मुद्रांक : (स्टँप). शासनाची शुल्कनिदर्शक अशी मुद्रा किंवा निशाणी छापलेली अधिकृत तिकिटे, प्रपत्रे किंवा लेख. न्यायालयीन किंवा कायदेशीर बाबी, व्यापारी दस्तऐवज, मालमत्तेचे हस्तांतर किंवा तत्सम असे लेखी व्यवहार करण्यासाठी मुद्रांक आवश्यक असतात व शासनाच्या महसुली उत्पन्नाचे ते एक मोठे साधन असते. मुद्रांक आणि पोस्टाची तिकिटे यांत मात्र फरक आहे. मुद्रांक शुल्क करारासारखे असते, तर पोस्टाची तिकिटे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या सेवेच्या मोबदल्याची निदर्शक असतात. सर्व देशांत शासन मुद्रांकाच्या रूपाने विविध प्रकारच्या व्यवहारांवर शुल्क आकारीत असते. भारतीय संविधानातील तरतुदीनुसार केंद्र आणि राज्य सरकारांच्या अखत्यारीतील मुद्रांकांबद्दल तरतुदी केलेल्या आहेत. संविधानातील सातव्या अनुसूचीखालील केंद्र शासनाच्या यादीत ९१ क्रमांकाच्या कलमाखाली विनिमयपत्रे, धनादेश, वाचनचिठ्ठ्या, भरणपत्रे, पतपत्रे, विमापत्रे, भागांचे हस्तांतरण, ऋणपत्रे, प्रतिपत्रे व पावत्या यांच्या संबंधातील मुद्रांक शुल्कांचे दर ठरविण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्याप्रमाणे ‘भारतीय मुद्रांक अधिनियमा’मध्ये (१८९९) वेळोवेळी दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. राज्य सरकारच्या अखत्यारीतील मुद्रांक शुल्काच्या बाबी सातव्या अनुसूचीखाली राज्यसूचीच्या ६३ व्या कलमात सूचित केल्या आहेत. केंद्र सरकारच्या यादीतील बाबी सोडून इतर बाबतींत राज्य शासन मुद्रांक शुल्कांचे दर ठरवू शकते. मात्र समाईक सूचीतही मुद्रांकशुल्क हा विषय असल्याने या बाबतीत केंद्र शासन राज्य शासनाच्या अधिकाराला बाजूला सारू शकते. महाराष्ट्रात १९५८ सालच्या ‘मुंबई मुद्रांकशुल्क अधिनियमा’त अनेक दुरुस्त्या करण्यात येऊन १० डिसेंबर १९८४ पासून हा सुधारित अधिनियम अंमलात आला आहे. या अधिनियमान्वये काही बाबींत शंभर टक्के मुद्रांकशुल्क आकारण्यात आले आहे, तर निरनिराळे दस्तऐवज व कायदेशीर व्यवहार यांत मुद्रांकशुल्क वगळण्यात आले आहे.

मुद्रांकाचे दोन प्रकार आढळतात. पोस्टाच्या तिकिटासारखे कागदावर चिकटवण्याजोगे काही मुद्रांक असतात तर लिहिण्यासाठी पुष्कळ जागा कोरी सोडून दर्शनी शिरोभागी शुल्कनिर्देश व शासनाची अधिकृत निशाणी छापलेले असे मुद्रांक असतात. त्यांना अनुक्रमे ‘चिकटाऊ’ व ‘कोरामुद्रित’ मुद्रांक असे म्हणता येईल. चिकटाऊ मुद्रांक काही विशिष्ट बाबींच्या दस्तऐवजांनाच वापरता येतात. उदा., भारताबाहेर झालेल्या भारतीय व्यवहारांबद्दलच्या हुंड्या व वचनपत्रे. त्यामानाने कोरामुद्रित मुद्रांकांवर करावयाच्या दस्तऐवजांचीच संख्या अधिक आहे. मुद्रांक अधिनियमान्वये योग्य मुद्रांकापेक्षा कमी मुदांकाचे लेख किंवा कागदपत्रे तसेच मुद्रांकविरहित कागदपत्रे न्यायालयीन पुराव्यात ग्राह्य ठरत नाहीत. महसूल अधिकाऱ्याकडे अशी सदोष पत्रे पाठवून, योग्य त्या मुद्रांकाची व दंडाची रक्कम वसूल करण्यासाठी पाठविण्याचा न्यायालयास अधिकार असतो. या रकमा न्यायालयात भरल्या, तर संबंधित कागदपत्रे पुराव्यात ग्राह्य ठरतात. परदेशांतील भारतात न्यायालयप्रविष्ट बाबींसंबंधीच्या कागदपत्रांबद्दल भारतातही ठराविक मुदतीच्या आत त्यावरील योग्य ते मुद्रांकशुल्क भरावे लागते.

न्यायालय शुल्काबद्दलही चिकटाऊ व कोरामुद्रित असे दोन्ही प्रकारचे मुद्रांक वापरावे लागतात. न्यायालय शुल्क अधिनियमानुसार अशा मुद्रांकांचे दर ठरविलेले असतात. मुंबई मुद्रांक अधिनियम १९५८ नुसार दत्तकपत्र, प्रतिज्ञापत्र, कर्जरोखे, खरेदीपत्रे यांसारख्या अनेक लेखी व्यवहारांसाठी कोणत्या दराचे मुद्रांक वापरावयाचे, हे निश्चत करण्यात आलेले आहे.

जाधव, रा. ग.