यांत्रिकीकरण : मनुष्यशक्ती वा पशुशक्ती यांऐवजी यंत्रांचा वापर म्हणजे ‘यांत्रिकीकरण’ होय. औद्योगिक क्रांतीनंतर यांत्रिकीकरणाला जीवनाच्या विविध क्षेत्रांत सुरुवात झाली, असे म्हणण्यास हरकत नाही. आजच्या युगातील ‘स्वयंचालन’ हे यांत्रिकीकरणाचा उच्च बिंदू समजला जातो व त्याचे ‘दुसऱ्या औद्योगिक क्रांतीची वाटचाल’ असे यथार्थ वर्णन केले जाते. यांत्रिकीकरण हे आधुनिक उत्पादन पद्धतीचे व सांप्रतच्या जीवनातील विविध क्षेत्रांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. यंत्रांच्या शोधामुळे जुने श्रमप्रधान तंत्र मागे पडून नवे यंत्रप्रधान तंत्र पुढे आले आहे.

यंत्रे व यांत्रिक अवजारांचा उपयोग ही यांत्रिकीकरणाची वैशिष्ट्ये होत. यंत्र व यांत्रिक अवजारे ह्यांत फरक आहे. यंत्रे ही अवजारांपेक्षा वजनाने व आकाराने मोठी असतात, तसेच त्यांचे मूल्यही जास्त असते. त्याचबरोबर यंत्रांत एकाच वेळी विविध प्रक्रिया होतात, कारण यंत्रांत अनेक अवजारांचे एकत्रीकरण असून ती एकाचवेळी यांत्रिक सांगड्यात काम करतात. यंत्रातील ही अवजारे प्रत्यक्षपणे मनुष्य चालवीत नसून ती संलग्न अशा प्रेरक यंत्राने चालविली जातात. याउलट अवजारे प्रामुख्याने एकाच प्रक्रियेकरिता वापरली जातात व अवजारांच्या साहाय्याने प्रत्यक्षपणे मनुष्य प्रक्रिया करून साधनसामग्रीचे अपेक्षित परिवर्तन घडवून आणतो. यंत्र चालविण्याकरिता सर्वसाधारणपणे कुशल कामगारांची आवश्यकता असते, कारण यंत्रात विविध हालचाली एकाच वेळी होतात व म्हणून ज्या साधनसामग्रीवर प्रक्रिया करावयाची असते, तिच्या हालचालीबरोबर यंत्राची विवक्षित हालचाल नियमित करावी लागते. ह्याचाच अर्थ हालचाल नियमित करण्याकरिता मानवी हस्तक्षेप व कौशल्य यांची जरूरी असते. याउलट अवजारांच्या हालचालीचा एकच साधा साचा असतो, त्यामुळे साधनसामग्री एकदा योग्य तऱ्हेने ठेवली की, आपोआप इच्छित प्रक्रिया होते. कामगाराचे काम फक्त गती नियमित करण्याचेच असते. त्यामुळे यंत्रावजारे अर्धकुशल कामगारही चालवू शकतात.

अर्थात कोणत्याही क्रियेचे यांत्रिकीकरण हे पूर्णतः वा अंशतः त्याचबरोबर गतिशील वा स्थिर असू शकेल. ‘गतिशील यांत्रिकीकरण’ म्हणजे एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरिता मनुष्य वा पशू यांच्याऐवजी यंत्राच्या प्रेरक शक्तीचा उपयोग करणे होय. ज्यावेळी एकाच ठिकाणी राहून तीच तीच गोष्ट अनेक वेळा वा सातत्याने करावी लागते, त्यावेळी अशा क्रिया यंत्राच्या साहाय्याने करून घेणे सुलभ जाते. अशा यांत्रिकीकरणाला ‘स्थिर यांत्रिकीकरण’ म्हणतात.

