प्रदर्शने : चित्रशिल्पादी विविध कलाक्षेत्रांतील कलाकृती, यांत्रिक-तांत्रिक उपकरणे वा उत्पादने, कलाकौशल्याच्या किंवा कुतूहलजनक वस्तूंचा संग्रह इत्यादींच्या खुल्या दर्शनासाठी केलेल्या सुसंघटित जाहीर योजना. अशा वस्तूंबद्दल जनतेमध्ये कुतहूल निर्माण व्हावे, त्यांच्या निर्मितीला उत्तेजन मिळावे, व्यापाराची भरभराट व्हावी आणि संस्कृतीच्या विविध शाखांमधील विकास व गुणसंपन्नता यांचे दर्शन घडावे, हे सामान्यतः प्रदर्शनाचे हेतू असतात. इंग्रजीतील ‘फेअर’, ‘एक्झिबिशन’ व ‘एक्स्पोझिशन’ या संज्ञा सामान्यतः परस्परपर्यायी म्हणून वापरल्या जातात. मराठीत त्या अर्थाने जत्रा, बाजार, प्रदर्शन इ. संज्ञा रूढ आहेत. प्रदर्शन भरविणाऱ्या संघटनेच्या योजनेनुसार त्याचे स्वरूप ठरते. काही प्रदर्शने अल्पमुदतीची व लहान प्रमाणावर छोट्याशा शहरांमधून भरविण्यात येतात व त्यांचे स्वरूप स्थानिक जत्रेसारखे किंवा लहानशा बाजारासारखे असते. ती बहुधा विशिष्ट क्षेत्रापुरती किंवा विभागापुरती मर्यादित असतात. उदा., कृषिप्रदर्शन, गृहविज्ञानप्रदर्शन, चित्रकलाप्रदर्शन इत्यादी. व्यापारी प्रगती दाखविण्यासाठी जत्रेच्या स्वरूपात मोठ्या आकाराची तात्पुरती प्रदर्शने वेगवेगळ्या ठिकाणी भरविण्याची प्रथा जगभर रूढ आहे. अशी प्रदर्शने भरविण्यासाठी काही ठिकाणीकायमच्या इमारती बांधण्यात आल्या आहेत. उदा., बर्लिनमधील Interbau वास्तू. काही ठिकाणी खास प्रदर्शने भरविण्यासाठीच कायमची दालनेही उभारण्यात आली आहेत, तेथे वेळोवेळी तात्पुरती प्रदर्शने भरविली जातात. उदा., पॅरिसमधील ग्रँड पॅलाइस. कित्येकदा ज्या वास्तूमध्ये प्रदर्शन भरते, ती वास्तू प्रदर्शन आटोपल्यावर नजीकच्या शहरामध्ये अंतर्भूत केली जाते.उदा., बार्सेलोना व बोलोन्या येथील जत्रा रोम येथील ‘Esposizione Universale Roma’ इ. काही प्रदर्शने कित्येक महिने चालणारी असून ती पुष्कळदा जागतिक पातळीवर योजिलेली असतात. त्यांमधून अनेक राष्ट्रांतील खाजगी व शासकीय उत्पादक संघटना भाग घेतात. अशा मोठ्या प्रदर्शनांसाठी होणारा खर्च निरनिराळ्या मार्गांनी भागविण्यात येतो.प्रदर्शन ज्या राष्ट्रात भरते तेथील शासन प्रदर्शनासाठी देणगी देते, प्रदर्शकांकडून भाडे मिळू शकते आणि व्यापारी व कारखानदार यांच्या संघटनाही वर्गणीरूपाने प्रदर्शनास मदत करतात. प्रदर्शन भरविणाऱ्या राष्ट्राचा मुख्य उद्देश आपल्या राष्ट्रात होणाऱ्या मालाचे व कलाकृतींचे दर्शन परराष्ट्रीय व्यापारी व उद्योगपती यांना घडवावे, हा असतो. म्हणूनच असे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन म्हणजे केवळ माल खपविण्यासाठी केलेला एक खटाटोप नसून ते राष्ट्रीय प्रतिष्ठेचे एक अंग मानण्यात येते आणि त्या दृष्टीने ते यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर प्रयत्‍न केले जातात. त्याचबरोबर प्रदर्शनात भाग घेणारे परराष्ट्रीय निर्माते व कारखानदार हेसुद्धा आपल्या निर्माणसंस्थांचीच नव्हे तर आपापल्या राष्ट्राची प्रतिष्ठा वाढविण्याची एक संधी म्हणून अशा प्रदर्शनांत सहभागी होतात. अर्थात मालाचा खप वाढविण्यासही अशा प्रदर्शनांचा उपयोग होतोच. काही प्रदर्शनांचा हेतू मुख्यत्वे प्रदर्शित मालाचा खप वाढावा हाच असल्याने ती फक्त संबंधित व्यापाऱ्यांनाच खुली असतात आणि त्यांमधून सामान्य जनतेच्या करमणुकीची किंवा आकर्षणाची काही सोय नसते. परंतु बहुतेक सर्व आंतरराष्ट्रीय प्रदर्शने, कृषिजत्रा आणि संघटित बाजार हे प्रेक्षकांना आकर्षून घेण्यासाठी खास व्यवस्था करतात. यासाठी कलाकुसर विभाग, करमणूक विभाग, खेळ, शर्यती, वाद्यवृंदमेळावे, जलसे, सौंदर्यस्पर्धा, वेशभूषास्पर्धा, चित्रपट, संगीत, नाटके, प्रहसने, सिनेतारकांचे मेळावे इत्यादींची योजना करतात.

