटत नाही.  यामुळे व्याजाचा दर वरखाली होऊन बचत आणि भांडवल गुंतवणूक यांचा मेळ आपोआप बसेल ही सनातनवादाची अपेक्षा गैर आहे, असे केन्सचे मत होते.  सनातनवादाचे विवेचन खरे असते, तर केवळ व्याजाचे दर खाली करून मंदीतून बाहेर पडणे शक्य व्हावयास हवे होते परंतु असे ते शक्य होत नाही असा प्रत्यक्ष अनुभव येत होता.

जनतेची मानसिक प्रकृती आहे तशीच राहील असे जर आपण गृहीत  धरले, तर एकूण उत्पादनाची व रोजगारीची पातळी भांडवल गुंतवणुकीच्या प्रमाणावर अवलंबून राहील, असा आपल्या विवेचनाचा सारांश केन्सनेच सांगितला आहे.  प्रभावी मागणीकडे नजर ठेवणे व एकूण प्रभावी मागणी एकूण उत्पादनाच्या मानाने अपुरी पडत नाही, याविषयी दक्षता घेणे हे शासनाचे महत्त्वाचे कर्तव्य ठरते.  यासाठी तुटीचा अर्थसंकल्प आखून व ती तूट भरून काढण्यासाठी अर्थभरणा करून   शासनाला एकूण क्रयशक्ती वाढविता येईल.  व्याजाचा दर कमी करणे यांसारखे उत्पादनाला उत्तेजक असे पूरक उपाय वापरले, तरी मुख्य भर तुटीच्या अर्थसंकल्पाच्या धोरणावरच ठेवणे आवश्यक आहे.  तुटीच्या अर्थसंकल्पाचे धोरण आखून पूर्ण रोजगारीच्या अवस्थेकडे जाण्याचा प्रयत्‍न करीत असताना मध्येच काही अडचणींमुळे उत्पादनवाढ रोखली गेल्यास तुटीच्या अर्थभरणाचा परिणाम केवळ भाववाढीत होतो.  यामुळे अशा अडचणी उद्भवल्यास त्या त्या वेळी त्या दूर करून मगच तुटीच्या अर्थसंकल्पाचे धोरण पुढे चालू करणे इष्ट ठरेल.  पूर्ण रोजगारीच्या अवस्थेला पोचल्यानंतर अर्थव्यवस्था पुन्हा खाली घसरू नये, यासाठीही शासनाने निरंतर दक्ष राहणे आवश्यक आहे.

केन्सने सनातनवादी निर्हस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार याप्रमाणे पूर्णपणे बाजूला सारला.  मंदीच्या काळात खाजगी गुंतवणूकीचे प्रमाण अत्यल्प असते.  त्यामुळे निर्माण होणारी बेकारी कमी करण्यासाठी शासनाने पुढाकार घेऊन रस्तेबांधणी, धरणे यांसारखी सार्वजनिक कामे सुरू करावीत, असा त्याचा आग्रह आहे.  अर्थव्यवस्थेतील अडचणीच्या काळात शासनाचा हस्तक्षेप त्याला मान्य असला, तरी भांडवलशाही अर्थव्यवस्थेच्या चौकटीवर त्याने आघात केला नाही.  समाजात जितक्या प्रमाणात विषमता अधिक, तितक्या प्रमाणात वाजवीपेक्षा अधिक बचत अर्थव्यवस्थेत होण्याची शक्यता अधिक, असे केन्सचे मत होते.  त्यामुळे आर्थिक समता त्याला हवीच होती.  परंतु उत्पादनाच्या साधनांचे राष्ट्रीयीकरण त्याला मान्य नव्हते.  भांडवलशाहीचे अस्तित्व कायम ठेवून तिच्यातील मुख्य दोष कसे काढून टाकता येतील, याकडेच त्याचे लक्ष होते.  त्याने केलेल्या विश्लेषणामुळे व सुचविलेल्या उपाययोजनेमुळे मार्क्सच्या भांडवलशाहीवरील कडव्या आक्षेपांची धारच काढून घेतल्यासारखे झाले.  त्यामुळे शासनाच्या हस्तक्षेपाचे महत्त्व मान्य करणाऱ्या, भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील दोषांना प्रतिकूल असणाऱ्या व मार्क्सवादाचा अतिरेकी कडवेपणा मंजूर नसणाऱ्या, मध्यममार्गी धोरण स्वीकारणाऱ्या लोकशाही समाजवादी विचाराच्या लोकांना केन्सच्या विवेचनाचा मोठाच आधार मिळाल्यासारखे झाले.


कल्याणकारी अर्थशास्त्र : केन्स व पिगू हे दोघेही मार्शलचे शिष्योत्तम होत.  केन्सने त्याच्या कालखंडात जगातील सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ म्हणून नाव मिळविले,  त्याच्या मृत्युनंतर जगातील सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञाचे स्थान पिगूकडे आले, असे अनेक लोक मानतात.  कल्याणाच्या अर्थशास्त्राचा आधुनिक कालातील प्रमुख प्रवर्तक म्हणून ðआर्थर सेसिल पिगूचेही (१८७७–१९५९) स्वतंत्र आणि महत्त्वाचे स्थान आहे.

कल्याणाच्या अर्थशास्त्राचा पिगूने उपस्थित केलेला प्रश्न सरळ आणि स्पष्ट होता.  बहुसंख्य जनतेच्या अधिकतम कल्याणाला उपकारक अशी धोरणे कोणती, हा पिगूच्या मते कल्याणाच्या अर्थशास्त्रापुढील प्रमुख प्रश्न होय.  समाजाची स्थिती कशी सुधारले याचे चिंतन हे अर्थशास्त्राचे प्रमुख कार्य असले पाहिजे, असे पिगू मानत असे. या बाबतीत मार्शलकडून मिळालेला वारसाच पिगू पुढे चालवीत होता.  कल्याणाची स्पष्ट व्याख्या करणे अगत्याचे होते.  मानवाचे सौख्यसमाधान यांत भर घालील, अशा कोणत्याही गोष्टीचा सामान्य अर्थाने कल्याणकारक गोष्टीत समावेश होऊ शकेल परंतु ‘आर्थिक कल्याणा’ चा जेव्हा विचार केला जातो, तेव्हा ज्या गोष्टींचे मूल्य चलनाच्या रूपात मोजता येणे शक्य आहे, त्याच गोष्टींचा विचार करण्यात येतो.  कल्याणाच्या अर्थशास्त्रातील कल्याण हे असे आर्थिक कल्याण होय.

