फिलिप्स घराणे : नेदर्लंड्‌समधील जगप्रसिद्ध आधुनिक उद्योगसमूहाचे प्रवर्तक घराणे. विद्युत् ‌दीप, विद्युत् ‌उपकरणे, रेडिओ व दूरचित्रवाणी यांची निर्मिती करणारे तसेच इलेक्ट्रॉनीय क्षेत्रातील एक अग्रगण्य उद्योगसमूह म्हणून या घराण्याला जगभर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. या उद्योगसमूहाचा प्रारंभ नेदर्लंड्‌समधील आयंटहोव्हेन शहरी १५ मे १८९१ रोजी झाला. जेरार्ड (९ ऑक्टोबर १८५८-२६ जानेवारी १९४२) आणि अँटन (१४ मार्च १८७४- ७ ऑक्टोबर १९५१) फिलिप्स या दोन बंधूंनी सतत परिश्रम, चिकाटी, दीर्घोद्योगी, संशोधकवृत्ती या गुणांच्या जोरावर फिलिप्स उद्योग नावारूपास आणला एवढेच नव्हे, तर विसाव्या शतकातील जगड्‌व्याळ कंपन्यांमधील एक अग्रणी कंपनी असे त्या उद्योगाला ख्यातकीर्त केले.

 अँटन फिलिप्स : फिलिप्स उद्योगसमूहाचा संस्थापक.जेरार्ड व अँटन या दोघा बंधूंचा जन्म झाल्टबॉमाल या गावी झाला. त्या दोघांमध्ये १६ वर्षांचे अंतर होते. त्यांचे वडील फ्रेडरिक फिलिप्स यांचा तंबाखूचा व्यापार होता झाल्टबॉमाल गॅस कारखाना त्यांनी इंग्रज मिशनऱ्यांकडून विकत घेऊन ग्राहक व उत्पादक या दोघांचाही फायदा व्हावा अशा पद्धतीने गॅस उत्पादन सुरू केले. हेच तत्त्व या दोन बंधूंनी भावी कारखानदारी कारकीर्दीत अंमलात आणले. 

जेरार्ड फ्रेडरिकचे शिक्षण डेल्फच्या ‘ पॉलिटेक्‍निक विद्यालया’त झाले व १८८३ साली त्याने अभियांत्रिकीमधील पदवी संपादन केली. प्रायोगिक भौतिकीचा, विशेषतः इलेक्ट्रॉनिकीचा, विशेष अभ्यास त्याने केला. विद्युत् ‌उत्पादनाबाबत जेथे जेथे प्रयोग चालू होते, तेथील संशोधनाबाबतची वृत्ते, प्रबंध मोठ्या आवडीने तो वाचत असे. २१ ऑक्टोबर १८७९ रोजी टॉमस आल्वा एडिसनने यशस्वीपणे प्रदीप्त दीपाचा प्रयोग केला होता १८८१ मध्ये पॅरिस येथे पहिले वीजप्रदर्शन भरविण्यात आले. १८८१ मध्येच जर्मनीत सीमेन्स व हॉल्स्क यांनी प्रदीप्त दीपनिर्मितीचा एक प्रायोगिक स्वरूपाचा छोटासा कारखाना उभारला होता. १८८३ मध्ये ‘जर्मन एडिसन कंपनी फॉर ॲप्लाइड इलेक्ट्रिसिटी’ या कंपनीची ५० लक्ष मार्क भांडवलावर स्थापना करण्यात आली होती. सीमेन्स व हॉल्स्क यांनी ‘एईजी’ (AEG-जनरल इलेक्ट्रिक कंपनी) कंपनीची स्थापना केली होती. याच सुमारास इटली, ऑस्ट्रिया, हंगेरी या देशांत प्रदीप्त दीपनिर्मितीचे छोटे कारखाने उभारण्यात आले होते.

