सलाल प्रकल्प : भारताच्या जम्मू व काश्मीर राज्यातील जम्मू विभागातील चिनाब नदीवरील रियासी गावाजवळील एक भव्य जलविद्युत् प्रकल्प. त्याचे बांधकाम १९७० मध्ये सुरू झाले आणि दोन टप्प्यांत ते पूर्णही झाले. या प्रकल्पामध्ये दोन अतिशय मजबूत धरणे असून एक धरण दगडी भरावाचे तर दुसरे काँक्रीटचे बांधण्यात आले आहे. रियासी या जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणापासून उत्तरेस २१ किमी.वर ध्यानगढ गावाच्या परिसरात ते असून त्याची उंची ११३ मी. व लांबी ४५० मी. आहे. धरणाला बारा अरीय दरवाजे ( रेडिअल गेट्स ), प्रत्येकी ५.२३ मी. व्यासाची आणि एकूण २७९ मी. लांबीची सहा जलव्दारे ( पेनस्टॉक्स) बांधण्यात आली आहेत. एकूण बारा सांडव्यांतून सु. २२,५०० घमी. पाणी सोडण्यात येते.

सलाल जलविद्युत निर्मिती प्रकल्प हा एकूण ९०० मेगॉ. ( प्रत्येकी २५० मेगॉ., जनक घटक ६) विजेचे उत्पादन करीत असून पूर्णत: एकद्देशीय तंत्रविदया व विशिष्ट ज्ञान या संदर्भात राष्ट्रीय जलविद्युटशक्ती निगमाच्या अखत्यारीतील हा प्रकल्प म्हणजे या निगमाचे एक अत्यंत प्रशंसनीय व लक्षणीय कार्य समजले जाते. या प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी आतापर्यंत एकूण ९३५.५५ कोटी रू. खर्च आला आहे.

हिमाचल प्रदेश राज्याच्या लाहौळ जिल्ह्यातील चंद्रा व भागा या दोन नदी प्रवाहांच्या रूपाने चिनाब नदीचे उद्वहन होत असते. बारालाछा खिंडीमधून सु. ४,९०० मी. उंचीवरून खाली कोसळणाऱ्या एका हिमनदीपासून वरील दोन्ही नदया खाली वाहत येत असतात. त्यानंतर चिनाब नदी वायव्य दिशेने हिमाचल प्रदेश राज्याच्या चंबा जिल्ह्यामधील पांगी खोऱ्यातून सु. १६० किमी. वाहत येते आणि पुढे १,८०० मी. उंचीवर जम्मू व काश्मीर राज्याच्या प्रवेश करते. शिवालिक टेकडयांच्या घडा ( श्रेणी ) प्रदेशात ध्यानगढ टेकडी वसली असून पायथ्याशी चिनाब नदी टेकडीला वळसा घालून वाहत असते. ध्यान गढ समीपच्या नेढयावर ( लूप ) चिनाब नदीला मिळणाऱ्या नैसर्गिक जलप्रपाताचा लाभ वीजनिर्मितीकरिता होणार आहे. या भौगोलिक रचनेचा अभियंते व तंत्रज्ञ यांनी कौशल्याने व सुयोग्य प्रकारे उपयोग करून घेतला आहे.

चिनाब नदीवरील एकूण दहा प्रकल्पांपासून मिळणाऱ्या जलविद्युत् संपत्तीची क्षमता सु. ५,९०० मेगॉ. हून अधिक आहे. यांपैकी एक प्रकल्प हिमाचल प्रदेश राज्यात असून अन्य नऊ प्रकल्प सलाल प्रकल्पांतर्गत असून ते जम्मू व काश्मीर राज्यात आहेत.

सलाल धरणाच्या बांधकामाकरिता पाच लाख टनांवर सिमेंट व ५०,००० टन पोलाद एवढे साहित्य लागले. दगडी भरावाचे धरण पूर्ण करण्यासाठी तसेच जमिनीवरील दगडी भराव हलविण्याकरिता सु. २५० विविध प्रकारची अवजड यंत्रसामगी आणि त्याकरिता २,००० कुशल कामगारांची नियुक्ती करण्यात आली होती. या धरणाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी अभियंत्यांच्या माहितीनुसार सलाल प्रकल्पाचा पहिला टप्पा नोव्हेंबर १९८७ मध्ये, तर दुसरा टप्प्यातील अंतिम घटक १९९५ मध्ये कार्यान्वित झाला. या प्रकल्पापासून उत्तर जालकाला वीज पुरविली जाते आणि त्या जालकापासून जम्मू व काश्मीर, पंजाब, हरयाना, दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश या राज्यांना व चंडीगढ या केंद्रशासित प्रदेशास विजेचे वितरण केले जाते.

वरील दोन्ही टप्प्यांतून निर्माण केलेली वीज उत्तर जालकाकडे दोन द्वि-मंडलीय सलाल-किशनपूर मार्ग आणि दोन एक-मंडलीय सलाल-जम्मू मार्ग अशा चार २२० किलो-वॉल्ट परिषण-मार्गांनी वाहित केली जाते. आतापर्यंत या प्रकल्पापासून सु. २२,००० दशलक्ष एकक वीज निर्माण करण्यात आली आहे.

रियासी विभागात हा प्रकल्प येत असल्यामुळे सबंध प्रकल्पाच्या परिसरात एका नवीन नागरी संस्कृतीचा शुभारंभ झाल्याचे भासते. प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीतीने सलाल प्रकल्पाच्या योगे स्थानिक नागरिकांना एक प्रकारचे वैभव व समृद्धी प्राप्त झाली असून हा प्रकल्प त्यांच्या बाबतीत वरदान ठरला आहे. वनरोपण कार्यकमांतर्गत ६.५ लक्षांहून अधिक रोपांची लागवड करण्यात आली त्यांपैकी ५.३४ लक्ष रोपांचे पूर्ण वृक्षात रूपांतर झाले.

गद्रे, वि. रा.