दुकाने व विक्रीकेंद्रे : वस्तू व सेवा यांचे गिऱ्हाइकांना वाटप करण्याची ठिकाणे. उत्पादक व कारखानदार वस्तू व सेवा यांचे उत्पादन, गिऱ्हाइकांनी त्यांची खरेदी करावी व त्यांचा उपभोग घ्यावा म्हणून करीत असतात. उत्पादनाचा हेतू केवळ मालाचा साठा करण्याचा नसून तो खपविणे हा असतो. गिऱ्हाइकांकडून मालाला सतत मागणी येत रहावी व आपल्या मालाची वाढत्या प्रमाणावर विक्री करून ती मागणी आपणास पुरविता यावी, या उद्देशाने कारखानदार मालाचे उत्पादन करीत असतात. म्हणूनच उत्पादित मालाचा व सेवांचा गिऱ्हाइकांकडून त्वरित उठाव व्हावा यासाठी गिऱ्हाइकांना माल अगर सेवा जेथे उपलब्ध होतील, अशी ठिकाणे निश्चित करून त्या ठिकाणी विक्रीची व्यवस्था करावी लागते. अशा ठिकाणांना दुकाने किंवा विक्रीकेंद्रे असे म्हणतात.

दुकानांचे अनेक प्रकार आहेत. काही दुकाने घाऊक विक्री करतात, तर काही किरकोळ विक्रीव्यवसाय करतात. काही खाजगी व्यापाऱ्यांची असतात, तर काही शासनाने अथवा सहकारी संस्थांनी चालविलेली असतात. काही मर्यादित वस्तूंची विक्री करणारी व्यक्तिगत दुकानदारांनी लहान प्रमाणावर चालविलेली असतात, तर काही अनेक वस्तूंची विक्री करणारी, संयुक्त भांडवल कंपन्यांनी चालविलेली, मोठ्या प्रमाणावर विक्रीची उलाढाल करणारी असतात. दुकानांची ही विविधता पुढील पानावरील तक्त्यावरून स्पष्ट होते.

दुकाने व विक्रीकेंद्रे - १. हँडलूम हाउस, मुंबई : प्रदर्शन कक्ष. २. हँडलूम हाउस, मुंबई : गृहशोभन-वस्तूंचे दालन. ३. स्वदेशी बाजार, मुंबई : जडजवाहिराचे दालन. ४. लक्ष्मी रोड : पुण्याची गजबजलेली बाजारपेठ. ५. स्वदेशी बाजार, मुंबई : भेटवस्तूंचे दालन. ६. हँडलूम हाउस, मुंबई : तयार कपड्यांचे दालन.


एक काळ असा होता की, वस्तूंचे उत्पादन करणारे थोडे व त्यांच्या मालाला मागणी मोठी असे. अशा परिस्थितीत उत्पादक आपल्या मर्जीप्रमाणे मालाचे वाटप करीत. गरजू गिऱ्हाइकांना विक्रेत्याच्या सर्व अटी मान्य कराव्या लागत व त्याच्या कारखान्यातून किंवा गुदामातून तो म्हणेल त्या किंमतीस माल स्वतः घेऊन जाण्याचा खटाटोप त्यांना करावा लागे. जसजशी कारखान्यांची संख्या वाढू लागली व त्यांच्यामध्ये विक्रीसाठी स्पर्धा सुरू झाली, तसतसे वाटप व्यवसायाचे महत्त्व वाढत गेले. वाटप–संघटना कार्यक्षम करण्याची जरूरी निर्माण झाली व दुकाने आणि विक्रीकेंद्रे केवळ गिऱ्हाइकांना माल पुरविण्यासाठीच नव्हे, तर त्यांना आकर्षून घेण्यासाठी कशी चालवावीत, या प्रश्नाकडे जास्त लक्ष पुरविले जाऊ लागले.