जेरार्डला या पार्श्वभूमीवर ग्‍लासगो येथे अनुक्रमे लॉर्ड केल्व्हिन या भौतिकीविज्ञाच्या प्रयोगशाळेत आणि ‘ग्‍लासगो कॉलेज ऑफ सायन्स अँड आर्ट्‌स’ च्या प्रा. जेमीसन यांच्या हाताखाली काम करण्याची दुर्मिळ संधी मिळाली. ‘लंडन सिटी अँड गिल्ड्‌स’ च्या ‘इलेक्ट्रिक लाइटनिंग अँड द ट्रान्स्‌मिशन ऑफ पॉवर अँड टेलेग्राफी’ या स्पर्धात्मक परीक्षेत तो पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला. यानंतर काही वर्षे जेरार्डने लंडनमध्येच जर्मन कारखानदारांचा एजंट म्हणून काम करून अनुभव मिळविला. १८८९ मध्ये तो ॲमस्टरडॅमला परतला व ‘एईजी’ कंपनीचा एजंट म्हणून काम पाहू लागला. जेरार्डच्या वडिलांनी झाल्टबॉमाल येथेच राहत्या घरी जेरार्डकरिता एक छोटीशी प्रयोगशाळा उघडून दिली. १८९० मध्ये जेरार्डला सेल्यूलोज तंतूंचे प्रचंड उत्पादन करता येईल, अशी एक निर्मितीप्रक्रिया प्रयोगांती सापडली. वडिलांनी भांडवल पुरविल्यामुळे जेरार्डने १५ मे १८९१ रोजी ‘फिलिप्स अँड कंपनी’ स्थापन केली. त्याचा धाकटा भाऊ अँटन त्यावेळी सतरा वर्षाचा होता. कल्पनाशक्ती, संवेदनशीलता, खेळांची आवड इ. गुण त्याच्यात होते. झाल्टबॉमालच्या शाळेच त्याची फारशी प्रगती  दिसून न आल्याने त्याला ॲमस्टरडॅमच्या व्यापारी शाळेत घालण्यात आले. येथेही त्याचे मन फारसे रमले नाही. यामुळे अँटनच्या वडिलांनी त्याला ॲमस्टरडॅमच्या एका शेअरदलालाच्या फर्ममध्ये उमेदवार म्हणून पाठविले. लवकरच या कामात त्याला गोडी निर्माण झाली व तो शेअरबाजारात आत्मविश्वासपूर्वक वावरू लागला. १८९४ मध्ये अँटनला शेअरबाजाराच्या पुढील शिक्षणासाठी लंडनला पाठविण्यात आले. इकडे आयंटहोव्हेनचा जेरार्डचा कारखाना पहिली काही वर्षे तोट्यातच चालत होता. भावाच्या मदतीसाठी अँटनला आयंटहोव्हेनला येण्याची विनंती करण्यात आली. प्रथम सहा महिने विक्रेता म्हणून ‘फिलिप्स अँड कंपनी’त काम करावयाचे अँटनने मान्य केले व त्याप्रमाणे तो १८९५ च्या प्रारंभी आयंटहोव्हेनला परतला.

जेरार्डने उद्योगाची तांत्रिक व अँटनने व्यापारी बाजू सांभाळावी, अशी त्यावेळी व्यवस्था करण्यात आली. तथापि थोड्याच दिवसांत अँटनने तांत्रिक बाबीही दीर्घ परिश्रमांनी व चिकाटीने आत्मसात केल्या. १८९५ मध्ये कंपनीचे दिव्यांचे उत्पादन प्रतिदिनी ५०० नग असे होऊ लागले आणि कंपनीला थोडा थोडा नफा होऊ लागला. अँटनने लवकरच आपले विक्रेत्याचे कौशल्य पणास लावून धंद्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली. त्याच्या बोलण्यातील सफाई, आर्जवीपणा आणि सौजन्यशील वागणूक यांमुळे नवीन मालाची विक्री होण्यातील अडथळे दूर होत असत.

जर्मन शहरांना व गावांना विक्रेता म्हणून भेटी देत असतानाच अँटनच्या मनावर जर्मन उद्योगांनी केलेल्या अफाट प्रगतीचा फार मोठा परिणाम झाला. ब्रॅबंट भागातील आयंटहोव्हेन येथे उभारण्यात आलेल्या फिलिप्स कारखान्यामध्ये येणारे कमी उत्पादन परिव्यय, जेरार्ड फिलिप्सची तांत्रिक विषयातील अफाट बुद्धिमत्ता आणि अँटनचे उत्कृष्ट विक्रीकौशल्य या तिन्ही गुणांमुळे यूरोपच्या औद्योगिक बाजारात ‘फिलिप्स अँड कंपनी’ ला फार मोठे यश लाभण्याची शक्यता अँटनला जाणवू लागली.

