पॉल अँटनी सॅम्युएल्सनसॅम्युएल्सन, पॉल अँटनी : (१५ मे १९१५–१३ डिसेंबर २००९). सुविख्यात अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ आणि १९७० चे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराचे पहिले मानकरी (१९७०). अमेरिकेच्या इंडियाना राज्यातील गॅरी शहरात जन्म. एला लिप्टन आणि फ्रँ क सॅम्युएल्सन हे त्यांचे आईवडील. शिकागोच्या हाइड पार्क विद्यालयात शिक्षण. पुढे शिकागो व हार्व्हर्ड विद्यापीठांत उच्च शिक्षण. १९३६ मध्ये त्यांनी अर्थशास्त्र विषयातील मास्टरची उच्च पदवी प्राप्त केली आणि १९४१ मध्ये याच विषयात डॉक्टरेट संपादन केली. पुढे त्यांची ‘हार्व्हर्ड सोसायटी ऑफ ज्यूनिअर फेलोज’ या संस्थेचा एक फेलो म्हणून नियुक्ती करण्यात आली. सॅम्युएल यांचा प्रथम विवाह मॅरिऑन इ. कॉफर्ड हिच्याशी झाला (१९३८). तिच्यापासून त्यांना चार पुत्र व दोन कन्या झाल्या. १९७८ मध्ये पहिल्या पत्नीचे निधन झाले. १९८१ मध्ये त्यांचा रिशा एकॉस यांच्याशी दुसरा विवाह झाला.

सॅम्युएल्सन यांनी मॅसॅचूसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एम्आय्टी) येथे अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ काम केले (१९४०–६५), इन्स्टिट्यूट प्राध्यापक म्हणूनही त्यांनी अध्यापनकार्य केले (१९६६-८५). १९८६ मध्ये ते गुणश्री (इमेरिटस) प्राध्यापक होते. न्यूयॉर्क विद्यापीठात ते राजकीय अर्थशास्त्र या विषयाचे अभ्यागत व्याख्याते होते (१९८७). त्यांनी विविध मंडळांवर सल्लगार म्हणूनही काम पाहिले. राष्ट्राध्यक्ष जॉन एफ्. केनेडी यांचे ते आर्थिक सल्लगार असून केनेडींच्या ‘स्टेट ऑफ अमेरिकन इकॉनॉमी’ या अहवालाचे शिल्पकार होत (१९६१). तसेच फेडरल रिझर्व्ह बोर्ड यामध्येही त्यांनी काम केले (१९६५). जर्नल ऑफ पब्लिक इकॉनॉमिक्स, जर्नल ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स आणि जर्नल ऑफ नॉनलीनिअर ॲनॅलिसिस इ.मासिकांचे ते सहयोगी संपादक होते. त्यांनी सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष म्हणून विविध संस्थांची पदे भूषविली. एम्आय्टी संस्थेने ‘पॉल ए. सॅम्युएल्सन प्रोफेसरशिप इन इकॉनॉमिक्स’ असे त्यांच्या नावाने अध्यासन निर्माण केले (१९९१).

सॅम्युएल्सन यांचा फाउंडेशन्स ऑफ इकॉनॉमिक ॲनॅलिसिस (१९४७) हा ग्रंथ आणि आर्थिक सिद्घांत, सांख्यिकी, गणितीय अर्थशास्त्र या विषयांसंबंधीचे विविध मूलगामी लेख तसेच महत्त्वाची युद्घोत्तर धोरणे व समस्या यांवरील त्यांचे वैचारिक लेख यांच्या योगे १९४७ च्या सुारास जगामधील अग्रे सर अर्थशास्त्रज्ञांध्ये त्यांची गणना होऊ लागली. याच वर्षी त्यांना ‘द जॉन बेट्स क्लार्क मेडल’ने सन्मानित करण्यात आले. तरुण अर्थपंडित म्हणून त्यांना मान्यता प्राप्त झाली. फाउंडेशन्स ऑफ इकॉनॉमिक ॲनॅलिसिस या ग्रंथात त्यांनी अर्थव्यवस्थेधील अनेक कुटुंबे आणि उत्पादन करणाऱ्या संस्था विविध निर्णय कशा प्रकारे घेत असतात, यांसंबंधी मूलभूत विवेचन केले आहे. ग्राहक जास्तीतजास्त समाधान मिळविण्याच्या प्रयत्नात असतात आणि उत्पादनसंस्था जास्तीतजास्त उत्पादन करून जास्त नफा मिळविण्याच्या मागे असतात आणि दोन्हीही घटक पदार्थांचे तसेच उत्पादनाला लागणाऱ्या निवेशांचे बाजारभाव हे गृहीत धरलेले असतात.

