टिनबर्जेन, यान : (१२ एप्रिल १९०३–  ). सुविख्यात डच अर्थशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रातील पहिल्या नोबेल पारितोषिकाचा सहविजेता (१९६९). जन्म द हेग येथे. लायडन विद्यापीठातून भौतिकी विषयात डॉक्टरेट. १९२९ मध्ये टाइन योहाना डे व्हिट हिच्याशी विवाह. द हेग येथील डच सरकारच्या ‘सेंट्रल ब्यूरो ऑफ स्टॅटिस्टिक्स’ मध्ये काम (१९२९–३६) व (१९३८–४५). राष्ट्रसंघात व्यापारचक्र संशोधन तज्ञ म्हणून कार्य (१९३६–३८), द हेग येथील ‘सेंट्रल प्लॅनिंग ब्यूरो’चा संचालक (१९४५–५५). १९३३ पासून ‘रॉटरडॅम स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स’ ह्या संस्थेत विकास नियोजनाचा प्राध्यापक. संयुक्त राष्ट्रांच्या ‘सामाजिक विकास संशोधन संस्थे’चा अध्यक्ष. नेदरर्लंड्सच्या ‘विज्ञान अकादमी’चा सदस्य. इरॅस्मस बक्षिसाचा मानकरी (१९६७). १९५५ पासून विविध देशाची सरकारे व आंतरराष्ट्रीय संघटना यांचा सल्लागार म्हणून कार्य.

टिनबर्जेन अर्थमितीमध्ये मोलाची भर घातली आहे. १९३०–३५ च्या सुमारास त्याने समस्त (ॲग्रिगेटिव्ह) अर्थव्यवस्थेच्या प्रतिमानांसंबंधी लेख प्रसिद्ध केले. त्यांमध्ये अनेकवर्णी गतिकसमीकरणांचा वापर करण्यात आला आहे. त्यानंतरच्या लेखांत अशा अर्थव्यवस्थांचा सांख्यिकीय पद्धतीने अभ्यास करण्यात आला. नेदरर्लंड्सची अर्थव्यवस्था हे टिनबर्जेनने प्रसिद्ध केलेले पहिले संपूर्ण प्रतिमान होय. हे प्रतिमान अतिशय गुंतागुंतीचे असून त्यामध्ये २७ समीकरणे व ५० हून अधिक चलपदे समाविष्ट होती. त्यांतून डच अर्थव्यवस्थेची विविध वैशिष्ट्ये साकारली होती. त्या प्रतिमानामुळे संशोधकांना आर्थिक समस्यांचे निराकरण करणाऱ्‍या विविध मार्गांचे मूल्यमापन तसेच अल्पकालीन विश्लेषणे तयार करणे सुलभ झाले त्याचा उपयोग राजकीय व आर्थिक नियोजन क्षेत्रांत करणे शक्य झाले. टिनबर्जेन राष्ट्रसंघाचा अर्थसल्लागार असताना त्याने अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या अर्थव्यवस्थेचे (पहिले महायुद्ध आणि जागतिक महामंदी यांदरम्यान झालेला अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचा विकास) प्रतिमान तयार केले. त्याचे हे कार्य म्हणजे पुढे सर्व जगभर मोठ्या प्रमाणावर तयार करण्यात येत असलेल्या प्रतिमानांचा पाया व प्रमुख प्रेरणाच ठरली. पुढे विकास पावलेल्या व्यापारचक्र सिद्धांताकरिता तसेच आर्थिक स्थिरीकरण पद्धतींकरिता आधारभूत साहित्य या प्रतिमानाच्या अभ्यासामुळे उपलब्ध झाले.

दुसऱ्‍या महायुद्धानंतर डच शासनाने नियोजन, अर्थसंकल्पन व अर्थनीती ह्यांबद्दलची धोरणे ठरविताना टिनबर्जेनच्या अर्थमितीय प्रतिमानांचा उपयोग केला. डच प्रतिमानांचे जगातील अनेक नामवंत अर्थमितिज्ञांनी अनुकरण केले. आर्थिक नियोजनाच्या संदर्भात अर्थमितीय प्रतिमानांचा वापर करताना टिनबर्जेनच्या ज्या महत्त्वाच्या संकल्पनांचा उपयोग झाला, त्यांमध्ये ‘लक्ष्ये’ (टार्गेट्स) व ‘साधने’ (इन्स्ट्रुमेंट्स) ह्या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. टिनबर्जेनने याच संकल्पनांचा पाठपुरावा अर्धविकसित देशांकरिता विकास-प्रतिमाने बनविण्यासाठी केला.

टिनबर्जेनचे मान्यवर ग्रंथ पुढीलप्रमाणे आहेत : बिझिनेस सायकल्स इन् द यू. एस्. ए. १९१९–३९ (१९३९) ऑन द थिअरी ऑफ इकॉनॉमिक पॉलिसी (१९५२) इकॉनॉमिक पॉलिसी : प्रिंसिपल्स अँड डिझाइन (१९५६) सिलेक्टेड पेपर्स (१९५९) शेपिंग द वर्ल्ड इकॉनॉमी (१९६२) डेव्हलपमेंट प्लॅनिंग  (१९६८).

समस्त अर्थमितीय प्रतिमानांची रचना व त्यांचा वापर आणि नियोजनतंत्रांचा विकास ह्यांबाबत टिनबर्जेनची भूमीका प्रवर्तकाची असून त्याने पुढील महत्त्वाच्या विषयांवरही लेखन केले आहे : व्यापारचक्रांचे गणितीय विश्लेषण उत्पन्न वाटपाचा सिद्धांत आर्थिक विकास सिद्धांत व पर्यायता लवचिकतेचे मापन. आर्थिक विश्लेषण-प्रक्रियेत अधिक अचूकता आणून टिनबर्जेनने आपल्या सहकाऱ्‍यांना राजकोषीय प्रवृत्ती आणि भावी घडामोडी ह्यांचे अधिक अचूक मूल्यमापन करण्याच्या कामी साहाय्य केले.

गद्रे, वि. रा.