फिलिप्स उद्योगसमूहाचे आद्य केंद्र आयंटहोव्हेनकंपनीला १८९५-९६ या पहिल्या आर्थिक वर्षात सु.१,२०० पौंड नफा मिळाला. त्यातूनच फिलिप्स बंधूंनी आधुनिक यंत्रसामग्री आणि उपकरणे खरेदी करून कारखाना सुसज्‍ज बनविला. १८९५ मधील १,०९,००० नग दिव्यांच्या उत्पादनावरून १८९६ मधील उत्पादन २·८० लक्ष नगांवर गेले. जेरार्ड व अँटन यांच्यामध्ये पुढेपुढे अधिक उत्पादन की अधिक विक्री अशी जणू स्पर्धाच सुरू झाली. १८९७ मध्ये दिव्यांचे उत्पादन ६·३० लक्ष नग झाले. कामगारांची संख्याही याच काळात ६० वरून १७० वर गेली. ९ जून १८९९ रोजी अँटनचा रॉटरडॅम म्युनिसिपल वर्क्सचे संचालक जी.जे.डी. जाँग यांच्या ॲना नावाच्या मुलीशी विवाह झाला.


जर्मनीमध्ये आपल्या मालाचा जम बसविल्यानंतर अँटनने आपला मोर्चा रशियाकडे वळविला. फिलिप्स बंधूंनी जर्मनीपेक्षा रशियन बाजारपेठेवर आपले लक्ष केंद्रित केले. उत्पादनाचा वेग जसजसा वाढत गेला, उदा., १८९८ मधील १२ लक्ष दिव्यांवरून १८९९ मधील उत्पादन १८ लक्ष दिवे, तसतशी कामगार संख्याही वाढत गेली. १ एप्रिल १८९९ रोजी अँटनला वडील व थोरला भाऊ यांप्रमाणे फिलिप्स कंपनीचा तिसरा समान भागीदार करण्यात आले. १९०१ व १९०२ मध्ये अँटनचे सपत्‍नीक रशियाचा व स्पेनचा यशस्वी व्यवसायदौरा केला. १९०२ मध्ये ड्युसेलडॉर्फ येथे भरविण्यात आलेल्या मोठ्या औद्योगिक प्रदर्शनात फिलिप्स कंपनीने आपले दिवे सर्वत्र लावण्याचे अधिकार मिळविले. सप्टेंबर १९०३ मध्ये झालेल्या एका करारान्‍वये तीन सर्वांत मोठ्या दिव्यांच्या कारखानदारांची विक्रीसंघटना स्थापन करण्यात येऊन तिचे मुख्यालय बर्लिन येथे ठेवण्यात आले. यानंतर अनेक कंपन्या या संघटनेच्या सदस्य झाल्या. अँटनची या संघटनेचे व्यवस्थापन करण्यासाठी ६ महिने बर्लिन येथे नियुक्ती करण्यात आली. ‘फिलिप्स कंपनी’ ला एक प्रमुख यूरोपीय कारखानदार म्हणून मिळालेली मान्यता म्हणजे अँटनच्या कौशल्याला व कर्तृत्वाला लोकांनी दिलेली पावतीच होती. वयाच्या अवघ्या एकुणतिसाव्या वर्षी अँटनला ‘एईजी’ कंपनीच्या संचालक मंडळावर निमंत्रित करण्यात आले तसेच बूडापेस्टमधील एका कारखान्याचे संचालकपदही त्याला देण्यात आले. १९०८ मध्ये कामगारसंख्या १,०५० झाली. ही वाढ  म्हणजे फिलिप्स कंपनीच्या मोठ्या प्रमाणातील विस्तार धोरणाची व महत्त्वाच्या तांत्रिक नवप्रवर्तनाची (ओतीव टंगस्टन तारेचा वापर करून धातवीय तंतुदीपाची निर्मिती) निशाणीच होती. अशा प्रकारच्या तंतुदीपाच्या निर्मितीस सीमेन्स-हॉल्स्क या जर्मन कंपनीने १९०५ मध्येच प्रारंभ केला होता. जेरार्डचे टंगस्टनवर संशोधनकार्य चालूच होते. अखेरीस जेरार्डला टंगस्टनची तार वापरून धातवीय तंतुदीप निर्माण करण्याची तांत्रिक पद्धत सापडली आणि त्यायोगे फिलिप्स कंपनीला आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महत्त्वाचे स्थान मिळवण्याची शक्यता निर्माण झाली. या नव्या प्रक्रियेमुळे नवी यंत्रसामाग्री, नवीन नोकरवर्ग, कामगार, जागेची वाढ अशा अनेक आवश्यक बाबी कार्यवाहीत आणाव्या लागल्या. व्यापार विभागचाही १९०७-०८ मध्ये विस्तार करण्यात आला.