मालाची घाऊक विक्री करणारे व्यापारी ठोक प्रमाणावर कारखानदारांकडून माल विकत घेतात, त्याची वाहतूक करतात, खप होईपर्यंत त्याचा गुदामात साठा करतात, मालाच्या सुरक्षिततेची आणि दर्जा टिकविण्याची व्यवस्था करतात, तो खपविण्यासाठी त्यावर आवश्यक त्या प्रक्रिया करतात, जरूर तेवढी मालाची जाहिरात करतात व किरकोळीने तो माल गिऱ्हाइकांना विकणाऱ्या व्यापाऱ्यांना जरूर तेव्हा, हवा तितका, रोखीने किंवा उधारीने पुरवितात. थोडक्यात, उत्पादक किंवा कारखानदार व किरकोळ विक्रेते यांना सांधणारा दुवा म्हणून घाऊक व्यापारी काम करतात. अशा परंपरागत वाटपव्यवस्थेत कारखानदारास दुकाने किंवा विक्रीकेंद्रे काढण्याची गरज भासत नाही. तो आपल्या विक्री विभागामार्फत घाऊक व्यापाऱ्यांशी संपर्क साधतो, त्यांना जाहिरातीने किंवा परिपत्रकाने मालाची माहिती पुरवितो, विक्रीच्या अटी कळवितो व घाऊक व्यापाऱ्यांडकून येणाऱ्या मागण्या पुरविण्याचे व किंमत वसूल करण्याचे काम कारखान्याच्या विक्री विभागाकडेच सोपवितो. त्यासाठी जरूर तर विक्री विभाग मालाचे प्रदर्शन भरवितो किंवा खरेदीदारास माल बघता येईल, अशी व्यवस्था करतो.

कारखानदार व किरकोळ विक्रेते या उभयतांच्याही दृष्टीने घाऊक व्यापारी अत्यंत महत्त्वाचे कार्य करतात. कारखानदाराच्या तयार मालाचा उठाव करून त्याला मालाच्या उत्पादनावर संपूर्ण लक्ष केंद्रीत करण्यास घाऊक व्यापारी मदत करतात. त्यांच्यामुळे माल खपविण्याचा खर्च, वेळ व त्रास यांपासून कारखानदाराची बचत होते. मालाची किंमत रोखीने देऊन घाऊक व्यापारी उत्पादकास भांडवलटंचाई भासू देत नाही. वस्तूंचे उत्पादन व उपभोग यांच्यामधील कालावधीत मालाचे जतन करण्याची व त्याच्या भावांतील चढउतारांची जोखीम तो पतकरतो आणि स्वतः माल खपविण्याची जबाबदारी स्वीकारून कारखानदाराला जाहिरातबाजीच्या दगदगीतून वाचवितो. किरकोळ व्यापाऱ्यांसही तो फार उपयोगी पडतो. किरकोळ व्यापाऱ्यांना हवा तेवढाच माल केव्हाही उपलब्ध करून देण्याची हमी घाऊक व्यापारी घेत असल्यामुळे किरकोळ व्यापाऱ्यांची अतिशय सोय होते. थोड्याशा जागेत ते आपला व्यवसाय चालवू शकतात. घाऊक व्यापाऱ्यांकडून उधारीनेसुद्धा माल मिळू शकत असल्यामुळे थोड्या भांडवलावर त्यांना विक्रीधंदा करता येतो. काही घाऊक व्यापारी इष्ट अशा आकारांचे गठ्ठे व डबे तयार करून ते किरकोळ व्यापाऱ्यांना पुरवितात व त्यांचे श्रम वाचवितात. बरेच घाऊक व्यापारी स्वतःच्या वाहनांनी किरकोळ दुकानांना त्यांच्या गरजांप्रमाणे माल पुरवितात. रोख किंमत देणाऱ्या किरकोळ व्यापाऱ्यांना सवलतीच्या दराने माल विकण्यासही घाऊक व्यापारी तयार असतात.


घाऊक व्यापाऱ्याला आपल्या विक्रीकेंद्रात मालाचे नमुने ठेवावे लागतात. तो एकाच कारखानदाराचा माल खपवितो किंवा अनेक कारखानदाराकडून माल विकत घेऊन त्याचे किरकोळ दुकानदारांना वाटप करतो. किरकोळ व्यापाऱ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरवून व त्यांचा विश्वास संपादन करून तो आपली विक्री वाढवितो. त्याला आपल्या व्यवसायाचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी पुरेसे भांडवल, गुदामे, वाहतूकव्यवस्था, विशिष्ट मालाविषयी तांत्रिक माहिती व अनुभव, कामाचा उरक होण्यासाठी आवश्यक असा कर्मचारीवर्ग आणि दळणवळणाची साधने यांची गरज भासते. काही बाबतींत जाहिरातीची जबाबदारीही तो सांभाळतो व त्यासाठी जरूर ती मदत किरकोळ व्यापाऱ्यांना देण्यास तयार असतो.