उच्चतम आर्थिक कल्याण कोणते याचा शोध घेणे व ते साध्य करण्यासाठी कोणती धोरणे स्वीकारावी लागतील हे सांगणे, या गोष्टी कल्याणाच्या अर्थशास्त्राच्या कक्षेत येतात.  राष्ट्रीय उत्पन्नाची वाढ होणे हे अधिक कल्याणप्रद असते व राष्ट्रीय उत्पन्नाची अधिक समप्रमाणात वाटणी करणे, हेही अधिक कल्याणनिर्मितीला व समाजातील एकूण सुखसमाधाननिर्मितीला उपकारक असते, असे पिगूचे सांगणे होते.  त्याने आपले विचार वेल्थ अँड वेल्फेअर   या १९१२ मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या ग्रंथात मांडले.  याचाच विस्तार १९२० मध्ये द इकॉनॉमिक्स ऑफ वेल्फेअर या ग्रंथात झाला.  राष्ट्रीय उत्पन्नाची कल्पना यापूर्वी मार्शलने मांडली होती.  परंतु पिगूने आपल्या विवेचनात तिला महत्वाचे स्थान दिले.  राष्ट्रीय उत्पन्न कसे मोजावे, याचे शास्त्रही त्यावेळी विकास पावलेले नव्हते.  राष्ट्रीय  उत्पन्नाची मोजदाद कशी करावी, याविषयी कल्याणकारी अर्थशास्त्राच्या विवेचनाने पुष्कळ उपयुक्त सूचना दिल्या.

उत्पादनाच्या दृष्टीने उपलब्ध साधनसंपत्तीचा सर्वोत्कृष्ट वापर कसा करता येईल, हा कल्याणाच्या अर्थशास्त्रापुढील एक प्रश्न होता. त्याचप्रमाणे विभाजनाच्या दृष्टीनेही सर्वोत्कृष्ट अवस्था साधली जाणे आवश्यक होते.  या दोन ध्येयांचा एखाद्या कार्यक्रमाच्या कार्यवाहीत विरोध आला, तर अचूक तात्त्विक उत्तर कसे शोधावे याचा मार्ग उपलब्ध नाही. बाजारपेठेत प्रत्यक्षात ज्या किंमती ठरतात, त्या लोकांच्या गरजांच्याच निदर्शक असल्यामुळे मुक्त स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बिंदू आपोआपच गाठला जाईल, अशी अपेक्षा करता येत नाही.  कारण बाजारातील किंमत गरजांप्रमाणे ठरत असली, तरी त्या गरजांच्या मागे उभ्या असलेल्या क्रयशक्तीचा (म्हणजे पर्यायाने विभाजनाचा) परिणाम बाजारात कोणाच्या गरजा प्रभावी ठरतात व कोणाच्या ठरत नाहीत, यांवर झाल्याखेरीज रहात नाही. विभाजन समप्रमाणात करावे असे म्हणून हा प्रश्न सुटत नाही.  कारण ज्याच्याकडे अधिक संपत्ती आहे त्याच्याकडून काही भाग घेऊन तो ज्याच्याकडे कमी आहे त्याला देण्याने एकूण समाजातील सौख्य वाढते हे सिद्ध करावयाचे असेल, तर एकाने गमावलेले सौख्य हे दुसऱ्याला मिळालेल्या सौख्यापेक्षा  कमी होते, असे सिद्ध व्हावयास पाहिजे.  हे सिद्ध करावयाचे, तर दोन व्यक्तींच्या मानसिक समाधानाची तुलना करता येणे शक्य झाले पाहिजे. ‘मी ही वस्तू गमावली तर मला किती दुःख होईल, हे मी जाणू शकतो परंतु ज्याला ती वस्तू दिली, त्याला त्या वस्तूपासून किती सौख्य झाले, हे मला कसे सांगता येईल?’ दोन व्यक्तींच्या मानसिक समाधानांची तुलना करण्याचा कोणताही मार्ग आपल्याला उपलब्ध नाही.

यातून एक मार्ग शोधण्याचा निकोलस कॅल्डॉरसारख्या (१९०८–       )  इंग्रज अर्थशास्त्रज्ञांनी प्रयत्‍न केला.  ज्याच्याकडून वस्तू घेतली जाते, त्याला त्याचे एकूण समाधान कमी होऊ  नये म्हणून आर्थिक भरपाई द्यावयाचे ठरविले,  (ती प्रत्यक्षात दिलीच पाहिजे, असे नव्हे)  तर त्यासाठी करावी लागणारी आर्थिक तरतूद व ज्यांच्याकडे ती वस्तू दिली जाते, ते लोक त्या वस्तूपासून मिळणाऱ्या समाधानासाठी द्यावयास तयार असलेले आर्थिक मोल, या दोघांच्या तुलनेत द्यावी लागणारी भरपाई जर कमी असेल, तर ती वस्तू पहिल्या वर्गाकडून दुसऱ्या वर्गाकडे देणे सामाजिक कल्याण वाढविण्यास कारणीभूत होईल परंतु येथेही विविध वर्गांच्या कमीअधिक क्रयशक्तीमुळे या कल्पनेवर पडणाऱ्या मर्यादांतून आपण पार पडू शकत नाही.  याच्याही पुढे केवळ अशी आर्थिक भरपाई करता येते एवढीच कसोटी मानणे योग्य होणार नाही,  असेही लिट्ल यांसारख्या अर्थशास्त्रज्ञांनी दाखवून दिले.  गिरणीच्या उत्पादनातून हातमाग विणकराला त्याच्या पूर्ण उत्पन्नाची भरपाई करता आली, तर स्वतः काही कामात राहून आपली उपजीविका मिळविण्यात लाभणारा जो स्वाभिमाचा आनंद असतो, तो गमावल्याची भरपाई  कशाने होऊ शकेल? पिगू, कॅल्डॉर, हिक्स, रेडर, लिट्ल, स्किटोव्हस्की, ⇨ ॲरो  यांसारख्या कल्याणाच्या अर्थशास्त्रज्ञांना या समस्या जाणवल्या आहेत.  गणित, आलेख यांच्या साहाय्याने या समस्यांचे स्वरूप स्पष्ट करण्याचेही प्रयत्‍न झाले आहेत.  त्या सर्व प्रयत्‍नांना काही मूलभूत मर्यादा पडतातच.  परिस्थिती ‘अ’  ही परिस्थिती ‘ब’ पेक्षा कमी किंवा अधिक चांगली, असे ठरवून धोरणात्मक निर्णय घेताना ‘अ’ पासून ‘ब’ पर्यत जाण्याच्या क्रियेसाठी जे मूल्य द्यावे लागेल, त्याचाही अंतर्भाव केला पाहिजे.  केवळ  ‘ब’  ही परिस्थिती  ‘अ’  पेक्षा अधिक चांगली आहे, एवढा निर्वाळा पुरेसा होऊ शकणार नाही.  असे निर्णय घेण्यासाठी लागणारी सर्व माहितीही उपलब्ध असली पाहिजे.  काही वेळा ती तशी उपलब्ध होणे  दुष्कर असेल किंवा ती उपलब्ध करण्याचे तंत्रही पुरेसे विकसित झालेले नसेल.  समाधानाच्या मूल्यमापनात लोकांच्या ज्या आवडीनिवडी आहेत, त्या तशाच काही बदल न होता राहतील, असे गृहित धरलेले असते.  हे गृहीतकृत्यही वस्तुस्थितीला धरून राहू शकत नाही.  त्याचप्रमाणे जो मार्ग तात्कालिक समृद्धीचा वाटत असतो, त्याचे दूरगामी बरेवाईट परिणाम कोणते होतील, याचेही नीट आकलन आधी होणे शक्य नसते.  सुखसमाधानाला बाधक असे काही प्रश्न समृद्धीतूनही निर्माण होणारे असतात, याचा व्यक्तींना व राष्ट्रांनाही अनुभव आहे.


