मागणी : विशिष्ट काळात, विशिष्ट किंमतीला वस्तूचे विशिष्ट परिमाण मागितले जाणे. उपभोक्त्याला आपल्या अनेकविध गरजा भागविण्यासाठी उपभोग्य वस्तूंची आवश्यकता भासते. म्हणूनच उपभोक्ता किंवा ग्राहक आपल्याजवळ असलेल्या क्रयशक्तीचा उपयोग करून उपभोग्य वस्तू खरेदी करतो म्हणजे उपभोक्ता त्या त्या वस्तूंची मागणी करतो. म्हणूनच एखादा ग्राहक दुधाची मागणी करतो, म्हणजे दर लिटरला विशिष्ट भावाने ग्राहक विशिष्ट परिमाण दूध खरेदी करण्यास तयार आहे, असा अर्थ अभिप्रेत होतो. अशा रीतीने ‘मागणी’ या शब्दात वस्तूचे परिमाण आणि ते विकत घेण्यासाठी किंमत देण्याची तयारी म्हणजेच क्रयशक्तीचे अस्तित्व, या दोहोंचाही अंतर्भाव होतो.

अत्यल्प काळात किंवा एखाद्या क्षणी उपभोक्ता एखादी वस्तू निरनिराळ्या किंमतींना निरनिराळ्या परिमाणांत खरेदी करण्याची तयारी दर्शवील. उपभोक्त्याने किंवा ग्राहकाने निरनिराळ्या किंमतींस मागणी केलेल्या एखाद्या वस्तूच्या परिमाणांच्या कोष्टकाला व्यक्तीचे ‘मागणी कोष्टक ’ असे म्हणतात. या कोष्टकात एका बाजूला वस्तूची प्रत्येक नगास किंमत व दुसऱ्या बाजूस वस्तूचे मागणी-परिमाण ही दिलेली असतात. व्यक्तीचे मागणी-कोष्टक खाली दिल्याप्रमाणे असते :

ग्राहक वेगवेगळ्या किंमतीस एखादी वस्तू वेगवेगळ्या परिमाणांत कशी घेईल, हे मागणीच्या कोष्टकावरून दिसून येते. जसजशी वस्तूची किंमत कमी होत जाते, तसतसे मागणीचे परिमाण वाढत जाते. दुधाची किंमत लिटरला दोन रुपये असेल, तर ग्राहक तीन लिटर दुधाची मागणी करील. दुधाची किंमत लिटरला दीड रुपया असेल, तर मागणी चार लिटर असेल. याचा अर्थ असा नव्हे की, दुधाची किंमत उतरत राहील आणि ग्राहक दूध खरेदी करीत राहील. समजा, ग्राहकाने दोन रुपये लिटर या भावाने तीन लिटर दूध घेतले आणि पुढच्या क्षणी दुधाचा भाव दीड रुपया लिटर झाला, म्हणजे परत तोच ग्राहक चार लिटर दूध घेणार नाही कारण दूध घेण्यासाठी त्याने राखून ठेवलेले पैसे आधीच खर्च झाले आहेत. सारांश, एका विशिष्ठ क्षणी किंवा अत्यल्प काळात ग्राहक एका विशिष्ट किंमतीला एकच वस्तुपरिमाण घेऊ शकतो. म्हणून मागणी-कोष्टकात एकच किंमत आणि एकच वस्तु-परिमाण सत्य असतात, बाकीच्या किंमती आणि परिमाणे कोष्टक तयार करण्यासाठी मानलेली असतात. एका व्यक्तीच्या मागणी-कोष्टकाप्रमाणे अनेक व्यक्तींची मागणी-कोष्टके तयार करता येतील. सर्व व्यक्तींच्या मागणी-कोष्टकांच्या साहाय्याने, वेगवेगळ्या विशिष्ट किंमतींनुसार बाजाराची एकंदर मागणी-परिमाणे नमूद करून वस्तूचे बाजारी मागणीचे कोष्टक बनविता येईल. समजा, दुधाचे बाजारी मागणीचे कोष्टक खालीलप्रमाणे आहे :

 

वरील कोष्टकाच्या साहाय्याने क्ष-अक्षावर दुधाच्या मागणीचे परिमाण आणि य-अक्षावर दुधाची दर लिटरी किंमत दर्शवून खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे मम ही मागणी वक्ररेषा काढता येईल.