दुकाने व विक्रीकेंद्रे - १. मृत्तिकापात्रांचे खुले दुकान. २. पुण्याची मंडई : एक दृश्य. ३. शहरांतील दूधनिक्रीकेंद्र. ४. चौपाटीवरील भेळ-पुरीवाला, मुंबई. ५. शनिवारवाड्याच्या तटालगतची छोटी दुकाने, पुणे. ६. साडी-खरेदीची खास पुणेरी बेठक. ७. दूध व फळांचा रस यांचे शहरी दिमाखाचे विक्रीकेंद्रे.

किरकोळ व्यापारी मालाची विक्री किरकोळीने करीत असतात. त्यांच्या दुकानांतून ग्राहक माल खरेदी करतात. अर्थात मालाचा खप दुकानाकडे ग्राहक आकर्षित होण्यावर, आलेल्या गिऱ्हाइकांस माल विकला जाण्यावर व ते गिऱ्हाईक पुनःपुन्हा माल विकत घेण्यासाठी दुकानात येण्यावर अवलंबून असतो. यासाठी किरकोळ दुकाने ग्राहकांच्या घरांच्या शक्य तितक्या जवळ उघडावी लागतात. दुकानांतून मालाची मांडणी नीटनेटकी व आकर्षक पद्धतीने करावी लागते. ग्राहकांशी वागताना विक्रीव्यवसायातील कसब वापरावे लागते व त्यांच्या गरजा योग्य किंमतीत योग्य माल पुरवून भागविण्यास दुकानदार तत्पर आहे, अशी त्यांची खात्री पटवून द्यावी लागते. केव्हाकेव्हा गिऱ्हाइकास माल उधारीने पुरविण्याची व घरपोच पाठविण्याचीही सोय दुकानदारास करावी लागते. हे सर्व करीत असताना इतर किरकोळ विक्रीकेंद्राशी त्याला तीव्र स्पर्धा करावी लागते कारण किरकोळ विक्रीक्षेत्रात फारशी मक्तेदारी आढळत नाही. साहजिकच अल्प प्रमाणात नफा घेऊन एकूण खप जास्त होण्याकडे विशेष लक्ष पुरविल्यास त्याला पुरेसे उत्पन्न मिळू शकते. त्याचे उत्पन्न मुख्यतः मालाच्या विक्रीच्या गतीवर अवलंबून असते. म्हणून गिऱ्हाइकांच्या सदिच्छा त्याला संपादन करून त्या टिकवून ठेवाव्या लागतात.


काही कारखानदार आपल्या मालाचे वाटप करताना घाऊक व्यापाऱ्यांशी संपर्क न ठेवता, किरकोळ विक्रेत्यास परस्पर कारखान्यातून माल पुरविण्याची व्यवस्था करतात त्याच्या दुकानात आपल्या मालाची आकर्षक मांडणी करण्यास व जाहिरात करण्यास त्याला मदत करतात व योग्य त्या मोबदल्याचे त्यास आकर्षण दाखवून तो आपला माल दुकानात ठेवीलच, याची खात्री करून घेतात. अशा वेळी इतर काखान्यांत तयार झालेला तसाच माल किरकोळ दुकानदाराने आपल्या दुकानात ठेवल्यास त्याच्याशी स्पर्धा अपरिहार्य ठरते. आपल्या मालावर आपला विशिष्ट छाप (ब्रँड) मारून किंवा त्याला विशिष्ट नाव देऊन गिऱ्हाइकांवर त्याच छापाचा किंवा नावाचा माल घेण्याचा दबाव जाहिरातींद्वारा किंवा देणगीपद्धतीचा उपयोग करून ते आणतात. किरकोळ विक्रेत्याने गिऱ्हाइकांना आपल्या मालाची विशेष शिफारस करावी म्हणून त्याला खास प्रलोभनही कारखानदार देत असतात.

दुकाने व विक्रीकेंद्रे - १. आठवड्याचा बाजार. ३. ग्रंथभांडार. ३. 'मॅफ्‌को' विक्रीकेंद्र. ४. हातगाड्या : फिरती दुकाने. ५. दुचाकीवरील खेळणीविक्रेता. ६. सहकारबाजार, वांद्रे : एक दृश्य. ७. 'जय जवान' : पानाचे दुकान. ८. खुला धान्यबाजार. (९) जुना बाजार (पुणे) : एक दृश्य.