इतक्या खोलात न जाता समृद्धीच्या मागे लागण्याच्या प्रयत्‍नात मानवाच्या प्रत्यक्ष कल्याणाचा कसा बळी दिला जात आहे आणि ग्राहक, मजूर व अंतिमतः सर्व समाज यांना या प्रयत्नात किती दुःख भोगावे लागत आहे याचे विवेचन करणारे व सनातनवादात सुधारणा करण्याच्या प्रयत्‍नाऐवजी सनातनवादाला सरळ विरोध करणारेही जॉन हॉब्सनसारखे (१८५८–१९४०)  इंग्रज विचारवंत या कालखंडात होऊन गेले.

संस्थावाद : संस्थावाद हा काही एखादी परंपरा सांगणारा संप्रदाय  नव्हे.  याचा उगमच शोधावयाचा, तर आपल्याला इतिहासवादाकडे जाता येईल किंवा स्विस अर्थशास्त्रज्ञ झां शार्ल सीसमाँदीपर्यंतही (१७७१–१८४२) तो मागे शोधता येईल,  सीसमाँदी हा व्यक्तिवादी अर्थशास्त्राचा टीकाकार होता व समाजवादी विचारसरणीचा मागोवा त्याच्यापर्यंत घेत येत असला, तरी तसा तो समाजवादी नव्हता.  सनातनवादाने मिळणारी तात्त्विक उत्तरे व प्रत्यक्ष येणारा अनुभव यांत अंतर पडत आहे, याची त्याला जाणीव होती.  आर्थिक मंदी, बेकारी, दारिद्र्य यांचे समर्पक विवेचन सनातनवाद करू शकत नव्हता.  या अशा गोष्टींची कारणे शोधावयाची, तर मानवी  स्वभाव व मानवाने निर्माण केलेल्या इतर संस्था यांच्या संदर्भात ती शोधली पाहिजेत, असे त्याचे म्हणणे होते.

‘संस्थावादी’ ही संज्ञा ðथॉर्स्टाइन व्हेब्लेन व त्याचे अनुयायी ह्यांच्या अर्थशास्त्रीय लेखनाला विसाव्या शतकाच्या प्रारंभी लावण्यात आली.  ह्याचे कारण ती संज्ञा विविध संस्थांचे संमिश्रण अशा मानवी संस्कृतीचा एक भाग बनलेल्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करते.  संस्थावाद १८९० नंतर प्रामुख्याने अमेरिकेत प्रचलित झाला.  या वादाचे प्रवक्ते थॉर्स्टाइन व्हेब्लेन (१८५७–१९२९), वेस्ली क्लेअर मिशेल  (१८७४–१९४८)  आणि जॉन कॉमन्स (१८६२–१९४५) हे होत.  या तिघांचेही कार्य तसे स्वतंत्र होते.  त्यांना फार अनुयायी होते असेही नाही परंतु त्यांपैकी प्रत्येकाने स्वतंत्रपणे मोठे नाव कमावले व त्यांच्या नावांची प्रतिष्ठा या वादाला लाभली.

औद्योगिक प्रवृत्तीविषयी व्हेब्लेनला अगत्य होते परंतु उद्योगधंद्यांच्या आड विकास पावणाऱ्या व केवळ पैशाच्या मागे धावणाऱ्या आर्थिक व्यवहाराचा त्याला तिटकारा होता.  कोणतीही अर्थव्यवस्था ही चिरंतन असू शकत नाही देश, काल व सांस्कृतिक परिस्थितीप्रमाणे अर्थव्यवस्था हळूहळू आकार घेत असते, असे त्याचे विवेचन होते.  हा संदर्भ लक्षात न घेतल्यामुळेच सनातनवाद तथाकथित चिरंतन स्वरूपाची व आपल्या मनःकल्पनेवर आधारलेली तत्त्वे  घेऊन विवेचन करण्याच्या भरीस पडला.  मानवाचा व्यावहारिक आचार हा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक संस्थांच्या संदर्भात नियमित होत असतो यामुळे या संस्थांच्या कार्याचा अभ्यास केल्याखेरीज मानवी व्यवहाराचे विश्लेषण करता येत नाही.

व्हेब्लेन हा भांडवलशाहीचा कडक टीकाकार होता व भांडवलशाहीतील दोष दूर केले नाहीत, तर समाजवाद किंवा फॅसिझम यांपैकी एकाचा उदय होणे अटळ आहे, असा धोक्याचा इशारा त्याने दिला होता.  व्हेब्लेन साम्यवादी नव्हता. संस्थात्मक संदर्भाला मार्क्सवाद महत्व देत असे.  परंतु संस्थात्मक बदल आर्थिक परिवर्तनाच्या संदर्भात एका विशिष्ट पद्धतीनेच होत जातात, असे मार्क्सवादाचे सांगणे होते.  याउलट आर्थिक परिवर्तनावर संस्थात्मक संदर्भाचा परिणाम होत असतो, अशी व्हेब्लेनची भूमिका होती.