परिमाण आ. १. मागणी सिद्धांत स्पष्ट करणारा आलेख मागणी रेषेकडे पाहिले असता असे दिसून येईल की, वस्तूची मागणी किंमतीच्या विरुद्ध दिशेने बदलत आहे. बाजारी मागणीची हीच प्रवृत्ती मागणी-सिद्धांतात ग्रथित केलेली आहे. म्हणून मागणी सिद्धांतानुसार ‘इतर परिस्थिती तशीच कायम असल्यास, एकाद्या वस्तूची किंमत वाढली, तर तिच्या मागणीचे परिमाण घटते आणि या उलट वस्तूची किंमत घटली, तर तिच्या मागणीचे परिमाण वाढते.’ हा मागणी-सिद्धांत ‘इतर परिस्थिती तशीच कायम असल्यास’ (सेटेरिस पॅरिबस) या गृहीतपक्षावर आधारलेला आहे. ही इतर परिस्थिती म्हणजे मागणीची परिस्थिती होय. मागणी परिस्थिती बदलली, तर निराळे मागणी कोष्टक तयार करावे लागेल. म्हणजे प्रत्येक विशिष्ट मागणी परिस्थितीनुसार वेगळे कोष्टक आणि त्या कोष्टकानुसार वेगळ्या मागणी वक्ररेषा असतील. वस्तूच्या मागणी परिस्थितीत ज्या गोष्टींचा समावेश होतो. त्यांमध्ये लोकसंख्या, लोकसंख्येमध्ये स्त्री-पुरुषांचे तसेच लहान मुलांचे आणि वृद्धांचे प्रमाण, एकंदर मिळकत व मिळकतीचे वाटप, उपभोक्त्यांच्या आवडी-निवडी, प्रतिस्थापनीय (पर्यायी) वस्तू आणि त्यांच्या किंमती, भविष्यकाळात वस्तूंच्या किंमतींच्या चढउतारांबाबत उपभोक्त्यांच्या अपेक्षा या प्रमुख होत. यांमधील कोणत्याही बाबतींत फरक झाला, तर मागणी-कोष्टकांत बिघाड होईल. मग दुसरे कोष्टक तयार करावे लागेल आणि या बदललेल्या मागणी -परिस्थितीत तिला अनुरूप असे मागणी-कोष्टक आणि मागणी वक्ररेषा यांना अनुसरून मागणी-सिद्धांत लागू होईल.


आ.२. मागणीचे प्रसरण व आकुंचन आणि मागणीची वृद्धी व ऱ्हास दर्शविणारा आलेख. मागणीचे प्रसरण व आकुंचन आणि मागणीची वृद्धी व ऱ्हास : मागणी -परिस्थिती कायम असताना मागणी सिद्धांतानुसार वस्तूच्या मागणीचे प्रसरण किंवा आकुंचन किंमतीच्या बदलाला अनुसरून होते. वस्तूची किंमत वाढली, तर तिची मागणी आकुंचन पावते व तिची किंमत कमी झाली, तर मागणी प्रसरण पावते. वस्तूच्या मागणीचे आकुंचन व प्रसरण एकाच मागणी रेषेला अनुसरून दाखविली जातात. खाली दिलेल्या आकृतीत दर्शविल्याप्रमाणे ‘मम’ या मागणी रेषेला अनुसरून ‘बक’ या किंमतीत मागणी-परिमाण ‘अक’ आहे. वस्तूची किंमत ‘ब,क,’ पर्यंत घटली, तर मागणी ‘अक,’पर्यंत वाढेल, म्हणजे प्रसरण पावेल. याउलट वस्तूची किंमत ‘ब’ पर्यंत वाढली, तर मागणी ‘अक’ पर्यंत आकुंचित होईल.