‘इंडिया - ५८’ प्रदर्शन दिल्ली: एक दालन.

मालाचे प्रदर्शन व त्याचा खप करण्यासाठी जत्रा व बाजार यांचा उपयोग मध्ययुगीन काळापासून करण्यात आला. आधुनिक स्वरूपाची प्रदर्शने मात्र अठराव्या शतकात औद्योगिक युगाच्या सुरुवातीपासून भरविण्यात येऊ लागली. लंडनच्या ‘सोसायटी ऑफ आर्ट्‌स’ या संस्थेने अठराव्या शतकाच्या मध्यास कारखान्यात उत्कृष्ट माल बनविणाऱ्यांस बक्षिसे देऊ केली व स्पर्धकांच्या मालाचे प्रदर्शन भरविले. फ्रान्समध्येही कारखानदारांच्या मालाचे अशाच प्रकारचे प्रदर्शन १७९८ मध्ये भरविण्यात आले व त्यानंतर वेळोवेळी अशी प्रदर्शने भरविली जाऊ लागली. पहिले भव्य आधुनिक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन (द ग्रेट एक्झिबिशन) १८५१ मध्ये लंडन येथे प्रिन्स ॲल्बर्टच्या संचालनाखाली भरविण्यात आले. हाइड पार्कमध्येसु. ८ हे. क्षेत्र व्यापणाऱ्या ‘क्रिस्टल पॅलेस’ या अवाढव्य इमारतीची उभारणी खास प्रदर्शनासाठी करण्यात आली. १८५१ ची आठवण राहावी म्हणून इमारतीची लांबी १८५१ फूट (५६४ मी.) ठेवली होती. या प्रदर्शनात १४,००० प्रदर्शकांनी भाग घेतला व प्रदर्शनास ६० लक्ष प्रेक्षकांनी भेट दिली. हे प्रदर्शन अतिशय यशस्वी झाल्यामुळे त्यानंतर अशी अनेक प्रदर्शने भरविण्यात आली. उदा., १८५५ मध्ये पॅरिस येथे (२४,००० प्रदर्शक) १८६२ मध्येलंडन येथे (२९,००० प्रदर्शक) आणि १८६७, १८७८, १८८९ व १९०० मध्ये पॅरिस येथे. अशीच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रदर्शनेहॉलंड, बेल्जियम, जर्मनी, ऑस्ट्रिया व आयर्लंड या देशांत भरविण्यात आली. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील पहिले मोठे प्रदर्शन फिलाडेल्फियामध्ये १८७६ साली स्वातंत्र्यशताब्दी समारंभानिमित्त भरविण्यात आली. १८५१ ते १९७० या काळात जागतिक पातळीवर सु. ३४ प्रदर्शने भरली होती. १९२८ पर्यंत कोणत्याही राष्ट्राला असे आंतरराष्ट्रीय प्रदर्शन हवे तेव्हा भरविता येत असे परंतु त्या वर्षी ३५ राष्ट्रांनी केलेल्या करारानुसार पॅरिसमध्ये एक आंतरराष्ट्रीय प्रदर्शन संचालनालय स्थापण्यात आले व त्यामार्फत अशी प्रदर्शने संघटित केली जावीत, असे ठरले. जागतिक पातळीवर भरविण्यात आलेल्या भव्य प्रदर्शनांमध्ये पुढील विशेष उल्लेखनीय आहेत : फिलाडेल्फिया शताब्दी १८७६ (१ कोटी लोकांनी पाहिले) जागतिक कोलंबियन प्रदर्शन, शिकागो, १८९३ शिकागो विकासशताब्दी, १९३३-३४ (उपस्थिती २·२ कोटी लोक) ब्रूसेल्स जागतिक, १९५८ न्यूयॉर्क जागतिक, १९३९-४० (३·४ कोटी लोकांनी भेट दिली) न्यूयॉर्क जागतिक, १९६४-६५ माँट्रिऑल, १९६७ ओसाका, १९७० स्पोकॅन (वॉशिंग्टन), १९७४. यांशिवाय प्रतिवर्षी सु. १०० व्यापारी प्रदर्शने भरतात त्यांपैकी बरीचशी यूरोपात योजिली जातात.