सांप्रत आर्थिक दृष्ट्या पुढारलेल्या राष्ट्रांमध्ये जीवनाच्या विविध क्षेत्रांत यांत्रिकीकरण झालेले दिसते. अशा देशांत शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे शेतीच्या नांगरटीपासून ते उत्पादनाच्या विपणनापर्यंत आणि जनावरांचे दूध काढण्यापासून त्यांच्या चराईपर्यंत सर्व क्रिया यंत्राने केल्या जातात. शेतीच्या यांत्रिकीकरणामुळे त्या देशात शेती पुरोगामी पद्धतीची झाली असून लोकांचे राहणीमान सुधारले आहे. औद्योगिक क्षेत्रातसुद्धा स्वयंचलित अशा अद्ययावत स्वरूपाच्या यंत्रसामग्रीचा वापर दिसतो. वाहतूक साधनांत आज आपणास यांत्रिकीकरणामुळे क्रांती झालेली दिसते. घोडागाडी, बैलगाडी व शिडाची जहाजे ह्यांऐवजी विजेवर चालणाऱ्या आगगाड्या, तसेच हेलिकॉप्टर, स्पुटनिक, जेट विमाने, अवकाशयाने व वातानुकूलित जहाजे दृष्टीस पडतात. ह्या साधनांमुळे प्रवास जलद होऊन तो सुखावहही होत आहे. दळणवळण व वाहतुकीची साधने यांमुळे बाजारपेठेच्या मर्यादा वाढून आज सर्व जग जणू एकच बाजारपेठ बनली आहे. शीतगृह, शीत संग्रहागार व वातानुकूलित जहाजे यांच्या योगे नाशवंत वस्तूही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पाठविणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर मालाची चढउतारसुद्धा यंत्राच्या साहाय्याने करता येणे शक्य झाले आहे.

दळणवळणाच्या साधनांत आज आपणास विद्युत्‌ तारायंत्र, बिनतारी संदेशवाहक, रेडिओ संदेशवाहक वगैरे साधने यांत्रिकीकरणामुळे उपलब्ध झाली आहेत. ह्यामुळे अंतर्देशीय व परदेशीय संदेश त्वरित पाठविणे शक्य झाले आहे. दळणवळणाच्या साधनांतील प्रगतीमुळे व्यापाराच्या तंत्रात एक क्रांतीच झाली आहे. कारण आज ह्या साधनांमुळे व्यापाऱ्यांना जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यांतील आर्थिक घडामोडींची बातमी लगेच मिळून त्या अनुषंगाने त्यांना आपल्या खरेदीविक्रीच्या धोरणांत बदल करणे शक्य झाले आहे. त्याचबरोबर ह्या साधनांच्या साहाय्याने पैसे व मालाची मागणी लगेच पुरविणे सहज शक्य झाले आहे.

व्यापाराच्या क्षेत्रात आज आपणास विविध प्रकारची यंत्रे प्रसारात दिसतात. नाणी वेगळी करण्याकरिता, मोजण्याकरिता व मोड देण्याकरिता रोकड हाताळणी यंत्र आहे, तर रोकड ताडण्याकरिता रोकड ताडणी यंत्र उपलब्ध आहे. एकाच वेळी हजारो विपत्रे तयार करण्याकरिता बीजक व विपत्र तयार करण्याच्या यंत्राचा आज सर्रास उपयोग केला जातो. इतकेच काय पण तिकिटे चिकटविण्याचा त्रास वाचविणारी अंकन व तिकिटे लावण्याची यंत्रेही उपलब्ध आहेत. गेल्या काही वर्षांत इलेक्ट्रॉनिकी क्षेत्रात मोठीच क्रांती झाली असून मोठमोठ्या संगणकांचा उपयोग हिशेबासाठी व कार्यालयातील अन्य लहानमोठ्या कामांसाठी होऊ लागला आहे. पाश्चात्य देशांत घरातील केर काढणे, कपडे धुणे, बशा पुसणे आदी कामे यंत्रांच्या साहाय्याने केली जातात. अशा कामांसाठी मनुष्यबळाचा वापर करणे फार खर्चिक असल्याने व स्त्रिया सर्रास नोकऱ्या करीत असल्याने घरगुती कामांचे यांत्रिकीकरण त्या देशात वरदानच ठरले आहे. यांत्रिकीकरणामुळे मनुष्यजातीचे अनेक फायदे झाले आहेत. यंत्रामुळे मनुष्याची निसर्गावर मात करण्याची शक्ती तर वाढली आहेच, पण त्याबरोबरच विविध आर्थिक क्षेत्रांतील उत्पादन व उत्पादकता वाढली असून उत्पादनाचा वेगही वाढला आहे. उत्पादन व उत्पादकता वाढल्यामुळे राहणीमानात सुधारणा झाली आहे. यांत्रिकीकरणामुळे माल मोठ्या प्रमाणावर तयार होऊ लागला आहे. परिणामी उत्पादन खर्च व वस्तूमूल्य कमी झाले आहे. यांत्रिकीकरणामुळे शारीरिक ताण कमी होऊन कामकारांची हुशारी, कुशलता व सधनता वाढली आहे. यंत्रांच्या वापरामुळे जुन्या व्यावसायिक श्रम-विभागणीची जागा सूक्ष्म श्रम-विभागणीने घेतली आहे.