वस्तूच्या मागणीची परिस्थिती बदलली असता मागणीची वृद्धी किंवा ऱ्हास होतो. मागणीची वृद्धी झाली असल्यास नवी मागणी रेषा मूळ मागणी रेषेच्या उजव्या (वरच्या) बाजूस असते. आकृतीत ‘म’ ही मागणी रेषा मागणीची वृद्धी दाखविते. जेव्हा दिलेल्या किंमतीत, ‘बक’या किंमतीत, वस्तूची मागणी वाढलेली असते म्हणजे मागणी ‘अक’ पासून ‘अग’ पर्यंत वाढते, तेव्हा मागणीची वृद्धी झालेली असते. याउलट नवी मागणी रेषा मूळ मागणी रेषेच्या डाव्या (खालच्या) बाजूला सरकलेली असते, तेव्हा मागणीचा ऱ्हास झालेला असतो. आकृतीत ‘म,म’ ही रेषा मागणीचा ऱ्हास दर्शविते. जेव्हा दिलेल्या किंमतीत, म्हणजे ‘बक’ या किंमतीत वस्तूची मागणी कमी झालेली असते, म्हणजे मागणी ‘अक’ पासून ‘अख’ पर्यंत कमी होते, तेव्हा मागणीचा ऱ्हास झालेला असतो. वस्तूच्या मागणीची वृद्धी किंवा ऱ्हास मागणीच्या परिस्थितींतील बदलामुळे होतात. लोकसंख्या वाढली, राष्ट्रीय मिळकत वाढली, पर्यायी वस्तूच्या किंमती वाढल्या, किंवा उपभोक्त्यांच्या आवडी-निवडींत बदल झाला, तर वस्तूच्या मागणीची वृद्धी होईल आणि मागणी परिस्थितींतील याउलट झालेल्या बदलामुळे मागणीचा ऱ्हास होईल.

मागणीच्या नियमाला काही अपवाद : मागणीच्या नियमाला काही अपवाद आहेत. सर्वसाधारणपणे मागणी रेषा वरून खाली म्हणजे क्ष-अक्षाकडे कललेली असते. परंतु काही विशिष्ट परिस्थितीत आणि वस्तूंच्या बाबतींत मागणी रेषा अपवादात्मक असून त्या सुरुवातीला किंवा नंतर काही अंतरापर्यंत खालून वर गेलेल्या दिसतात. काही निकृष्ट वस्तू, ज्यांना ‘गिफेनच्या वस्तू’ म्हणतात, ग्राहकांच्या किंवा उपभोक्त्यांच्या अपेक्षांचा ज्या वस्तूंच्या किंमतींवर व मागणी परिमाणांवर विशेषतः परिमाण होतो अशा वस्तू, तसेच ज्या मौल्यवान वस्तूंमुळे व्यक्तीचे समाजातील स्थान ठरविले जाते अशा वस्तू, या सर्व मागणी नियमाला अपवाद आहेत. रॉबर्ट गिफेन याने दाखवून दिले की, पावाची किंमत उतरली, तर उपभोक्ते अधिक पाव खरेदी करणार नाहीत. कदाचित उतरलेल्या किंमतींत कमी पाव खरेदी करून वाढलेल्या वास्तविक मिळकतीचा उपयोग अधिक पौष्टिक खाद्य वस्तू जास्त परिमाणांत खरेदी करण्यात केला जाईल. तसेच पावाची किंमत वाढली, तर पाव जास्त परिमाणांत खरेदी केला जाईल. कारण पाव हे सर्वसामान्य जनतेचे खाद्य असल्याकारणाने लोक इतर वस्तूंवरील खर्च कमी करून पाव जास्त प्रमाणात घेतील. अशा रीतीने गिफेन वस्तूंच्या बाबतीत मागणी रेषा खालून वर गेलेली असण्याचा संभव आहे. ज्या वस्तूंची किंमत, उदा., कर्जरोखे आणि भाग, थोडी वाढली असता भविष्यकाळात अधिक प्रमाणात वाढतील अशी ग्राहकांची अपेक्षा असते, तेव्हा थोड्या वाढलेल्या किंमतीस मागणीचे परिमाण अधिक असेल. तसेच मौल्यवान रत्ने, मोती वगैरे वस्तूंमुळे व्यक्तीचे समाजातील स्थान उंचावते, अशा वस्तूंच्या बाबतीतही किंमत वाढली, तर मागणीचे परिमाणही वाढते.