लंडनमध्ये सबंध वर्षभर उद्यानविज्ञान, कृषी, विविध प्राणी यांची विशेष प्रकारची प्रदर्शने चालूच असतात. प्राणिप्रर्दशनांत ‘क्रफ्ट्‌स श्वानप्रदर्शन’ हे विशेष प्रसिद्ध आहे. यांशिवाय खाद्यपदार्थ, मेवामिठाई यांची व इतर व्यवसाय प्रदर्शने भरतात. ऑलिंपिया येथे अनेक उद्योगधंद्यांची प्रदर्शने भरविली जातात. मोटारगाड्या, नौका यांचीही प्रदर्शने वेळोवेळी भरत असून स्मिथफील्ड येथील गुरांची प्रदर्शने अतिशय प्रसिद्ध आहेत. ग्रेट ब्रिटनमधील बर्मिंगहॅम येथे १९७६ साली ९०,००० चौ. मी क्षेत्रामध्ये सर्व सुविधायुक्त ‘राष्ट्रीय प्रदर्शन केंद्र’ उभारण्यात आले.

व्यापारी व कारखानदारी मालाच्या प्रदर्शनाप्रमाणेच चित्रशिल्पादी कलाकृतींचीही प्रदर्शने भरविण्यात येतात. त्याचप्रमाणेसांस्कृतिक महत्त्व असलेल्या वस्तू अशा प्रदर्शनांतून मांडण्यात येतात. प्रदर्शनांची मांडणी करणे हीही एक कला असल्याने त्या क्षेत्रातील तज्ञ वास्तुशिल्पाज्ञांकडे प्रदर्शनाच्या मांडणीची योजना आखण्याचे काम सोपविण्यात येते. प्रदर्शन मांडण्याच्या विविध कल्पनांचा वापर करून त्याच्या अंतर्बाह्य सजावटीमध्ये त्यांनी फार मोठी भर घातली आहे. १८५१ च्या लंडन येथील जागतिक प्रदर्शनापासून औद्योगिक प्रदर्शनांमध्ये वास्तुशिल्पाचा अभिनव आकर्षक नमुना तयार करण्याची स्पर्धा जगभर सुरू झाली.

‘एस्पो - ६७’ प्रदर्शन, माँट्रिऑल, कॅनडा : भारतीय दालनातील नागार्जुनसागर प्रकल्प उभारणीचे भित्तीचित्र.

सोळाव्या शतकामध्ये चित्रशिल्पादी कलाकृती जत्रेत व बाजारात प्रदर्शित केल्या जात. रोममध्ये चर्चमधून चित्रे प्रदर्शित करण्याची प्रथा होती. अँटवर्प (बेल्जियम) या शहरामधील स्थानिक चित्रकारांच्या मंडळाने (गिल्ड) १५४० मध्ये शहराच्या चौकात प्रदर्शन भरविल्याचा उल्लेख सापडतो. सतराव्या शतकात काही घराण्यांनी आपल्या खाजगी संग्रहांतील कलाकृती सार्वजनिक रीत्या प्रदर्शित केल्या. पुरातन कलावस्तूंच्या प्रदर्शनाची ही सुरुवात होती. पुढे या परंपरेतूनच अठराव्या शतकामध्ये ‘द सलाँ ऑफ फ्रान्स’ या नियमित चित्रप्रदर्शनांना चालना मिळाली. अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात औद्योगिकीकरणातून औद्योगिक प्रदर्शनांना चालना मिळाली. व्यापारी दृष्टिकोणापेक्षाही तंत्रविद्या, विज्ञान, उद्योग, कृषी इ. क्षेत्रांतील प्रगती दर्शविण्यावर या प्रदर्शनांतून भर देण्यात आला.