ज्या देशांत यांत्रिकीकरण रूढ झाले नाही, ते देश आर्थिक क्षेत्रात मागासलेले आहेत. त्यांचा आर्थिक विकास व्हावयाचा असेल, तर त्यासाठी उत्पादनाच्या यांत्रिकीकरणावर त्यांनी भर देणे आवश्यक आहे. अर्थात ज्या ठिकाणी यंत्रांची उपलब्धता आहे, ती चालविण्याकरिता विजेसारखी प्रेरक शक्ती व कुशल कसबी कामगार सहजप्राप्य आहेत व ज्या ठिकाणी मनुष्यबळाचा तुटवडा आहे, त्या ठिकाणीच यांत्रिकीकरण यशस्वी होण्याची शक्यता आहे.

भारतात मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर व म्हणूनच स्वस्त किंमतीत उपलब्ध आहे बेकारीची समस्या तीव्र असल्याने यांत्रिकीकरणाचा अवलंब आत्मघातकी ठरेल, असा विचार महात्मा गांधींनी पुढे मांडला होता. ग्रामीण भागात शेतमजूर मुबलक असताना ट्रॅक्टर व अन्य अवजारे यांचा उपयोग हितावह ठरणार नाही, अशी त्यांची विचारसरणी होती. महात्मा गांधींचा सर्व प्रकारच्या यांत्रिकीकरणाला विरोध होता, असे म्हणणे चुकीचे ठरेल. माणसाला हलकी, गलिच्छ कामे करावी लागू नयेत यासाठी पर्याय म्हणून यंत्रे वापरली पाहिजेत, असे त्यांचे ठाम मत होते. ज्या योगे उत्पादकता मोठ्या प्रमाणावर वाढेल, आर्थिक प्रगती शीघ्रगतीने होईल, रोजगारीवर फार विपरीत परिणाम होणार नाही अशा प्रकारच्या यांत्रिकीकरणाला उत्तेजन दिले पाहिजे, अशी मते म. गांधींनी वेळोवेळी व्यक्त केली होती.

यांत्रिकीकरणामुळे मानवजातीच्या विकासाचा दरवाजा जरी खुला झाला असला, तरी संहारक शक्तीच्या वाढीमुळे मानवी विध्वंसाचा मार्गही मोकळा झाला आहे. अणुबाँब, हैड्रोजन बाँब ह्यांसारख्या संहारक शक्तींची यंत्राने निर्मिती यांत्रिकीकरणामुळेच शक्य झाली आहे. अणुशक्तीचा उपयोग ऊर्जानिर्मितीसाठी व अन्य विधायक कामासाठी केला पाहिजे हे जेव्हा मानवजातीला पटेल, तेव्हा यंत्र शाप न ठरता वरदान ठरल्याशिवाय राहणार नाही.

पहा: औद्योगिक क्रांती स्वयंचालन वाहतूक यांत्रिक शेती व्यापारक्रांति संगणक.

रायरीकर, बा. रं.