मागणीची लवचिकता : वस्तूच्या किंमतीच्या बदलानुसार मागणीचे परिमाण विरुद्ध दिशेने बदलते. म्हणजे वस्तूची किंमत कमी झाल्यास तिच्या मागणीचे परिमाण वाढेल. वस्तूच्या किंमतीत अत्यल्प बदल झाल्यास मागणीचे परिमाण कमी-जास्त बदलते. या प्रमाणास ‘वस्तूच्या मागणीची लवचिकता’ असे म्हणतात. काही वस्तूंची मागणी कमी लवचिक व काही वस्तूंची मागणी अधिक लवचिक असते. ज्या वस्तूच्या किंमतीत अगदी थोडा फरक झाल्यानेसुद्धा तिच्या मागणीत प्रमाणापेक्षा बराच अधिक फरक होतो, त्या वस्तूची मागणी सापेक्षतेने अधिक लवचिक असते. वस्तूची किंमत शेकडा ५ टक्क्यांनी कमी झाली आणि त्यामुळे मागणी शेकडा १० टक्क्यांनी वाढली, तर वस्तूची मागणी अधिक लवचिक असल्याचे दिसून येते. याउलट वस्तूची किंमत शेकडा ५ टक्क्यांनी कमी झाल्यामुळे मागणी शेकडा १ टक्क्यांने वाढली, तर वस्तूची मागणी कमी लवचिक असल्याचे दिसून येते. वस्तूची किंमत कितीही कमी झाली वा वाढली, तरी मागणी परिमाणांत काहीच फरक झाला नाही, तर वस्तूची मागणी संपूर्णपणे अलवचिक असते.

वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेचे मापन हे वस्तूच्या मागणीच्या बदलाचे प्रमाण व त्याला कारण असलेले वस्तूच्या किंमतीच्या बदलाचे प्रमाण, या दोन प्रमाणांच्या गुणोत्तराने करतात. वस्तूच्या किंमतीच्या बदलानुसार तिच्या मागणी-परिमाणामध्ये होणारा बदल विरुद्ध दिशेने होत असल्याकारणाने, कोणतेतरी एक प्रमाण ऋण असते, म्हणून मागणीची लवचिकता ऋण (-) असते. परंतु वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेचे मापन करताना या उणे चिन्हाचा निर्देश करीत नाहीत. म्हणून मागणीच्या लवचिकतेच्या या कल्पनेनुसार आकृतीच्या साहाय्याने खालीलप्रमाणे मापन करता येईल.


वरील आकृतीत ‘मम’ ह्या मागणी रेषेला ‘ट’ या बिंदूशी ‘सर’ ही स्पर्शरेषा आहे. स्पर्शबिंदू ‘ट’ आणि त्याच्याजवळचा दुसरा बिंदू ‘ठ’ एकाच सरळ रेषेत आहेत असे समजू. ‘बट’ ह्या किंमतीत मागणी ‘अब’ आहे. किंमत थोडीशी वाढली आणि ‘कठ’ झाली, तर मागणी ‘अक’ असेल. म्हणजे किंमतीची वाढ ‘डठ’ (Δ कि) आणि मागणीची घट ‘बक’(Δ मा) आहे.