मिशेलने केलेला व्यापारचक्राच्या परिवर्तनाचा वस्तुस्थितीवर आधारित असा प्रचंड अभ्यास प्रमाणभूत मानला जातो.  आर्थिक  सिद्धांत मांडावयाचे, तर साध्या, सरळ, ढोबळ सिद्धांतांचे आकर्षण टाळले पाहिजे व तपशिलांत शिरून अभ्यास करण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशी मिशेलची भूमिका होती.  हा तपशीलही शास्त्रशुद्ध मोजमापाच्या आकडेवारीचा हवा.  मिशेलने आपल्या विवेचनाला अशा अभ्यासाचे अधिष्ठान दिले.  अर्थशास्त्राच्या विवेचनात संख्याशास्त्राचा मोठ्या प्रमाणात उपयोग करावयास मिशेलने चालना दिली.  या अभ्यासाच्या आधारे व्यापारचक्राचे सामान्य स्वरूप स्पष्ट करण्याचा व या एकाच चक्राच्या अंतर्गत वेगवेगळी चक्रे वेगवेगळ्या गतीने कशी फिरत असतात, हे दाखविण्याचा त्याने प्रयत्‍न केला.

कॉमन्सनेही ऐतिहासिक आर्थिक घटनांचा तपशीलवार आणि सखोल अभ्यास केला.  अमेरिकेतील औद्योगिक विकासाचा इतिहास व अमेरिकेतील मजूरवर्गाचा इतिहास यांवरील त्याचे ग्रंथ म्हणजे ऐतिहासिक कागदपत्रांवर आधारित अशा अभ्यासाचा परिपाक आहेत.  शासनाशी आलेल्या संबंधामुळे आर्थिक क्षेत्रातील कायदे घडविण्यातही कॉमन्सच्या विचारांचा मोठा प्रभाव पडला.  सनातन अर्थशास्त्राने वर्णन केलेली परिस्थिती व अमेरिकेत प्रत्यक्षात अस्तित्वात आलेली परिस्थिती यांत खूप अंतर पडले होते.  केवळ भांडवलदारांच्याच नव्हे तर मजूर, शेतकरी, ग्राहक या वर्गाच्याही प्रबळ संघटना निर्माण झालेल्या होत्या.  अशा परिस्थितीत लोकशाही शासनाने दक्षपणे आपली योग्य भूमिका पार पाडणे आवश्यक आहे,  असे कॉमन्सचे मत होते.  भांडवलशाहीतील दोषांचे निराकरण करून आर्थिक विकास चालू ठेवावयाचा असेल, तर अर्थव्यवस्थेत काही मोक्याच्या ठिकाणी नियोजित विकासाची दिशा दिग्दर्शित करणे व त्या दिशेची वाटचाल सुकर करणे, हे शासनाचे आवश्यक कर्तव्य ठरते.  नियोजन म्हटले की, साम्यवादाची धास्ती घेणाऱ्या अमेरिकेपेक्षा आपल्या विशिष्ट परिस्थितीत आणि सांस्कृतिक व सामाजिक पार्श्वभूमीवर जलद आर्थिक विकासाचा प्रयत्‍न करणाऱ्या अप्रगत राष्ट्रांतून या विवेचनाचे अधिक स्वागत होण्यासारखे आहे.

विकासाचे अर्थशास्त्र : अर्थशास्त्राचा एक स्वतंत्र विभाग म्हणून ‘विकासाच्या अर्थशास्त्रा’ चा विकास गेल्या तीन-चार दशकांतच सुरू झाला आहे.  हा विकास आजही पूर्ण झालेला आहे किंवा तो एका निश्चित प्रगत अवस्थेत आहे,  असे म्हणता येणार नाही.  विकासाचे अर्थशास्त्र ज्या प्रश्नांचा विचार करते, त्या प्रश्नांना अर्थशास्त्रज्ञांनी आपल्या इतर विवेचनांत वेळोवेळी उपयोग केला आहे.  ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, जॉन स्टूअर्ट मिल यांनी वेगवेगळ्या पद्धतींच्या विकासाचा संपत्तीच्या विभाजनावर काय परिणाम होतो, याचा विचार केला होता.  मार्क्सने आणि इतिहासवाद व संस्थावाद या संप्रदायांतील  विचारवंतांनी भांडवलशाही अर्थव्यवस्थेतील संस्था कशा निर्माण होतात व त्यांच्यामध्ये परिवर्तन कसे होत जाते, याचे विवेचन करण्याचा प्रयत्‍न केला.  मॅक्स वेबर (१८६४–१९२०),  रिचर्ड हेन्‍री टॉनी (१८८०–१९६२), व्हेब्लेन, मिशेल व ð योझेफ शुंपेटर  या विचारवंतांनी, विज्ञानाचा विकास होऊन उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी त्याचा वापर होण्यास कोणत्या मानसिक प्रवृत्ती उपकारक ठरतात, याचे विवेचन केले होते.  बचत, भांडवलनिर्मिती, घटत्या उत्पादनाचा सिद्धांत, वाढत्या उत्पादनाचा सिद्धांत, लोकसंख्येतील बदल, त्याची कारणे व परिणाम यांसारख्या प्रश्नांचे विवेचनही वेगवेगळ्या संदर्भात पूर्वीच्या अर्थशास्त्रज्ञांनी केलेले होते.  विविध देशांच्या आर्थिक विकासाच्या इतिहासाचा झालेला अभ्यास, राष्ट्रीय उत्पन्न, उपभोग, बचत, भांडवल गुंतवणूक यांसारख्या गोळा करण्यात आलेल्या व येत असलेल्या विविध माहितीच्या कालश्रेणी यांचाही विकासाच्या अर्थशास्त्राच्या अभ्यासाला पूरक म्हणून उपयोग झाला परंतु  तरीही या शास्त्रविभागाच्या अभ्यासाला अजून पूर्ण सुसंघटित रूप प्राप्त झालेले  आहे, असे नाही.  एकतर आर्थिक इतिहासाच्या व आकडेवारीच्या माहितीचे संकलन, अशा ढोबळ स्वरूपात तरी या विभागाचे विवेचन राहते किंवा ते सूक्ष्म करण्याचा प्रयत्‍न केल्यास व्यवहाराशी ज्याचा संबंध तुटला आहे, अशा क्लिष्ट गणितीय, तांत्रिक प्रतिमानांच्या निष्फळ चर्चेत तरी ते विवेचन अडकून पडते.