किरकोळ विक्रीची दुकाने दोन प्रकारची असतात : छोट्याशा दुकानदारांची लहान प्रमाणावर चालविलेली स्वतःच्या मालकीची दुकाने आणि संयुक्त भांडवल कंपन्यांनी चालविलेली मोठ्या प्रमाणावर विक्री करणारी साखळी दुकाने, विभागीय भांडारे किंवा टपाल विक्री व्यवसाय करणारी दुकाने, सहकारी संस्थांनी चालविलेली विक्री भांडारेही मोठ्या प्रमाणावर किरकोळ विक्री करतात [→ विभागीय भांडारे टपाल विक्री व्यवसाय सहकार]. मोठ्या प्रमाणावर किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांची संघटना, व्यवस्थापनपद्धती व विक्रीधोरणे ही लहान प्रमाणावर कार्य करणाऱ्या किरकोळ विक्री दुकानांपेक्षा काहीशी वेगळ्या स्वरूपाची असतात.


प्रत्येक गावाच्या व शहराच्या विशिष्ट भागात विक्रीकेंद्रे निर्माण होतात. काही किरकोळ विक्री दुकाने जरी शक्यतोवर ग्राहकांच्या वस्तीत आणि त्यांच्या राहत्या घरांजवळ असली, तरी किरकोळ विक्रीची बरीच मोठाली दुकाने गावाच्या मध्यवर्ती भागात, एखाद्या विशिष्ट पेठेत किंवा मध्यवर्ती रस्त्याच्या दुतर्फा उघडली जातात कारण हा विभाग गावच्या सर्वच रहिवाशांना खरेदेसाठी येण्यास मध्यवर्ती असल्याने सोईचा पडतो. अशा विभागात अनेक छोटी दुकाने किंवा मोठ्या प्रमाणावरील दुकाने असतात. त्यांच्याजवळ मालाचा साठा भरपूर व विविध प्रकारचा असल्यामुळे गिऱ्हाइकांना आपल्या पसंतीनुसार निरनिराळ्या दुकानांतील मालाचे निरीक्षण करून व किंमतींची तुलना करून खरेदीचा निर्णय घेता येतो. अशी बाजारपेठ सर्व गावांत आणि शहरांत आढळते. विशिष्ट वस्तूंची दुकानेही बाजारपेठेच्या विशिष्ट भागात एकमेकांजवळ असलेली आढळतात. नगरपालिका काही वस्तूंच्या विक्रीसाठी खास विक्रीकेंद्रे उभारून विक्रेत्यांची व गिऱ्हाइकांची सोय करतात. अलीकडे मोठमोठ्या शहरांतून विविध वस्तूंची बाजारपेठ एकत्र यावी, यासाठी सुपरबाजारांची संघटना अस्तित्वात येऊ लागली आहे. अशा विक्रीकेंद्रातून विक्रेत्यांना आवश्यक असलेल्या सुविधा पुरविण्याची व्यवस्था करावी लागते. एकाच इमारतीत गिऱ्हाइकांना हवा असलेला हरतऱ्हेचा माल विकण्याची सोय सुपरबाजारात केलेली असते [→ सुपरबाजार].

सर्व दुकानदारांना आपला व्यवसाय चालविताना त्याचे नियमन करणाऱ्या कायद्यांचे पालन करावे लागते. त्यासाठी विक्रीव्यवहारांचे सविस्तर हिशेब ठेवावे लागात. प्राप्तिकर, विक्रीकर, व्यवसायकर इ. कर भरण्यासाठी आवश्यक त्या नियमांचे परिपालन करावे लागते. दुकानांतील नोकरवर्गाच्या संरक्षणासाठी त्यांचे कामाचे तास, वेतनश्रेणी, सुट्या इत्यादींविषयी राज्यसरकारने केलेले नियमही पाळावे लागात. दुकानातील मालाची स्वच्छता, दर्जा, निर्भेळपणा यांसंबंधीच्या नियमांचेही पालन करावे लागते. शिवाय दुकानदार एखाद्या व्यावसायिक संस्थेचा सभासद असल्यास त्या संस्थेने केलेले नियम पाळण्याचीही जबाबदारी त्याच्यावर येते.