 

यावरून, मागणी रेषेवरील कोणत्याही बिंदूजवळ मागणीच्या लवचिकतेचे मापन करण्यासाठी त्या बिंदूजवळ स्पर्शरेषा काढून ती य-अक्ष व क्ष-अक्ष छेदील येथपर्यंत वाढवावी. म्हणजे क्ष-अक्षावरील छेदनबिंदूपासून स्पर्शरेषेच्या अनुरोधाने मागणी रेषेवरील बिंदूपर्यंतचे अंतर आणि त्या बिंदूपासून स्पर्शरेषेच्या अनुरोधाने य-अक्षावरील छेदनबिंदूपर्यंतचे अंतर यांच्या गुणोत्तराने मागणीच्या लवचिकतेचे मापन होते. म्हणून आकृतीच्या संदर्भात रट = टस असेल, तर मागणीची लवचिकता एक (१) असते रट टसपेक्षा मोठी असेल, तर मागणीची लवचिकता एकापेक्षा अधिक असते, म्हणजे वस्तूची मागणी सापेक्षतेने लवचिक असते रट टसपेक्षा लहान असेल, तर मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी, म्हणजेच मागणी सापेक्षतेने अलवचिक असते. 

समजा, वस्तूची मागणी रेषा खालील आकृतीत दाखविल्याप्रमाणे सरळ रेषा आहे आणि ती ‘अक्ष’ आणि ‘अय’ अक्षांना अनुक्रमे ‘क’ आणि ‘ख’ बिंदूंमध्ये छेदते. ‘ग’ हा ‘कख’चा मध्यबिंदू आहे.

आ. ४ मागणीची कमी-अधिक लवचिकता दर्शविणारा आलेख  

दोन किंवा अनेक मागणी रेषा खालील आकृतीत दर्शविल्याप्रमाणे एका बिंदूत छेदत असतील, तर त्या छेदनबिंदूच्या संदर्भात एखाद्या वस्तूची मागणी अधिक लवचिक, तर दुसऱ्या वस्तूची मागणी कमी लवचिक असेल. 

‘मम’ आणि ‘भभ’ या दोन मागणी रेषा एकमेकींना ‘ट’ बिंदूमध्ये छेदतात. म्हणून ‘ट’ बिंदूच्या संदर्भात ‘भभ’ ही मागणी रेषा अधिक लवचिक मागणी दर्शविते, तर ‘मम’ ही मागणी रेषा कमी लवचिक मागणी दर्शविते.

 वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेचे सर्वसाधारण मापन वस्तूवरील एकंदर खर्चातील बदलाने होते. वस्तूची किंमत घटल्यामुळे मागणीचे परिमाण इतके वाढले की, वस्तूवरील एकंदर खर्च कायम राहिला, तर मागणीची लवचिकता एक असते एकंदर खर्च वाढला, तर मागणीची लवचिकता एकापेक्षा अधिक असते, आणि एकंदर खर्च कमी झाला, तर मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी म्हणजे मागणी सापेक्षतः अलवचिक असते. दुधाची किंमत १·१० रु. लिटर असताना मागणी १० लिटर म्हणजे दुधावरील एकंदर खर्च ११ रु. आहे. दुधाची किंमत १ रु. लिटर झाली आणि म्हणून मागणीचे परिमाण ११ लिटर झाले, तर दुधावरील एकंदर खर्च कायम (म्हणजे रु. ११) राहिला, तर दुधाच्या मागणीची लवचिकता एक आहे. समजा, दुधाच्या मागणीचे परिमाण १२ लिटरपर्यंत वाढले, तर एकंदर खर्च १२ रु. झाला, म्हणून दुधाच्या मागणीची लवचिकता एकापेक्षा अधिक असेल. परंतु दुधाच्या मागणीचे परिमाण १०·५ लिटरपर्यंतच वाढले, तर दुधावरील एकंदर खर्च १०·५ रु. होईल, म्हणजे एकंदर खर्च कमी झाला. म्हणून मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असेल. म्हणजेच मागणी सापेक्षतः अवलवचिक असेल. वस्तूची किंमत थोडीशी कमी झाल्यामुळे मागणीचे परिमाण इतके वाढले की, एकंदर खर्च कायम राहिला, तर वस्तूवरील सीमान्त खर्च शून्य असेल. म्हणजे सीमान्त खर्च शून्य असला, तर मागणीची लवचिकता एक असते. सीमान्त खर्च धन (+) असेल, तर मागणीची लवचिकता एकापेक्षा अधिक आणि सीमान्त खर्च ऋण (−) असेल, तर मागणीची लवचिकता एकापेक्षा कमी असते.