औद्योगिक प्रदर्शनांच्या निमित्ताने आश्रयदाते आणि चित्रकारादी कलावंत यांचे संबंध अधिकाधिक वाढू लागले व या संबंधातूनच केवळ कलांची अशी प्रदर्शने भरू लागली. चित्रनिर्मितीची कामे मिळविण्यासाठी चित्रकाराला जनतेसमोर सतत येणे भाग पडू लागले. त्यातूनच कलावस्तुविक्रयाची नवी प्रथा सुरू झाली. कलावस्तुविक्रयासाठी खाजगी कलावीथी निर्माण झाल्या. या प्रथेचा फायदा असा झाला की, समाजातील बराच मोठा वर्ग कलेमध्ये रस घेऊ लागला.

आधुनिक कलाप्रदर्शनांद्वारा लोकांपुढे नवनव्या कलाकृती योजनापूर्वक व सातत्याने मांडल्या जातात. त्यामुळे समाजाची कलाभिरुची घडविण्याला व ती विकसित करण्याला प्रदर्शने अप्रत्यक्ष रीत्या हातभार लावतात, असे म्हणता येईल. वेगवेगळे आनुधिक कलाप्रवाह व संप्रदाय जनतेसमोर आणण्यात प्रदर्शनांचा वाटा मोठा आहे. अशा ऐतिहासिक महत्त्वाच्या प्रदर्शनांपैकी काही उल्लेखनीय प्रदर्शने पुढीलप्रमाणे : ‘सेझेशन’ संप्रदायाचे म्यूनिकमधील आंतरराष्ट्रीय प्रदर्शन (१८९८) व व्हिएन्ना येथील सेझेशन प्रदर्शनातील (१९०३) गुस्टाफ क्लिम्ट याचे व्यक्तिगत चित्रप्रदर्शन, ह्यांमधून नव्यकला संप्रदाय सर्वत्र प्रसृत झाला. ॲल्फ्रेड स्टीग्‌लिट्‌स व वॉल्टर पॅच यांनी १९१३ मध्ये न्यूयॉर्क येथे आयोजित केलेल्या ‘आर्मरी शो’ या प्रदर्शनात पॉल सेझान, कॉन्स्टंटिन ब्रांकूश, पाब्लो पिकासो, फ्रांसिस पीकाब्या, आंरी मातीस, झॉर्झ ब्राक इ. प्रख्यात कलावंतांच्या कलाकृती ठेवल्या होत्या. त्यांतून अमेरिकेतील नवीनतम (आव्हां गार्दे) प्रवृत्तींना चालना मिळाली. जर्मनी व फ्रान्स येथील दादावादी प्रदर्शने (१९२०, १९२२) तसेच लॉरेन्स, बर्लिन व पॅरिस येथील नवकालवादी प्रदर्शने यांतून नव्या शैली व नवी माध्यम-साधने यांविषयी नवी अभिरुची यूरोपभर निर्माण होण्यास मदत झाली. ‘द एक्स्पोझिशन इंटरनॅशनल द्यू सुर्‌रिआलिझ्मे’ (१९३८) आणि अशाच प्रकारचे आंद्र ब्रताँ व मार्सेल द्यूशाँ यांनी आयोजित केलेले प्रदर्शन (१९४७) ही अतिवास्तववादी चित्रप्रदर्शने होत. यांतून अत्यंत अभिनव व भावोद्दीपक चित्रनिर्मिती लोकांपुढे आली. अशा प्रकारची अभिनव व नवकल्पक ‘आव्हां गार्दे’ प्रदर्शने व आधुनिक कलासंग्रहालये यांचे परस्परांशी अतूट नाते आहे. या प्रदर्शनांतून संग्रहालयांना कलाकृती स्वीकारण्याच्या संदर्भात नवनवे निकष प्राप्त झाले व त्यांतून कलारसिकांना या कलाकृती कायम स्वरूपात पाहण्यास मिळून नवी कलाभिरुची निर्माण करण्याच्या प्रक्रियेस चालना मिळते गेली. न्यूयॉर्क येथील ‘म्यूझीयम ऑफ मॉडर्न आर्ट’ या कलासंग्रहालयाचे कार्य या संदर्भात विशेष मोलाचे आहे.

