व्यवसाय संशोधन : (बिझनिस् रिसर्च), उद्योग-व्यवसाय-क्षेत्रात अन्वेषण वा संशोधन करणारी ज्ञानशाखा. उद्योग-व्यवसायाच्या विशिष्ट क्षेत्रातील तथ्ये व आकडेवारी यांचे संकलन, विश्लेषण, मूल्यमापन व त्यांच्या आधारे काढलेले निष्कर्ष असे सामान्यपणे व्यवसाय संशोधनाचे स्वरूप असते. व्यवसाय संशोधन करताना सामान्यत: शास्त्रीय पद्धती अनुसरली जाते. निरीक्षण, गृहीतक, पूर्वानुमान व पडताळणी अशा त्या पद्धतीच्या चार पायऱ्या होत. संशोधनासाठी निरीक्षण पद्धतशीरपणे व कमी खर्चात होईल, अशी व्यवस्था करावी लागते. निरीक्षणावरून कही गृहीतके सहजासहजी सुचतात. जी गृहीतके सिद्ध होण्याजोगी आहेत, त्यांच्या आधारे काही व्यावसायिक पूर्वानुमाने बांधावी लागतात आणि प्रत्यक्ष कसोट्या लावून ती सिद्ध होतात की नाही, हे तपासून पहावे लागते. व्यवसाय संशोधनात कसोट्या लावण्याचे काम करण्यासाठी विशेष ज्ञान व कौशल्य यांची गरज असते.

व्यवसाय संशोधनाच्या सैद्धांतिक व उपयोजित अशा दोन शाखा त्यांच्या स्वरूपानुसार पडतात. सैद्धांतिक व व्यवसाय संशोधन केवळ ज्ञानजिज्ञासेपोटी केले जाते. ते त्या क्षेत्रातील ज्ञानाच्या कक्षा रुंदावणारे, व्यवहार-निरपेक्ष, विशुद्ध व केवलस्वरूपी संशोधन असते. अशा शुद्ध, निरपेक्ष संशोधनामुळे ज्ञात झालेल्या सैद्धांतिक कल्पनांचा पुढेमागे व्यवसायात बहुमोल उपयोग होऊ शकतो. त्यांच्या आधारेच व्यावहारिक दृष्ट्या उपयुक्त ठरणारे पुढील संशोधन करता येते. विशिष्ट स्थलकाल परिस्थितीत उदभवणाऱ्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी केले जाणारे व्यवसाय संशोधन म्हणजे उपयोजित संशोधन होय. उपयोजित संशोधनात मुख्यत: व्यवसाय-क्षेत्रातील तथ्य-संकलन, विश्लेषण व त्या आधारे निष्कर्ष हे टप्पे असतात. अशा संशोधनात सांख्यिकी व गणित यांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. व्यवसाय संशोधनाचे हे दोन्ही प्रकार परस्पर पूरक होत. सैद्धांतिक संशोधनामुळे उपयोजित संशोधनास मार्गदर्शन होते, तर उपयोजित संशोधनामुळे सैद्धांतिक संशोधनाला चालना मिळते. पूर्वी शुद्ध व सैद्धांतिक संशोधन हे प्राय: विद्यापीठीय प्राध्यापकांनीच करावयाचे, अशी समजूत असल्याने ते केवळ अकादमिक पातळीवर स्वतंत्र रीत्या केले जाई. दुसऱ्या महायुद्धानंतर मात्र ही परिस्थिती पालटली. व्यवसायात गुंतलेल्या व्यक्ती, अन्य संस्था व कंपन्या यांनीही निरपेक्ष व शुद्ध संशोधनाला साहाय्य करण्यास सुरुवात केली. व्यवसायवाढीसाठी त्याचा लाभ होऊ लागला. व्यवसायवाढीच्या मार्गात ज्या अडचणी किंवा समस्या निर्माण होतात, त्या सोडविण्यासाठी व्यवसाय संशोधनाचा मुख्यत: उपयोग होऊ शकतो. त्या त्या समस्येनुसार संशोधनाच्या पद्धतीत किंवा आखणीत थोडाफार फरक करावा लागतो. उपलब्ध असणारा वेळ, पैसा, त्या समस्येची संबंधित अशा माहितीची कमी-अधिक उपलब्धता इ. घटकांमुळे संशोधनावर मर्यादा पडतात.

