खुले बंदर व खुला प्रदेश : खुले बंदर व खुला प्रदेश या ठिकाणी परदेशातून आयात केलेला माल जकात न भरता उतरविता येतो व मालाचे संस्करण आणि उत्पादन करून पक्का माल जकात न भरता परदेशास निर्यात करता येतो. ह्या प्रदेशात किंवा बंदरात आरोग्य, मजूर, वाहने, टपाल यांबाबत नेहमीचेच सर्वसाधारण नियम लागू असतात. परंतु हा प्रदेश जकातीचे कर व नियम यांपासून मोकळा असतो. ज्या देशांमध्ये असे बंदर किंवा प्रदेश वसलेला आहे, त्या देशांतच जर माल निर्गत करावयाचा असेल, तर जकात लादली जाते. हॅंबर्ग व ब्रेमेन ही दोन बंदरे कित्येक शतके खुली बंदरे म्हणून अस्तित्वात आहेत आणि त्यांद्वारे यूरोपातील प्रगत देश व बाकीचे जग यांच्यात व्यापार चालू आहे. खुले बंदर व खुला प्रदेश यांमुळे जहाजांची ये-जा वाढते, मालाची जुळणी आणि निर्मिती जकातीचा बोजा न पतकरता येते. उत्पादन वाढल्यामुळे लगतच्या देशांतील लोकांना रोजगार मिळतो. या पद्धतीतील एक धोका म्हणजे, अशा प्रदेशात तयार झालेला माल संलग्न देशांत अवास्तव किंमतीस विकता येतो. जगाच्या निरनिराळ्या भागांमध्ये पुढील खुले प्रदेश आहेत :  यूरोप– स्टॉकहोम, गॉथनबर्ग, कोपनहेगन, हँबर्ग, ब्रेमेन, जेनोआ, शॅनन. अमेरिका– न्यूयॉर्क, न्यू ऑर्लीअन्स, सॅन फ्रॅन्सिस्को, लॅस अँजेल्स, सिॲटल, सॅन ॲन्टोनिओ एअरपोर्ट, मेक्सिको, पनामा व बारांगकिया. आशिया– कांडला, हाँगकाँग, सिंगापूर, एडन, बेरूत. आफ्रिका– ट्रिपोली (लिबिया) व पोर्ट सैद.

खुल्या बंदराचा व्यापाराची उतारपेठ म्हणून उपयोग केला जातो व अशा ठिकाणी मालाची साठवण करून लगतच्या देशांना मालाचा तातडीने पुरवठा करता येतो.  [→ तारपेठ, पुनर्निर्यातीची].

ज्याप्रमाणे खुला प्रदेश योजनेमुळे जकातीचे ओझे टाळता येते, त्याप्रमाणे ‘मॅन्युफॅक्चर इन बाँन्ड’ ही दुसरी पर्यायी पद्धत याच हेतूसाठी अवलंबिली जाते. ‘आयात केलेल्या मालाचे संस्करण करून ते निर्यात करीन’, असे अभिवचन (बाँड) उत्पादक देतो आणि त्यानुसार मालाची आयात जकातमाफ करता येते. पक्का माल तयार झाल्यानंतर तो निर्यात झाला की, उत्पादक आपल्या अभिवचनामधून मोकळा होतो. जर मालाची निर्यात केली नाही, तर मात्र तो जकातपात्र होतो. अशा प्रकारची पद्धत लंडन, रॉटरडॅम व ॲम्स्टरडॅम या शहरांमध्ये सुरू करण्यात आली आहे.

मुंबई, कलकत्ता व मद्रास ही खुली बंदरे करावीत, अशी सूचना १९५७ च्या निर्यात विकास समितीपुढे आली असता ती फेटाळून लावण्यात आली. या शहरांची लोकसंख्या अवाढव्य असून शिवाय चोरट्या व्यापाराची मोठी शक्यता असल्याने ही खुली बंदरे  करू नयेत, असे समितीने सांगितले. भारत सरकारने पश्चिम किनाऱ्यावर कांडला बंदरात खुला प्रदेश निर्माण केला आहे. करपात्र अशा कच्च्या मालावर जकात न लादता पंचवीस संस्करणांचे धंदे या प्रदेशात काढण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. येथे तयार होणारे उत्पादन विशिष्ट प्रमाणात नासधूस वजा जाता निर्यात व्हावे, अशी अपेक्षा आहे. जर देशांतर्गत उपभोगासाठी येथे तयार होणाऱ्या वस्तू भारताच्या अन्य भागाकडे रवाना करावयाच्या असतील, तर त्यासाठी जकात द्यावी लागेल व या वस्तूंचे वाटप सरकारनियुक्त संस्थेमार्फत होईल. हल्डिया (पश्चिम बंगाल) येथे दुसरा खुला प्रदेश चालू करावा, अशी कारखानदार लोकांची मागणी आहे.

पहा : मूल्यावपाती अन्यदेशीय विक्री.

बोंद्रे, चिं. रा.