सॅम्युएल्सन यांच्या इकॉनॉमिक्स : ॲन इंट्रॉडक्टरी ॲनॅलिसिस (१९४८) या अर्थशास्त्रावरील पाठ्यपुस्तकास प्रतिष्ठा प्राप्त झाली आणि अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांना जगन्मान्यताही मिळाली. इकॉनॉमिक्स या पुस्तकाच्या १९४८-८० पर्यंत ११ आवृत्त्या निघाल्या. विल्यम डी. नॉरहॉस या लेखकासमवेत त्या पुस्तकाच्या १२ ते १९ आवृत्त्या निघाल्या (१९८५-२००५). हे पुस्तक जगातील चाळीस भाषांध्ये अनुवादित करण्यात आले, तसेच ते अनेक देशांतील महाविद्यालयीन अर्थशास्त्राच्या विद्यार्थ्यांचे प्रमाणीभूत पाठ्यपुस्तक म्हणून अत्यंत लोकप्रिय ठरले. त्यांचे अर्थशास्त्रविषयक विविध लेख द कलेक्टेड सायंटिफिक पेपर्स ऑफ पॉल ए. सॅम्युएल्सन या शीर्षकाने पाच खंडांत १९६६ ते १९८६ दरम्यान प्रकाशित झाले.

सॅम्युएल्सन यांनी ग्राहक वर्तन सिद्घांत, भांडवल व व्याज, आंतरराष्ट्रीय व्यापार, सरकारी अर्थकारण, कल्याणकारी अर्थशास्त्र आणि करविषयक व वित्तविषयक नीती यांसंबंधी मांडलेले मौलिक विचार लक्षणीय आहेत. त्यांनी जॉन मेनार्ड केन्सप्रमाणेच व्यापारचक्रे व आर्थिक स्थैर्य यांसंबंधी अतिशय अभ्यासपूर्ण लेखन केले.

सॅम्युएल्सन यांना अनेक सन्माननीय पदव्या व पुरस्कार प्राप्त झाले. त्यांपैकी १९७० सालचा नोबेल अर्थशास्त्र पुरस्कार (आर्थिक सिद्घांतनामध्ये शास्त्रीय विश्लेषणाची पातळी उच्च प्रमाणात वाढविल्याबद्दल), ॲल्बर्ट आइन्स्टाइन स्मृति-पुरस्कार (१९७१), ॲल्युम्नी मेडल-शिकागो विद्यापीठ (१९८३), ब्रिटानिका पुरस्कार (१९८९), गोल्ड स्कॅन्नो प्राइस-नेपल्स (१९९०), मेडल ऑफ सायन्स (१९९६), जॉन आर्. कॉन्स अवॉर्ड (२०००) इ. महत्त्वपूर्ण होत.

सॅम्युएल्सन यांनी अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील अनेक राष्ट्राध्यक त्यांची आर्थिक सल्लगार मंडळे, शासकीय प्रतिनिधी मंडळे व सार्वजनिक संस्था इत्यादींना सल्लमसलती दिल्या. रेडिओ, दूरचित्रवाणी तसेच इतर प्रसिद्घीमाध्यमे यांद्वारा आर्थिक बाबींवर त्यांनी मते व भाषणे दिली.

बेलमाँट (मॅसॅचूसेट्स) येथे त्यांचे निधन झाले.

गद्रे, वि. रा.