विकासाच्या अर्थशास्त्राला शास्त्रीय म्हणून मान्यता देण्यास अर्थशास्त्रज्ञांनीखळखळ केली असली, तरी खरोखर अर्थशास्त्रातील अखेरचा जिव्हाळ्याचा प्रश्न तोच आहे.  राष्ट्रांचा आर्थिक विकास कसा सुरू होतो, त्याला उपकारक गोष्टी कोणत्या,  अनुपकारक गोष्टी कोणत्या, हा विकास कोणत्या दिशेने व कोणत्या गतीने चालू राहतो, मध्येच कधीकधी या विकासात खंड का पडतो, या विकासाचे अंतर्गत व आंतरराष्ट्रीय परिणाम  कोणते होतात, अर्थकारणाच्या क्षेत्राबाहेर राजकीय व सामाजिक क्षेत्रांत या आर्थिक परिवर्तनाचे परिणाम कोणते होतात व त्या परिणामांच्या प्रतिक्रिया पुन्हा आर्थिक विकासावर कोणत्या होतात, यांसारख्या प्रश्नांचा विचार विकासाचे अर्थशास्त्र  करते. म्हणजेच या शास्त्राचा केवळ आर्थिक क्षेत्राशीच संबंध येत नसून आर्थिक विकासाशी संबंधित असणाऱ्या सामाजिक, राजकीय,  मानसशास्त्रीय, ऐतिहासिक अशा मानवी जीवनाच्या विविध बाजूंशी येतो.  अर्थशास्त्रज्ञांनी ही अशी सर्वसमावेशक कक्षा आपल्या विशिष्ट शास्त्राची म्हणून मानावयास तयार होणे स्वाभाविकच कठीण होते.

या शास्त्राच्या प्रत्यक्ष अभ्यासातही अनेकविध दुर्लंघ्य अडचणी आहेत.  कल्पनेचे मनोरे बांधण्याऐवजी  व्यावहारिक भूमीवर रचना करावयाची असेल, तर या शास्त्रातील प्रश्नांच्या विवेचनासाठी विविध शास्त्रांतील तज्ञांच्या मदतीची आवश्यकता असते.  विकास ही गोष्ट एखाद्या कालखंडात घडत असल्यामुळे तिच्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टींचा केवळ त्याचे आजचे रूप पाहून स्थितीशील विचार करून चालत नाही तर हे रूप कालांतराने कसेकसे पालटत जाईल, याची कल्पना करून गतिशील विचार करावा लागतो.  लोकांच्या प्रेरणा, आवडीनिवडी, त्यांचे कल हे नेहमी सरळपणे बदलतात असे नाही.  यामुळे या शास्त्रात सर्वसामान्य सिद्धांत सांगणे दुर्घट किंबहुना अशक्यप्राय आहे, याची जाणीव या शास्त्राच्या अभ्यासकांनाही आहे.

ज्या कालखंडातील विकासाचा आपण विचार करीत असतो, तो जितका दीर्घमुदतीचा असेल, तितक्या या शास्त्राच्या विवेचनातील अडचणी वाढतात.  कारण अल्प कालावधीत इतर संदर्भात काही विशेष बदल होणार नाहीत, हे गृहीत धरता येते.  जितका अधिक दीर्घ कालावधी घ्यावा, तितकी या संदर्भातील अनिश्चितता वाढत जाते.  अशा कालावधीत कोणत्या अनुक्रमाने घटना घडत जातील, प्रत्येक टप्प्यावर कशी परिस्थिती असेल हे सांगणे तर त्याहूनही दुष्कर होय.  विकासाच्या अर्थशास्त्राला अवघड म्हणून असे प्रश्न टाळता येत नाहीत कारण त्याच्या अभ्यासाचे क्षेत्रच ते आहे.  परंतु आपण देत असलेल्या उत्तरांचे  संदर्भ त्याने स्पष्ट केले पाहिजेत व आपल्या उत्तरांच्या मर्यादांचेही भान राखले पाहिजे.

ð आर्थर ल्यूइस (१९१५–    ), लायबेनस्टाइन, रांगनार नर्क्स (१९०७–१९५९), बर्ट होझलिट्झ  (१९१३–    ) यांसारख्या अभ्यासकांनी विकासाच्या प्रश्नांचे विवेचन केले आहे.  वॉल्ट व्हिटमन रोस्टो (१९१६–     ) ह्या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने आपल्या विवेचनात सहा प्रेरणांना प्रमुख स्थान दिले आहे :  मूलभूत विज्ञानाच्या अभ्यासाची प्रेरणा, मूलभूत विज्ञानाचा आर्थिक विकासासाठी उपयोग करून घेण्याची प्रेरणा, नवीन बदलांचे स्वागत करण्याची प्रेरणा, भौतिक अभ्युदयाची प्रेरणा, वस्तूच्या उपभोगाची प्रेरणा व  प्रजोत्पादनाची प्रेरणा या त्या सहा प्रेरणा होत. या सर्व प्रेरणांच्या परिणामामुळे विकासाला गती मिळत असते.

विकासाच्या प्रक्रियेत सर्वात अवघड समस्या विकासाची पहिली गती घेण्याची असते, याविषयी सर्वांचे एकमत आहे.  अप्रगत राष्ट्राला पहिली गती घेताना अनेक अडचणी पार करावयाच्या असतात.  परंपरागत सामाजिक रचना नवीन पद्धतीच्या विकासाला प्रतिकूल असते, भांडवलाचा काहीच आधार नसतो, इतकेच नव्हे, तर बचतीची व भांडवलगुंतवणुकीची जनतेला सवयही नसते, तांत्रिक ज्ञान अभावानेच अस्तित्वात असते, लोकसंख्या जलद गतीने वाढत असते व लोकसंख्येच्या वाढीचा हा वेग उत्पादनवाढीच्या वेगापेक्षा अधिक असतो.  बाह्य मदतीखेरीज या अडचणी ओलांडणे अशक्य व्हावे, अशीही काही राष्ट्रांतील परिस्थिती असू शकते.  या अडचणींतून पार पडल्यावर आर्थिक विकासाची खरी प्रक्रिया सुरू होते.  विकासाच्या दुसऱ्या टप्प्यात वेग थोडा अधिक असतो, कारण नव्या तंत्राचे सर्व फायदे क्रमाक्रमाने आत्मसात होत असतात.  वाढत्या उत्पादनाच्या सिद्धांतामुळे काही काळ सरासरी उत्पादन-परिव्यय कमी होत असतो.  जखडून टाकणारी सामाजिक व इतर बंधने उत्तरोत्तर शिथिल होत असतात.  या सर्वांचा परिणाम म्हणून विकासाच्या वेगात जी वाढ होण्याची शक्यता असेल, ती झाल्यानंतर मात्र आणखी वाढ होणे, हे नवीन तंत्रज्ञान वापरले जाण्यावर व भांडवल बचतीचे प्रमाण वाढविण्यावर अवलंबून असते.  हे प्रमाण कसे वाढविता येईल, आर्थिक विकासाच्या दीर्घ मुदतीच्या कार्यक्रमांत प्रथमदर्शनी आर्थिक न वाटणाऱ्या अशा कोणत्या घटनांचे व कारणांचे विवेचन आवश्यक आहे, त्यांचा तपशीलवार अभ्यास कसा करावा, त्या तपशिलांतून योग्य निष्कर्ष निघण्याची शक्यता किती यांसारख्या प्रश्नांची नीट उत्तरे अजूनही विकासाच्या अर्थशास्त्राला सापडलेली आहेत, असे म्हणता येणार नाही.  गणितीय तांत्रिक प्रतिमानांचा कितीही वापर केला, तरी त्या प्रतिमानांचा मुख्य भाग उपलब्ध श्रमशक्ती, उपलब्ध भांडवल व एकूण उत्पादन या त्रयीवरच आधारित आहे.  प्रतिमानांवर याहून अधिक बारकाव्याची नक्षी करण्याचे प्रयत्‍न शोभादायक असले, तरी अजूनही ते व्यावहारिक दृष्ट्या उपयोगी ठरलेले नाहीत.