व्यवसाय संशोधन स्थूलमानाने पुढीलप्रमाणे केले जाते : अगदी प्रारंभी समस्येची रूपरेषा निश्चित करावी लागते. व्यवसाय चालविताना आलेल्या अडचणी व अनुभव यांच्या आधारे समस्येची स्थूलमानाने जाणीव होते, पण ती पुरेशी नसते. त्या समस्येचे सर्वांगीण स्वरूप अगदी स्पष्टपणे मांडावे लागते. त्यामुळे संशोधनाची उद्दिष्टे सुस्पष्ट व मर्यादित होतात. त्यानंतर त्या समस्येविषयी उपलब्ध असलेली माहिती जमा केली जाते. अधिक माहितीची आवश्यकता भासल्यास ती कोठून मिळवायची, याचीही आखणी करावी लागते. प्रश्नावली तयार करायची की नुसत्याच मुलाखती घ्यावयाच्या, किती कालमऱ्यादेपर्यंतची माहिती जमवावयाची, हेही ठरवावे लागते. माहिती जमा केल्यानंतर तिचे संकलन व एकत्रीकरण करण्यात येते. हे काम बरेचसे तांत्रिक स्वरूपाचे असते. संकलित माहितीचा अन्वयार्थ लावून अखेरीस निष्कर्ष काढला जातो. या निष्कर्षामधून व्यवसायातील समस्यांवर उत्तर सापडू शकते. अर्थात प्रत्येक समस्येवरील संशोधन यशस्वी होईलच, असे नाही.

व्यवसाय संशोधनाचे प्रकार : (अ) बाजारपेठांचे संशोधन : ग्राहकांचा, त्यांच्या क्रयशक्तीचा व प्रेरणांचा अभ्यातस करणे, संभाव्य ग्राहकांचा शोध घेणे, ग्राहक कोणत्या वस्तू वापरतात व त्याच का वापरतात, तसेच त्या वस्तूंचा केव्हा व कसा वापर करतात, या विविध प्रश्नांचा अभ्यास करणे म्हणजे बाजारपेठेचे संशोधन वा विपणन संशोधन होय. त्यात वस्तूंच्या वा मालाच्या विक्रीसंबंधी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी बाजारपेठांतील परिस्थितीचा अभ्यास करणे, वितरणपद्धतीतील दोष काढून टाकणे आणि ती अधिक निर्दोष व कार्यक्षम बनविणे या सर्व प्रक्रियांचा समावेश होतो. विपणन संशोधनामुळे विक्रय-क्षेत्राचे आकारमान निश्चित करता येते, ग्राहकांच्या आवडीनिवडींनुसार मालाचे उत्पादन व वितरण करता येते आणि त्यामुळे एकूणच विक्रय धोरण ठरविणे शक्यआ होते. (→ विपणन संशोधन).

(आ) वस्तुसंशोधन : या प्रकारात वस्तूचे तांत्रिक दृष्टिकोनातून संशोधन व विश्लेषण करून, त्या वस्तूच्या उत्पादनासाठी कोणत्या प्रकारची सामग्री किती प्रमाणात आवश्यक आहे, हे ठरविता येते. वस्तुसंशोधनामुळे उत्पादन, नियोजन व गुणवत्ता-नियंत्रण करणे, तसेच वस्तूंची मागणी व पुरवठा यांमध्ये समन्वय साधणे शक्य  होते. काही मोठ्या कंपन्यांमध्ये अशा प्रकारच्या संशोधनासाठी स्वतंत्र संशोधन व विकास विभाग असतो.