दुकाने व विक्रीकेंद्रे चालविणाऱ्यांनी जनसंपर्काचे तंत्र अनुसरणे फार महत्त्वाचे आहे. गिऱ्हाइकांशी अदबीने वागून त्यांना खूष ठेवण्यावर विक्रीव्यवसायाचा उत्कर्ष अवलंबून असतो. पोलीस, नगरपालिका कर्मचारी, विक्रीकर व प्राप्तिकर निरीक्षक, बँकांचे अधिकारी इ. अनेक क्षेत्रांतील व्यक्तींशी योग्य संपर्क ठेवून त्यांच्याकडून विक्रीव्यवसायात अडथळे निर्माण होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागते. मालपुरवठा करणारे घाऊक व्यापारी व कारखानदार यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेवून त्यांच्याकडून मालाचा पुरवठा व पतपुरवठा दुकानाच्या गरजांप्रमाणे उपलब्ध होईल, याची खात्री करून घ्यावी लागते.

खाजगी क्षेत्रातील दुकानांची कार्यक्षमता उपलब्ध वस्तू व सेवा यांचे, ग्राहकांना व्यवस्थित व सोयीस्कर असे वाटप झाल्यासच सिद्ध होते. ग्रहाकांना माल वाजवी किंमतींत व आपल्या गरजा भागविता येतील इतक्या प्रमाणात मिळाला, तरच त्यांचे समाधान होते. सामान्यतः आर्थिक परिस्थिती समाधानकारक असते, तेव्हा हा वाटपव्यवहार सुरळीत चालतो परंतु युद्धजन्य परिस्थिती, दुष्काळ अथवा अवर्षण यांमुळे होणारी उत्पादनातील घट आयातीवरील कडक निर्बंधांमुळे उद्‌भवणारी काही वस्तूंची टंचाई, साठेबाजी इ. बाबींचा परिणाम होऊन वाटपयंत्रणा ग्राहकांचे पूर्ण समाधान करण्यास असमर्थ ठरते. अशा टंचाईच्या परिस्थितीत भाववाढ अटळ ठरते व त्या भाववाढीचा परिणाम वाटपाची गती रोखण्यावर, म्हणजेच साठेबाजीचा वाढत्या प्रमाणावर अवलंब करण्यावर होतो. त्यामुळे ग्राहकांचे हाल होतात व स्थिर उत्पन्न असणाऱ्यांना आणि गरीब लोकांना भाववाढीस तोंड देणे अशक्य होते. व्यापारीवर्ग व दुकानदार यांच्या नफेबाजीच्या आणि काळ्या बाजारात वस्तू विकण्याच्या प्रवृत्तींमुळे अडचणी उत्पन्न होतात. त्यांपासून जनतेचे संरक्षण करून जीवनावश्यक वस्तू निर्वेधपणे उपलब्ध व्हाव्यात म्हणून शासनाला वाटपयंत्रणेत हस्तक्षेप करावा लागतो. खाजगी व्यापारक्षेत्रात दिसून येणाऱ्या वाढत्या अपप्रवृत्ती व जीवनावश्यक वस्तू योग्य किंमतींत जनतेस मिळाव्यात, ही शासनाची जबाबदारी असल्याने शासनाला घाऊक व किरकोळ व्यापारांत पदार्पण करावे लागते. दूध, धान्ये, रॉकेल, साखर यांसारख्या अत्यावश्यक वस्तू सरकारी विक्रीकेंद्रांतून किंवा वाजवी किंमतीच्या दुकानांमार्फत ग्राहकांना शिधापत्रिका देऊन ठराविक प्रमाणात ठराविक किंमतीस त्या उपलब्ध करून देण्याची सोय असते. इतर दुकानांतून तोच माल खुल्या किंमतीस विकण्याचीही परवानगी असते. सरकारी दुकानांतून विकल्या जाणाऱ्या मालाचा दर्जा ज्यांना असमाधानकारक वाटतो, असे ग्राहक खुल्या बाजारात अधिक किंमती देऊन हवा तेवढा माल खरेदी करण्यास तयार असतात. असे असले तरी शासकीय दुकानांची व्यवस्था, हे सरकारी भाववाढविरोधी धोरणाचे एक महत्त्वाचे साधन आहे.

पहा : व्यापार : किरकोळ व घाऊक.

 संदर्भ : Bahl, J. C. Dhongde, E. R. Elements of Commerce and Business Methods, Bombay, 1972.

धोंगडे, ए. रा.