नियोजनाचे अर्थशास्त्र : वेगवेगळ्या राष्ट्रांचा विकास वेगवेगळ्या गतीने चाललेला आहे.  परंतु प्रगत-अप्रगत अशी सर्व राष्ट्रे शीघ्र आर्थिक विकासाच्या दिशेने प्रयत्नशील आहेत. यांपैकी अनेक राष्ट्रांनी योजनाबद्ध आर्थिक विकासाचा कार्यक्रम कमीअधिक प्रमाणात स्वीकारला आहे.

शासनाने अर्थव्यवस्थेत कोणताही हस्तक्षेप करू नये, हे एका टोकाचे विवेचन होते.  तात्त्विक विवेचन म्हणून इतिहासवादाने, संस्थावादाने, साम्यवादाने किंबहुना नवसनातनवादानेही त्या धोरणावर आक्षेप घेतले होते.  पहिल्या महायुद्धाच्या आधीच्या काळातही निर्हस्तक्षेपाचे धोरण पूर्णपणे तात्त्विक टोकाला जाऊन आचरणारे एकही राष्ट्र अस्तित्वात नव्हते.  इंग्लंडसारख्या राष्ट्रातही मजूरविषयक कायदे शासनाने केले होते.

पहिल्या महायुद्धाच्या काळातील अनुभवांमुळे व त्यानंतरच्या काळात आलेल्या अडचणींमुळे निर्हस्तक्षेपाचे धोरण सर्वच राष्ट्रांतून आणखी मागे पडले.  उद्योगधंद्याची परिस्थिती, रोजगारी, आंतरराष्ट्रीय व्यापार, चलनाचे आंतरराष्ट्रीय मूल्य यांसारख्या अनेक गोष्टींत शासनाला हस्तक्षेप करावा लागला. १९२९ मध्ये जागतिक मंदी आल्यानंतर तर, अमेरिकेसारख्या भांडवलशाहीच्या अनिर्बंध विकासाचा पुरस्कार करणाऱ्या राष्ट्रातही शासनाला अर्थव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप करावा लागला.  याप्रमाणे निर्हस्तक्षेपाच्या धोरणापासून जग दूर चालले होते परंतु निश्चित योजनाबद्ध नियोजनाचा मार्ग मात्र साम्यवादी रशियाखेरीज दुसऱ्या कोणत्या राष्ट्राने स्वीकारलेला नव्हता.  साम्यवादी क्रांती होऊन उत्पादनाची सर्व साधने राष्ट्रीय मालकीची झाल्यानंतर नियोजनाखेरीज दुसरा मार्गच नसतो.  दुसऱ्या महायुद्धानंतर ज्या राष्ट्रांत साम्यवादी क्रांती झाली, त्या राष्ट्रांनाही नियोजनाचा मार्ग स्वीकारणे असेच अटळ होते.


साम्यवादाच्या व नियोजनाच्या या साहचर्यामुळे लोकांच्या मनात नियोजन म्हटले की शंका निर्माण होई व काहींच्या मनात तशी ती आजही निर्माण होते. ðफ्रीडरिख ए. फोन हायेक (१८९९– ) ह्या ब्रिटिश (मूळ ऑस्ट्रियन) अर्थशास्त्रज्ञाचे द रोड टू सर्फडम (१९४४) हे पुस्तक त्या काळात खूप चर्चिले गेले होते.

तात्त्विक चर्चा करूनही ज्या वादांचा निकाल लागू शकत नाही, अशांपैकी हा एक वाद आहे.  दुसऱ्या महायुद्धानंतर आजवर साम्राज्यशाहीच्या जोखडाखाली असलेली अनेक अप्रगत राष्ट्रे स्वतंत्र झाली.  आपला आर्थिक विकास जलद गतीने व इष्ट दिशेने करण्यासाठी नियोजनाची त्यांना आवश्यकता वाटणे स्वाभाविक होते.  नियोजनातून लोकशाहीचा लोप होईल काय, या तात्त्विक प्रश्नापेक्षा नियोजन व लोकशाही किंबहुना समाजवादी समाजरचना व लोकशाही यांचा समन्वय कसा साधता येईल, असा प्रश्न भारतासारख्या नियोजनाचा स्वीकार करणाऱ्या आणि आर्थिक समृद्धी, आर्थिक समता व लोकशाही या तीनही गोष्टींविषयी आस्था असणाऱ्या राष्ट्रांपुढे येऊन पडला.  या प्रश्नाचे उत्तर शोधण्याच्या प्रयत्‍नात आजही भारत व्यग्र आहे.

साम्यवादी राष्ट्रांतील नियोजनकारांपुढे एक वेगळी आर्थिक समस्याही उभी होती.  भांडवलशाही राष्ट्रांत कोणत्या गोष्टींचे उत्पादन किती प्रमाणात करावे, याविषयीचे निर्णय नफ्याच्या प्रमाणावर नजर ठेवून आपोआप घेतले जातात.  जरूरीहून अधिक उत्पादन झाले की, भाव घटतात, नफा घटतो व उत्पादक त्या क्षेत्रातून बाहेर पडू लागतात.  याउलट जेथे नफ्याचे प्रमाण अधिक असेल, तेथे उत्पादक आपोआप आकर्षित होतात.  अदृश्य हात अशा प्रकारे भांडवलशाही अर्थव्यवस्थेत मार्गदर्शन करीत असतो व ग्राहकाच्या गरजांची पूर्ती होत असते.