(इ) मानवी संबंधांविषयीचे संशोधन : अलीकडे वर्तनवादी शास्त्राच्या आधारे मानवी स्वभावाचे व संघटनेतील मानवी वर्तनाचे पृथक्करण केले जाते. या शास्त्रानुसार व्यवसायात काही भाकिते करून उद्‌भवणाऱ्या समस्या सोडविणे शक्य झाले आहे. मोठ्या आकाराच्या व्यवसाय संघटनांमधील व्यवस्थापकीय प्रक्रिया अधिकाधिक गुंतागुंतीची होऊ लागल्याने, व्यवसाय संशोधनातही या शास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व खूपच वाढले आहे. कामगारांच्या मानसशास्त्राचा अभ्यास व मानवी संबंध यांविषयीचे संशोधन आवश्यक बनलेले आहे. (→ वर्तनवाद : व्यवस्थापनशास्त्र).

(ई) कार्यपद्धतीचे संशोधन : दुसऱ्या महायुद्धाच्या काळात इंग्लंडमध्ये या प्रकारच्या संशोधनास सुरुवात झाली. प्रारंभी सैनिकी विषयांच्या संदर्भात संशोधनाचा उपयोग करण्यात आला. त्याचा लष्करासाठी फायदा झाला. हे लक्षात घेऊन सरकारने विविध व्यवसाय-उपक्रमांना त्यांच्या कार्यपद्धतीसंबंधी संशोधन करण्यास प्रेरणा दिली. व्यवसायाचे विभाग व खाती अनेकविध असतात, पण साधावयाचा अंतिम उद्देश एकच असतो. तो साध्य करण्यासाठी सर्वांनी यथाशक्य् कार्यक्षमतेने काम केले पाहिजे. प्रत्येक विभागाच्या किंवा खात्याच्या कार्यपद्धतीमध्ये काही अडचणी व दोष संभवतात. ते टाळण्याच्या दृष्टीने अभ्यास करणे, तसेच प्रत्येकाच्या कार्यपद्धतीत सुधारणा घडवून योग्य समन्वय साधणे शक्ये व्हावे, म्हणून कोणकोणते व कसकसे बदल केले पाहिजेत, ह्याचे अन्वेषण या संशोधनाद्वारे केले जाते. व्यवसाय संशोधनाचे काम ज्या अनेकविध संस्था व यंत्रणा यांच्यामार्फत चालते, त्यांचा निर्देश पुढीलप्रमाणे करता येईल : (१) कंपन्यांचे संशोधन विभाग, (२) एकाच व्यवसायातील वेगवेगळ्या कंपन्यांनी सहकाऱ्याने किंवा त्यांच्या संघाने चालविलेले संशोधन विभाग, (३) वैयक्तिक संशोधन-सल्लागगार, (४) कंपनीला मालाचा पुरवठा करणाऱ्या किंवा कंपनीकडून घाऊक खरेदी करणाऱ्या संस्था वा व्यक्ती, (५) महाविद्यालये व विद्यापीठे, (६) स्वतंत्र प्रतिष्ठाने, (७) व्यावसायिक प्रयोग शाळा, (८) सरकारी संशोधन विभाग इत्यादी.

व्यवसाय संशोधनाच्या कामात या व यांसारख्या अनेक संस्थांचे सहकार्य व देवाणघेवाण चालू असते. छोट्या व्यवसायांना स्वतंत्र संशोधन विभाग चालविणे परवडत नाही, म्हणून संशोधन-सल्लागार किंवा धंदेवाईक प्रयोगशाळा  यांच्या सेवा घेण्याकडे त्यांचा विशेष कल असतो व ते त्यांना परवडतेही. भारतात सरकारी संशोधन विभागांमार्फत अनेक व्यवसायांना संशोधनाची सेवा विनामूल्य पुरविली जाते.

पहा : वैज्ञानिक व औद्योगिक मानके, वैज्ञानिक संशोधन, वैज्ञानिक संस्था व संघटना.

सुराणा, पन्नालाल