 अँटन फिलिप्स हा फिलिप्स उत्पादने ज्या ज्या देशांत विकली जावयाची, तेथील विक्रेत्या- प्रतिनिधींना विशेष प्रशिक्षण देत असे. तो स्वतःच्या प्रतिनिधींबरोबर त्या त्या देशांत जात असे. त्या त्या विक्रेत्याचे विक्रय कौशल्य व सामर्थ्य अजमावणे आणि त्या प्रदेशातील बाजार परिस्थितीचे अद्ययावत ज्ञान मिळविणे, असे त्याचे दुहेरी हेतू असत. ग्राहकाची प्रत्येक इच्छा, प्रत्येक तक्रार, प्रत्येक स्थानिक वैशिष्ट्य लक्षात घेऊन व सर्व व्यवसायसंबंध हे आपलेच आहेत असे समजून धंदा वाढविला  पाहिजे, असे अँटनचे मत होते. 

आयंटहोव्हेन येथे १९०९ मध्ये सुसज्‍ज अशी रासायनिक प्रयोगशाळा उभारण्यात आली. १९१७ मध्ये कंपनीत ३,७५० पर्यंत कामगारसंख्या वाढली. पहिल्या महायुद्धकाळात कंपनीने लहान आकाराचे, अत्यंत बचतीचे परंतु प्रकाशमान दिव्यांचे उत्पादन सुरू केले. ‘आर्गा’ नावाच्या घरगुती वापराच्या दिव्यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होऊ लागले. काचेच्या दिव्यांच्या पुरवठ्यात अडचणी येऊ लागल्या, तेव्हा अँटनच्या सूचनेवरून कंपनीने स्वतःचाच काचदिवे निर्मितीचा कारखाना उभारला. फिलिप्स कंपनीच्या भौतिकीय प्रयोगशाळेकडे क्ष-किरण नलिका दुरूस्ती, रेडिओ व्हॉल्व्ह निर्मिती इत्यादींसाठी मागण्या येऊ लागल्या. जेरार्ड फिलिप्सचे तंत्रज्ञान व विज्ञान यांमधील कौशल्य पाहून ‘डेल्फ्‌ट तांत्रिका महाविद्यालया’ने जेरार्डला सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान केली (८ जानेवारी १९१७०). या वेळी जेरार्ड ६० वर्षांचा व अँटन ४४ वर्षांचा होता. ९ जानेवारी १९१९ रोजी अँटनने ब्रूसेल्स येथे फिलिप्सचा पहिला दुय्यम कारखाना उभारला. या कारखान्यातून दिवे, मोटारगाडीचे दिवे, प्रक्षेपण दिवे इत्यादींची निर्मिती होऊ लागली. जेरार्ड फिलिप्स १ एप्रिल १९२२ रोजी निवृत्त झाला. वीस वर्षांनी तो आयंटहोव्हेन येथे मरण पावला, तेव्हा फिलिप्स आणि कंपनीचे पहिले भागीदारीचे पर्व समाप्त झाले. जेरार्ड-अँटन या भागीदारीने हॉलंडमध्ये प्रदीप्त दिव्यांच्या निर्मितीबाबत उच्चांक प्रस्थापित केला. यानंतर अँटन फिलिप्सवरच फिलिप्स उद्योगाचे नेतृत्व येऊन पडले. त्याच्या गतिमान धोरणाने फिलिप्स उद्योगाच्या नॉर्वे, स्वीडन, इटली, फिनलंड, चेकोस्लोव्हाकिया, ब्राझील, इंग्‍लंड, डेन्मार्क, ऑस्ट्रिया, स्पेन, हंगेरी, जर्मनी, ऑस्ट्रेलिया इ. देशांत दुय्यम कंपन्या उभारण्यात आल्या. अँटनला अनेक विद्यापीठांकडून सन्माननीय डॉक्टरेट पदव्या आणि इतरही किताब मिळाले. न्यूझीलंड, रूमानिया, द. आफ्रिका, आयर्लंड, भारत (फेब्रु. १९३०) याही देशांत फिलिप्स कंपन्यांची स्थापना करण्यात आली. भारतात स्थापन झालेली फिलिप्स कंपनी सांप्रत आपला सुवर्णमहोत्सव साजरा करीत आहे. वयाच्या सत्याहत्तराव्या वर्षी अँटनचे आयंटहोव्हेन येथे निधन झाले.