सर्व उत्पादन आपल्या हाती घेतल्यानंतर नियोजन मंडळ योग्य किंमती कशा ठरवू शकेल, असा वादाचा प्रश्न होता.  ग्राहकांच्या गरजा कशा प्रभावी होतील, असाही प्रश्न यातच अनुस्यूत होता.  खुली बाजारपेठ अस्तित्वात नसताना साम्यवादाला ही गोष्ट जमणार नाही, असे लूटव्हिख फोन मीझेस (१८८१–    )  व हायेकसारख्या साम्यवादाच्या टीकाकारांचे म्हणणे होते.  कारण नियोजन मंडळ असंख्य वस्तूंच्या उत्पादन खर्चाची व मागणीची आकडेवारी गोळा करू  शकणार नाही व वापरू शकणार नाही, असे त्यांचे म्हणणे होते. ð ऑस्कार लांगे (१९०४–    ) व फ्रेड एम्. टेलर (१८५५–१९३२) यांनी हा प्रश्न, नियोजन मंडळ पूर्वीच्या अनुभवांचा आधार घेऊन नव्या अनुभवांत होणाऱ्या चुका सुधारत सोडवू शकेल, असे सांगितले.  ग्राहकांचे स्वातंत्र्यही भांडवलशाही अर्थव्यवस्थेत आपण समजतो तितक्या प्रमाणात प्रत्यक्षात अस्तित्वात नसते, असे साम्यवादाच्या पुरस्कर्त्यांचे त्या प्रश्नाला प्रत्युत्तर होते.   किंमती ठरविण्याचा प्रश्न साम्यवादी अर्थव्यवस्थांनी प्रत्यक्ष व्यवहारात सोडविला आहे, असे इतिहास सांगतो.  उत्पादनांच्या कार्यक्षमता-मापनासाठी नफ्याच्या निर्देशांकाचा  मर्यादित उपयोग करावा, या विचारसरणीकडे मात्र सोव्हिएट रशिया गेल्या काही वर्षात वळला आहे.  भारतासारख्या मिश्र अर्थव्यवस्था असणाऱ्या  राष्ट्रांत मिश्र अर्थव्यवस्थेचे काही प्रश्न असतात व सार्वजनिक क्षेत्र व खाजगी क्षेत्र यांतील विरोधाची कारणे दूर करून, त्यांचे  परस्पर सहकार्य घडवून आणण्याच्या प्रयत्‍नात निर्माण होणाऱ्या समस्यांचा मिश्र अर्थव्यवस्थेला विचार करावा लागतो.

आगामी विकासाची दिशा : केन्सच्या क्रांतिकारक विवेचनानंतर गेल्या जवळजवळ तीन तपांच्या काळात तेवढ्या तोलामोलाची तात्त्विक मांडणी अर्थशास्त्राच्या क्षेत्रात झालेली नाही परंतु केन्सच्या विवेचनात आलेल्या कल्पनांचा तपशीलवार संख्याशास्त्रीय अभ्यास करण्याच्या दृष्टीने महत्त्वाची प्रगती झालेली आहे.  गणिताचा उपयोगही  अर्थशास्त्राच्या विवेचनात  मोठ्या प्रमाणावर उत्तरोत्तर करण्यात येत आहे.  अर्थमितीच्या अभ्यासाचे महत्त्व वाढत आहे.  याबाबतीत गणिताला परिशिष्टात स्थान देणाऱ्या मार्शलपेक्षा गणितीय अर्थशास्त्राचा मोकळेपणाने पुरस्कार करणारा व्हालरा हा द्रष्टा ठरला आहे.  रूढ आर्थिक सिद्धांतांचे गणितीय भाषेत पुनर्लेखन करण्याचा एक महत्त्वाचा प्रयत्‍न म्हणून १९४७ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ ðपॉल सॅम्युएल्सनच्या (१९१५–    )  फाउंडेशन्स ऑफ इकॉनॉनिक अनॅलिसिस ह्या ग्रंथाकडे बोट दाखविता येईल.  श्रमिकांचे अर्थशास्त्र, आर्थिक इतिहास यांसारखी काही उपांगे सोडल्यास गणितीय अर्थशास्त्राने अर्थशास्त्राचे संपूर्ण क्षेत्र व्यापले आहे.  साहजिकच अर्थशास्त्राच्या प्रत्येक अभ्यासकाला आज गणिताचे ज्ञान आवश्यक होऊन बसले आहे.

आर्थिक सिद्धांत गणितीय भाषेत मांडून प्रत्यक्ष अभ्यासाच्या कसोटीवर ते घासून पाहण्याचे हे शास्त्र संशोधनाच्या कक्षा रुंदावर आहे, हे निःसंशय.  अर्थशास्त्राची मूलभूत साधनसामग्री परिमाणांच्या स्वरूपात असल्याने आणि वास्तवाची सिद्धांताशी सांगड घालणे जरूरीचे असल्याने अर्थमितिशास्त्राचे महत्व यापुढे वाढत जाईल.  प्रत्यक्ष अभ्यासाशी नाते जोडण्याची ही प्रक्रिया परिणामी अर्थशास्त्राला उपकारक ठरणार आहे.  या संदर्भात महत्त्वाचे उदाहरण ðपॅसिली लेआँटिएफच्या (१९०६–   ) निविष्ट-उत्पाद विश्लेषणाचे (इनपुट-आउटपूट ॲनॅलिसिस ) देता येईल. वास्तविक आता प्रगत अवस्थेत असलेल्या या विश्लेषणाची ही पद्धत, प्रकृतिवाद्यांच्या अर्थाभिसरण तक्त्याचा व एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस मान्यता पावलेल्या मूल्य सिद्धांताचा वारसा सांगते.  लेआँटिएफने १९१९ ते १९३९ या वीस वर्षातील अमेरिकेच्या अर्थकारणाच्या संदर्भात हे विश्लेषण केले.  समाजाच्या उत्पादन  प्रयत्‍नात बदल झाल्यास अर्थकारणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कसा परिणाम होतो, याचा या पद्धतीने शोध घेता येतो.  रशिया व अन्य साम्यवादी राष्ट्रांनी लेआँटिएफच्या पद्धतीचा आर्थिक नियोजनाच्या क्षेत्रात बराच उपयोग केल्याचे दिसते.