मागणीची लवचिकता कशावर अवलंबून असते : काही वस्तूंची मागणी लवचिक, तर काहींची सापेक्षतः अलवचिक असते. ज्या गोष्टींवर वस्तूंच्या मागणीची लवचिकता अवलंबून असते त्या गोष्टी म्हणजेः वस्तूचे स्वरूप, तिच्या पर्यायी वस्तू, तिचे विविध उपयोग, वस्तूची किंमत, उपभोक्ता वस्तूच्या खरेदीवर खर्च करू इच्छिणारा आपल्या मिळकतीचा भाग, ह्या होत. चैनीच्या वस्तूंची मागणी लवचिक असते, तर जीवनोपयोगी वस्तूंची मागणी सापेक्षतः अलवचिक म्हणजे कमी लवचिक असते. म्हणून मोटारी, रेडिओ वगैरे वस्तूंची मागणी अधिक लवचिक आणि मीठ, अन्नधान्ये, साखर आदी वस्तूंची मागणी कमी लवचिक असते. ज्या वस्तूला बऱ्याच पर्यायी वस्तू असतात, त्या वस्तूची मागणी अधिक लवचिक असते. याउलट ज्या वस्तूला पर्यायी वस्तू नसतात किंवा फारच कमी असतात, तिची मागणी कमी लवचिक असते. ज्या वस्तूला विविध वैकल्पिक उपयोग असतात, तिची मागणी अधिक लवचिक असते. तसेच ज्या वस्तूवर उपभोक्त्याच्या मिळकतीचा अतिशय लहान भाग खर्च होतो, त्या वस्तूची मागणी कमी लवचिक असते. त्याचप्रमाणे ज्या वस्तूची किंमत फार अधिक, तिच्या मागणीची लवचिकता जास्त असते व ज्या वस्तूची किंमत खालच्या पातळीत असते, तिच्या मागणीची लवचिकता कमी असते. यामुळेच शुद्ध लोणी आणि मार्गरीन यांमध्ये शुद्ध लोण्याची मागणी अधिक लवचिक व मार्गरीनची मागणी कमी लवचिक असते. संयुक्त मागणी असलेल्या वस्तूंची मागणी सापेक्षतः कमी लवचिक असते.

मागणीच्या लवचिकतेचे महत्व : वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेचे अर्थशास्त्रीय विवेचनात फार महत्त्व आहे. वस्तूच्या किंमतींतील चढउतार मागणीच्या लवचिकतेवर अवलंबून असतात. वस्तूची मागणी अतिलवचिक असेल आणि तिचा पुरवठा कमी झाला, तर किंमतीमध्ये फारसा फरक होणार नाही याउलट मागणी कमी लवचिक असेल आणि तिचा पुरवठा कमी झाला, तर किंमत जास्त प्रमाणात वाढेल. तसेच मक्तेदार उत्पादक आपला निव्वळ नफा अधिकतम करण्यासाठी वस्तूच्या मागणीच्या लवचिकतेनुसार किंमत ठरवितो. सरकार निरनिराळ्या वस्तूंवर जकाती लादताना जकातीचे दर वस्तूंच्या मागणीच्या लवचिकतेवर ठरविते.