स्वतः चित्रकारांनी एकत्र येऊन प्रदर्शने भरविण्यास सुरुवात केली, ती विसाव्या शतकात. चित्रकार, शिल्पकार आणि आरेख्यक कलांवत एकत्र येऊन त्यांनी सांघिक प्रदर्शने भरविल्याची उदाहरणे आहेत. संग्रहालये, कलाशिक्षणसंस्था आणि विद्यपीठे यांमार्फत विविध कलानिर्मितीची प्रदर्शने भरू लागली. कलावीथींमधून आणि संग्रहालयांतून सांघिक प्रदर्शने किंवा व्यक्तिगत प्रदर्शने भरवून नव्या प्रकारची कलानिर्मिती जनतेसमोर मांडण्याची पद्धत रूढ झालेली आहे.

भारतातही हे कार्य काही कलासंस्था आणि खाजगी कलावीथी करीत आहेत. १८८८ मध्ये स्थापन झालेली ‘बाँबे आर्ट सोसायटी’ आपले प्रदर्शन दरवर्षी भरविते. याच प्रदर्शनांतून अनेक नामांकित भारतीय चित्रकार, शिल्पकार पुढे आले. अमृता शेरगिल, बेंद्रे, हेब्बर, करमरकर, पळशीकर, आरा, सामंत इ. कलावंतांना या प्रदर्शनांतून सुवर्णपदके मिळाली आहेत. महाराष्ट्र शासनही १९५६ पासून वार्षिक राज्य कला प्रदर्शन भरविते. त्यात मध्यंतरी काही काळ खंड पडला. राज्य कला प्रदर्शनांतील निवडक कलाकृतींचे फिरते प्रदर्शन महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरांतून दाखविण्याची प्रथा १९७१ मध्ये सुरू झाली. मुंबईतील ‘आर्ट सोसायटी ऑफ इंडिया’ ही संस्थाही कलाप्रदर्शने भरविते. नवी दिल्ली येथील ‘ऑल इंडिया फाइन आर्ट्‌स अँड क्राफ्ट्स सोसायटी’, मुंबईची ‘ऑल इंडिया स्कल्प्‌टर्स असोसिएशन’ अशा काही संस्थादेखील नियमितपणे वार्षिक प्रदर्शन भरवीत असतात. प्रत्येक राज्यातील ललित कला अकादमीतर्फे किंवा शासनातर्फेही वार्षिक प्रदर्शने त्या त्या राज्यात होत असतात. भारत सरकारच्या ललित कला अकादमीद्वारा आंतरराष्ट्रीय कलाकृतींचे-चित्रकला, शिल्पकला व आरेख्यक कला यांचे-त्रैवार्षिक प्रदर्शन १९६८ पासून भरविण्यात येऊ लागले आहे.

मुंबईत ‘जहांगिर आर्ट गॅलरी’ ही सार्वजनिक कलावीथी आणि ‘ताज’, ‘केमोल्ड’, ‘पुंडोल’ इ. खाजगी कलावीथी यांमधून दरआठवड्याला एखादेतरी प्रदर्शन भरते. ‘आर्टिस्ट’-सेंटर’ या संस्थेचीही स्वतःची कलावीथी आहे. नवी दिल्ली, कलकात्ता व मद्रास येथेही प्रदर्शनांसाठी कलावीथींची सोय उपलब्ध आहे.

भारतीय मालाला आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांतून प्रसिद्धी देण्याचे काम प्रदर्शन संचालनालयाकडे आहे. हे संचालनालय व्यापार मंत्रालयाचा घटक असून भारताने कोणकोणत्या प्रदर्शनांत भाग घ्यावयाचा, यासंबंधी ते निर्णय घेते. या संचालनालयास मदत करण्यासाठी शासनाने ‘भारतीय व्यापारजत्रा व प्रदर्शन मंडळ’ (इंडियन कौन्सिल ऑफ ट्रेड फेअर्स अँड एक्झिबिशन्स), ही निमसरकारी संस्था स्थापन केली आहे. (चित्रपत्र ).

  

धोंगडे, ए. रा. परब, वसंत गद्रे, वि. रा.