तात्त्विक सिद्धांतांत प्रत्यक्ष अभ्यासाचा व संख्याशास्त्रीय तपशीलवार माहितीचा आशय भरून व्यावहारिक उपयोगाचे निष्कर्ष काढण्याचे प्रयत्‍न चालू आहेत.  पहिल्या महायुद्धाच्या शेवटी उपलब्ध होती, त्याहून कितीतरी अधिक प्रमाणात विविध उपयुक्त माहिती आज उपलब्ध आहे.  राष्ट्रीय उत्पन्नविषयक माहितीला हे विधान विशेष लागू आहे.  यामुळे आज नियोजन करणाऱ्या व न करणाऱ्या सर्व राष्ट्रांना आपल्या आर्थिक विकासाचे धोरण अधिक डोळसपणे ठरविणे शक्य झाले आहे.  परंतु याहूनही उपयुक्त उत्तरे हवी असतील, तर पूर्ण तपशिलांची प्रत्येक व्यक्तीविषयीची व संस्थेविषयीची प्रतिवार्षिक माहिती गोळा होणे आवश्यक आहे.

अशा अभ्यासाचे महत्त्व प्रगत राष्ट्रांतून आता मान्य झालेले आहे.  परिव्यय-लाभ विश्लेषण (कॉस्ट बेनिफिट अनँलिसिस), निविष्टि-उत्पाद विश्लेषण, प्रचालन संशोधन (ऑपरेशन्स रिसर्च) या तंत्रांचा वापर प्रगत राष्ट्रांतील शासनसंस्था व विशेषतः मोठ्या उद्योगसंस्था मोठ्या प्रमाणावर करू लागल्या आहेत.  अशा एकेका अभ्यासासाठी लागणारा खर्चही तसाच मोठा असतो.  परंतु सूक्ष्म तपशीलवार शास्त्रशुद्ध अभ्यासातून उपयुक्त निष्कर्ष हाती लागतात, असे या उद्योगसंस्थांच्या अनुभवास आले आहे.  या दिशेची प्रगती यामुळे पुढे अधिक वेगाने चालू राहील, अशी अपेक्षा ठेवावयास हरकत नाही.  आपण करीत असलेला खर्च व त्यापासून मिळणारे फलित यांविषयी दक्ष राहणे अमेरिकेसारख्या सर्वसमृद्ध राष्ट्रालाही आवश्यक वाटते.  आपण एखाद्या क्षेत्रात कार्यक्षमतेच्या दृष्टीने रशियापेक्षा कमी तर पडत नाही ना, अशी भीती या जागरूकतेमागे आहे.  शिक्षणाचे अर्थशास्त्र, समाजकल्याण कार्यक्रमांचे अर्थशास्त्र यांसारख्या विषयांच्या अभ्यासाला याचमुळे गेल्या एक-दोन दशकांत चालना मिळाली.


आज अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याच्या कामी अर्थशास्त्रज्ञ गर्क आहेत.  मागासलेल्या देशांच्या आर्थिक विकासाच्या समस्या जटिल आहेत आणि लोकसंख्या-नियंत्रण, कृषिविकास, औद्योगिकीकरण आणि परकीय मदत यांसंबंधीच्या समस्यांचा खल पुढील अनेक वर्षे होत राहणार, यांवर दुमत होणार नाही.

तथापि यांपलीकडील काही समस्यांकडे अर्थशास्त्रज्ञांचे लक्ष वेधले आहे.  पुढारलेल्या औद्योगिक राष्ट्रांच्या दृष्टीने आर्थिक विकासाच प्रश्न फारसा निकडीचा नाही.  विकासाच्या मार्गावरून शीघ्रगतीने प्रवास करणाऱ्या या राष्ट्रांना आत्यंतिक भौतिक प्रगतीमुळे आज वेगळ्या प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  हार्व्हर्ड  विद्यापीठाचे  ⇨ जॉन केनेथ गालब्रेथ (१९०९–    ) यांनी १९५८ मध्ये प्रसिद्ध केलेल्या द अफ्ल्यूअंट सोसायटी या गाजलेल्या पुस्तकात त्या समस्यांवर बोट ठेवले आहे.  श्रीमंत देशांतील विलासी जीवनातून उद्भवणारे प्रश्न दारिद्र्य व टंचाई यांनी गांजलेल्या जगापासून निराळे आहेत, असे गालब्रेथ यांचे म्हणणे आहे.  कमतरतेवर आधारलेली अर्थशास्त्रातील बहुतेक तत्त्वे समृद्धीच्या अर्थकारणात निरुपयोगी ठरतात, असे त्यांचे आग्रही प्रतिपादन आहे.

एक गोष्ट मात्र खरी, गेल्या दोन शतकांत अर्थशास्त्राचा जो झपाट्याने विकास झाला आहे, त्या विकासाची प्रक्रिया यापुढेही सतत चालू राहणार आहे. नवनवीन समस्यांची उकल करणे व ज्ञानाची नवनवी क्षेत्रे धुंडाळणे हे तर कुठल्याही गतिशील शास्त्राच्या विकासाचे मुख्य गमक आहे.

पहा: अर्थनीती अर्थव्यवस्था अर्थशास्त्र कल्याणकारी अर्थशास्त्र नियोजन विकासाचे अर्थशास्त्र.

संदर्भ:    1. Beer, M. Early British Economists, London, 1938.  

            2. Gray, A. The Socialist Traditions: Moses to Lenin, London, 1946. 

            3. Hecksher, R.F.  Mercantilism, London, 1935. 

            4. Hutchison, T.W. A Review of Economic Doctrines : 1870-1929, London, 1935. 

            5. Laidler, H.W. Socio-Economic Movements, New York, 1945. 

            6.  Samuelson, P.A. Foundations of Economic Analysis, Cambridge, 1958. 

            7.  Schumpeter, J.A. History of Economic Analysis, New York, 1954. 

            8.  Schumpeter, J.A.  Ten Great Economists, New York, 1951. 

            9.  Spiegel, H.W.  The Development of Economic Thought: Great Economists in Perspective,     

                 New York, 1952.

           10.  Stigler, G.J. Essays in the History of Economics, Chicago, 1967. 

            11. Tawney, R.H. Religion and the Rise of Capitalism, London, 1926. 

            12. Timlin, M.F. Keynesian Economics, Toronto, 1942. 

            13.  Whittaker, E. Schools and Streams of Economic Thought, London, 1960.

दाभोळकर, देवदत्त