मागणीची उत्पन्न-लवचिकता : वस्तूच्या किंमतीच्या बदलाच्या संदर्भात मागणीत होणाऱ्या बदलाचे प्रमाण मागणीची मूल्याधिष्ठित लवचिकता दर्शविते. परंतु समाजाच्या आणि व्यक्तीच्या उत्पन्नांत होणाऱ्या बदलांनुसार वस्तूच्या मागणीत जो बदल संभवतो, त्याच्या संदर्भात मागणीची उत्पन्न-लवचिकता मोजली जाते. व्यक्तीचे किंवा कुटुंबाचे उत्पन्न वाढले असता ज्या वस्तूंच्या बाबतीत (उदा., गॅस, पाणी-पुरवठा, घरभाडे, अन्नधान्ये) खर्चाचे प्रमाण वाढत नाही, त्या वस्तूंच्या बाबतीत मागणीची उत्पन्न-लवचिकता फार कमी असते याउलट ज्या वस्तूंच्या बाबतीत खर्चाचे प्रमाण वाढत जाते, त्यांच्या मागणीची उत्पन्न-लवचिकता अधिक असते. या बाबतीत महत्त्वाचा नियम ⇨ एर्न्स्ट एंगेल या जर्मन संख्याशास्त्रज्ञ – अर्थशास्त्रज्ञाने मांडला, म्हणून तो नियम ‘एंगेलचा नियम’ म्हणून प्रसिद्ध आहे. या नियमानुसार, ‘जसजसे कुटुंबाचे उत्पन्न वाढत जाते, तसतसे सर्वच वस्तूंवरील खर्च सारख्या प्रमाणात वाढत नाही अन्नावरील खर्चाचे प्रमाण कमी होत जाते कपडालत्ता, घरभाडे, जळण, दिवाबत्ती ह्यांवरील खर्चाचे प्रमाण जवळजवळ कायम राहते आणि शिक्षण, चैनीच्या वस्तू यांवरील खर्चाचे प्रमाण वाढत जाते’. १८५५ मध्ये एंगेलने जर्मनीतील सॅक्सनी परगण्यातील अनेक कुटुंबांच्या अंदाजपत्रकांचा अभ्यास करून हा नियम प्रस्थापित केला.

संयुक्त मागणी : एखादी गरज भागविण्यासाठी दोन वस्तूंची संयुक्त रीतीने मागणी करावी लागते. या वस्तू एकमेकींना पूरक असतात. अशा प्रकारच्या पूरक वस्तूंची उदाहरणे म्हणजे मोटार आणि पेट्रोल, सिगारेट आणि आगपेटी, विटा आणि चुना ही होत. या वस्तूंच्या बाबतीत एक वस्तू असेल आणि दुसरी पूरक वस्तू नसेल, तर गरज भागविता येणार नाही. संयुक्त मागणी असलेल्या काही वस्तू एकाच विशिष्ट प्रमाणात असाव्या लागतात, तर काही वस्तू बदलत्या प्रमाणात असाव्या लागतात. ज्या दोन पूरक वस्तूंची मागणी विशिष्ट प्रमाणात असते, त्या दोन वस्तू एकच आहेत असे मानून दोहोंची मिळून एकच मागणी रेषा काढावी लागते. ज्या दोन पूरक वस्तूंची आवश्यकता बदलत्या प्रमाणात असू शकते, त्या प्रत्येकीचे वेगळे मागणी-कोष्टक तयार करता येते आणि त्यावरून प्रत्येकीची वेगळी मागणी रेषा काढता येते.

परप्रवृत्त मागणी : काही वस्तूंची मागणी दुसऱ्या एखाद्या वस्तूच्या मागणीपासून निर्माण झालेली असते, तिला ‘परप्रवृत्त मागणी’ असे म्हणतात. या वस्तूंना स्वतंत्र आणि प्रत्यक्ष मागणी नसते. कापडाच्या मागणीमुळे कच्च्या कापसाला मागणी निर्माण होते. तसेच उपभोग्य औद्योगिक वस्तूंच्या मागणीमुळे यंत्रसामग्री, मानवी श्रम, भांडवल, कच्चा माल यांना मागणी निर्माण होते. म्हणून यंत्रसामग्री वगैरे उत्पादनाच्या साधनांची मागणी परप्रवृत्त असते.

पहा : पुरवठा.

सुर्वे, गो. चिं.