फिलिप्स कंपनीच्या १९४७ मधील ५०० लक्ष पौंडांच्या उलाढालीवरून १९५१ मध्ये ती १० कोटी पौंडांवर पोहचली. याच सालांतील कामगारसंख्या अनुक्रमे ७७,००० व १ लक्ष होती. १९६५ मध्ये जगभर विखुरलेल्या व नेदर्लंड्‌समधील विविध फिलिप्स कारखान्यांतील कामगारसंख्या अनुक्रमे २·५२ लक्ष व ८७,००० होती. 

फिलिप्स उद्योगसमूहाचे कुशल नेतृत्व अँटनच्या मूत्यूनंतर त्याचा मुलगा फ्रेडरिक (फ्रिट्‌स) फिलिप्स याने (१६ एप्रिल १९०५-   ) चालविले. १९४६ पासून १९७७ पर्यंत विविध उच्च पदांवर राहून त्याने फिलिप्स उद्योगसमूहाची धुरा वाहिली. १९७८ मध्ये त्याने फॉर्टि फाइव्ह यिअर्स विथ फिलिप्स हे पुस्तक लिहून प्रसिद्ध केले.  

सध्या फिलिप्स उद्योगसमूहाचे खालील विभागांनुसार उत्पादन चालते : (१) प्रकाश, उपकरणे (रेडिओ, ग्रामोफोन, दूरचित्रवाणी), (२) दूरसंचरण व संरक्षण सामग्री, (३) क्ष-किरण यंत्रे व वैद्यकीय साहित्य, (४) तदनुषंगी उद्योग व काचसामान आणि (५) औषधे-रसायने. 

यानंतर आयंटहोव्हेन येथे नवीन औद्योगिक उत्पादनाचे विभाग निर्माण करण्यात आले. त्यांमध्ये ‘संगीत विभाग-ध्वनिमुद्रण’ हा १९५० मध्ये स्थापन करण्यात आला. त्यानंतर ‘औद्योगिक उपकरणे व साधनसामग्री विभाग’ (आयकोमा), तर १९५७ मध्ये ‘गृहोपयोगी उपकरणनिर्मिती विभाग’ स्थापन करण्यात आला. १९६४ मध्ये ‘संगणक विभाग’ उभारण्यात आला. १९६५ मध्ये ‘इल्‌कोमा’ (इलेक्ट्रॉनिक काँपोनंटस् अँड मटीरिअल्स-इलेक्ट्रॉनीय उपकरणे व साहित्य) हा विभाग स्थापन करण्यात आला.

अँटन फिलिप्सचा मुलगा फ्रेडरिक (फ्रिट्‌स) याच्या अध्यक्षतेखाली फिलिप्स उद्योगसमूहाचा कार्य-विस्तार विविधांगांनी वाढत गेल्याचे दिसून येते. कंपनीच्या १९६१ च्या ५,६७० लक्ष पौंड उलाढालीवरून १९६५ मध्ये ८,६७० लक्ष पौंड उलाढाल झाली. यामागे तांत्रिक गुणवत्ता, उपयोजित शास्त्राचे यश, संघटनकौशल्य आणि कंपनीमधील प्रत्येक कर्मचार्‍याची आत्मीयता हे गुण एकवटलेले आहेत.  

प्रथमतः विजेचे दिवे, रेडिओ व दूरचित्रवाणी संच यांचा उत्पादक म्हणून फिलिप्स उद्योग ओळखला जात होता, परंतु नंतर नवनवीन वस्तू व वस्तुसमूह यांच्या उत्पादनामुळे फिलिप्स कंपनीची वैशिष्ट्यपूर्ण अशी प्रतिमा जनमानसात निर्माण होऊ लागली. गृहोपयोगी उपकरणांचे उत्पादन फिलिप्स कंपनीने सुरू केले आणि आरामप्रद व चैनीच्या वस्तूही सामान्य माणसांपर्यंत आणण्याचे काम तिने चालविले. दुसऱ्या महायुद्धापूर्वी काही काळ ‘ फिलिशेव्ह’ नावाचे कोरड्या स्थितीत दाढी करण्याचे उपकरण कंपनीने बाजारात आणले व ते अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय ठरले. अन्न तात्काळ थंड करणारा प्रशीतक (डीप फ्रीझर), सूक्ष्मतरंगांवर कार्य करणारी भट्टी (मायक्रोवेव्ह ओव्हन) ही कंपनीची  नवी उत्पादने होत. १९५१ च्या सुमारास फिलिप्स कंपनीचा दूरचित्रवाणी संच घरोघरी वापरला जात होता. आता त्याचाच उपयोग उद्योग व शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात होत आहे. रंगीत दूरचित्रवाणीच्या क्षेत्रास तर ‘प्लंबिकॉन’ नावाची दूरचित्रवाणी कॅमेरा नलिका फिलिप्स कंपनीने तयार केली असून ती एकरंगी वा रंगीत दूरचित्रवाणी संचांसाठी वापरता येते. अमेरिकेत तर प्लंबिकॉनचा उपयोग सर्वसाधारण दूरचित्रवाणी प्रक्षेपण केंद्रे व औद्योगिक प्रक्रियांमध्ये वापरण्यात येणारी दूरचित्रवाणी केंद्रे यांमध्ये करण्यात येतो. दृश्याचे तबकडीवर मुद्रण करणाऱिया ‘दृश्य अभिलेखक’ (व्हिडिओ रेकॉर्डर) या फिलिप्सच्या नवीन उपकरणाचे प्रचंड प्रमाणावर उत्पादन अद्यापि झाले नाही. फिलिप्स ध्वनी फीतमुद्रक अतिशय लोकप्रिय झाले आहेत. फिलिप्सने उत्पादित केलेल्या ‘फिलिकोर्डा’ ह्या इलेक्ट्रॉनीय संगीत उपकरणामुळे घरबसल्या संगीताचे श्रवणसौख्य मिळण्याची सोय झाली आहे. ७०-३५ मिमी. फिलिप्स प्रक्षेपकाच्या योगे चित्रपटवितरक व  चित्रपटगृहचालक यांना दूरचित्रवाणी उद्योगाला धंद्याच्या दृष्टीने तोंड देता येणे शक्य झाले आहे. फिलिप्सची अनुवाद यंत्रेही मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. क्ष-किरण यंत्रे व तदनुषंगिक अनेक उपकरणे, अणुभट्टीसाठी आवश्यक असणारी नियंत्रण-उपकरणेदेखील फिलिप्सच्या आयंटहोव्हेन कारखान्यात बनविली जातात.

अशा तऱ्हेने फिलिप्स उद्योग प्रकाश निर्मितीपासून वनस्पतिरोगांवरील औषधे, लशी आणि जीवनसत्वे यांच्या उत्पादनापर्यंत कार्यशील आहे. 

गद्रे, वि. रा.